फैज अहमद फैज हा कवी मित्रकृपेनं भेटला. पुरते शब्दार्थ न कळताही भाषेच्या लयीची भूल पडते नि मागून दमदार अर्थ आकर्षण अधिक सखोल करत नेतात, तसं झालं. कवी असण्यातली सगळी वेडं जगून घेणारा हा कवी. बंडखोर, स्वप्नाळू, धुंद प्रेम करणारा, प्रेम पचवून शहाणपणाचं खंतावलेलं पाऊल टाकणारा. तो गायलाही गेला खूप. वेड लागल्यासारखी मी वाचत, ऐकत, समजून घेत सुटले. १३ फेब्रुवारीला या कवीचा जन्मदिन. त्या निमित्तानं हे साहस.
खरं तर काही ऋणनिर्देश करायला हवेत. पण काही ऋणांतून कधीच मुक्त न होण्यात... वगैरे वगैरे!
हे शब्दश: / अर्थश: भाषांतर नाही. कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चिमटीत धरायचा; की कवितेचं कवितापण, तिच्यातला मूड असा प्रश्न अनेकवार पडला. नि फैजच्या शब्दांना हात घालायचं पाप करतोच आहोत, तर न भिता-न कचरता-मनापासून करू, असं म्हणत मी दुसरा पर्याय स्वीकारला.
गायत्री नातूनं मागे केलेली चार भाषांतरं आठवून मी खचणारा धीर सावरला. तिचे आभार मानायला हवेत. वाद होऊ शकतो अनेक गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांवरून. क्रमावरून. प्रतीत होणार्या अर्थावरून. कुठे भाषांच्या मर्यादा आहेत, कुठे नादाच्या. मला मर्यादा मान्य आहेत. 'हे सापेक्ष आहे' ही इथे पळवाट म्हणून वापरत नाही, मला खरंच असंच म्हणायचं आहे, की हा कवितेनं 'मला' दिलेला अर्थ आहे नि तो प्रत्येकासाठी निराळा असेल.
असो. पुरे. एकदाच माफी मागते.
ही फैज यांची मूळ कविता:
तुम मेरे पास रहो
तुम मेरे पास रहो
मेरे क़ातिल मेरे दिलदार, मेरे पास रहो
जिस घड़ी रात चले,
आसमानों का लहू पी के सियाह रात चले
मर्हमे-मुश्क लिये नश्तरे-अल्मास लिये
बैन करती हुई, हंसती हुई, गाती निकले
दर्द की कासनी पाजेब बजाती निकले
जिस घड़ी सीनों मे डूबे हुए दिल
आस्तीनों मे निहां हाथों की राह तकने लगे
आस लिये
और बच्चों के बिलखने कि तरह क़ुलकुले-मै
बहरे-नासूदगी मचले तो मनाये न मने
जब कोई बात बनाए न बने
जब न कोई बात चले
जिस घड़ी रात चले
जिस घड़ी मातमी सुनसान, सियाह रात चले
पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो
(
इथे नायरा नूरच्या आवाजात नि
इथे विद्या शाहच्या आवाजात ती ऐकताही येईल. मला विद्या शाहची आवृत्ती अधिक आवडली.)
थांब इथे.
माझ्यापाशी.
आभाळाच्या रक्तावर पोसलेली धुंद रात्र
काळोखाची लयबद्ध पावलं टाकत येते,
तेव्हा सार्या व्यथांवर क्षणमात्र फुंकर पडल्यासारखी होते.
पण तिच्या पायी कसलेले असतात दुःखांचे खळाळणारे चाळ
आणि हातच्या नक्षत्रांना लक्कन कापून जाणारी हिर्याची धार असते.
तेव्हा,
थांब इथे माझ्यापाशी.
एरवी छातीच्या तटबंदीआड मुकाट राहणार्या काळजांचा सुटू पाहतो ठाव
लागते कुण्या आश्वासक हातांची ओढ,
स्पर्शांची स्वप्नं पडू लागतात...
तिन्हीसांजेला कळवळून रडणार्या पोरासारखा भेसूर सूर असतो ओतल्या जाणार्या मद्यालाही,
अवघ्या अर्थाला निरर्थकाचे वेढे पडतात.
काहीच मनासारखं होत नाही
काही केल्या.
दूरवर कुठेच कुणीच काही बोलत नाही.
स्मशानशांतता पेरत रात्रीची काळीशार दमदार पावलं पडू लागतात.
तेव्हा जिवलगा,
थांब इथे.
माझ्यापाशी.
श्रद्धा, याच कवितेचं भाषांतर करायचा खो घेणार का?