संवेदचा खो बघून खरंच त्यानं म्हटल्यासारखी वॉशिंग्टनची कुर्हाड हाती आल्यासारखे हात शिवशिवायला लागले. कुणाला झोडू नि कुणाला नको, असं होऊन गेलं.
मग लक्षात आलं, एखाद्या लेखकाला अशा प्रकारे लक्ष्य करणं सोपं आहे. एका बाजूला ग्रेस, जी. ए. वा तेंडुलकर. एका बाजूला व.पु., संदीप खरे, मीना प्रभू, प्रवीण दवणे, हल्ली अनिल अवचट आणि चक्क पु.ल.सुद्धा. या लेखकांची वेगवेगळ्या कारणांनी वारंवार रेवडी उडवली जाते. कधी दुर्बोधपणाच्या आरोपाखाली. कधी तथाकथित ’बोल्ड’ वा ’अश्लील’ असण्याबद्दल. कधी साहित्यबाह्य कारणं असतात म्हणून, कधी तसं करणं उच्चभ्रू असतं म्हणून, कधी त्यांची लोकप्रियता आणि लिहिण्याचा दर्जा (अर्थात सापेक्ष) यांचं प्रमाण व्यस्त असतं म्हणून, कधी निव्वळ तशी फॅशन असते म्हणून. पण या सगळ्या लेखकांनी कधी ना कधीतरी गाजण्याइतकं चांगलं, दखल घेण्याजोगं लिहिलं आहे. एका पुस्तकाच्या गाजण्यावर नंतर सगळी कारकीर्द उभारली असेलही कुणी कुणी, पण त्यांच्या त्यांच्या काळाच्या चौकटीत त्यांच्या पुस्तकांच्या गाजण्याला सबळ कारणं आहेत. ती दुर्लक्षून पुस्तकांबद्दल न बोलता लेखकांच्या शैलीवर, विषयांवर, लोकप्रियतेवर टीकेची झोड उठवणं, कसलीच जबाबदारी न घेता - विखारी टवाळकीचा / सर्वसामान्य वाचकाच्या बाळबोध अभिरुचीचा / सिनिक जाणकारीचा आसरा घेत बोलणं सोपं आहे.
पण इथे संवेदनं तसला सोपा रस्ता ठेवलेला नाही. अमुक एक पुस्तक, ते का गाजलं नि त्याची तितकी लायकी नव्हती असं मला का वाटतंय असं रोखठोक बोलावं लागेल हे लक्षात आलं, तेव्हा कुर्हाडीची धार गेल्यासारखी वाटली. पुस्तक निवडताना तर फारच पंचाईत. इतक्यात गाजलेलं, पण गाजण्याची लायकी नसलेलं पुस्तक कुठलं तेच मुळी मला ठरवता येईना. भाषेच्या नावानं दरसाल गळे काढणारे आपण लोक, आपल्या भाषेत पुरेशी पुस्तकं गाजतात तरी का, असा प्रश्न पडला. ’हिंदू, हिंदू... हिंदू’ अशी आसमंतातली कुजबुज ऐकली मी, नाही असं नाही. पण निदान तुकड्या-तुकड्यांत तरी मला ’हिंदू’ आवडली होती. तसंच ’नातिचरामि’चं. शिवाय ’हिंदू’ आणि ’नातिचरामि’ला झोडण्याची सध्या फॅशन असली, तरी काही वर्षांचा काळ मधे गेल्यानंतरच त्यांचं मूल्यमापन करता येईल असंही मला वाटतं.
अलिप्त अंतर बहाल करण्याइतकं जुनं, खूप गाजलेलं नि मला तितकंसं न आवडणारं - अशा पुस्तकाचा शोध घेताना ’मृत्युंजय’ आठवलं. सुरुवातीलाच कबूल करते - मी लहानपणापासून ’मृत्युंजय’ अतिशय प्रेमानं, अनेक पारायणं करत वाचलं आहे. निदान काही वर्षं तरी त्या पुस्तकाची शिडी करून इतर पुस्तकांपर्यंत - लेखकांपर्यंत पोचले आहे. त्याबद्दल या खोमध्ये लिहिणं काहीसं कृतघ्नपणाचं ठरेल, हेही मला कळतं आहे. पण आता ते इतकं गाजण्याइतकं थोर वाटत नाही हेही खरंच आहे.
का बरं?
माझी चांगल्या गोष्टीची व्याख्या ही अशी - ज्यात गोष्टीचा तंबू एकखांबी नसतो. एकापेक्षा जास्त पात्रांनी मिळून बनलेली ती गोष्ट असते. पात्रं हाडामांसाची, चुका करणारी-शिकणारी, वाढणारी, घडणारी-मोडणारी असतात. काळी किंवा पांढरी नसून राखाडी असतात. गोष्टीला खिळवून ठेवणारे चढ-उतार असतात. नि मुख्य म्हणजे वाढणार्या आपल्यासोबत गोष्ट कालबाह्य होत जात नाही. तिचं अपील आपल्याकरता टिकून राहतं.
या व्याख्येत ’मृत्युंजय’ बसते का? नाही बसत.
एक तर ती पुरी गोष्ट नाही. कुणीतरी आधीच सांगितलेल्या गोष्टीचा आपल्या सोयीनं निवडून घेतलेला नि आपल्या सोयीनं भर घालून वा कातरी लावून मांडलेला एक तुकडा आहे. अशी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन सांगितलेल्या गोष्टी मुळातूनच दुय्यम असतात (आणि त्यांना संदर्भमूल्य नसतं) हे आपण मान्य केलं पाहिजे. तेही एक वेळ ठीक. त्यातून काही नवे अन्वयार्थ लागत असतील तर. इथे महाभारताचा कोणता नवीन पैलू सामोरा येतो? कुठलाच नाही. फक्त त्यातल्या एका पात्राला कुठल्याही तोलाचं भान न बाळगता एखाद्या सुपरहीरोसारखं अपरिमित मोठं केलं जातं. त्यासाठी सावंत वरवर अतीव आकर्षक भासेलशी संस्कृतप्रचुर विशेषणांनी लगडलेली भरजरी, अलंकृत भाषा वापरतात. कर्णाच्या आजूबाजूची पात्रं फिक्या-मचूळ रंगांत रंगवतात. इतकी, की कादंबरी वाचल्यावर त्यातलं फक्त कर्णाचं पात्र तेवढं आपल्या डोक्यात स्पष्ट ठसा उमटवून उरतं. थोडा-फार कृष्ण. बस. बाकी काहीही छाप पाडून जात नाही. ही काही चांगल्या कादंबरीची खूण नव्हे. याला फार तर एखादं गोडगोड चरित्र किंवा गौरवग्रंथ म्हणता येईल.
कदाचित मी फारच जास्त कडक निकष लावून पाहते आहे. एक ’एकदा वाचनीय पुस्तक’ या निकषावर आजही ’मृत्युंजय’ पास होईल. पण मग तिला मिळालेला ’मूर्तिदेवी पुरस्कार’? भारतातल्या नि भारताबाहेरच्याही भाषांमध्ये तिची झालेली भाषांतरं? तिच्या दोन आकडी आवृत्त्या? कुणीही मराठी कादंबर्यांचा विषय काढला की अपरिहार्यपणे तिचं घेतलं जाणारं नाव? ती वाचलेली नसली तर अपुरं समजलं जाणारं तुमचं वाचन? हे सगळं मिळण्याइतकी तोलामोलाची आहे ती?
सावंत, माफ करा, पण ’मॄत्युंजय’ इतकी मोठी नाही. तरी तिला मिळालेल्या इतक्या अफाट लोकप्रियतेमुळे तिच्यानंतर अशा प्रकारच्या चरित्रात्मक कादंबर्यांचं पेवच मराठीत फुटलं. इतिहासाला वा पुराणातली कोणतीही एक व्यक्तिरेखा उचलावी, तिला अपरिमित मोठं-भव्य-दिव्य-लार्जर दॅन लाईफ रंगवावं, तिच्या आजूबाजूला यथाशक्ती प्रेमकथा / युद्धकथा / राजनीतीकथा रचावी आणि एक सो-कॉल्ड यशस्वी कादंबरी छापावी, असं एक समीकरणच होऊन बसलं, हे ’मृत्युंजय’नं केलेलं आपलं नुकसान. तशा पुस्तकांची यादी करायला बसलं, तर मराठी वाचकांची कितीतरी ’लाडकी’ नावं बाहेर येतील...
पण आपला खो एकाच पुस्तकापुरता मर्यादित आहे. ’मृत्युंजय’वर माझ्यापुरता खिळा ठोकून नि कुर्हाड मिंट, राज, गायत्री, दुरित आणि एन्काउंटर्स विथ रिऍलिटी यांच्याकडे सोपवत तो पुरा करतेय. संवेदचा खो तर घ्याच, शिवाय माझी ही खालची पुरवणीही जरूर घ्या.
माझी पुरवणी:
’खपाऊ पण पकाऊ पुस्तकं’ हा संवेदचा विषय वाचताक्षणी माझ्या डोक्यात ताबडतोब त्याला जुळा असलेला विषय आला होता. ’उत्तम पण उपेक्षित पुस्तकं’.
काही पुस्तकांना ती तितकी तालेवार असूनही मिळायचं तितकं श्रेय कधीच मिळत नाही. ती कायम उपेक्षित राहतात. नंदा खरे यांचं ’अंताजीची बखर’ हे ऐतिहासिक कादंबरीचा घाट असलेलं पुस्तक मी या खणात टाकीन. मराठी ऐतिहासिक कादंबरीतली कायमची-भव्य-दिव्य-जिरेटोपी व्यक्तिमत्त्व बाजूला सारून एका क्षुल्लक मराठी हेराच्या नजरेतून ही कादंबरी मराठी रियासतीतल्या एका मोठ्या कालखंडाकडे डोळसपणे (आणि तिरकसपणे) बघते. ती शब्दबंबाळ नाही. तिला उपरोधाचं नि पक्षी विनोदाचंही अजिबात वावडं नाही. त्यातली अस्सल रांगडी नि मिश्कील मराठी भाषा आवर्जून वाचावी अशीच आहे.
पण तिची म्हणावी तशी दखल घेतलेली ऐकिवात नाही. बर्यापैकी जुनी असूनही ती मी अगदी अलीकडे वाचली आणि हरखून गेले.
बहुतेक मराठी वाचकाला भव्य नसलेल्या इतिहासाचं वावडं असावं!