Showing posts with label काहीबाही. Show all posts
Showing posts with label काहीबाही. Show all posts

Wednesday, 17 July 2024

आजीची गोष्ट ०५

(भाग ०४)

तिला शिक्षणाची हौस होती, म्हणजे किती होती! तिच्या लहानपणी तिला फारसं शाळेत जाता आलं नाही. काळही वेगळा, मुलींना शिकवण्याला फारसं महत्त्वच नव्हतं. ती ज्या खेड्यात जन्मली तिथे शाळाही नव्हती तेव्हा चौथीच्या पुढे. शिवाय घरची गरिबी.

सकाळी कामं करून शाळेत जायची, तर जाताना काही खाऊन जाणं जमत नसणार, इतकी कामाची धावपळ. तेव्हा डबा वगैरे नेण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी तीन-चार वाजता घरी यायची, तेव्हा तिच्या वाटचा गुरगुट्या भाताचा थिजून गारगुट्ट झालेला वाटीएवढा गोळा केळीच्या पानाखाली झाकून ठेवलेला असायचा. तो जेवताना तिला काय वाटत असेल? कधीच्या काळी केळीचं पान बघायला मिळणार्‍या आम्हां शहरी मुलांना केळीच्या पानावरजेवण्याचं कोण आकर्षण. गरम अन्न केळीच्या पानावर वाढलं की त्या वाफेनं केळीच्या पानावर असलेलं एक मेणसदृश रसायन वितळतं आणि अन्नात मिसळतं. त्याचा विशिष्ट वास अन्नाला येतो. तो वास मला फार आवडतो. पण आजीला त्या वासानं कसंसंच होत असे. घरी काही विशेष समारंभ वगैरे असला, एकत्र जेवणं असली की भांडी घासायला कमी असावीत, म्हणून मुद्दाम केळीची पानं आणवून घेतलेली असायची. पण ती मात्र केळीच्या पानात कदापि जेवायची नाही. तिचं जेवण ताटात. त्या नकोसेपणामागे काय-काय असेल!

इतकं करून शाळेचं शिक्षण जेमतेम चौथी पास. ती राहून गेलेली हौस तिच्यात मूळ धरून राहिली असावी. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर तिनं खूप कष्ट केले. अंकगणितात तिला गती होती. आई सांगते त्यानुसार पार डीएडच्या अभ्यासक्रमातल्या अंकगणिताच्या अडचणी ती सोडवून देत असे. मामाला गणितात फारसा रस नसायचा. शाळेतून घरी आल्यावर तो आजीला बजावून ठेवायचा, “ही रीत बघून ठेव गं गणित सोडवायची. नंतर मी विसरीन. मग तू मला सांगायला हवीस.” मग ती रीत शिकून ठेवून आजी त्याचा अभ्यास घेणार! सातवी-आठवीपासून पुढच्या शिक्षणासाठी मुलांना कुठे नणंदेकडे रत्नागिरीत, कुठे बहिणीकडे भांडूपला राहायला ठेवून त्यांच्या शिक्षणाची सोय होईलसं तिनं पाहिलं. सगळ्यांत मोठी मुलगी हुशार होती. म्हणती तर डॉक्टर होती. पण तिलाच एकटीला शिकवत बसलं, तर बाकीच्या चार मुलांची शिक्षणं कशी व्हायची? या विचारानं मावशीचं मॅट्रिकचं शिक्षण होऊन तिला नीटस नोकरी मिळाल्या मिळाल्या आजीनं पाच मुलांना ठाण्यात बिर्‍हाड थाटून दिलं. तेव्हा एखादा ब्लॉकही स्वस्तात मिळाला असता. पण पाच मुलंच राहायची, सगळ्यात मोठी मुलगी एकोणीस वर्षांची. आजूबाजूला बरीशी सोबत हवी. स्वच्छता हवी. सुरक्षितता हवी. येणंजाणं फार गैरसोयीचं नको. बरं, भाडंही पुढे त्यांचं त्यांना कमावून परवडेलसं हवं. अशा सगळ्या विचारानं तिनं एका चाळीतली तळमजल्यावरची जागा निवडली. पागडी जास्त लागणार होती, तर स्वतःच्या बांगड्या विकल्या.

या सगळ्यातला तिचा धोरणीपणा, निर्णय घेताना न डगमगणं, दूरवरचा विचार करण्याची वृत्ती, व्यावहारिकपणा... हे सगळं तर थक्क करतंच. पण सगळ्याच्या तळाशी असलेली दिसते, ती तिची चांगल्या शिक्षणासाठीची कळकळ.

मुलांपैकी दोन शाळेत जाणारी, दोन कॉलेजच्या वयातली, एक मुलगी नुकती नोकरीला लागलेली. अशा पाचच्या पाचही मुलांना घरापासून दूर स्वतंत्र राहायला ठेवताना तिला काळजी वाटली नसेल? असणारच. लोकांनीपण काहीबाही ऐकवलं असेलच. पण आजीचीच धाकटी बहीण म्हणायची, “लोक काही तुम्ही काय जेवता ते बघाला येत नाहीत की करून घालाला येत नाहीत, आपला आपल्यालाच पिठलंभात कराचा असतो...” आजी तिचीच मोठी बहीण, कुणी काही बोललं असेलच, तर तिनं सरळ काणा डोळा केला असणार! गावातला कुणी एसटीत काम करणारा, कुणी अजून कसला चाकरमानी... तिचं सगळ्यांशी चांगलं. त्यांच्यातलं कुणी-कुणी या मुलांकडे चक्कर टाकून येऊन-जाऊन असायचं. त्यांच्याकरवी ती सतत मुलांसाठी काही ना काही पाठवत असायची. दारच्या अळवाच्या अळवड्यांचे शिजवलेले उंडे, कोहाळ्याच्या वड्या, आंब्याच्या रसाचा आटवून वाळवलेला गोळा, फणसाची साटं, खरवसाचा चीक... गावातल्या दवाखान्यातून सलाईनच्या मोठ्याशा बाटल्या आणून स्वच्छ धुवायची. त्यांची बुडं नि अंग रुंद असायची, तर गळे अगदी निरुंद. त्या बाटल्यांतून घरचं दूध किंचित विरजण घालून तेही पाठवायची.

तेव्हाच्या त्या काळजीनं उडून जाणार्‍या दिवसांतच तिला डायबेटिस सुरू झाला असेल का? काय ठाऊक.

दुर्दैवाची गोष्ट अशी की तिन्ही मामांना शिकण्यात फार गती नव्हती. हे कळेस्तोवर मुलींची शिक्षणाची वयं उलटून त्यांनी बर्‍याश्या नोकर्‍या धरल्या होत्या. पण यानं निराश-बिराश होईल तर ती आजी कसली! तेव्हाच्या आणि त्यापूर्वीच्या कोकणातल्या निम्नमध्यमवर्गीय वा मध्यमवर्गीय ब्राह्मण पुरुषांना एक शाळामास्तरकी, भिक्षुकी, नाहीतर किराणा मालाचं दुकान यापलीकडचा चौथा धंदा सुचलेला दिसत नाही. पण मामांनी रिक्षा चालवण्यापासून ते फिशरी चालवण्यापर्यंत, टेम्पो-ट्रक्स चालवण्यापासून ते पोल्ट्र्या चालवण्यापर्यंत, मासळीचं खत विकण्यापासून ते कौलं विकण्यापर्यंत... स-ग-ळे धंदे केले. सगळ्याला आजीचा सक्रिय पाठिंबा असायचा. पुढे मामानं पुष्कळ टेम्पो दाराशी उभे केले. पण त्याच्या पहिल्या रिक्षा-टेम्पोत चालवणार्‍या मामाच्या शेजारी, एक तृतीयांश सीटवर बसून फिरून आलेली आजी मला आठवते आणि तिचं अजब वाटतं.

आईची नोकरी सुरू झाल्यावर पहिलं मूल तिनं कसंबसं पाळणाघरं, प्रेमळ शेजारणी, वहिनीची आई... असं करून शाळेच्या वयाचं केलं. पण दुसर्‍या मुलाच्या वेळी मात्र हे सगळं करणं तिच्या जिवावर आलं. सासूनं हात वर केलेले. तेव्हा आजीच उभी राहिली. माझी धाकटी बहीण तीन महिन्यांची असताना आजी तिला घेऊन गेली आणि ती साडेतीन वर्षांची – शाळेच्या वयाची होईपर्यंत आजीजवळ राहिली. आईची नोकरी बिनघोर सुरू राहिली. आईबापापासून लांब आहे हो पोर!म्हणून तिची जी काही कोडकौतुकं त्या घरादारानं केली त्याबद्दल निराळं लिहावं लागेल! आजी! तू नि मीच फक्त झोपाळ्यावर बसायचं. बाकी कुण्णी नको!” हे किंवा “आजी! मी तुझ्या मांडीवर झोपणार. तू मागे भिंतीला टेकायचं नाहीस!” या आमच्या दोनवर्षीय बहिणाबाईंनी काढलेल्या फर्मानांच्या कथा अजूनही अर्धवट थट्टेनं – अर्धवट कौतुकानं सांगितल्या जातात, इतकं म्हणणं पुरे आहे!

तिच्या मुलांसाठी आणि मुलीच्या मुलांसाठी तिनं इतकं केलं. मग मुलांच्या मुलींना - नातींना तळ्यासारख्या गावातल्या शाळा थोड्याच पुरणार‍! त्या शाळेच्या वयाच्या झाल्या. मुलांचे गावातले धंदे जोरात. मग पन्नाशीपुढची आजी नि साठीतले आजोबा असे दोघं स्वतः शहरात चार नातींना घेऊन राहिले!

शिक्षणाची हौस... असं मी पुन्हापुन्हा म्हणते आहे खरी. पण आजीला एकूणच हौस पुष्कळ. तिची मुलंबाळं, पैपाहुणा, गडीमाणूस, शिवण, स्वैपाक... वगैरे बारदाना तिला दिवसभराला पुरवत असणार. पण रात्रीच्या जेवणानंतर हातावर पाणी पडलं की अडकित्त्या नि सुपारी घेऊन पुढल्या पडवीत निदान अर्धा तास तरी येऊन बसणं चुकत नसे. पुढल्या पडवीत एक पट्ट्यांची पाठ नि टेकायला हात असलेला, वापरून वापरून मऊ-गुळगुळीत झालेला डौलदार लाकडी बाक होता. त्या बाकात बसायला नि वारा खायलाआजी रात्री येऊन बसायची. तिथे गप्पा रंगायच्या. सारीपाटासारखा कवड्यांनी आणि फाशांनी खेळण्याचा एक खेळ ती आणि शेजारची नलूआजी, आणि आजीच्या दोघी नणंदा खेळत असत. तोही तासंतास चालणारा खेळ. मार्कडाव उर्फ तीनशे चार हा तर आमच्या घरातला फार लाडका डाव. काळ्या बिल्ल्यांचे चोरून लाल बिल्ले केले म्हणून एकमेकांच्या उरावर बसणार्‍या नातवंडांची भांडणं आजीनं बघितली असती, तर ती चिडली असती की आधी ओरडून मग कौतुकानं हळूच हसली असती, असा प्रश्न मला अनेकदा पडून गेला आहे. गावातले डॉक्टर घरी जेवायला असायचे. त्यांनी आणलेला चित्रलॅडिजचा खेळ, कॅरम, कवड्या नाहीतर खुब्या वापरून एकमेकांवर मात करण्याचा फरं-मरं नामक एक मजेशीर खेळअसं सगळं कायम चालू असायचं. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये घरी आलेल्या सगळ्या पोरासोरांसकट थोरांचा पत्त्यांचा डाव पडायचा. त्यात कुणीही खेळायला बसायची मुभा असायची. अट एकच – “खोटं खेळाचं नाही!”

साधं भरतकाम म्हणू नका, नाड्यांचे तुकडे जोडून केलेलं भरतकाम म्हणू नका, व्रतवैकल्यं म्हणू नका, नाटकं म्हणू नका, खेळ म्हणू नका, सासरमाहेरच्या नातेवाइकांना जीव लावून त्यांचं कष्टांनी-पैशांनी करणं म्हणू नका, तीर्थयात्रेपासून ते लग्नामुंजींपर्यंत आईबापापासून लांब असलेल्यानातीला खाकोटीला मारून भटकणं म्हणू नका... आजीची जीवनेच्छाच जबर. त्यात तिला आजोबांची तशीच साथ असायची. एकदा गावात बूड स्थिरावल्यानंतर ते गावाची वेस ओलांडून बाहेर पडायला फारसे उत्सुक नसायचे. पण तुला हवी तितकी तू भटक.” मुलांना मारायचं नाही” हे आजीचं सांगणं. डोक्यात मारून मुलांना इजा होऊ शकते, कानफटीत मारून तेच, पाठीत धबका जोरात बसला तर मूल तोंडावर आपटेल.... म्हणून मग आजोबांनी हिरकूट पैदा केलेला असायचा. मार म्हणजे गुडघ्याच्या खाली, पोटरीवर हिरकुटाची शिपटी, बास! कायम घरातली अंथरुणं घालण्यापासून ते आजी दमली तर तिच्या पायांना रॉकेल लावून मालीश करून देण्यापर्यंत सगळं काही आजोबा करायचे. वेळी विरजलेल्या सायीचं ताक करून, लोणी काढून, तूप कढवण्यापर्यंत सगळं.

त्या दोघांच्यातलं भांडण कधी पाहिलंच नाही, असं आई आणि तिची भावंडं एकमुखानं सांगतात. अनेक वर्षं ते दोघंच जण रात्री एक तरी डाव रमीचा खेळायचे. काहीतरी जादू व्हावी नि त्या दोघांच्या पानांमध्ये आळीपाळीनं डोकावत त्यांचा डाव बघता यावा, असं फार वाटतं.

क्रमशः

Wednesday, 6 September 2023

मेहंदी से जला के उंगलीयाँ...

आमच्या इमारतीबाहेर कुंपणबिंपण होण्याच्या पूर्वी तिथे मेंदीची झुडपं होती. त्याची पानं वाटून एखाद्दोनदा हाताला बांधण्याचा उपद्व्याप केलेला आठवतो. पण आमची खरी भिस्त मेंदीच्या तयार कोनांवरच असायची. ते कोन चांगले आहेत ना, असं दुकानदाराला चारचारदा विचारून मग आणायचे. नि तरी तो अडकायला लागला तर, म्हणून सेफ्टीपिना, टाचणी, एखादं फडकं, सेलोटेप असा सगळा सरंजाम तयार ठेवायचा. तेव्हा आयते कोनही तसे अपूर्वाईचेच होते पण. बाबांची चित्रकला चांगली असल्यामुळे त्यांच्याकडून आईनं मेंदी काढवून घेतल्याचीही मला आठवण आहे. पण त्यात काही रोमॅंटिक वाटायची ऐवजी आईचा चिकित्सकपणा, भेंडी वाटून घातल्यामुळे अतिरिक्त तार आलेली मेंदी, हिरकुटाची हजारदा मोडणारी काडी आणि त्यामुळे एकंदर कावलेले बाबा, इतकीच अंधुक आठवण. पुढे बरेच दिवस त्या प्रकरणाचा शेष रोमान्स पुरला असावा. कारण मग अनेक वर्षं काडीनं मेंद्याबिंद्या काढल्याचं मला आठवत नाही. एकदम कोनच आठवतात. पण ते ठाण्यातल्या दुकानांतून सर्रास नि खातरीचे मिळायला लागण्यापूर्वी ट्रेनने येणार्या कुणालातरी कुर्ल्याच्या स्टेशनबाहेरच्या मार्केटातून आणायला सांगत असू. मेंदी आणि मुसलमान धर्म यांची अस्फुट का होईना – जोडी जुळल्याची ती एकमात्र आठवण. बाकी मेंदी कायमच आसमंतात होती. नि बायकी नटमोगरेपणा वगळला , तर तिच्याशी इतर कसले लागेबांधे नव्हते. धार्मिक तर नव्हतेच नव्हते. एनिवे.


तर कोन. काही हौशी नि कुटीरोद्योगी लोक मेंदीचे कोन घरी करत असत. मेंदीची भुकटी पातळ कापडातून जमेल तितक्या वेळा गाळून घेणे, मग ती एकही गुठळी राहू न देता उकळून गार केलेल्या चहाच्या पाण्यात भिजवून ठेवणे, भिजवताना त्यात लिंबाचा रस – तोही गाळून! – घालणे – मग ती पेस्ट दुधाच्या पिशवीच्या कोनात भरून सेलोटेपनं तो बंद करणे... असा सगळा खटाटोप असायचा. मेंदीच्या क्लासला जाऊन तोही मी एखाद-दुसर्या वेळा यशस्वीपणे केला आहे. पण हळूहळू बाजारानं ती गरज संपवली. तरी मेंदी हा एक उपक्रम असायचा. दुसर्या दिवशी रविवार हवा. कोन तर हवेतच. कापूस. निलगिरीच्या नाहीतर लवंगेच्या तेलाची एखादी चिमुकली कुपी. लिंबाचा रस आणि साखर यांचं संपृक्त द्रावण. शिवाय घरात लवंगा आहेत ना हे बघून ठेवायचं. मेंदीचं एखादं पुस्तक. तेव्हा ‘लोकप्रभा’ आणि ‘साप्ताहिक सकाळ’ वर्षातून एकेकदा मेंदी विशेषांकही काढायचे. ते जपून ठेवलेले अंक. मग कुठलं डिझाईन कुणाला ते ठरवायचं. शेजारच्या काकी कलाकार. त्यांना ते दाखवून त्यांच्याकडून अप्रूव करून घ्यायचं. नि मग रात्री काकी पेंगायला लागेस्तो मेंदी प्रकरण सुरू. हाताला निलगिरीचं तेल लावून घ्यायचं. काढताना हात हलवायचा नाही, मेंदी काढल्यावर वाळेस्तो वाकवायचाही नाही. मेंदी किंचित सुकू लागली की मग अलगद कापसानं लिंबूसाखरेचा पाक लावायचा तिला, की मग ती हाताला घट्ट चिकटून बसते. आधीच हातावर रेखाटलेली ओली मेंदी काहीच्या काही सुंदर दिसते. त्यात तो साखरेचा द्राव तिच्यावर बसला की तिला चकाकी चढायची. हाताकडे बघत राहावं वाटायचं. कोयर्या, वेलबुट्ट्या, ग्रेसफुली वळलेले ग आणि ह ल्यालेल्या वेली, पाना-फुलांचे नाना प्रकार, हंस, मोर, चक्रं, शंख, हत्ती... यांचीच कॉम्बिनेशन्स असलेल्या नक्ष्या. चोचीत चोच घातलेले हंस बघताना मला अगदी टिपिकल बायलट वाटायचं, ते बहुधा या सगळ्या चित्रांमधला स्टिरिओटिपिकल बायकी नाजूकपणा जाणवल्यामुळेच असावं. पण हाताला वळणच इतकं पडलं, की आता कागदावर डूडल काढतानाही असलंच काहीतरी हातून उमटतं. पुढे कधीतरी एकदा कोयरी हे स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक आहे हे ऐकल्यावर मी अवाक झाले होते. आश्चर्य, चिडचिड, आणि मग पुन्हा वळून तो डौलदार आकार हट्टानं रिक्लेम करण्यासाठी झगडणं. एनिवे! नि हो, एका हातावर दुल्हा नि एका हातावर घुंगटातली दुल्हन असंही एक असायचं. दोन्ही हात एकमेकांशी जोडून त्याची ओंजळ केली, की ते एकमेकांकडे बघताना दिसणारे, असा लग्नाच्या अल्बममधला एक फोटोही ठरलेला असायचा. हल्ली काय असतं काय कळायला मार्ग नाही. पण हे दुल्हा-दुल्हन डिझाईन मात्र स्ट्रिक्टली फ-ह-क्त-ह नवर्यामुलीसाठी. तिच्या मेंदीत नवर्याचं नाव लिहायचं नि मग नवरा सुहागरातीला ते शोधेल असाही एक भाबडा संकेत मनात अनेक वर्षं होता. नवर्याचं वा प्रियकराचं प्रेम असेल तर मेंदी रंगते, हा विड्याच्या बाबतीतला कॅरीड फॉर्वर्ड संकेत मात्र आमच्या विश्वात शिरला नव्हता. एखादीची मेंदी अती रंगली (“अय्या! हिची काळी झाली बघ!”) तर ‘काय हीट आहे गं तुझ्या अंगात.’ इतपतच आमची धाव. ती मेंदी रंगावी म्हणून कोण कर्मकांडं. मेंदी वाळून पडून जायच्या आत साखरेचं पाणी तर झालंच, पण आधी निलगिरीही त्याचसाठी. झोपताना हात अलगद उशाकडे वर ठेवून झोपायचं. तोही पालथा नाही! उठल्यावर सगळीभर मेंदीचे कणकण पडलेले असायचे नि बाबा वैतागायचे. ती मेंदी काढून टाकतानाही सुरीबिरीनं खरवडून काढायची. पाणी लावायचं नाही. चुन्याच्या पेस्टचा एक थर द्यायचा. मग लवंगा तव्यात तापवून त्यावर हात शेकवायचे. जमेल तेवढा वेळ हात न धुता वावरायचं. कुणाची किती रंगली, ते तपासून बघायचं.

माझ्या आजूबाजूला कुठेच मुलगे नव्हते. मावसभाऊ होते, पण ते मेंदीच्या खटाटोपात अजिबात नसायचे. त्यामुळे एखाद्या मुलाला हे सगळं बघून मेंदीचं अप्रूप वाटतं का, मेंदी काढून घ्यावीशी वाटते का, नि मग बाकीचे लोक त्यांच्याशी कसे वागतात, ते मला बघायला मिळालं नाही कधीच. पुढे एकदा एका गे मित्रानं कौतुकानं मनगटावर मेंदीनं काढलेली काकणं दाखवली होती, तेव्हा त्याच्या गे असण्याशी हे जोडलं जाईल का हा प्रश्न मला पडल्याचा आठवतो. पण हळूहळू आपण लिंगभावाबाबत निदान शहरांतून तरी तसे बर्यापैकी खुले होत गेलो आणि मेंदी मागे पडत गेली. आपण खुले झालो हे ठीकच. पण मेंदी मागे पडली हे जरा खटकतं. मला तिच्याबद्दल कधी कसली अढी नव्हती. तिला स्त्रीत्वाचे लागेबांधे लगडलेले असूनही आणि मला स्त्रीवादाचे वारे लागल्यानंतरही मला मेंदी मनापासून आवडायची. लग्नाची मेंदी काढून पहिली कमाई करण्यापासून ते सख्ख्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आधल्या दिवशी मेंदी काढताना दोघींनीही उद्यापासून बदलणार असलेल्या परिस्थितीचा ताण वाटून, कंटाळून ‘मरो मेंदी’ असं म्हणत गप्पाच मारत बसण्यापर्यंत अनेक प्रकारे मेंदी आयुष्यात होती. आहे.

कोरड्या, ओल्या, नंतर रंगलेल्या मेंदीचा – असे तीन स्वतंत्रपणे ओळखू येणारे धुंदावणारे गंध. हातांवरून वाहत असल्यासारखे दिसणारे ते डौलदार आकार. रंगण्या-न रंगण्याबद्दलची उत्कंठा. सगळंच बेहद्द आवडायचं. आवडतं. ‘बेहनों ने रौशनी कर ली, मेहंदी से जला के उंगलीयाँ’ ही 'पिंजर'मधली ओळ ऐकल्यावर हटकून रंगलेल्या मेंदीचा आतून उजळल्यासारखा दिसणारा केशरी रंग आठवायचा नि तो रंग पाहिला की कधीही तीच ओळ मनात उमटायची. ‘गीली मेहंदी की खुशबू’ लिहिणारा गुलजार मित्रासारखा वाटायचा, त्याचं तेही एक कारण असणारच, इतकी मला मेंदी प्रिय.

आत्ता काही श्रावण नाही. पण श्रावणात लिहायला बसलं तर हे अजूनच क्लिशेड वाटणार आहेच. म्हणून आत्ताच मनात आल्याक्षणी let's indulge म्हणत निखळ नॉस्टाल्जियाला शरण जाणं.

Sunday, 11 December 2022

राहत्या शहराचे लागेबांधे ०७

ग्लोबल कंटाळ्याचे ढग डोक्यावर जमा होत असताना कानात गुंड्या खुपसून शहरातल्या रस्त्यांवरून चालत सुटावं. काही लावू नये गुंड्यांवर, पण असू द्याव्यात त्या कानात. लोक आपल्याला तिरशिंगराव समजून दूर राहतात. पहिली साताठ मिनिटं आपण आपल्या डोक्यात तडमडत राहतो. मग मात्र कुरकुरलेले आपण हळूहळू माघार घेऊ लागतो. बागेत दुडदुडताना पुढे धाव घेऊन आजोबाची फरफट करणाऱ्या वांड पोरासारखं सुटवंग होऊन आपलं डोकं कधी आपल्यापुढे चार पावलं धावत सुटतं, तर कधी आपल्यामागे रेंगाळू लागतं. एक मात्र करायचं. कुठे जायचं त्याचं अजिबात नियोजन करायचं नाही. अक्षरशः वाट फुटेल तिकडे घरंगळत सुटलो, की आपल्या मूडला खेळकर वळणं देणारे रस्ते आपसुख पायाखाली येऊ लागतात. 


पायाखालचं शहर असलं की काही रस्ते निरनिराळ्या काळातल्या रूटीनची साक्ष देतीलसे चाकोरीबद्ध झालेले असतात. पण अशा वेळी त्यांना किंचित चकवावं. ज्या गल्ल्यांची तोंडं कधीच पाहिली नाहीत, अशांना हॅलो करावं. कधी डेड एण्ड लागून फसगत होते, तर कधी चक्क एखादा बहरलेला कैलासपती भेटून चकित करतो. कुठे जुन्याजाणत्या डेरेदार झाडाच्या पोपटी पानांतून सांडणारं जरतारी ऊन. अशा वेळी लागलेल्या डेड एण्डांनाही घरगुती स्वभाव असतो. रेंगाळत रेंगाळत थबकलेल्या गल्लीच्या टोकापाशी निव्वळ धूळ खात पडलेल्या अजस्त्र चारचाकी धुडांची गर्दी न मिळता एखादं अजूनही सिमेंटचा बट्टा न लागलेलं मातीचं अंगण आणि व्हरांडा लागतो. येणार्‍या-जाणार्‍यावर चष्मिष्ट लक्ष्य ठेवून असणारा एखादा खडूस म्हातारा दिसतो कुठे. कुठे चक्क कांदाभज्यांचा खमंग वास आणि निवांतपणे नाश्ता करणारे चुकार कष्टकरी. तिथे थांबण्याचा मोह होणं साहजिक. पण असे थांबे घेऊ नयेत. चांगली लागलेली तार त्यानं विस्कटू शकते. अशा शांत गल्लीतून आपण एकाएकी रहदारीनं गजबजलेल्या आणि अगदी सरावाच्या हमरस्त्यावर येऊन ओतले जातो, तेव्हा त्या रस्त्याची निराळीच बाजू दिसून दचकायला होतं. नि 'अरेच्चा! बबनचा वडापाव इथे मिळायला लागला होय हल्ली! तरीच तिकडची टपरी बंद दिसते!'प्रकारचे सुखद धक्के मिळतात. काही निखळ नॉस्टाल्जियाच्या गल्ल्या घ्याव्यात. मात्र त्यात किंचित जोखीम असते. आपण अक्षरशः वीसेक वर्षं मागच्या पाण्यात पाय बुडवून शांत होऊन बाहेर येऊ शकतो, वा 'छे! किती इमारती उगवल्या इतक्यात इकडे! आता दोन्ही बाजूंनी अंगावर आल्यासारखं होतंय. नि इथले दोन एकमेकांवर ओठंगलेले गुलमोहोर काय झाले? साले हरामी बिल्डर्स!' अशी तणतणही होऊ शकते. त्यामुळे जरा जपून. कधी मात्र आपला जुना भडभुंजा जसा आठवणीत होता तसाच्या तसाच दिसून चपापायला होतं आणि मग एकदम 'ओह! हा त्याचा मुलगा असणार!' हे ध्यानात येऊन सातत्यसाखळीनं आश्वस्त नि अचंबित असं दोन्ही वाटतं. काही रस्ते आपला तुळशीवृंदावनी स्वभाव सोडून एकदम मुरकी मारत, पान चघळत चहाटळ झालेले असतात. त्यानं विषण्ण व्हायला होतं. कधीकधी मात्र त्या तसल्या रस्त्यांवरही एखादंच जुनं रुपडं आणि ठणठणीत तब्बेत राखून असलेलं एखादं कौलारू घर खास आपल्याला दिलासा द्यायला थांबल्यासारखं थबकून राहिलेलं भेटतं. त्यानं एकदम खुशालल्यासारखं होतं. असे कोपरे भेटले, की आपण पुढे निघालो तरी मन मागेच रेंगाळतं. त्याचा पाय निघत नाही. पण आपण त्याचे लाड न करता साळसूदपणे पुढे निघायचं. कधी काही इमारती निव्वळ नसलेपणामुळे खिन्न करतात. 'या इथल्या कोपर्‍यावरून जाताना 'नववी अ'च्या वर्गाच्या खिडकीचा कोपरा दिसायचा...' असं आठवतं नि तिथे आता अवतरलेला 'अमुकतमुक नगरसेविकेच्या कृपेनं सेल्फी पॉइंट' बघून जग चंगळवादानं विटाळल्यासारखं अस्वच्छ-अशुद्ध वाटायला लागतं. पण हेही औटघटकेचंच. चार पावलं पुढे गेल्यावर सळसळत्या पिंपळातून नाचणारे उन्हाचे कवडसे टिपायला आपणही म्यानातून मोबाईल उपसतोच. चंगळवाद किंवा रसिकता, जो जे वांछील तो ते लाहो! 


मूड्सची अशी अनपेक्षित-खेळकर वळणं घेत हळूहळू पावलं आपसुख आपल्या हक्काच्या टपरीवाल्याकडे वळतात. अशा वेळी लाभलेल्या कटिंगशी स्पर्धा करणारं पेय अजून जन्मायचं आहे. ते घशाखाली उतरताना ग्लोबल कंटाळ्याचे ढग उडून गेलेले असतात. लख्ख मऊ ऊन पडलेलं असतं.


Wednesday, 13 July 2022

त्रांगडं

माझा एक प्रियकर म्हणायचा, "माणसांच्या आजूबाजूला असण्यातून ताकद शोषून घेतो मी. एकटा असलो, तर कंटाळून-विझून जातो." मला तेव्हा अजब आणि आकर्षक वाटलं होतं हे, इतकी स्वतःच्या माणूसघाणेपणाविषयी खातरी होती. आता काही वर्षांनंतर वाटतं, अर्थात, दुसरा काय रस्ता असतो आपल्यासारख्या नास्तिक माणसांना? 

पण माणसं जमवणं म्हणजे त्यांच्या सगळ्या म्हणण्यांना विनाअट शरण जाणं असतं का? नसतं. किंवा फॉर दॅट मॅटर त्यांना वरचेवर भेटत सुटणंही नसतं. वा ती कमावून, घडी घालून कपाटात ठेवून देणं नि लागतील तेव्हा काढून वापरणंही नसतं. 

मग काय असतं? 
 
आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो. एक ते बारा आकडे लिहायचे एकेका ओळीत चार-चार असे, मध्ये थोडंं अंतर राखून. मग एकानं पेन घेऊन एक आकड्यापासून सुरुवात करायची आणि दुसर्‍यानं त्याला दुसरा एक आकडा सांगायचा बारापर्यंतचा. त्या आकड्यापर्यंत जाताना तिसरा एखादा आकडा आणि आपण आधीच इकडून तिकडे जाताना मारलेल्या रेषा यांपैकी कुठल्याच नव्या रेषेचा स्पर्श न करता जायचं असे. सांगणारा आडवेतिडवे आकडे सांगून गुंता करून ठेवायचा प्रयत्न करी, तर पेन हातात घेऊन हिंडणारा कुठेच न चिकटणारी रेषा काढत हिंडण्याचा. असं बाराही आकडे फिरून पुन्हा एकपाशी परतता आलं नि वाटेत कुठेच रेषेला रेष लागली नाही, तर पेनवाला भिडू जिंकला. नाहीतर मग सांगणारा. असा खेळ. 

त्या खेळाची आठवण झाली. माणसं तर हवीत. पण अंगाअंगाशी येणारी नकोत. आपल्यावर भलभलत्या भावनिक जबरदस्त्या करणारी नकोत. आपल्याला कामापुरतंच वापरणारी नि ठेवणीत ठेवून देणारी नकोत. आपल्या भावनांवर कोरडेपणी बोळा फिरवणारीही नकोतच. नात्यागोत्यापायी मानगुटीवर बसणारी नकोत, पण आपल्यावाचून काहीच न अडणारीही नकोत. नि तरी बाराच्या बारा माणसं हवीतच. त्यातल्या एखाद्याही ठिकाणी रेषेला रेष लागली, की झालाच गुंता. गेम ओव्हर. 

आपल्यातल्या त्या दुसर्‍या 'सांगणार्‍या' भिडूला फितूर करून घेता आलं तर सोपं होईल? पण एकाकडून दोनाकडे नि दोनाकडून तिनाकडे जाण्यात काय गंमत? एक, मग बारा, मग सहा, मग तीन, मग नऊ, मग अकरा.. असं करत जाण्यातच आव्हान आहे! 

सालं त्रांगडंच आहे.

Tuesday, 21 December 2021

या मौनाची जात निराळी

या मौनाची जात निराळी

उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी

या मौनाची जात निराळी.

कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी

या मौनाची जात निराळी.

संध्याकाळी, उदास वेळी, हुरहुर काहूर, काळीज जाळी

या मौनाची जात निराळी.

अशाच वेळी साथ देतसे, अस्फुट सोबत जणू अबोली

या मौनाची जात निराळी.

संथ शांतता पाण्यावरली, आत नांदते अथांग खोली

या मौनाची जात निराळी.

डोहामधले विश्व आगळे, खळबळ न्यारी निळीसावळी

या मौनाची जात निराळी.

कुणी जाणावे होईल का कधी या मौनाची मुखरित बोली?

या मौनाची जात निराळी.

उंबऱ्यापाशी अडते पाऊल, हर प्रहराची आण निराळी

या मौनाची जात निराळी.


संपादित आवृत्ती –

या मौनाची जात निराळी
उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी
या मौनाची जात निराळी.
कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष जिव्हाळी
या मौनाची जात निराळी.
संध्याकाळी, उदास वेळी, हुरहुर काहूर, काळीज जाळी
या मौनाची जात निराळी.
अशाच वेळी साथ देतसे, अस्फुट सोबत जणू अबोली
या मौनाची जात निराळी.
संथ शांतता पाण्यावरली, आत नांदते अथांग खोली
डोहामधले विश्व आगळे, निळेसावळे लालप्रवाळी
या मौनाची जात निराळी.
खळबळ न्यारी निळीसावळी, मुरकत जाते कुणी मासोळी
कधी उन्हाची तिरीप चमकते, कभिन्नकाळी कधी सावली
या मौनाची जात निराळी.
या मौनाशी त्या मौनाची अखंड चाले गूढ गजाली
या मौनाची जात निराळी.
कुणी जाणावे होईल का कधी या मौनाची मुखरित बोली?
या मौनाची जात निराळी.
उंबऱ्यापाशी अडते पाऊल, हर प्रहराची आण निराळी
या मौनाची जात निराळी.

Tuesday, 2 March 2021

कासवकाळ

अधूनमधून माझ्यातलं कासव डोकं वर काढतं. एकदा त्यानं डोकं वर काढलं की मला गुपचूप पाय पोटाशी घेऊन मान आक्रसून घेऊन कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसण्याची अनावर हुक्की येते. खूप इंट्रेस्टिंग कामं, माणसं, कार्यक्रम, मजेच्या संधी, आमंत्रणं असतात. पण कासव पुन्हा तळाकडे सूर मारेस्तो मला कशात गम्य नसतं. आहे मनोहर तरी गमतो मज एकांतवास. दिवसचे दिवस पारोसं लोळून पुस्तकं फस्त करणे, देशोदेशींच्या मालिका बिंजणे, घरातले स्वैपाकघरापासून पुस्तककपाटापर्यंतचे कोपरे आवरणे, टीव्हीवर एकसमयावच्छेदेकरून चारेक सिनेमे लीलया पाहणे आणि एकही आवडतं गाणं वा प्रसंग हुकू न देणे, घरातल्यांसह टीव्हीतल्या गदळ वा अ-गदळ कंटेंटवर मनसोक्त कमेंटा करणे, लाख वेळा पिसून कोपरे झिजलेली गाणी ऐकणे, मोबाईलमधून तासंतास एकास एक गप्पांची लड पेटती ठेवणे... अशा अनेक मजेमजेशीर गोष्टी करता येतात. आपण इतक्या वर्षांचे झालो पण आपल्याला काही जमेना, आपल्याला समंजसपणा येईना, आपल्याला स्वतःचा पैसा स्वतःला नीट मॅनेज करता येईना... अशी कसलीही कल्पित वा सत्य दुःखं करून, उदास गाणी लावून, एकंदर स्वतःचा राग करतो आहोतसं दाखवून, प्रत्यक्षात स्वतःचे लाड करण्यासारख्या निराळ्या मजेशीर गोष्टीही करता येतात. पण लोकसंपर्क ही मात्र त्यांपैकी एक नव्हे. कटाक्षाने नव्हे. कुणी मला या दिवसांत फोन करू नये. मी तो उचलणार तर नाहीच, पण त्याबद्दल मला पश्चात्तापही वाटणार नाही. दाताचं काम चालू असेल, तेव्हाच फक्त टेक्स्ट करणाऱ्या मायक्रॉफ्टच्या बरोबर उलटा असा माझा अवतार असतो. सगळं काही टेक्स्टवर. कुणाशी बोलण्याचे श्रम मला कल्पनेतही सहन होत नाहीत. अशा वेळी घरातलं इंटरनेट हरपू नये, बस. बाकी सगळं निवार्य. हां, पाहुणे सोडून. या कासवकाळात दार वाजल्यानंतर दाराला सर्वांत जवळ असलेली व्यक्ती मी नसेन, तर ते उघडण्याचाही मला कंटाळा येतो. अशा वेळी कुणा पाहुण्यानं अजिबात टपकू नये. त्याला मिळणाऱ्या चहाइतका फुळकवणी चहा त्रिखंडात दुसरा असणार नाही. कॉफी मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. 

Thursday, 25 February 2021

ऐकत राहायला हवं

कुणाचं काही ऐकू नयेसं वाटतं. 
कुणी काही बोलू लागलं तर त्यावर आवाज चढवून आपणच बोलत राहावं वाटतं.
नव्हे, तसं केल्यावाचून राहवतच नाही. 
फक्त आपलाच आवाज ऐकू येत राहतो मोठ्यांदा.
नि तरी समाधान होत नाही,
तहान शमत नाही,
जीव शांतवत नाही.
कशानं हे असं?
कसला राग येतो?
कसले अपमान सलतात?
असतात का ते खरेच अपमान?
आपण स्वतःला मानत असू, तर कोण करू शकतं आपला अपमान?
मग छाताडावर बारामहिनेचोवीसघंटे नाचणारे हे कोणते अपमान?
हे माझ्या मनातच तर जन्माला आलेले नाहीत?
अपमान करणाऱ्यांचा राग?
की या अपमानाच्या भुतांची भीती?
स्वला गाडू पाहणारी?
कसली भीती?
जवळच्यांपासून स्वतःला तोडणारी?
एकटं करणारी?
एकटं राहायला भाग पाडणारी?
कशी करू मात तीवर?
वेळ जाऊ देऊ?
पण धुमसत राहीन मी फक्त.
अधिकाधिक.
राख होऊन उरायचंय का मला?
जगण्याच्या-उरण्याच्या लसलसत्या इच्छेहून का अधिक आहे माझी धुमसण्याची इच्छा?
नाही ना?
मग सोडायला हवी.
भीतीकडे हलकेच मान वर करून बघायला हवं.
जरा थारावला जीव की कशाला भ्यालो आपण, असं हसूही येईल.
मग नाही येणार राग.
मग आजूबाजूचं जग दिसेल.
आपलं.
तोवर मी शांत राहायला हवं. 
कुणाचं काही ऐकू नयेसं वाटलं,
तरी ऐकत राहायला हवं.

Sunday, 4 October 2020

आस्वादकाच्या मेंदूतलं घड्याळ आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी

कुठलीही गोष्ट वाचता-ऐकता-बघताना माझ्या डोक्यात एक अत्यंत कस्टमाइज्ड घड्याळ कम् कॅलेंडर चालू होत असतं. उदाहरणार्थ, १९२८ साली घडतीय का ही गोष्ट? बरं. पण १९२८ म्हणजे? या आकड्यांनी मला काहीच बोध होत नाही. म्हणजे भाऊआजोबा प्लेगातून मरता मरता वाचलेलं ते वर्षं. आत्या झाली होती, पण काका नि बाबा व्हायचे होते. नि गावात विजेचा पत्ता नव्हता. नि महायुद्धपण व्हायचं होतं ना पहिलं? की झालंवतं? च्यायला, कधी झालं पहिलं महायुद्ध? मरो. आलं लक्ष्यात. इतकं सगळं झर्रकन त्या घड्याळात वाजून जातं. नि मsssग गोष्टीला नेपथ्य-प्रकाश मिळून ती पुढे चालू होते. 
गोष्ट वाचताना ती कुठे घडतीय हे आपोआप रंगतं डोक्यात. आपण अगदी लहानपणी बघितलेल्या घरांचा नि जागांचा तोंडवळा असतो तिला. नि मजा म्हणजे प्रमाणंही त्या-त्या वयात भासलेलीच असतात. परदेशात घडणाऱ्या गोष्टी डोक्यात रचताना आपण कुठलं नेपथ्य घेतो हे मुद्दाम पडताळून पाहिलंय मी. तिथेही आपल्याला ठाऊक असलेली देशी घरंच चक्क मेकप् करून अवतरतात. उदाहरणार्थ, 'चौघीजणी' वाचताना माझ्या डोळ्यांसमोर ते साकारतं ते माझ्या आजोळच्या शेजाऱ्यांच्या घरात. का? तर बहुधा शांताबाई शेळक्यांच्या भाषांतरात चुकून आलेला पानगी हा शब्द मला त्या घरी घेऊन जात असावा, म्हणून. 
किंवा, वाचताना डोळ्यांसमोर येणाऱ्या माणसांना तोंडावळे कुठले मिळतात? तर नव्व्याण्णव टक्के वेळा असे तोंडावळे न मिळताच डोकं काम भागवून नेत असतं. पण जर गोष्टीला रेखाटनं सोबत करत असतील, तर त्या रेखाटनांना गोष्टीपासून वेगळं काढताच्च येत नाही. मला प्रतापगडावरच्या भुयारात अडकलेला फास्टर फेणे एका विशिष्ट पोजमध्ये काटकिळ्या तंगड्या दाखवत नि तांबारलेल्या डोळ्यांनी बघत असलेलाच दिसतो. आता किती निरनिराळी चित्रं नि चित्रपट त्यावर सुपरइम्पोज् करायला बघितलं, तरी अहं. वाईरकरांचा फाफे फिट् झालेला आहे, त्याला हलवणं ब्रह्मदेवाच्या बापालापण शक्य नाही. जेव्हा रेखाटनं नसतात, तेव्हा बरेचदा मला गोष्टीतली माणसं पाठमोरीच वावरताना दिसत असतात. त्यांची अंगयष्टी उभी राहते कल्पनेतून. पण चेहरा? चक्. जेव्हा चेहरे मिळतात, तेव्हा ते हमखास कुठल्यातरी नाटकासिनेमात दिसलेल्या नटांचे असतात. त्यांच्या निवडीचा गोष्टीशी कसलाही तर्कशुद्ध संबंध नसतो. माझ्या मेंदूनं जणू समोरच्या बावन्न पत्त्यातलं या चेहऱ्याचं पान ओढलं असावं, इतका शून्य तर्काधार.
या असल्या चमत्कारिक गोष्टी पुस्तकांच्याच बाबतीत नव्हे. सिनेम्यांच्याही बाबतीत घडतात. 'रंगीला'मधलं 'हाय रामा' आताची मी ऐकते, तेव्हा आताची मी एकदम कॉलेजातली मी होते. पातळ गुलाबी कागदाची बाल्कनीतली तिकिटं काढून धावत धावत सिनेमा बघायला पोचलेली. तेव्हाच्या मला येणारे वास, तत्कालीन मित्रमैत्रिणींसोबतचे संबंध, तेव्हाचे मूड्स, गंड, संकोच, आनंद... सगळं एकदम आतल्याआत कुणीतरी फिल्म चालू करावी तसं चालू होतं आणि मी त्यातलं माझं पात्र रंगवत असते. 
काही काही सिनेमांना माझी एखादी तत्कालीन आठवण चिवटपणे चिकटून बसलेली असते. उदाहरणार्थ, 'टायटॅनिक' बघताना मला का-य-म आम्ही सहकुटुंब सहमावसपरिवार आबालवृद्धांसकट हौसेनं सिनेमाला एकत्र गेलो होतो नि जॅक रोजचं चित्र काढतो तेव्हा भयंकर अवघडून बसलो होतो, हे आठवतंच आठवतं. आताही ऐन सीन बघता बघता त्या बिचाऱ्यांचा रोमान्स मनात सुरू व्हायच्या आधी ती अवघडलेली आठवण येते नि मग डोक्यातल्या डोक्यात स्वतःला हाकलत सिनेमात शिरावं लागतं. 
असं सगळं अत्यंत कस्टमाइज्ड होत असतानाही आपण सिनेम्यांची नि पुस्तकांची परीक्षणं वाचून अमुक काहीतरी आपल्याला आवडेल वा नावडेल हे कस्काय बॉ ठरवणार, असं वाटायला लागून समीक्षकांना गुरू मानणं सोडून दिलं आणि त्यांना सहप्रवासी मानलं, तेव्हापासून मी अत्यंत सुखी झाले - असंही एक आठवतं. ही आठवण कधीची हे मात्र नीटसं आठवत नाही.

Tuesday, 11 August 2020

मला प्रवास आवडत नाहीत - ३

एकीचं शाळेत शिकलेलं फ्रेंच आणि बाकीच्यांचं फ्रेंचचं एकअक्षरकळलतरशपथ-आकलन घेऊन पॅरिसात उतरलो आम्हीतेव्हा गंतव्य मेट्रो स्टेशन 'इथ्थेच जवळआहे हे माहीत होतं. आमची किल्ली घेऊन एअरबीएनबीत साफसफाई करणारी काकू तिष्ठत होती. पण प्रत्यक्ष मेट्रो स्टेशनात पोचेस्तो किमान पाच तरी 'कुठून येतात काय माहीत असले लोकअसं म्हणणारे कटाक्षतीन अत्यंत पोलाईट आणि मदतशील 'नो आयडिया'वाले कोरे चेहरेआणि बॅगा फरफटवतग्राफिटी बघून दचकतभुयारी मार्गांच्या क्रीपीपणानं शहारत ओलांडलेला वीसेक मिनिटांचा खुश्कीचा मार्ग - इतकं सोसलंतेव्हा कुठे योग्य मेट्रो गावली. दोन स्टेशनांनंतर आपलं स्टेशन इतकं एकमतानं नक्की करून सैलावून बसलो. दोन स्टेशनं गेली आणि गाडी धाडधाड करत एका पुलावर आली. बाहेर नजर गेली तर आयफेल टॉवरचं शिंग झुईंकन समोर. कधी ठरवूनही न किंचाळता येणाऱ्या माझ्या तोंडून आनंदाची आरोळी फुटली असणार. कारण आम्हांला सगळ्यांना त्या निमिषभरात ते टॉवरचं शिंग तर दिसलंचवर डब्यातले पॅरीसकर खुदखुदून आमच्याकडे बघायला लागलेते आम्ही किंचित शरमिंदं हसूनस्टेशनात उतरून त्यांना हात दाखवेपर्यंत. मग किल्ली ताब्यात घेईस्तो केलेले साडेतीन-चार फोनशाळेत मिळालेल्या मार्कांची सत्त्वपरीक्षाआम्हांला पत्ता समजावून सांगण्यातला खटाटोप किती व्यर्थ ठरेल ते कळून आपला आवरत आलेला भाजीचा गाळा मदतनिसावर टाकून इमारतीच्या खालपर्यंत सोडायला आलेला भाजीवाला... हे सगळं पार पडेपर्यंत तो 'झुईंडोक्यात ताजा राहिला असणार. कारण बॅगा टाकूनशूविसर्जन करूनकुलपाचा पासवर्ड पाठ करून आम्ही तत्काळ टॉवरच्या दिशेनं कूच केलं होतं. मग त्या तीन दिवसांत अक्षरशः सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र दर्शन घेतलं त्याचं. वर जाऊन. पोटात शिरून. नदीपल्याड काठावर पाय हलवत बसून. दुपारी हिरवळीवर लोळून... तरी बेट्याचा टूरिस्टी लोकप्रियतेबद्दल फणकारा नाही आला. मजाच वाटत राहिली एकसारखी.

‍~

गोव्यातल्या माझ्या त्यापूर्वीच्या सगळ्या ट्रिपा सपशेल फेल होत्या. कधी मंगेशी आणि शांतादुर्गा आडवे येत. कधी शुद्ध शाकाहारी लोकांसह फरफट. कधी पाण्याला भिणाऱ्या लोकांसह कुचंबणा. कधी 'दारू म्हणजे काय रे भाऊ?'वाल्या शुभंकरोति मंडळींच्यात बाजूला बसावं लागणं.
त्या खेपेला भेटलेलं गोंय मात्र खम्प्लीट निराळं. पावसाची रीरी संपता संपेनाचे अप्रवासी दिवस. हवेत ओलावा आणि नजरेला हिरवाई. पंज्येंमधलं एक कौलारू छप्पर आणि बाहेर फणसाची झाडं असलेलं कॉटेज. समुद्राशी लगट करणारं नसल्यामुळे आबदार आणि शांत. दुचाकी चालवणारी आणि खानावळींची खडानखडा माहिती असलेली अबोल सोबत.
त्याच ट्रिपेत पोर्तुगीज वारसा जपणारी गोव्याची भव्य लायब्री भोगली. खाडीच्या काठानं पहुडलेल्या निवांत रस्त्यावरून वारा पीत भटकलो. खानावळींतून कालवणं नि मच्छी ओरपली. बटाट्याचा अंगभूत गंध ल्यालेल्या पिवळ्या पातळभाजीत चिवट उन्नी भिजवून खाल्ले. रस आम्लेटाच्या गाड्या हुडकत हिंडलो. गव्हाचा चुरचुरीत कोंडा ल्यालेले ताजे पोंय् खाल्ले. 'सोलकढीन् पॉट भरतांबास. चंणक कोण खाईल. ज्येवा आता.असा दम भरून लाल तांदळाचा भात खिलवणाऱ्या वेटराच्या हातचं जेवलो. रस्त्यावर बागेलच्या बांगड्या घेऊन उभे राहिलेल्या पाववाल्यांकडून ते गरमचविष्ट बांगडीपाव खाल्ले.
खाडीच्या एका फाट्यावरून नारळींतून येणारा रस्ता. शेजारी पाणी. मधूनच उघडा मांडव असलेलं गावातलं चर्च. आकाशात आख्खा चांद. हवेत झुलणारे माड अन् पोफळी. पोटात गोंयचं तीर्थ. काळोख आणि उजेड. चंदेरी माहोल.
सरत्या संध्याकाळी खाडीशेजारच्या रस्त्यावरच्या एका सरकारी बागेत शिरलोतर एक सोनसळी काठ गवसला. माझी पापं संपून पुण्याचा हिशेब सुरू झाला असणार त्या ट्रिपेपासून.

‍~

प्रवासाला जाताना कोऱ्या मनानं आणि उघड्या डोळ्यांनी जावं वगैरे सुविचार कितीही थोर असलेतरी चोप्रांच्या सिनेमावर पोसलेल्या निदान मला तरी स्वित्झर्लंडच्या बाबतीत तसं करणं अशक्य आहे हे मी स्वतःशी स्वीकारेस्तोवर माझ्या समोरच्या दृश्याला बॅकग्राउण्ड म्युझिक म्हणून 'चाँदनी ओ मेरी चाँदनीवाजून मी श्रीदेवीच्या किनरट आवाजातल्या 'मेरे शोनाशोना..'वर जाऊन पोचले होते. बरंस्वित्झर्लंडनी तरी भारतीयांच्या मनातली 'नंदनवनही आपली भूमिका बजावण्याकरता थोडं ताठ्यानं वागावंपण ते तर 'खास भारतीयांसाठीपंजाबट जेवण विकणारी हाटेलं थाटून बसलेलं आणि 'डीडीएलजे'मधल्या शारुख-काजोलचा पुरुषभर उंचीचा कटाउट मिरवणारं. मग मीपण जनाची न् मनाची दोन्ही उधळून दिल्या आणि हिरवळीवर फोटो काढायला स्लिवलेस पोलकं नि शिफॉनची प्लेन साडी आणायला हवीवती का कायअशा खंतावणाऱ्या विचारात बुडून गेले. पथारी पसरायला मिळालेल्या बेड न् ब्रेकफास्टच्या खोलीला एक चिमुकली गच्ची होती. तिथून एक निळंभोर चमचमतं तळं दिसायचं. त्या गच्चीतल्या आरामखुर्चीत पसरून फोनच्या स्पीकरवर 'तू मेर्रे स्सामने...लावलं. तोच 'तळ्याचा रंग किती 'कैसी है ये रुत की जिसमें'मधल्या तळ्यासारखा दिसतोय ना...हे जोडीदारणीचं वाक्य आलंच! चोप्रांना उचक्या लागल्या असणार बहुतेक त्या दिवशी.

‍~

शहर अपरात्री पाहावं म्हणतात. अहर्निश धडधडणारे रस्ते निवांत सैलावून पहुडलेले असताना. तेव्हा ते आपल्याकडे मान वळवून नीट बघण्याच्या शक्यतेची शक्यता तरी असते. राहत्या महाशहरातही असला योग किती दुर्मीळ ते पक्कं ठाऊक असलेल्या मला परदेशातल्या शहराबाबत तशी काही अपेक्षा नव्हती. पण संध्याकाळभर गळणारा पाऊस दुर्लक्षून मैत्रिणीला नि तिच्या ताज्या नवऱ्याला भेटायला गेलो. सुरुवातीची बळंच मैत्रीपूर्ण संभाषणं ओलांडता आली नसतीतर एक टिकमार्क करून परतायचा इरादा होता. पण 'युनिव्हर्सल स्टुडिओचं सोडाया झुल्यात बसलात तर खरं!अशा खेळकर च्यायलेंजचा विडा उचलला नि इतक्या उंचीवरून चमचमती नदी बघताना 'आपल्या वजनानं तुटणार नाही ना हा पट्टा'ची बाकबूक अल्लाद विरून गेली. तिथून रंगतच गेली संध्याकाळ. नदीकाठच्या हाटेलांतून जेवत बसलेले लोकबेंबीतला खडा नि सपाट पोट दाखवत थिरकणारी बाईशेजारी उभं राहून कुणास ठाऊक किती वेळ टाळ्यांनी धरलेला तालहळूहळू ओसरत गेलेली गर्दीरिकामे रस्ते तुडवत जाण्याचा सरता न सरणारा उत्साहअधूनमधून झिमझिमणारा पाऊसशेजारून वाहतं पाणीकुणाकडेच नसलेली छत्रीसोडियम व्हेपरच्या पिवळ्या दिव्यांनी बहाल केलेला सेपिया टोनिश माहौल, 'सुबत्ता आहेसुरक्षितता आहे. पण संस्कृतीची नाडी नाही बा गवसलेली अजून मला इथल्या..असल्या दोन-अडीच पेगनंतर होणाऱ्या गप्पा... काहीच न पिता तरी कसं म्हणावंरात्र चढत गेली त्या दिवशी.


Friday, 5 June 2020

लायब्र्यांचे दिवस ५

कागदी पुस्तकांशी असलेलं पातिव्रत्य सोडून मला पहिला व्हर्चुअल व्यभिचार करायला लावला तो हॅरी पॉटरच्या अखेरच्या भागानं. जगभर पुस्तक प्रकाशित झालंय, लोक वाचतायत, पण आपल्याला वीकान्तापर्यंत प्रत मिळणार नाही हे असह्य होऊन मी मिळेल तिकडे सॉफ्टकॉपी हुडकायला सुरुवात केली. 'शोधेल तो पाणी चाखेल' या इंटरनेट ॲक्टान्वये मला ती मिळालीही. फक्त रिक्षा, ट्रेन, टॅक्सीतच नव्हे, तर हापिसातही राजरोस पडफ उघडता येणे या फायद्याची चव कळल्यानंतर तर मला पापाची चटकच लागली. 

पायरसी चूक की बरोबर या वादात मी पडणार नाही. त्याची उत्तरं ज्यानंत्यानं आपापली शोधावीत, समर्थावीत आणि पचवावीत. मराठी पुस्तकांवर मिळकतीचा अमुक एक हिस्सा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे महाशहरातल्या इंच-इंच-लढवू घरातली तमुक इतकी जागा खर्चत असताना इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत तरी आपण थोडा बाहेरख्यालीपणा करावा अशी सूट मी मात्र मला देऊन घेतली आणि मग कायच्या काय एकेक मरुद्यानं सापडत गेली. इंग्रजीतलं माझं बहुतांश वाचन चाटकॉर्नरीच असे आणि असतंही. त्यामुळे मला कागदी प्रतींची तहान नसे. तरी मधूनमधून 'हारून ॲण्ड दी सी ऑफ स्टोरीज्' किंवा 'हॅंडमेड्स टेल'सारखी गाळीव रत्नं सापडतच. मग 'हे पुस्तक तरी कागदी हवंच आपल्याकडे' असं वाटून कागदी पुस्तकं घरी येत. माझ्या इंग्रजी वाचनात अशी माणकं विरळा असल्यामुळे जागेचं कसंबसं निभलं म्हणायचं. 

पण पुस्तकांच्या बरोबरीनं ब्लॉग्स, टम्ब्लर्स, फॅनफिक्स असं वाचन वाढत गेलं, तसतशा निराळ्या अडचणी सतावायला लागल्या. खरं फॅनफिक्स हे अस्सल ऑनलाईन वाचन. पण त्यातही काही फॅनफिक्स इ-त-क्या आवडल्या, की मी चक्क पानाला आठाणे देऊन त्या छापवून नि बांधवून घेतल्या. अर्थात, हा अंमळ चोचलाच म्हणायचा. तो अपवादात्मक म्हणून सोडून दिला नि कागदी साठेबाजी रद्दबातल मानली, तरी सतत अद्ययावत होणाऱ्या ऑनलाईन गोष्टींचा माग काढणे आणि आपल्या संदर्भासाठी त्यांच्या नोंदी ठेवणे ही एक गरज होऊन बसली. गूगलचा रीडर होता तोवर चिंता नव्हती. तिथे एकदा ब्लॉगलिंक डकवली, की तो इमानेइतबारे खबरबात आणि दप्तरखानाही राखून असे. पण गूगलच्या 'खपतं ते विकणार नाही' या पुणेरी धोरणानुसार रीडर अंतर्धान पावला आणि पंचाईत व्हायला लागली. मग आपली कस्टमाइज्ड व्यवस्था आपली आपण राखणं आलं. बरं, पुस्तकांच्याही बाबतीत इंटरनेटवर फक्त पायरेटेड सॉफ्टकॉप्याच मिळत असं नव्हे. हळूहळू प्रताधिकार कायद्याबाहेर निसटलेल्या अनेक जुन्या मराठी-इंग्रजी पुस्तकांच्या प्रतीही ठिकठिकाणी चढवल्या जायला लागल्या. दर काही महिन्यांनी 'अमक्या ठिकाणी बराच माल आला आहे' अशी टीप कुणीतरी समानधर्मी देई आणि मग बरेच दिवस तिथला माल हुडकत बसण्यात नि इतरांना वेचक मालाच्या खबरी पुरवण्यात जात. 'किशोर'सारख्या मासिकानं आपलं सगळं जुनं दप्तर जालावर आणलं, तेव्हा तर 'घेता किती घेशील दो करांनी…' अशी अवस्था. काही हौशी आणि संचयी मित्रांच्या सल्ल्यानं ड्राइव्हवरची चकटफू जागा वापरून या सरकारी मालाचा ब्याकप घेण्याचेही धंदे केले. हो, अनेक पारिभाषिक कोश देणारं एक सरकारी संस्थळ अकस्मात दगावलं किंवा काही दिवस इंटरनेटवर वसून मराठी 'चांदोबा' एकाएकी पंचतत्त्वांत विलीन झाला, तसे फट म्हणता अंक गायबले म्हणजे हो?

पण असल्या व्यवस्था करूनही - योग्य वेळी योग्य लिंका आणि योग्य पडफस्रोत हाती लाभण्याकरता माणसांवर अवलंबून राहण्याला पर्याय नाही, हे माझ्या लक्ष्यात यायला लागलं, ते वाचन अद्ययावत राखून असणाऱ्या काही शेलक्या व्हर्चुअल मैत्रांच्या मागावर राहिल्याचे फायदे भोगल्यावर. त्याच सुमारास एका टम्ब्लर लेखिकेचं एक टपोरं सुभाषित नजरेस पडलं. ही लेखिका व्यवसायानं ग्रंथपाल. फॅनफिक्स लिहिणं, वाचणं, वेचक गोष्टींच्या शिफारशी करणं आणि त्यांबद्दल गप्पा छाटणं हा छंद. तिच्या मते अचूक हॅशटॅग लिहिणं आणि डकवणं हे परीकथेतल्या ब्रेडक्रम्स टाकत आपला माग सोडण्याच्या क्लृप्तीसारखंच कौशल्याचं आणि मोलाचं असतं. किंबहुना हे ज्याला जमलं, तो आजच्या युगातला ग्रंथपालच.

हे वाचून मान डोलावली. इथल्या अमूर्त ग्रंथालयांबद्दल नि अनामिक ग्रंथपालांबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढची लिंक क्लिकवली.

Thursday, 4 June 2020

लायब्र्यांचे दिवस ४

शाळेत असतानाची बहुतेक वर्षं घरातल्यांचा मुख्य जाच जर काही असेल, तर तो म्हणजे हक्काची लायब्ररी नसणे. लहान मुलांची पुस्तकं पुरेनाशी झालेली आणि मोठ्यांची पुस्तकं वाचायला सेन्सॉर बोर्ड. परिणामी कुणीतरी भेट दिल्याशिवाय, कुण्या जबाबदार जाणत्या माणसानं सुचवल्याशिवाय, वा आईबापांनी वाचून संमत केल्याशिवाय पुस्तकं हाती लागत नसत. पण पुस्तकांकरता तर मी सदैव बुभुक्षित असे. आणि तत्कालीन मराठी लोकांच्यात सोज्ज्वळ संस्कार करू शकणारं साहित्य म्हणून मान्यता पावलेली पुस्तकंच आधी आणि अल्लाद हातात पडत. अर्थात माझी त्यांबद्दल तक्रार नव्हती. तेव्हा मिळेल ते सगळंच गोड लागण्याचे दिवस होते. पण त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या, चरित्रं, आत्मचरित्रं… असला निवडक कडबाच आधी हातात मिळत गेला, असं आता लक्ष्यात येतं. 

'स्वामी' ही कादंबरी बरी आहे की वाईट आहे ही चर्चा आपण बाजूला ठेवू. पण शाळकरी मुलांनी ती वाचावी का, याचं उत्तर मला आज निस्संदिग्धपणे हो असं देता येत नाही. सती जाण्याचं उदात्तीकरण वाईट हा तथाकथित 'फुरोगामी' मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी त्या गोष्टीत यत्ता पाचवी-सहावीतल्या मुलीला भावण्यासारखं काय आहे? वाचणारी माणसं - मग ती वयाने कितीही लहान का असेनात - ती त्यांच्या क्षमतेनुसार दिसेल ते ते भक्ष्यत सुटतात, शोषून घेतात आणि काहीतरी अंगी लावून घेतातच हे जरी खरं असलं, तरी मी काही आज पौगंडवयीन मुलांना ही कादंबरी सुचवणार नाही. नि हे तरी 'स्वामी'बद्दल झालं. 'ययाती'? का? का? का? पण 'स्वामी', 'मृत्युंजय', 'ययाती' या तीन एकमेकांशी साहित्यप्रकाराच्या अंगाने आणि साहित्यिक काळाच्या अंगानेही अर्थाअर्थी संबंध नसलेल्या आणि कुठल्याही प्रकारे मुलांसाठी नसलेल्या कादंबऱ्यांचं त्रिकूट अगोचर वाचणाऱ्या मुलांना सुचवण्याची प्रथा आजही मराठी माणसांच्यात आहे.


तशी शाळेला सुरेख लायब्ररी होती. पण ती मुलांसाठी वापरण्याची मात्र प्रथा नव्हती. बहुतकरून शिक्षकच तिचा वापर करत. शाळेच्या सगळ्या मिळून दहा वर्षांत एकदा कधीतरी कुणा तरुण शिक्षकांनी ऑफ तासाला एकेक पुस्तक हातात देऊन वाचा, अशी ऑफर दिल्याची आठवते. एरवी पुस्तकांनी खचाखच भरलेल्या कपाटांकडे आशाळभूतपणे फक्त पाहणे. माझ्या पालकांची शाळेत ओळख असल्याकारणे मला लायब्रीचा फायदा मिळे. पण तिथेही काही विशिष्ट पुस्तकंच थोर मानली जात. आणि तीही मिळायची, ती फक्त दिवाळीच्या वा उन्हाळ्याच्या सुट्टीत. आमच्या शाळासमूहामध्ये इतरही काही शाळा होत्या. पालकांच्या ओळखीचा फायदा घेऊन मी त्यांच्याही लायब्र्या पालथ्या घातल्या. सगळीकडे माझ्या वाचनाचं एक पारंपरिक आणि अपरंपार कौतुक - जे मी पथ्यावर पाडून घेऊन त्याचा नीट वापर करायला शिकले - आणि माझ्यावर संस्कार घडवण्याची एक जबाबदारी घेऊन वावरणारे लोक भेटत. मग रत्नाकर मतकरींचं 'ॲडम' चुकून माझ्या हाती लागलंच, तर कसनुसं होऊन ते घाईघाईनं काढून घेणे, 'पॅपिलॉन' मी वाचावं की नाही याबद्दल भवति न भवति होऊन माझ्या मनात त्याबद्दल अतीव उत्सुकता निर्माण करून ठेवणे, चरित्रांमुळे चांगले संस्कार होतात या समजुतीपायी हाती लागतील ती चरित्रं माझ्या हाती कोंबणे… असल्या लिळा होत.

उन्हाळी सुट्ट्यांच्यात लायब्ररी 'लावली', तरीही तिथेही हा प्रश्न उद्भवेच. मला अधिकृतरीत्या उपलब्ध असे, तो बालविभाग. आणि त्यात मी कसाबसाच जीव रमवून घेई. मग्रसंसारख्या अवाढव्य लायब्रीच्या बालविभागातही भारा आणि इतर काही मंडळीच कसाबसा किल्ला लढवत असत. तीही जेमतेम दोन बाय दोन फुटाच्या लाकडी खोक्यात. तुका म्हणे त्यातल्या त्यात तेच ते उचकत त्यातून मनाजोगतं वाचायला शोधताना चरफडाट होई. 

पण त्यामुळेच मी काय वाट्टेल ते वाचायला लागले. हे चांगलं झालं की वाईट झालं हे मला आजही ठरवता येत नाही. बालसाहित्य असं काही आखीवरेखीव, मापात-चौकटीत, बांधीवतोलीव असावं का, असतं का, या प्रश्नाचं उत्तरही मला कुठल्याच बाजूनं ठामपणे देता येत नाही ते त्यामुळेच असावं.


०१०२ ०३ । ०४ । ०५


Wednesday, 3 June 2020

लायब्र्यांचे‌‌ दिवस ३

लायब्री म्हटल्यावर वास्तविक पुस्तकं आठवावीत. पण माझ्या गावातल्या मग्रसंच्या बाबतीत पुस्तकं ही एक गृहीत धरलेली बाब आहे. सरकारी लायब्र्यांमधली पुस्तकं जुनाट, पिवळी पडलेली, जीर्ण, फाटकीतुटकी असतात, वाचावीशी वाटत नाहीत… वगैरे राजपुत्री तक्रारी करणार्‍या लोकांशी वाद घालण्याच्या अजिबात फंदात न पडता – अर्थात. असल्या लोकांना बहुतकरून ‘मी आजवर १७३ पुस्तकं वाचलीत’ वगैरे हिशेब ठेवायची सवय असते आणि जनरली ते ‘दिल चाहता है’मधल्या सुबोध-कॅटेगरीत मोडतात. असल्यांच्या तोंडी कुठला शहाणा मनुष्य लागेल? असो. डायवर्जन लांबलं. तर, त्यांच्या फंदात न पडता – मी सरकारी लायब्री हा माझ्या वाचनाचा मुख्य स्रोत ठरवून सुखी झाले खरी.
उदाहरणार्थ, त्यांच्याकडची पुस्तक निवडण्याची व्यवस्था. पुस्तकांना थेट हात लावून, पान पलटून, मलपृष्ठावरचा मजकूर वाचूनबिचून पुस्तकं निवडण्याची जगन्मान्य पद्धत मग्रसंला मान्य असत नाही. साधारण चपला-बूट ज्या खोकांतून मिळतात, त्या खोक्यांच्या आकाराचे लाकडी खोके आणि त्यात पुस्तक, लेखक, किंमत, पृष्ठसंख्या इ. नोंदलेली पोस्टकार्डाच्या आकाराची आडवी कार्डं. पुस्तकांचं वर्गीकरण – उदा. कादंबरी, संकीर्ण, कविता, नाटक, निबंध, चरित्र... – दर्शवणारा एक मोठा पुठ्ठा खोक्याच्या पाठीशी उभा खोचलेला. असे वीस-पंचवीस खोके टेबलावर हारीनं लावलेले. लोकांनी या खोक्यांमधली कार्डं पेटीच्या भात्यासारखी ओढून वाचत आपल्याला हवी ती दोन – दोनच हं, लाडात यायचं नाही – कार्ड निवडून काउंटरवर नेऊन द्यायची. मग देवघेव विभागातला कर्मचारी ती कार्ड घेऊन मागच्या कपाटांच्या रांगांत गडप होणार. जर पुस्तक तुलनेनं नवं असेल, तर त्याला फार खोल सुळकांडी मारावी लागत नाही. पण जर ते पुस्तक बाबा आदमच्या जमान्यातलं असेल, तर बुडी मारण्यापूर्वी मारक्या म्हशीसारखा एक कटाक्ष भेटीदाखल दिला जातो. आपण अपराधी लोचटपणानं तस्सं उभं राहायचं. ती पुस्तकं गहाळ नसतील, तर ती तुमच्या पुढ्यात यथावकाश दाखल होतील. मग त्यांतलं एक निवडून घ्यायचं. तुम्ही पुस्तक नेलंत की निवडलेलं कार्ड आत जमा होतं, जेणेकरून ते लायब्रीत परत जमा होईस्तो इतरांना लोकांना निवडता येऊ नये. व्यवस्था चोख. पण एकदा घरी नेलेल्या पुस्तकात खुपसलेली दुसर्याच कुठल्यातरी पुस्तकांची दोन कार्डं हाती आल्यावर या व्यवस्थेतला घपला माझ्या लक्ष्यात आला. आपल्याला आवडतीलशी तीन कार्डं एकदम मिळाली, तर चक्क ती लांबवायची, म्हणजे मग पुढचे तीन दिवस कार्ड हुडकायचे कष्ट नकोत! हे भलतंच आवडूनही मला ही ट्रिक वापरायचा धीर काही कधी झाला नाही! आमची मजल आपली सगळ्या खोक्यांमधली कार्डं पलटून ‘शास्त्र चुंबनाचे’, ‘लक्ष्मी, लक्ष्मी, कुठे चाललीस?’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ आणि तत्सम नावं माफक मोठ्यांदा वाचून दाखवून खुसफुसण्यापर्यंतच.
दर साली दिवाळी आटपून महिना-दोन महिने उलटले की दिवाळी अंक विकून टाकण्यासाठी लागणारा मग्रसंचा बंपर सेल ही त्यांच्या खाती जमा असलेली एक रोमहर्षक बाब. दहा आणि पंधरा रुपयांत मिळणारे दिवाळी अंक ही माझ्या विद्यार्थी खिश्याकरता चैनीची परमावधी होती. कित्तीतरी वर्षं मी या संधीत अक्षरशः हात धुऊन घेतले. महिनाभराचं वाणसामान आणण्याच्या दोन दणकट खाकी पिशव्या घेऊन मी लुटीला जाई आणि गोड ओझं वागवत हवेवर तरंगतच घरी पोहोचे.
पारंपरिक आणि जुन्या घरांना पडव्या-पोटपडव्या पाडून वाढवल्यामुळे त्यांना जसे विशिष्ट भोंगळ-प्रेमळ-अमिबाई आकार आलेले असतात, तशा आकारांच्या अघळपघळ इमारतींतून गावातल्या मग्रसंच्या दोन्ही शाखा नांदत. त्यांची उंच कौलारू छतं, वर्षानुवर्षांच्या वापरानंच होऊ शकतात तसे गुळगुळीत झालेले लोणकट लाकडी जिने, जुन्या शहाबादी फरश्या, लोकमान्य टिळकांची आठवण करून देणार्‍या संस्थापककालीन देणगीदारांच्या काळ्यापांढर्‍या तसबिरी, उंच पाठींची लाकडी बाकडी, तिथे बसणारी रिकामटवळी पेन्शनर मंडळी, तिथल्या सभागृहांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिथे हमखास भेटणारे गावातले उत्साही लोक, रुक्षपणाचा साक्षात अर्क म्हणावा असा कर्मचारिवर्ग, अपरिहार्यपणे त्यांच्याशी भांडणं केल्यावर ‘फूंक फूंक के रखने पडनेवाले कदम’ नि ओळख झाल्यावर होणारे लाड... आणि सरतेशेवती तिथली कितीकांनी शेरेबाजी केलेली, चिताडून ठेवलेली, पुन्हा पुन्हा बांधणी केल्यामुळे ओळीतल्या शेवटच्या शब्दापर्यंत पोचण्याकरता हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार्‍या नृसिंहाचा अवतार घ्यायला लावणारी, जुनी, नवी, पिवळी, पांढरी, फाटकी, गुलाबी बायंडिंगातली,… अक्षरशः अंतहीन पुस्तकं... हे सगळं मी पुरेपूर उपभोगलं.
लायब्री जुन्या इमारतीत नांदत असताना, इमारतीच्या बाहेरून काढलेला एक डुगडुगता माडीवजा जिना संदर्भविभागात नेत असे. तो साक्षात स्वर्ग होता. तिथलं बुटकं छत, जुन्या कपाटांच्या अंतहीन रांगा, तिथे भरून राहिलेला अस्सल जुन्या पुस्तकांचा धुळकट वास, पाणी प्यायला भीती वाटावी असा एक प्राचीन माठ, शंभरेक वर्षांच्या कालखंडात जमा होत गेलेली निरनिराळ्या आकारांची नि शैलीतली लाकडी नि धातूची खुर्च्या-टेबलं, नुसतं नावं नोंदून सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट्टेल ती पुस्तकं वाचत बसण्याची मुभा...
अलीकडे काही कामानिमित्त नव्या इमारतीच्या संदर्भ विभागात गेले असता तिथे बॅंकेच्या कॅशियर काउंटरला लाज आणेल असा एक जाळीदार-कुलूपबंद-अद्ययावत काउंटर, अनेक कॉम्प्युटरांचे जुनाट डबे ठेवल्यामुळे सगळ्या संदर्भविभागाला आलेली स्वस्त सायबर कॅफेची कळा, आणि ‘बाहेर बसण्यासाठीच्या जागा संपल्या आहेत, पुढच्या वर्षी प्रयत्न करावा’ ही पाटी पाहिली.
मी अक्षरशः हाय खाऊन परतले.

०१०२ । ०३ । ०४ । ०५

Monday, 1 June 2020

लायब्र्यांचे‌‌ दिवस २




आपल्या हक्काच्या शहरात असताना नाक वर करून, भवतालाला गृहीत धरून, आपल्याच तंद्रीत सुखेनैव चालणारी माणसं परक्या शहरात पडल्यावर जशी व्याकूळपणे आपल्या गावच्या खुणा हुडकत असतात; तसं होऊन मी बंगळूरच्या लायब्रीत गेले. आपण कुठल्यातरी अमराठी ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात जायचं आहे या कल्पनेनीच माझी नांगी इतकी मोडली होती, की गावढ्या गावातून तालुक्याच्या जागी चालत येण्यापूर्वी आठवून आठवून पिशवी भरणार्‍या एखाद्या कष्टकरी महिलेप्रमाणे वेळेआधी फोन करून, आज नक्की लायब्री उघडी असेल ना हे तीनतीनदा विचारून मी तिकडे मोर्चा वळवला. 
त्यांच्याकडे नाव नोंदवताना मात्र क्याटलॉगात नजर फिरवून घेतली आणि 'अरेच्चा! 'बाइंडर' आहे यांच्याकडे शाबूत!', ''नातिचरामि'ही घेतलंय अं? वाईट नाही. तसे अद्ययावत दिसतात.', ''मी भैरप्पा''! हे कधीचं राहिलंय वाचायचं...' अशा जिभल्या चाटत आणि मनोमन शेरेबाजी करतच विचार पक्का केला. तशी पुस्तकं बदलायला मुख्य शाखेत क्वचितच गेले असेन. कारण घराजवळ पंचवीस रुपये रिक्षाच्या अंतरात एक काकू ट्रंक भरून पुस्तकं आणून पोटशाखा चालवतात अशी माहिती मिळाली आणि मग एकशेपंचवीस रुपये रिक्षाला देणं अर्थातच मागे पडलं. पण सुमारे दोन-अडीच वर्षं वापरली ती लायब्ररी. आपल्या शहरात नसताना वीकान्ताचे रकाने भरून काढणं खरं दमवणारं असतं हा साक्षात्कार होता-होताच मला लायब्रीचा शोध लागलेला. त्यातही माझं मराठी नाक मनातल्या मनात सदैव वर असे. 'महाराष्ट्राबाहेर गोठवलेली मराठी जपणारे डबकीय लोक हे, नाईलाज आहे म्हणून वाचायचं झालं!' असा एक उगाचच्या उगाच आढ्यताखोर फणकारा असायचा. पण नाही म्हणता म्हणता मी चिकार नवं कायकाय वाचलं त्यांच्याकडे. 
सुरुवातीला त्यांच्या 'गेटेड कम्युनिटी'तल्या चकचकीत ड्युप्लेक्स फ्लॅटमधून ट्रंकभरून पुस्तकांची शाखा चालवणार्‍या काकूंची जिम्मा मीही पुलंच्याच असंवेदनशीलतेनं 'अतिविशाल' क्याटेगरीत करून टाकली होती. अर्थात - त्यांच्याही बाजूनं अढी कमी नसणार. कधीच एका शब्दाहून अधिक बोलायच्या नाहीत. शोधक नजरेनं बघायच्या मात्र मी काय वाचतेय ते. हळूहळू 'अमकं वाचलंय का?' इथवर प्रगती झाली होती, इतकंच. विशीच्या अल्याडपल्याडच्या पोरी खिदळत पुस्तकं न्यायला येतात, त्या काय डोंबल वाचणारेत, ओसरेल खूळ... अशी दबा धरून बसलेली, पन्नाशीच्या अल्याडपल्याडची, कमावलेली खातरी त्यांनाही असणारच. मी आपली हे सगळं नोंदूनच्या नोंदून वर खांदे उडवून खुशाल असे. दर चारेक महिन्यांनी तेवीस किलोंमधले पंधराएक किलोतरी मी पुस्तकांकरताच वापरत असे, ती काय उगाच होय! परिणामी वर्तुळात सावध अंतरावरून एकमेकींसमोर गोल फिरत एकमेकींचा अंदाज घेणार्‍या आणि क्वचित दात विचकून मग पवित्रा बदलणार्‍या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे आमची एकंदर पुस्तक देवघेव चाले. 
यात फरक पडला, तो विभावरी शिरूरकरांचं 'खरे मास्तर' हे पुस्तक मी उचललं तेव्हा. हे पुस्तक मला तोवर भेटलं नव्हतं. विभावरी शिरूरकरांचं 'कळ्यांचे निःश्वास' हे एकच पुस्तक ठाऊक. अत्यंत विपरित परिस्थितीत जिद्दीनं आपल्या लेकींना शिकवणार्‍या आणि मग त्यांचे पुरोगामी निर्णय पचवणार्‍या गरीब मास्तराची स्तिमित करणारी आधुनिक ओळख वाचून मी अतिशय अतिशय हरखून गेले. 


त्या आनंदात देवघेवीच्या पुढच्या शनिवारी माझ्याकडून अधिकचं वाक्य सुटलं, "काय सुरेख आहे पुस्तक!" यावर काकूंनी हातातला मटा खाली करून चश्मिष्ट नजर माझ्याकडे वळवली. हसू नाही. नुसती सावधपणे जोखणारी नजर. एक क्षण माझ्या काळजाचा ठोका चुकला असणार बहुतेक. पण मग हसल्या हलकंसं. नकळत हुश्श झालं मला! तेव्हापासून त्या आवर्जून एखाद्दुसरं वाक्य उच्चारायला लागल्या दर शनिवारी. सुचवायला लागल्या क्वचित एखादं पुस्तक. 
तितकीच ती मैत्री. कोणत्याही आबदार ग्रंथपालाशी हवी तितकीच आणि तशीच. काकू क्वचित हॉलमध्ये गवार मोडत असल्या, क्वचित यजमानांना सूचना देत असल्या - तरी त्या होत्या अंतर्बाह्य ग्रंथपालच, हे मी स्वीकारून टाकलं. तिथला मुक्काम संपतानाही त्या मैत्रीत विशेष भावनात्मक देवाणघेवाण झाली नाही. 'चाललात का? अच्छा.' इतपतच संवाद. 
पुढे पुष्कळ वर्षांनी एका दिवाळी अंकातला लेख वाचून काकूंनी आवर्जून वाचल्याचं कळवलं. 'वाचला. कुठे असता?' उत्तर. पूर्णविराम. इतकाच संवाद. पुढचा फापटपसारा नाही! मग मी त्यांचं ग्रंथपालपद अजूनच पक्कं करून टाकलं. 

०१ । ०२ । ०३ ०४ । ०५

Friday, 29 May 2020

लायब्र्यांचे दिवस १

लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इतकुशीच होती ही जागा?’ असा विश्वासघात होऊन खट्टू व्हायला होतं. माझ्या पहिल्या लायब्रीच्या बाबतीत तसं होण्याची वेळ सुदैवानं कधीच आली नाही. मी इतरत्र मोर्चा वळवण्याच्या वयात असतानाच कधीतरी ‘माणिक वाचनालया’नं आपला गाशा गुंडाळून तिथे रंगांचे डबे विकणार्‍या कुणालातरी जागा करून दिली. पण ती जागा माझ्या स्मरणात इतकी पक्की आहे, की अजुनी कधी स्वप्नात लायब्री आलीच, तर तिला त्या गाळ्याचंच नेपथ्य असतं. सोबत पुस्तकांबद्दलचं एक हव्यासयुक्त, असुरक्षित, आतुर आकर्षण. लायब्र्यांच्या बरेवाईटपणाचे निकष मनात आकाराला येण्यापूर्वी मिळालेली ही लायब्ररी जेमतेम एका गाळ्यात वसलेली होती. लांबुळका गाळा. तिच्या तिन्ही भिंतींना काचदरवाजे असलेली, पुस्तकांची पातळ कपाटं. मधे लांबुळका काउंटर. गाळ्याच्या दर्शनी भागात, काउंटरला लंबरेषेत मासिकं मांडलेली. लहान मुलांची पुस्तकं भिंतीवरच्या कपाटांच्या पायथ्याशी. तिथल्या ग्रंथपालांच्या – हा शब्द मला पुष्कळ पुढे कळला. तेव्हा ‘खडूस’, ‘राखुंड्या’, ‘ढापण्या’ इत्यादी विशेषणं विशेषनामासारखी वापरलेली ऐकू येत – खडूसपणाबद्दल वाडीतल्या अनेकांची ठाम मतं होती. पण त्यांना माझ्याबद्दल ममत्व असावं. माझ्यातला भावी वाचक वेळीच हेरून आपल्या व्यवसायबंधूंसाठी एक गिर्‍हाईक पोसण्याचाही त्यांचा मनोदय असू शकेलच. पण ते काहीही असलं, तरी माझ्या अंगावर तिथे कुणी कधी खेकसत नसे. मी म्हणीन ती पुस्तकं म्हणीन तितका वेळ बघायला मुक्तद्वार असे. सगळ्याच लायब्रर्‍यांमध्ये हाती लागलेल्या विशेष पुस्तकांच्या आठवणी कायम आपल्या हाती पडलेल्या तिथल्या प्रतींची छबी घेऊनच येतात. तशा तिथून आणून वाचलेल्या ‘हॅन्स अ‍ॅंडरसनच्या परीकथा’ मला अजूनही तशाच्या तशा आठवतात. त्यांतल्या एका कथेचं मधलं पान गहाळ होतं, तर अलीकडे कधीतरी नवीकोरी प्रत विकत मिळाल्यावर मी अचूक त्या पानापाशी जाऊन अधाश्यासारखा तो मजकूर वाचून घेतला.

तिथल्याच कपाटातून आणलेलं शरलॉक होम्सच्या कथांपैकी एक वाचून मला भीतीनं अक्षरशः ताप भरलेला आठवतो. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत सोडलेल्या घंटेच्या दोरीवरून साप सोडून पुतणीचा खून करवणार्‍या काकाची ती कथा होती. भाषांतरात तिचं नाव ‘कृष्णकारस्थान’ होतं नक्की, पण भाषांतरकार काही केल्या आठवत नाही. ‘शिवणाच्या दोर्‍यानं हत्ती जखडण्याइतकं महाकर्मकठीण काम’ किंवा ‘’ग’ची बाथा होणे’ इत्यादी वाक्प्रचार शिकून मग जमेल तिथे त्यांचा यथाशक्ती वापर करणे आणि घरातल्या लोकांना चिमखडे बोल ऐकण्याचा आनंद पुरवणे हेही गुन्हे माझ्या खाती जमा आहेत. मातापितर सुज्ञ असल्यामुळे म्हणा किंवा तत्कालीन आईबापांना चिमखडे बोल नामक चाळे ऐकवण्यातली मज्जा ठाऊक नसल्यामुळे म्हणा – माझी तितकी बदनामी झाली नाही, इतकंच. आता नवल वाटतं, पण लायब्री तशी शुद्ध धंदेवाईकच असूनही तिथे ‘जादूची अंगठी’, ‘उडता खजिना’ आणि तत्सम पुस्तकं कधीही दिसली नाहीत. साधं चंपक आणि ठकठकही नसे. परीकथा, साहसकथा, नीतिकथा, बोधकथा, पंचतंत्र, बिरबल-तेनालीरामा वगैरे चातुर्यकथा, ताम्हनकरांची पुस्तकं, किशोर-आनंद-कुमार यांसारखी मासिकं, थोरांची चरित्रं इत्यादी प्रकरणं असत. याचा अर्थ ग्रंथपालांना – तेच लायब्रीचे मालक होते – काहीएक भूमिका होती असणार. त्याचं आता अप्रूप वाटतं. आता ते भेटण्याची शक्यता कमीच, पण मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडलं असतं. ‘मीच ती आगाऊ बारकी पोरगी’ असं सांगून थोडे नॉस्टाल्जिक लाड वसूल करण्यापलीकडचं मूल्य त्या गप्पांना येऊ शकलं असतं. बाकी काही जरी नाही, तरी तत्कालीन लोकांच्या वाचनाबद्दलचे आणि वाचनाच्या सवयींबद्दलचे त्यांचे शेरे-ताशेरे ‘किमान शब्दांत कमाल जहाल वर्णन’ या चाचणीला उतरणारे असले असतेच. ते आता होणे नाही. आता असे ग्रंथपाल-चालक-मालक अस्तंगत होण्याचा जमाना आहे…
०१०२०३०४ । ०५

Monday, 9 December 2019

नाटक - ३

अनेकदा पडलं आहे मला असं स्वप्न. कसंकुठे वापरू त्याला असा तद्दन लेखकासारखा विचारही केला आहे मी अनेकदा. पण नाही जमलेलं. असं स्वप्न पडलं की काही चांगलं घडतं काकाही वाईट घडतं का... हाही एक नॉस्ट्राडेमसीय विचार अधूनमधून कुरतडत राहतो मनाला. पण बरेच दिवसांत स्वप्न पडलं नाहीकी तोही विचार मागे पडतो. कधीतरी पुन्हा तसं स्वप्न पडतं आणि मी सकाळी जाग आल्यावरही इतकी भारलेलीखूश असते… की हे सगळे फायद्यातोट्याचे विचार मागे पडतात आणि फक्त हातातून सुटून जाणार्‍या स्वप्नाचे सुटेसुटे धागे होता होईतो हातात धरून ठेवायची आनंददायी धडपड तेवढी उरते. अर्थातच तपशील दर वेळी निराळे असतात. स्थळं निराळी. वेळाही निराळ्या. पण काही तपशील मात्र आश्चर्यकारकरीत्या समान. थिएटर असतं कुठलं ना कुठलं. नाट्यगृह हा शब्द मुद्दाम नाही वापरलेला. कारण कधीतरी नाटक दिसतं नुकतंच सुरू झालेलंकधी नाही. मग मला कळत नाहीहे सिनेमाचं थिएटर आहे की नाटकाचं. ओळखीची नसतात ही थिएटर्स. हे गडकरी रंगायतन किंवा हे वडाळ्याचं आयमॅक्स किंवा हे शिवाजी मंदिर... किंवा हे क्रायटेरियन थिएटर – असं छातीठोकपणे सांगता यावं अशी नसतात ती. त्यांच्यातले कितीतरी घटक एकमेकांत मिसळून गेलेले असतातत्यांच्या कडा पुसट झालेल्या असतात. कधीकधी नाटक चालू असतं रंगमंचावर. पण बरेचदा मी घाईनं माझी खुर्ची शोधत असते. मनात कमालीची उत्कंठाआता पडद्यावर काहीतरी सुरू होईल आणि तत्पूर्वी मला माझी जागा हुडकून तिकडे बसलं पाहिजेअसा अदृश्यहवाहवासा धाक. एकटीच असते मी कायम. कधीच सोबत कुणी असल्याचं आठवत नाही. थिएटर कायम गर्दीनं फुलून गेलेलं. पण सगळी अपरिचितांची गर्दी. सगळीभर पसरलेला सोनसळी प्रकाश. वावरणार्‍याला आश्वस्त वाटावं इतकाच उजेड घेऊन तो उरलेल्या अंधारात मिसळून दिलाकी तयार होईल अशा पोताचा. त्यात कध्धीच कुणालाच भीती वाटू नये कसलीहीअशा मऊ स्पर्शाचा. पायर्‍या असतात चिकार. आणि मी त्या घाईनं उतरत वा चढत असते. भिरभिरत्या नजरेनं माझी जागा शोधत. मी जागेवर पोचतेआसनस्थ होते आणि स्वप्न झोपेत विरघळून जातं. सिनेमातल्या एखाद्या स्वप्नदृश्याच्या कडा बाजूच्या धुक्यात विरघळलेल्या असाव्याततसं. माझ्या मनातल्या अनिवार उत्सुकतेबद्दल मनात अनिवार उत्सुकता असूनही मी स्वप्नात कधी माझी जागा शोधल्यावर खुर्चीत बसून पुढचं नाटक वा सिनेमा पाहिलेला नाही. दुसर्‍या कुणाचीतरी गोष्ट ऐकण्याबघण्यातलाआपलं आयुष्य पुस्तकासारखं आणि पुस्तकाइतकंच काही काळ मिटून ठेवू शकण्यातलाचौथ्या भिंतीच्या जागची मोक्याची जागा मिळवण्यातला थरार असेल त्यातकाय की...

***
नाटक १
नाटक २