Showing posts with label पुस्तक. Show all posts
Showing posts with label पुस्तक. Show all posts

Friday, 14 March 2025

दिसामाजी काहीतरी : अंतर्जनम : देवकी निलयगोडे

‘अंतर्जनम’ हे देवकी निलयमगोडे (उच्चारात चू०भू०दे०घे०) यांचं आत्मचरित्र. नंबुद्री ब्राह्मण घरात १९२८ साली जन्माला आलेल्या या बाई. इंदिरा मेनन आणि राधिका पी. मेनन अशा दोघी जणींनी देवकीबाईंची मल्याळमध्ये लिहिलेली दोन चरित्रात्मक पुस्तकं आणि त्यांचेच काही सुटे लेख यांचं इंग्रजीत भाषांतर करून हे पुस्तक सिद्ध केलं आहे.
नंबुद्री ब्राह्मण चालीरीतींबद्दल मला मोघम माहिती होती. साधारणपणे आठव्या शतकात केरळातल्या राजांनी श्रौत कर्मकांडं करवून धर्माची मान्यता मिळवण्याकरता नंबुद्री ब्राह्मण कुटुंब उत्तरेतून आणवली. ही कर्मकांडं करण्याच्या मोबदल्यात त्यांना जमिनी दिल्या. या ब्राह्मणांनी वेदाध्ययनाची मौखिक परंपरा जपली. मल्याळम भाषेत काव्यरचना केल्या. त्यातून मल्याळम भाषेवर संस्कृतचा अमीट ठसा उमटला. याबद्दल आणि त्यांच्या काही विशिष्ट चालीरीतींबद्दल तेव्हा ऐकण्यात आलेलं असल्यामुळे मला त्याविषयी कुतूहल होतं. त्यामुळे नेटवर रानोमाळ भटकताना वाटेत लागलेलं हे पुस्तक उचललं आणि ते अक्षरशः दोन दिवसांत संपवलं.
वाचताना संताप, शरम, अचंबा, कुतूहल, विषण्णता, कौतुक, अविश्वास…. अशा भावना आलटून पालटून मनात येत राहिल्या.
नंबुद्री ब्राह्मणांना इनाम मिळालेल्या जमिनी कुटुंबातच राहाव्यात आणि त्यांचे तुकडे होऊ नयेत, म्हणून या कुटुंबांमध्ये एक विशिष्ट पद्धत राबवली जात असे. फक्त मोठ्या मुलग्याचं लग्न नंबुद्री ब्राह्मण जातीत करायला परवानगी होती. बाकीच्या मुलग्यांना नायर राजकुळात, वा इतर काही क्षत्रिय जातींमध्ये ‘संबंध’ राखण्याला परवानगी असायची. या संबंधांना ‘संबंधम्’ असंच म्हणत. त्यांच्या स्त्रिया आणि मुलं ही त्यांच्या मातृघरीच राहत. त्यांचे वंशपरंपरागत हक्क, नावं हे सगळंच त्या स्त्रियांच्या माहेरचं असायचं. त्यामुळे नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या जमिनी त्यांच्याकडे सुरक्षित राहत. त्या कुटुंबातल्या मुलींना साहजिकच नवर्या मुलांची चणचण भासायची. हुंडेही जबरदस्त द्यावे लागायचे. त्यामुळे त्यांची लग्नं होणं अतिशय कठीण असे. या मुली वयात आल्यापासून मरेपर्यंत अक्षरशः दिवाभीतासारख्या घरातच डांबल्या जात. एकुणातच नंबुद्री घरांमधल्या सगळ्याच स्त्रियांना परपुरुषाच्या नजरेला पडण्याचीच बंदी होती. त्यामुळे त्यांना ‘अंतर्जनम्’ – म्हणजे अक्षरशः ‘आत राहणारी माणसं’ हेच नाव असे. पुरुषाचा तर सोडाच, परजातीच्या स्त्रीचाही स्पर्श वर्ज्य. तो झालाच तर स्नान केल्याशिवाय अन्नग्रहण-जलग्रहण नाही. पुरुषाची तर नजरही पडणं अशक्यप्राय. तरी घरातल्या विवाहित आणि नवरा जिवंत असलेल्या बाईचं आयुष्य बरं. पण अविवाहित मुली मात्र पाळी सुरू होईपर्यंत घराबाहेरच्या आवारात, देवळापर्यंत, ओसरी-पडवीवर, तळ्यापर्यंत उंडारतील, तितक्याच. पाळी सुरू झाली, की लग्न होईपर्यंत वा मरण येईपर्यंत स्वैपाकघर ते घरातल्या बायकांसाठी राखीव असलेला, परसातला आंघोळीचा हौद कम् तळं. इतकाच त्यांच्या आयुष्याचा परीघ.
वाचताना माझा संताप होत होता. पण मग लागोपाठ चित्पावन ब्राह्मण घरातल्या बायकांची स्थिती आठवे आणि शरमेनं जीव गोळा होई. पण महाराष्ट्रात आधी न्यायमूर्ती रानडे यांनी बालविवाहाच्या विरुद्ध चळवळ आरंभली होती (इ०स० १८६५) तर धोंडो केशव कर्व्यांनी महाराष्ट्रातला पहिला विधवाविवाह १८९८ साली केला होता. त्याही आधी फुले दाम्पत्यानं विधवांच्या मुलांसाठी, स्त्रीशिक्षणासाठी काम सुरू केलं होतं. त्यामुळे तुलनेनं लवकर परिस्थिती बदलली. पण केरळमध्ये मात्र साधारण १९४०-४५पर्यंत नंबुद्री ब्राह्मण स्त्रियांची परिस्थिती कमालीची दयनीय होती. म्हणजे फक्त ८० वर्षांपूर्वीपर्यंत हे असंच सुरू होतं.
राग येत होता, पण एक विचित्र रोगट कुतूहलही वाटत होतं, इतके विलक्षण तपशील.
सांपत्तिक स्थिती बरी असेल, तर या घरांमधून शेकडो माणसं जेवून जात, मदतनीस स्त्रिया, नोकरचाकर, आला-गेला, रोगी, विद्यार्थी... कुणीही विन्मुख जात नसे. पण घरातल्या स्त्रीला मात्र दमडीही उपलब्ध नसायची. ‘तशी पद्धत नव्हती’, इतकंच स्पष्टीकरण. लेखिकेच्या आईला माहेरी जायचं असेल, तर स्वैपाकघरात वापरण्यासाठी जे तांदूळ मॅनेजर द्यायचा, त्यांतले काही तांदूळ महिनोन् महिने थोडथोडे बाजूला करून ठेवावे लागत. मग ते कुणाच्या तरी मेहेरबानीनं विकले गेले की मग हाती आणा लागायचा. असे पैसे जमले की ते मुंडूच्या चुण्यांमध्ये लपवायचे आणि तेव्हा कुठे माहेरी जाता यायचं. अंगावर ल्यायचे कपडेही रंगीत नव्हेत. दोन पांढरी वस्त्रं. बाहेर जाताना अंगाभोवती गुंडाळायला एक मुंडू. एक सोनेरी कडा असलेलं पांढरं वस्त्र. चोळ्या घालायला बंदी. एक लाकडी छत्री. लग्नाच्या वेळी बरोबर आणलेले काही दागिने. एक लाकडी पेटी. इतकीच त्यांची सत्तेची मालमत्ता. बाहेर जाताना अंगाभोवती पायघोळ वस्त्र लपेटायचं, छत्री धरायची – जेणेकरून कुणाच्या दृष्टीला नखही पडू नये, नजर खाली पायाकडे. पुढे मदतनीस नायर स्त्रिया चालत, ‘याS होS’ अशा आरोळ्या देत, म्हणजे ‘शूद्र’ कुणी असेल, तर त्यांनी रस्त्यातून दूर व्हावं. असं देवळापर्यंत जायचं आणि तसंच परत यायचं. मुलींचे कान टोचून त्यात जड पितळी कानातले बाळपणीच घातले जात. कानांच्या पाळ्या लोंबून पार खांद्यापर्यंत याव्यात अशा बेतानं या कानातल्याचं वजन वाढवलं जाई. तसे कान सुंदर मानले जात. ‘मुलींचे कान चांगले लांब होऊ देत’ अशी प्रार्थना बायका करत, म्हणजे मग त्यांची लग्नं नीट होतील आणि त्या कदाचित पोटभर जेवू शकतील, अशी इच्छा त्यामागे असे. नवरा चिडला तर कानांतले खेचून बायकोला सहज यातना देऊ शके. किंवा बसायचं लाकडी आसन पायांवर फेकून मारी, म्हणजे पाय मोडत. बायकांना डॉक्टरनं बघायची पद्धत नव्हतीच. कुणीही आजारी पडलं, तरी आधी आयुर्वेद. तो थकला की मग डॉक्टर. तोही पुरुषांकरता. ‘घरी डॉक्टर आला, तर पेशंट अर्थात ‘पुरुष’ असायचा’ या अर्थाची नोंद वाचून मला चरकायला झालं. बायकांनी अंथरूण धरायचं. जीवानं तग धरला तर ठीक. नाहीतर विधवा, कुमारिका, अविवाहिता मेली काय नि जगली काय. लग्नाची बाईल मेली, तर तिची जागा घ्यायला इतर मुली तत्पर असायच्या. शिक्षण वर्ज्यच. अक्षरओळख करून दिली जायची, पण ती पुराणाचं एक पुस्तक वाचता आलं की तत्काळ बंद. मग पुस्तक वाचण्यावर अर्थातच बंदी. शिक्षणालाही. कारण? परपुरुषाच्या नजरेला पडण्याला बंदी. लग्न झालं तर ठीक, नाहीतर घरात कुजून-राबून मरण. क्वचित या बाया अविवाहित असतानाच मेल्या, तर त्यांची नाममात्र लग्नं करून त्या नवऱ्याकरवी अंत्यसंस्कार केले जात. कारण धर्मानं मुलगी अविवाहित ठेवण्याला मान्यता नव्हती. विधवांचे हाल तर कुत्राही खात नसे. त्यांच्या ‘अशुभ’पणाबद्दल आपण मराठी ब्राह्मणजनांना काही सांगायला नकोच. पण एकंदरीतच शुद्धाशुद्धतेच्या विलक्षण कर्मठ कल्पना. नवरा मेल्यावर स्त्रीनं दागिने उतरवून ओलेतं वस्त्र नेसायचं. नवर्याच्या प्रेतासमोर माथा टेकून त्याची क्षमा मागायची. मग तिनं स्नान करायचं. पण तिला अंग कोरडं करायची परवानगी नसे. दिवसातून तीनदा स्नान करून ओलेतं वस्त्र अंगावरच वाळू द्यायचं. मीठ नसलेलं, न शिजवलेलं असं कदान्न खायचं. एकान्तात, कोंडल्या स्थितीत, काळोखात राहायचं. वैधव्यानंतर पुढे तीन वर्षं हा ‘दीक्षा’ नामक सुतकाचा कार्यक्रम लागू असे. विवाहित बायकाही अक्षरशः जेवणाच्या आशेनं लग्नाबिग्नासारख्या समारंभांतून आशेनं जात. पण त्यांनी जेवायचं ते नवर्याच्या उष्ट्या पानात. ही नंबुद्री ब्राह्मण बायांची स्थिती. इतर - नायरेतर आणि ब्राह्मणेतर - 'शूद्र' स्त्रियांनी तर इतर सगळे जेवल्यावर त्यांच्या उष्ट्या पानांवरच जेवायचं. तेही मालकानं समारंभाच्या ठिकाणच्या ब्राह्मणाला सांगून ओळख पटवून दिली तरच. नंबुद्री कुटुंब कर्जबाजारी झाल्यामुळे जमिनी गेल्या, जप्ती आली, तर पुरुष खुशाल कुठल्यातरी देवळाच्या आसर्याला राहू शकत. स्त्रियांची फिकीर कुणालाच नसे. त्यांचं काही का होईना.
यातला अन्याय अंगावर येतोच. पण त्याचं व्यवस्थेमध्ये केलेलं चिरेबंदी रूपांतर जाणवून थरकून जायला होतं. कुठून आला असेल इतका तीव्र द्वेष आपल्याच बायकांबद्दल आणि मुलींबद्दल? पोटात तुटत नसेल काही? न राहवून मला पेगी मोहन यांच्या पुस्तकाच्या भाषांतरांच्या निमित्तानं वाचलेल्या अनेक गोष्टींची आठवण होत राहिली. भारतात आलेल्या वैदिक आर्यांच्या टोळ्या निदान सुरुवातीच्या काळात तरी पुरुषबहुल होत्या. त्यांनी इथल्या स्त्रिया मिळवल्या. कशा मिळवल्या? त्या स्वेच्छेनं या परकीय पुरुषांशी रत झाल्या असतील, की नाइलाजानं? कुणाला ठाऊक. या स्त्रियांची भाषा संस्कृतेतर. शिवाय त्यांच्यावर संबंध लादलेला असल्यामुळे त्यांच्याबद्दल कमालीचा अविश्वास. त्यामुळे त्यांना संस्कृत शिकायला बंदी असेल? या अविश्वासाची, तिरस्काराची, व्यवस्थाप्रणित छळाची मुळं तिथे असतील का? समजत नाही... अवाक, खिन्न व्हायला होतं खरं.
लेखिकेची भाषा मात्र कमालीची संयत आहे. इतकी, की हा संयतभाव भाषांतरातही आणायचा, पण लेखिका त्या नेमनियमांचं समर्थन करत नाहीय, हेही अधोरेखित करायचं – हे कसं साधायचं असा पेच भाषांतरकारांपुढे उभा राहिल्याचं त्यांनी नोंदलं आहे.
लेखिकेच्या सुरात कडवटपणा नाही. तिला यातला अन्याय दिसत नाही, असं नाही. तिचं लग्न सुधारकी कुटुंबात झालं आणि इंग्लिश शिकता आलं. ‘योग क्षेम सभा’ नामक सुधारकी चळवळीचं काम करता आलं. आयुष्य बदललं. पण ते नंतर. त्यापूर्वीच्या आयुष्याबद्दलच्या तिच्या नोंदी कडवट, संतप्त असत्या तर ते समजण्याजोगं होतं. पण तसं दिसत नाही. तत्कालीन सणसमारंभ आणि चालीरीती, अन्नधान्य साठवण्याच्या पद्धती, जेवणातले पदार्थ, वस्त्रप्रावरणं, निसर्गाशी असलेलं जोडलेपण, वैद्यकीय अज्ञान आणि त्यामुळे धर्मावर असलेलं अवलंबित्व, देवभोळेपण, निरनिराळी फळं-फुलं-पानं यांना जगण्यात असलेलं स्थान... यांबद्दल अतिशय तपशिलात जाऊन, रसाळपणे केलेल्या नोंदी दिसतात. आयुष्य एका प्रकारे अभावाचं खरं, पण ही व्यक्ती त्याही परिस्थितीत किती रसरसून जगली आहे, ते दिसायचं राहत नाही. त्यानं थक्क, नतमस्तक व्हायला होतं.
मला त्यातल्या कितीतरी समारंभांबद्दल वाचताना, केळी-नारळ-सुपार्या-भात-बांबू यांनी घेरलेलं हिरवंगर्द आयुष्य अनुभवताना; कोकणातल्या तत्कालीन मंगळागौरींची, गौरीगणपतीत खेळल्या जाणाऱ्या बायकांच्या खेळांची, तिथल्या निसर्गाची, हिरवेपणाची आठवण होत राहिली. पाठोपाठ अर्थात चित्पावनांच्या केशवपनासारख्या चालीही आठवणं क्रमप्राप्त होतं... पण समाज सुधारू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी रक्त आटवणार्या काही माणसांचं महत्त्व किती आणि त्यांनी माझं आयुष्य कसं बदललं आहे, हेही पुन्हा पुन्हा जाणवत राहिलं.
नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या दात्री नामक स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप झाला आणि तिच्यावर ‘स्मार्तविचारम’ नावाचा खटला चालवण्यात आला. तिनं एक-दोन नव्हे, तब्बल त्रेसष्ट पुरुषांची नावं घेतली. त्यांच्या शरीरावरच्या अवघड जागच्या खुणा- त्यांची पत्रिका – जन्मवेळ – शरीरसंगाची वेळ-तिथी... इत्यादी पुरावे देऊन तिनं खटला चालवणार्या नायर राजाच्या तोंडाला फेस आणला. त्यानं तिच्यासकट त्या त्रेसष्ट लोकांना जातिबाह्य जाहीर करून खटला गुंडाळला. पुढे तिचं काय झालं त्याच्या काहीही नोंदी सापडत नाहीत. ही घटना १९०५मधली. (अलीकडे मनु पिळलै यानं लिहिलेल्या The Courtesan, the Mahatma & the Italian Brahmin: Tales from Indian History या पुस्तकात त्याबद्दल तपशीलवार वाचता येईल.) या प्रकरणाचे लेखिकेच्या आयुष्यावर पडलेले पडसाद या पुस्तकात दिसत राहतात. दबक्या आवाजात होणार्या चर्चा, दात्रीच्या चारित्र्यावर ओढले जाणारे ताशेरे, आपल्या कुटुंबातल्या कुणा पुरुषाचं नाव त्यात ‘निघालं’ तर काय, ही पोटातली भीती, अविश्वास आणि एक प्रकारचं छुपं कौतुक... अशा गोष्टींच्या नोंदी लेखिकेनं केल्या आहेत. त्या वाचताना लेखिकेच्या संयत, डोळस, विशाल दृष्टीचा प्रत्यय येत राहतो.
नंबुद्री ब्राह्मण जातीतले पुरुषही अखेर या सगळ्या अंधकारमय चालीरीतींचे बळीच होते. त्यांच्यापैकीही काही जणांनी आपापल्या मुलीबाळींसाठी, बहिणीबायकांसाठी सुधारणेचे कडवे प्रयत्न केले. काही जणांमध्ये धैर्य नव्हतं. पण प्रेम होतं. लेखिकेच्या वडलांनी तिच्या बहिणीला संस्कृत शिकायची हौस असल्यामुळे निदान ज्योतिषशास्त्र तरी शिकवण्याचं वचन तिला दिलं. मुलगी एका खोलीत, उंबर्यात वडील, दुसर्या खोलीत शिक्षक – असा शिक्षणाचा खटाटोप काही काळ चालवला, अशी नोंद लेखिकेनं केली आहे. काही नंबुद्री ब्राह्मण पुरुषांनी औषधोपचार न घेता देवासमोर मरायचं ठरवलं. पण स्नानाशिवाय देवासमोर जायचं नाही या नियमासमोर मान तुकवून त्या मरणासन्न अवस्थेत घरच्या तळ्याकाठच्या हौदात बुडी घेऊनच... हे वाचताना पोटात तुटतं. माणसं रूढींसमोर इतकी हतबल का होतात, असा प्रश्न परत एकदा पडला.
जमिनींच्या मालकीपासून या भयानक चक्राला मिळालेली गती अखेर कूळकायद्यात जमिनी गेल्यावर हळूहळू मंदावली. जमिनीच उरल्या नाहीत. जमिनींवर उलटसुलट दावे सांगून तिच्या वाटण्या होऊ नयेत, म्हणून नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या धाकट्या मुलग्यांनी जातीत लग्न करण्यावर बंदी होती. तीही हळूहळू संपुष्टात आली. वाटण्या झाल्या. विभक्त कुटुंबव्यवस्था आली. स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, चोळ्या घालू लागल्या, कानांच्या फाटक्या पाळ्या शिवून घेऊ लागल्या...
हे पुस्तक इंग्रजीत २०११ साली प्रकाशित झालं. ‘माझ्यानंतर कुणी अशा प्रकारचं आत्मचरित्र लिहू शकणार नाही. जग बदललं आहे.’ अशा आशयाची ओळ त्यातल्या शेवटच्या परिच्छेदात आहे. ती वाचताना हायसं वाटतं.
पण जे. देविका यांनी त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना विचारात टाकणारी आहे. ‘खरंच दरवाजे उघडले का, किती?’ असा प्रश्न त्या प्रस्तावनेत विचारतात. ते आठवून आणि सध्याचे एकंदर वारे पाहता - थोडं भयभीतही वाटतं.
***

Antharjanam : Memoirs of a Namboodiri woman
Devaki Nilayamgode
Trans. Indira Menon, Radhika P. Menon
Oxford University Press, 2011
***

'फेसबुक'च्या पोस्टखालच्या कमेंट्स बघून काही पुरवण्या जोडाव्याशा वाटतात -
१. केरळ पुढे पुष्कळ प्रागतिक राज्य झाले, तरी नंबुद्री ब्राह्मण समाजांसारख्या काही तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये ही कर्मठ आणि संकुचित मानसिकता पार स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकून होती. त्यानंतर त्यात बदल झाला. जाती-जातींमध्ये असा असमतोल आजही दिसतोच - तोही फक्त केरळमध्ये नव्हे, सर्वत्रच.

२. तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये स्त्रियांचे स्थान कायमच दुर्लक्षित, बंदिस्त असे असते असे एक समाजशास्त्रीय निरीक्षण सांगतात. मालमत्ता अधिक, त्यामुळे त्यावर ताबा ठेवण्याची उर्मी अधिक, त्यामुळे योनिशुचितेची चिंता अधिक - असा त्यामागचा तर्क असावा.

३. स्त्रियांना दिली जाणारी वागणूक भयावह असली, तरी त्यात फक्त नंबुद्री ब्राह्मण ही एकच जात दोषी होती असे नाही. महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबांमध्ये बालविवाहाची चाल होती, तसेच केशवपनासारखी निर्घृण चालही होती. विधवांची स्थिती भयानकच होती. बंगाली ब्राह्मणांमध्ये सती चांगलीच प्रचलित होती. त्याबद्दल काही बोलावे तितके कमीच आहे. तमिळ ब्राह्मणांमध्येही केशवपनाची चाल होती. मराठा जातींतल्या सधन-जमीनदारीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये आजही स्त्रियांची स्थिती दयनीय असते. मारवाडी समाजात, तसेच उत्तरेकडच्या उच्चजातीय समाजांमध्येही तीच परिस्थिती असते. मुस्लीम समाजातल्या स्त्रीप्रश्नांवर तर सरकारी प्रचारच चालतो. एकुणात कुणी कुणाला हसण्यासारखी परिस्थिती नाही. काही पुढे, तर काही मागे, काही आधी, तर काही नंतर. पण स्त्रीची दडपणूक या एका बाबतीत सब घोडा बारा टक्का.

४. याविषयी पुष्कळ पुस्तके आहेत. मराठीत ह. ना. आपटे, वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, ज्योतिबा फुले, आगरकर, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, ताराबाई शिंदे, साने गुरुजी, श्री. ज. जोशी अशा कितीतरी नव्या-जुन्या लोकांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल पुष्कळ लिहिले आहे. बंगालीबद्दलही तेच. मल्याळममध्ये ललितांबिका अंतर्जनम यांचे लेखन आहे. त्यावर दोन उत्तम सिनेमेही ऐंशीच्या दशकामध्ये येऊन गेले. मराठी वैचारिक निबंध आणि कादंबर्यांखेरीज, नाटकांमध्येही या विषयाचे उत्तम आणि यथासांग प्रतिबिंब पडलेले दिसते. संदर्भासाठी पाहा : मराठी नाटकाच्या तीस रात्री, खंड पहिला, मकरंद साठे, पॉप्युलर प्रकाशन.

४. वरील परिचयात मी या लेखिकेने केलेल्या निसर्गविषयक, संस्कृतिविषयक निरीक्षणांबद्दल फार लिहिलेले नाही. हे लेखिकेला अन्यायकारक आहे, लिहायला हवे होते. त्यातले अन्नाच्या साठवणुकीचे तपशील, सणांमधून दिसणारे पर्यावरणाचे भान, त्यातला विलक्षण आनंदाचा भाग, नृत्य आणि गाण्यांचे - पुस्तकांतल्या गोष्टींचे आणि पुराणांचे तपशील... हे सगळे अतिशय मनोज्ञ, आनंददायक आहे.

Thursday, 4 April 2024

द प्यूमा इयर्स

खूप दिवसांपासून मांजर पाळायचं होतं. 


अंगभूत डौल, शिकारी प्राण्याचे गुण. चकित करणारी चपळाई, सावध चाल, तीक्ष्ण नजर, अफाट श्रवणक्षमता, डोक्याएवढ्या लहान सापटीतून सहजी निसटू शकणारं शरीर, धारदार नख्या आणि दात... असं सगळं असलेलं मांजर पाळीव असलं, तरी मिजास राखून असतं. ती त्याची खासियतच. कितीही प्रेमाचं झालं, तरी मालकाच्या मागे लाळ घोटत येणारं मांजर दुर्मीळ. अशा मांजरांचा भोवतालचा वावर सुखावतो, शांतवतो. त्या मोहानं अनेकदा मांजर घरी आणायचे प्रयोग केले. पण त्यांतला एकही यशस्वी झाला नाही. कधी पिल्लाला घरात ठेवायला दारंखिडक्या लावून बसणं जिवावर यायला लागलं. कधी पिल्लाला त्याच्या आईविना चैन पडेना. कधी व्यावहारिक अडचणींपायी मांजराची पाठवणी, तर कधी मांजराच्या मूळ मालकाला विरह सोसेना म्हणून... 


एका पिल्लानं तर फार चटका लावला. घरी येऊन चांगला आठवडा झाला, तरी जवळ येऊ देईना. जेमतेम दीड महिन्याचं पोर. पण काय त्याचा फणकारा! फिस्कारणं, पाय आपटून दात विचकून दाखवणं, ओरबाडणं...  कुणासमोर अन्नपाण्यालाही तोंड लावायचं नाही. आठवडाभर नाना लाड करून पाहिले. उबेला शाली, खेळायला खेळणी, खाण्यापिण्याचे छप्पन्न प्रकार... त्याला सवय व्हावी म्हणून जमिनीवर बसून बोलाचाली, जेणेकरून त्याला भ्यायला होऊ नये. खाली बसून धीम्या आवाजात वाचणं-बोलणं, संथ हालचालींनिशी वावरणं, आवाज वा पारा चढू न देता त्याला दिलासा देत राहणं... एक ना दोन. पण ते दाद देईना. चिडक्या आवाजात ओरडत राहायचं. शेवटी बहुधा रागानं, अगतिकतेनं, ताणामुळे ते कुठेही हगू-मुतू लागलं. इवलासा मुका जीव. आपल्या हौसेपायी त्याचा सुखाचा जीव दुःखात का घालावा, असा प्रश्न पडला. असहाय वाटायला लागलं. कसेबसे आठ दिवस काढले. पण त्याच्या शीतून रक्त पडायला लागल्यावर मात्र धाबं दणाणलं. त्याला टोपलीत घालून डॉक्टर गाठला. 


“हे खूपच आक्रमक स्वभावाचं आहे. वय वाढलं की त्याची ताकद वाढत जाईल. कसं झेपेल तुम्हांला? शक्य असेल तर त्याच्या आईकडे परत सोडाल का त्याला?” असा निस्संदिग्ध सल्ला मिळाला. तो मानला. तशी साहेबांच्या म्यांवचा सूर बदलला. जुन्या ओळखीच्या परिसरात ते बागडू लागलं. येताजाता त्याला कोवळ्या सुरात साद घातली की ते म्यांव करून हाकेला ओ देई. खायला-प्यायला दिलं, तर सावधपणे स्वीकारी. पण त्यापल्याड ओळखीची रेष त्यानं कधीच ओलांडली नाही. 

त्याची रोखून बघणारी पण सावध नजर पक्की लक्षात राहिली.


या अनुभवानंतर माझी प्राण्यांकडे बघण्याची नजर बदलून गेली. आपल्याला वाटतं, तशा त्यांना फक्त अन्नाच्याच भुका असतात असं नव्हे. त्यापलीकडे आवडी-निवडी असतात, प्राधान्यक्रम, मूड्स, स्वभाव, भावनिक गरजा, ताणतणाव, आग्रह, हट्ट, त्यातून येणारी दुखणीखुपणी... सगळं असतं. आपण विश्वासाचा पूल बांधायला कमी पडतो – कारण आपल्याला एकमेकांची भाषा अवगत नसते, हे तर झालंच. पण त्याहून खरं म्हणजे, आपली दृष्टी बेपर्वा आणि मानवकेंद्रित असते. 

हे चरचरून लक्षात येऊ लागलं, त्या टप्प्यावर लॉरा कोलमनचं ‘द प्यूमा इयर्स’ हे पुस्तक मला मिळालं. 

‍~ 



बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातला एक विकसनशील देश. इतर विकसनशील देशांपेक्षा त्याची कहाणी फार वेगळी नाही. भ्रष्ट सरकार. गरीब, नाडलेले, शोषित लोक. अस्ताव्यस्त, निबीड, गर्द, स्तिमित करणारं जंगल आणि त्यातले प्राणी. लाकूड आणि खनिजं यांसाठी त्या जंगलावर डोळा ठेवून असलेल्या बड्या कंपन्या. विकासाच्या नावाखाली वाढते रस्ते. विरळ होत जाणारं, लचके तोडले जाणारं, नैसर्गिक आणि कृत्रिम वणव्यांखाली भाजून काढलं जाणारं, अपरिहार्यपणे आटत-आक्रसत जाणारं जंगल. हक्काचा अधिवास गमावणारे, परागंदा होणारे, कधी कुणा श्रीमंती फॅडपायी शिकार होऊन कातडी वा दातरूपानं उरणारे, कधी सर्कशीत विकले जाणारे, कधी कुणा अतिश्रीमंत विकृत चाळ्यांपायी ‘पाळीव’ केले जाणारे, अक्षरशः मुक्यानं सोसणारे प्राणी. 


नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुकाळ, आधुनिक युगातल्या विकासाची ओढ, अकार्यक्षम-भ्रष्ट राजवट – हे सगळं एकत्र आल्यावर जी घडते, तीच बोलिवियाचीही कहाणी. 


‘द प्युमा इयर्स’ हे अनुभवकथनात्मक पुस्तक अशा बोलिवियामध्ये घडतं. 


तिथल्या जंगलातल्या प्राण्यांचं बेकायदेशीर ट्रॅफिकिंग चालतं. सरकारी प्रयत्नातून त्यांपैकी काही रॅकेट्सवर धाडी पडतात, गुन्हेगार पकडले जातात. प्राणी ताब्यात घेतले जातात. पण त्या प्राण्यांनी कुठे जावं? खूप लहान पिल्लं असताना पकडले गेलेले हे प्राणी ना धड जंगलात जगू शकत, ना बंदिवासात. या प्राण्यांच्या अपेष्टा सहन न होऊन कुणीतरी आंदोलन उभं केलं. प्राण्यांच्या अंदाधुंद छळावर नियंत्रण आणलं. लहानपणी नैसर्गिक अधिवासात न वाढलेले आणि आता मोकळे केलेले वन्य पशू सांभाळण्यासाठी पदरचा पैसा खर्चून एक जमीन खरीदली. तिथे अभयारण्य आणि प्राणिसंग्रहालय यांच्या मधली एक व्यवस्था उभी केली. प्राण्यांना खायलाप्यायला मिळावं, त्यांना माफक का होईना – जंगलासारखा अनुभव देणार्‍या अधिवासात वावरता यावं, आपण त्यांच्यावर लादलेल्या छळाचं थोडं परिमार्जन करता यावं अशी ती यंत्रणा. 'एल पार्के' नावाची. अपुरा निधी, जगभरातून – विशेषतः विकसित देशांतून – कुतूहलानं येणारं स्वयंसेवक, आणि काही माणसांचं या प्राण्यांवरचं प्रेम – इतक्या बळावर चालत राहिली.


रंगीत काकाकुवे आणि पोपट, निरनिराळ्या जातींची माकडं, रानडुकरं, आणि मांजरं. पण मांजरं म्हणजे घराच्या उबेला राहणारी मांजरं नव्हेत. मोठ्ठाली मांजरं. बिबट्ये, सिंह, जॅग्वार आणि प्युमा! 


कुणी छळापोटी चिडखोर बनलेलं. कुणी निराशेनं ग्रासलेलं. कुणी आत्महत्याप्रवण. कुणी अपंग. कुणी पंख छाटलेलं... त्यांना सर्वतोपरी जगवणारी माणसं. 


त्या पार्कात लॉरा कोलमन जाऊन पोचली. ती तिथे कशी येऊन पोचली हाही एक मजेशीर योगायोगच आहे. मूळची ब्रिटिश असलेली चोवीसेक वर्षांची लॉरा. मानसोपचारतज्ज्ञ आईबाप, आपापल्या चमकदार व्यवसायांत यशस्वी असलेली भावंडं, उत्तम शिक्षण इ. असलेली ही मुलगी. आयुष्यात अद्याप स्थिरावत नव्हती. चारचौघींसारखी प्रेमप्रकरणं-लग्न-मुलंबाळं या चाकोरीत रस वाटत नव्हता, पण त्या अपेक्षांचं दडपण जाणवत होतं असावं. कामही मनासारखं मिळत नव्हतं. आज ही नोकरी, उद्या ती नोकरी, परवा कुठल्यातरी टूरिस्ट कंपनीत  मार्केटिंग कर, तेरवा प्रवासाला नीघ... शरीराबद्दल आत्मविश्वास नाही, वागण्यात ठेहराव नाही. नुसतीच भिरभिर भिरभिर. निबर-कोडग्या महत्त्वाकांक्षेचा अभाव. संवेदनशीलतेपोटी कायम मनात वस्तीला आलेली व्याकूळता... असं करता करता एका प्रवासादरम्यान तिनं हार पत्करून घरी परतायचं ठरवलं होतं. त्याकरता कुठल्यातरी सायबर कॅफेत विमानाचं तिकीट काढत असताना तिथल्या भिंतीवरचं 'एल पार्के'तर्फे स्वयंसेवकांना आवाहन करणारं पत्रक तिच्या नजरेस पडलं. त्यात ना फार पैसे होते, ना फार आकर्षक असं काही काम. निव्वळ 'नाहीतरी दुसरं काय करायचंय, हे करून बघू' अशा अनिर्णितावस्थेत लॉरा पार्कात गेली.


ती जेमतेम महिन्याभरापुरती पार्कात आलेली. तिला बोलिवियाच्या जंगलातली उष्णदमट हवा, अस्वच्छता, अन्नाचं वेगळेपण, सगळीभर वावरणारे प्राणी, शारीरिक कष्टांचं काम… यांतलं काहीच सवयीचं नव्हतं. ती सुरुवातीला धसकली, श्रमली, भ्यायली, रडली. एक महिना झाला की परत जायचं, असं घोकत ती तिथे राहिली. 


तिला त्या पार्कमधल्या ‘वायरा’ नामक प्यूमाला फिरवून आणण्याचं काम मिळालं. 


वायरा ही एक पूर्ण वाढलेली प्यूमा मादी. वाघ-सिंह वा बिबट्याइतकीच हिंस्र, पण बुजरी. लहानपणापासून कुणीतरी कोंडून ठेवल्यामुळे कुणावरच चटकन विश्वास ठेवू न शकणारी, संशयी-सावध, जंगलात जगण्याचा अनुभव आणि क्षमता नसलेली, जंगलालाही भिणारी. तिला तिच्या लहानशा पिंजर्‍यातून बाहेर येता यावं, जंगलाच्या हवेत थोडं फिरता यावं-रमता यावं, म्हणून तिला मोठ्ठा दोर लावून पिंजर्‍याबाहेरच्या राखीव तुकड्यात बाहेर काढून फिरवून आणण्याचा प्रघात होता. तिला फिरवून आणणार्‍या मुलीच्या हाताखाली लॉराला काम मिळालं. 


लॉरा हळूहळू तिथे रुळली. तिचं जंगलाशी नातं जुळत गेलं. तिथल्या अनागर, उग्र, रंगा-गंधा-नादांशी. तिथल्या शांततेशी. तिथल्या भौतिक सोयींच्या अभावांशी. 


तिथल्या प्राण्यांच्या अश्राप प्रेमाशी, भित्यांशी, असुरक्षिततांशी.



लॉरानं अगदी सुरुवातीच्या वेळी वायराकडे जाताना अनुभवलेल्या जंगलाचं वर्णनही अद्भुत म्हणावं असं आहे. 


 ... मी अंधारात अडखळतं पाऊल टाकलं. पायाखाली खडबडीत उखीरवाखीर ढेकळं होती आणि हवेला दवाचा वास. भोवती माझ्यापेक्षा उंच वाढलेलं जंगली गवत. मी हातानं ते वारायचा प्रयत्न केला, पण पात्यांना चांगलीच धार होती. जेमतेम काही फुटांवरचं कसंबसं दिसत होतं-नव्हतं. जंगलात दोनच ऋतू असतात - ओला नि कोरडा. मी जंगलात आले होते ती एप्रिलमध्ये. पाऊस संपून पाचेक महिने झालेले. आत्ता जंगलं जितकं सुंदर असतं, तितकं एरवी क्वचितच असतं. हळूहळू पाण्याची चणचण जाणवू लागेल आणि जमीन भेगाळेल. पण आत्ता? आत्ता मात्र जंगल मनाला दडपून टाकेलं असं नि इतकं देखणं दिसतंय. एकूण एक रंग जणू हिरव्याच्या जवळ गेला आहे नि जंगलानं ते सगळे रंग एकदम ल्याले आहेत. . . . राक्षसी झाडं, त्यांची अकराळ-विकराळ मस्तकं, खोडांच्या तपकिरी सालट्या सुटत चाललेल्या, अंगाखांद्यावर काटेदार चिलखतं. . . . एकमेकांच्या अंगाखांद्यावर चढलेली, गळ्यात पडलेली, गळे दाबणारी झाडंच झाडं... . . . हे एखादं स्वप्न तर नव्हे? मी त्यातून वाट काढताना विचार करत होते. धपापणारा श्वास असलेल्या अशा जिवंत ठिकाणी मी कधीच आले नव्हते आजवर. कितीतरी जीव स्पंदत होते माझ्या भोवतालात. लंडन अंडरग्राउंड ट्यूबमधली माणसांची गर्दी माझ्या डोळ्यासमोर आली. माणसांच्या घामाचा दर्प आणि जागेसाठी अव्याहत धडपडणारी माणसंच माणसं. तिथेही आजूबाजूला अनेक आयुष्यं धडधडत असायची. पण ती सगळी एकसारखीच होती. माझ्यासारखीच होती. इथे? इथे सगळंच माझ्याहून पूर्ण वेगळं. …


या जंगलानं लॉराला हळूहळू ताब्यात घेतलं. जंगलानं तिला बदलून टाकलं. लॉराच्या पार्कातल्या सहकारिणीच्या शब्दांत सांगायचं, तर ‘त्या प्राण्या-माणसांनी स्वतःच्या बचावासाठी स्वतःभोवती उभा केलेला एकेक थर त्या जंगलानं जणू हळूहळू सोलत नेला.’ आतलं अनाघ्रात कोवळेपण हळूहळू उजळत गेलं. त्या प्रक्रियेची ही गोष्ट.


वायरानं सुरुवातीला लॉराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्या दोघींना एकमेकींची सवय होत गेली. वायरानं लॉराचा हात पहिल्यांदा चाटला, त्या प्रसंगी लॉरानं नोंदलेली स्वतःची प्रतिक्रिया मुळातूनच वाचण्यासारखी आहे. भीती, अविश्वास, स्थिरावलेपणाची चकित करणारी भावना, आनंद... असे अनेक टप्पे तिनं अक्षरशः निमिषभरात ओलांडले. हळूहळू तिच्याबरोबर फिरताना, तिचा विश्वास बघताना, वायराचा शांत श्वासोच्छ्वास अनुभवत तासचे तास जंगलात पेंगत बसून राहताना लॉराला जणू पायाखालची जमीन सापडत गेली. या प्राण्यानं आपल्याला जितकं शूर मानलं आहे, तितके आपण नाही, पण त्यानं काही बिघडत नाही, आपण शिकू शकू... ही जाणीव पचवत लॉरा शांत होत गेली. 


वायरानं लॉरावर विश्वासून टाकलेलं एकेक बिचकतं पाऊल, तिच्या नजरेतली भीती आणि उग्र दहशत, तिच्या उरातली गुरगुर, एका टप्प्यावर तिनं लॉरावर केलेला हल्ला... आणि मग एक दिवस लॉराच्या उरावर घुसळलेलं मस्तक... हा सगळा अवाक करून टाकणारा प्रवास लॉरानं या पुस्तकात नोंदला आहे.


पण ‘द प्यूमा इयर्स’ केवळ या नात्याची गोष्ट सांगणारं पुस्तक नाही. 


मराठीतही प्राणी आणि माणसं यांच्यातल्या प्रेमाची गोष्ट सांगणारी अनेक पुस्तकं आहेत. पशुवैद्य विनया जंगलेंचं 'मुक्या वेदना, बोलक्या संवेदना' आहे. पशुवैद्य लेखिकेचं सुसंस्कृत, जिद्दी आणि प्राण्यांवर माया करणारं व्यक्तिमत्त्व या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. सर्कशीतले रिंगमास्टर दामू धोत्रे यांनी लिहिलेलं 'वाघसिंह - माझे सखेसोबती' हे अद्भुत आत्मचरित्र आहे. विलास मनोहर यांचं 'नेगल' पुष्कळ लोकप्रिय आहे. आदिवासींनी भुकेपोटी शिकार करून मारलेल्या प्राण्यांची पिल्लं सांभाळण्यातून हेमलकसामधल्या त्या प्रकल्पातल्या प्राणिशाखेची सुरुवात झाली. अनेक गैरसोयी सोसत प्राण्यांची काळजी घ्यावी लागे. सरकारी अधिकार्‍यांची मर्जी सांभाळावी लागे. पूर्वायुष्यात चक्क शिकारी असलेल्या विलास मनोहर यांचं या अनुभवादरम्यान एका प्राणिप्रेमी व्यक्तीत परिवर्तन झालं. डॉ. पूर्णपात्रे यांचं त्यांच्या लाडक्या सिंहिणीवरचं 'सोनाली' हे पुस्तकही सुरेख आहे. व्यंकटेश माडगूळकरांचं 'सत्तांतर' एका वानरटोळीचं शब्दचित्र रेखाटणारी कादंबरी आहे. वानरांमधली जगण्यासाठीची स्पर्धा आणि क्रूर निसर्ग यांचा अविस्मरणीय अनुभव ‘सत्तांतर’ वाचताना येतो.


पण या सगळ्या पुस्तकांहून ‘द प्यूमा इयर्स’ वेगळं आणि कितीतरी अधिक भेदक आहे. कारण प्राण्यांची ही अवस्था नक्की कशामुळे होते, त्यात प्रत्यक्ष ट्रॅफिकिंग करणार्‍या माणसांखेरीज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कुणा-कुणाचा सहभाग असतो, त्याबद्दल कुणाला किती भान असतं, असे अनेक प्रश्न हे पुस्तक विचारतं. 


लेखिका पार्कमध्ये राहत असताना हळूहळू जंगलातून लाकडाची ने-आण करणार्‍या ट्रक्सची रहदारी वाढत जाताना दिसत होती. जंगल विरळ होत जात होतं. दर काही वर्षांनी मोठाले वणवे लागत असत. एका टप्प्यावर अशाच एका वणव्यापासून पार्क वाचवण्याच्या प्रयत्नात तीन आठवडे खर्ची पडले. पावसाळ्याचा ऋतू नव्हता. पाण्याचं दुर्भिक्ष होतं. प्राण्यांचा जीव वाचवायचा की त्यांचा अधिवास वाचवायचा? की आपला जीव? आग पसरू नये म्हणून सगळं सोडून जिवाच्या आकांतानं चर खणायचे की हताश होऊन विध्वंस बघत राहायचा? कुठवर? आपण पुरे पडू शकू का त्याला? असे  अनेक प्रश्न. पण त्यांना सामोरं जात लॉरा आणि तिचे सहकारी नेटानं काम करत राहिले. परिस्थितीच्या रेट्यासमोर आपण हतबल, असहाय असल्याचं कळूनही, भावनिक-शारीरिक श्रम ओतून उभं केलेलं जग पुन्हा पुन्हा मोडून पडत असताना स्वतःच्या डोळ्यांनी बघावं लागत असूनही, पार्क वाचवत राहिले. 


हे वणवे नैसर्गिक कारणांमुळेच लागतात असं नाही, असं लेखिकेनं नोंदलं आहे. सरकार नामक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं, क्वचित बेकायदेशीर गोष्टींकडे काणाडोळा करत असल्याचंही नोंदलं आहे. जंगलात राहणार्‍या स्थानिक लोकांची मोजकी चित्रणंही आहेत. वायरा पार्कमधून पळून गेलेली असताना असाच एक स्थानिक 'शिकारी' माणूस लॉरा आणि सहकार्‍यांची घालमेल समजून घेतो. शब्दही न बोलता वायराचा माग काढायला मदत करतो. त्याचा जगण्यासाठी चालू असलेला झगडाही अपरिहार्यच आहे, हे लॉराला जाणवून जातं. अशा वेळी तिला ‘विकास’ या शब्दाभोवती असलेले पेच दिसू लागतात. प्राण्यांची अशी ससेहोलपट का होते? जंगल तुटतं म्हणून? ते का तुटतं? विकास हवा म्हणून? विकास म्हणजे काय? अजून वेगवान प्रवास, अजून काही छानछोकीच्या वस्तू, अजून थोडी चैन? कुणाची? स्थानिक लोकांची? की जगभर हातपाय पसरणार्‍या भांडवलशाहीची? 


या प्रश्नांमधून लॉरा आणि तिचे सहकारी स्वतःलाही सोडत नाहीत. पार्कमध्ये राहून रोज या प्रश्नांशी झगडणं ताकद मागणारं, थकवणारं, निराश करणारं खरंच. पण घरी परतून प्राण्यांपासून दूर राहणंही न सोसणारं. मग काय करायचं? विमानानं ये-जा करायची? आणि इंधनासाठी अ‍ॅमेझॉनमधलं जंगल संपवणार्‍या लोकांपैकी एक व्हायचं? अहं. विमानाच्या फेर्‍या अगदी जीवनावश्यक मानायच्या आणि शक्य तेवढी काटकसर करत जिथे असू तिथून भोवतालचा निसर्ग वाचवत राहायचं, असा एकमात्र पर्याय उरतो.

 

आपण जरी मुंगीलाही इजा न करण्याइतके तथाकथित अश्राप असलो, तरी या पापाच्या भारातून आपली सुटका आहे का, असा प्रश्न या पुस्तकातून उभा राहतो. हे ‘द प्यूमा इयर्स’चं वेगळेपण आहे. 


वाघ-सिंह-चित्ते यांसारखी मोठी शिकारी जनावरं त्यांच्या परिसंस्थेचं अक्षरशः सम्राटपण अनुभवतात. एक जिवंत वाघ निरोगीपणे नांदण्यासाठी एक विशिष्ट आकाराचा मोठा अधिवास असावा लागतो. त्या अधिवासाची स्वतःची अशी अन्नसाखळी असते. त्याच्या जिवावर वाघ जगतो. पिरॅमिडच्या वरच्या त्रिकोणातल्या मोजक्या जागेत, मोजक्याच संख्येनं राहून राज्य करणार्‍या सम्राटासारखा त्याचा वावर असतो. त्यातून त्याच्या देहबोलीतली लय, तंदुरुस्ती, देखणेपण, डौल, चपळाई, ग्रेस... हे सगळं येतं. 


या विलक्षण वैभवाचं आपण नक्की काय आरंभलं आहे, असा प्रश्न ‘द प्यूमा इयर्स’ वाचताना पुन्हा पुन्हा पडतो. आपणही संडास-आंघोळीसारख्या रोजच्या वापरासाठी अनेक बादल्या पाणी बिनदिक्कत आणि सहज फ्लश करून टाकतो. जगाच्या एका टोकाला पिकणारं अन्न बेपर्वाईनं दुसर्‍या टोकाला मागवतो. कुठल्याही ऋतूतलं अन्न बारा-महिने-तेरा-काळ पिकवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ऊर्जा खर्च करतो. विमानप्रवास स्वस्त झाला आहे आणि सगळीकडे ‘एअर बी एन बी’सारख्या कंपन्यांनी सुविधा दिल्या आहेत, म्हणून पैसे उधळून प्रवास करतो. आणखी-आणखी-आणखी मजा करतो, करत राहतो. ह्या भुकेतून किती नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च होते आणि पिरॅमिडच्या टोकावर जगणारे किती प्राणी छळ सोसतात... याचा विचारही आपल्या गावी असत नाही. 


आणि त्याच वेळी लॉरा कोलमनसारखी विशी-पंचविशीतली मुलं अशा प्रश्नांना न भिता प्राण्यांवर वेडं प्रेम करत राहतात. थकतात, विझतात, क्षणिक माघार घेतात, आणि पुन्हा नव्यानं भिडतात. त्यांच्या या लढ्यातली भावनिक ससेहोलपट बघताना नतमस्तक आणि हताश असं दोन्ही वाटतं. 

~


वायरा पार्कमधून पळून गेली. परत आली, तेव्हा भीतीपोटी तिनं हातात दोर घेऊन पुढे जाऊ बघणार्‍या लॉरावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या पिंजर्‍यात जाणार्‍या लॉराला सुरुवातीला वाटणारा भीतीचा धसका जाणवत होताच, पण अगदी आपल्यासारख्याच असलेल्या, स्नेही झालेल्या या मुक्या प्राण्याचा विश्वास आपल्याला पुन्हा लाभावा, ही ओढही होती. त्यापायी वायराच्या पुढ्यात जाण्याचा धीर तिनं केला. 


त्या क्षणांचं वर्णन वाचताना आपल्याला भीती वाटतेच. पण त्याहीपलीकडे फार आसुसून वाटतं, की या मुलीच्या मनातली ओढ वायराला कळावी. तिनं लॉरावर विश्वास टाकून पाहावा... 


लेखिकेचे शब्द असे आहेत : 


. . . हळूहळू श्वास सोडत मी हात सावकाश तिच्याकडे सरकवला. तिनं मला चाटायला सुरुवात केली. माझ्या हातावर तिची ओली जीभ घासली जाण्याचा आवाज मला जगातला सर्वांत सुंदर आवाज भासत होता. बधीर झाल्यासारखं वाटत होतं. डोळ्यांतून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. पुढे होऊन तिच्या मानेवर डोकं ठेवलं. एकदम सैल सैल वाटलं. . . . हवेची रेशमी झुळूक झाडांच्या फांद्यांवरून फिरली की जसा मातकट वास येतो, तसा वास येत होता वायराला. तीही अविश्वासानं आणि आनंदानं पुढे होऊन माझ्या अंगावर रेलली होती... 


भांडवलशाही आणि तिनं बदलत नेलेल्या जगाचे प्रश्न राहत नाही शेवटी मनात. उरतात ते डिप्रेशनशी लढणार्‍या माकडांना प्रेमभरानं जवळ करणारे लॉराचे सहकारी. समा नावाच्या सिंहाला 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स' वाचून दाखवणारी लॉरा. रात्रीचं चमचमतं आभाळ आणि शांतता वागवणारं हिरवंकंच जंगल. लॉरा आणि वायरा यांचं बिचकत बिचकत विश्वासून एकमेकींवर रेलणं. शांत होऊन, धीर करून नवे अनुभव घेऊन पाहणं. पोहायला पाण्यात उतरणं, नव्या वाटा हुंगून पाहणं, थारावत जाणं. 

~


आपल्याला कधीच मांजर पाळता येणार नाही, हा माझ्या मनातला सल या पुस्तकानं मिटवून टाकला. तिथे एका आशेला जागा करून दिली. स्वतःपलीकडे जाऊन विचार करता आला, धीर धरता आला, अनिश्चितता स्वीकारता आल्या... की जमेल. तोवर धीर धरायला हवा. 


आता लॉरा बोलिवियात राहत नाही. पण वायराशी तिचं नातं अभंग आहेच. लॉरानं ONCA नावाची संस्था सुरू केली आहे. सामाजिक-पर्यावरणीय प्रश्नांवर सर्जनशील उत्तरं शोधू बघणार्‍या या संस्थेच्या नावाचा अर्थच मुळी आहे - प्यूमा. Panthera Onca म्हणजे प्यूमा. वायराच्या माध्यमातून लॉरानं सगळ्या निसर्गाशी मैत्री करणारं पाऊल पुढे टाकलं आहे.

~


द प्युमा इयर्स

लॉरा कोलमन

प्रथमावृत्ती २०२१

लिटिल ए प्रकाशन


('अनुभव' या मासिकांमध्ये फेब्रुवारी २०२४ या अंकात पूर्वप्रकाशित)

Monday, 4 September 2023

चाळीस वर्षं ओलांडून आलेली मैत्रीण


एकेरीत उल्लेख करायला पद्मजा फाटक मला समवयस्क नव्हे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर वगैरे लोकांसारखी आपोआप एकेरीतली जवळीक प्राप्त होण्याइतकी सुप्रसिद्ध आणि थोर कलावतीही नव्हे. पण तरीही तिच्याशी झालेल्या पहिल्याच पुस्तकभेटीनंतर तिच्याविषयी ‘आदरणीय लेखिका पद्मजा फाटक’ या जातीचं काही न वाटता मैत्रिणीसारखी जवळीक वाटली आणि वाटतच राहिली, त्यामागची कारणं किंचित गुंतागुंतीची आहेत.
ललित लेखिका म्हणून आज मराठीत ती फारशी प्रसिद्ध उरलेली नाही. ‘बाराला दहा कमी’ आणि ‘हसरी किडणी’ यांसारखी तिची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण ‘गर्भश्रीमंतीचं झाड’ आणि ‘सोनेलूमियेर’ हे सुरेख ललितलेखसंग्रह सहजासहजी मिळत नाहीत. मग तिच्या सुरुवातीच्या काळातले ‘राही’ आणि ‘दिवेलागणी’ हे कथासंग्रह कुठून मिळणार? मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं आणि नंतर एका मित्राच्या शोधक नजरेमुळे मला ‘दिवेलागणी’ हा कथासंग्रह मिळाला.
या कथासंग्रहाविषयी सांगण्यापूर्वी पद्मजाची थोडी पार्श्वभूमी सांगणं भाग आहे. आज ती हयात असती, तर ती ऐंशी वर्षांची असती. साधारण तिच्या विशीबाविशीपासून ती लिहीत होती असावी. आई-वडील दोघेही सुशिक्षित, नोकरदार. लहानपणापासून कायम शहरात झालेलं वास्तव्य. उच्चशिक्षण, लेखनप्रकल्प, सांस्कृतिक वर्तुळातला वावर, मुलाबाळांसकट सुफळसंपूर्ण संसार, पुरस्कार आणि वाचकप्रियता अशा दोन्ही आघाड्यांवर लेखनात मिळालेलं यश... अशा सगळ्या प्रकारे ती चमकदार, पण चाकोरीतली व्यक्ती होती. पण लेखिका उर्फ स्त्रीलेखक म्हटल्यावर बंडखोरी वा बोल्डनेस वा स्त्रीस्वातंत्र्याचे झेंडे वाहण्याची जबाबदारी वा शोषित अबलांचा कळवळा अशा ज्या गोष्टी बघणार्याच्या नजरेत आपोआप उमटतात, त्यांपैकी कुठल्याही गोष्टींच्या अभिनिवेशाची ओझी तिच्यापाशी मुळातच नव्हती. पण म्हणून ती झापडबंद होती असं मात्र नव्हे. स्त्रीवादाचं चोख भान तिच्यापाशी होतं. हे माझ्या मते तिचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य. विवेक, वैज्ञानिकता, तर्कशुद्धता, सर्वार्थानं कॉस्मोपॉलिटन नजर ही सगळी आधुनिक मूल्यं... त्याखेरीज आलेली.
या कथासंग्रहात तिची ही सगळी वैशिष्ट्यं दिसतातच, शिवाय त्या-त्या मूल्यांना अनेकदा लगडून येणारा तर्ककठोरपणा न येता मानवी भावनांविषयी असलेलं कुतूहल आणि आस्था दिसत राहतात.
अंतर्बाह्य शहरीपणा हा तिचा ठळकपणे जाणवणारा गुण. ‘बेस्ट’च्या बसमधल्या सहप्रवासिनीच्या इतिहास-भूगोलाविषयी आडाखे बांधणारी निवेदिका ‘मूर्त’ या कथेमध्ये आहे. त्यातून तिच्या शहरी अवकाशाची भौतिक खूण पटते. ‘सर्किट हाऊस’ या कथेत अस्तित्ववादी प्रश्नांमध्ये गुरफटलेला लेखक-निवेदक ऑटो-पायलट मोडवरून सराईतपणे मागे पडणार्या उपनगरी स्टेशनांची नोंद घेताना दिसतो. ‘म्हातार्या’ या कथेतली तरुण नायिका आपल्या म्हातार्या आईच्या काश्मीर सहलीची तयारी करून देणारी. आपल्याला पाठमोरं बघणार्या आपल्या आईला नि तिच्या मैत्रिणीला आपल्या ‘स्मार्ट’ दिसण्याची असोशी असेल हे उमजून दमले-भागलेपण विसरते आणि उंच टाचांमधली आपली आकृती बघता बघता ताठ करून आत्मविश्वासानं पावलं टाकत जाते. अशा कितीतरी शहरी – आणि त्यातही मुंबईसारख्या आधुनिक शहराच्या खाणाखुणा या कथांमध्ये विखुरलेल्या आहेत. पण पद्मजाचा शहरीपणा या भौतिक आणि भौगोलिक खुणांपुरता मर्यादित नाही. तिचं खरंखुरं कॉस्मोपॉलिटन शहरीपण तिच्या नायक-नायिकांच्या मूल्यव्यवस्थेपर्यंत झिरपलेलं दिसतं. ‘हायड्रिला’ या कथेत कुठल्याच अस्मितांची आणि परंपरांची मुळं नसलेला विद्याधर हा नायक आहे. कुटुंबव्यवस्था, जातीचं वर्तुळ, भाषिक अस्मिता, प्रादेशिक लागेबांधे... त्याला स्पर्शत नाहीत. त्याला मानवजातीशी जोडणारा धागा आहे, तो माणसाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संतत ज्ञानतृष्णेचा.
‘पाहुणा’ या कथेची नायिका मध्यमवयीन पुरंध्री आहे. ध्यानीमनी नसताना पदरात आलेलं अवेळचं गरोदरपण खुडून टाकण्याचा तर्कशुद्ध, विचारी निर्णय ती घेते खरी. तो शांतपणानं पार पाडते. पण सगळं धडपणी झाल्यानंतरही, कुठलंही दृश्य वैद्यकीय कारण नसताना शरीराला आलेलं घायाळपण आणि मनाची कासाविशी हटता हटत नाही म्हटल्यावर अंतर्मुख होत जाते. स्त्रीचा स्वतःच्या शरीरावरचा हक्क आणि पूर्ण निर्मितिक्षम शरीरापासून काहीतरी हिरावून घेतलं जाताना होणारी हिंसा यांच्यातलं द्वंद्व निरखून पाहते. आधुनिक दृष्टी असलेल्या व्यक्तीमधली ही तरल संवेदनशीलता हे या सगळ्याच कथांचं वैशिष्ट्य आहे. ‘अनअव्हॉइडेबल एक्स्पेंडिचर’ या कथेतली नायिका याच संवेदनशीलतेपोटी स्वतःला आरोपी करून प्रश्न विचारते आणि सरतेशेवटी आपणही जगासारखे ‘सोयीस्कररीत्या’ संवेदनशील, अशा, औषधाच्या कडू गोळीसारख्या गिळाव्या लागणार्या, निष्कर्षावर येते. तशीच ‘अनुभव’ आणि ‘दिवेलागणी’ या एकाच जातकुळीच्या कथांची नायिकाही. म्हटलं, तर त्यांतलं ‘विवाहित स्त्रीचा मित्र’ हे सूत्र काहीसं सरधोपट आहे. पण त्याकडे बघण्याचा नजरिया मात्र खास पद्मजाचा. ‘मैत्रीची एक स्वतंत्र कमिटमेंट’ असते आणि ‘संपून गेलेल्या मैत्रीचीही डिग्निटी’ सांभाळायची असते असं मानणारी त्यांतली नायिका पारंपरिक कौंटुबिक चौकटीविरुद्ध बंड करत नाही, पण मैत्र या अतिशय आधुनिक नात्याचं मोठेपण मात्र ती मनोमन मानणारी आहे.
‘विदुर’ या कथेतल्या नायिकेला एका उतरत्या दुपारी चक्क भूत दिसावं, तशा एका वृद्ध आणि मृत परिचितांचं दृश्यरूप समोर साकारताना दिसतं. ‘आपण हे नक्की काय अनुभवतो आहोत?’ असा प्रश्न मनात उमटत असताना, पूर्ण जागेपणी आलेला हा अनुभव. पण नायिकेची त्याकडे पाहणारी दृष्टी सजगपणे विज्ञाननिष्ठ आहे. पण तसं असूनही ती तो अनुभव नाकारत नाही. चाकोरीबाहेरचं आयुष्य जगण्याची ओढ, त्याकरता घ्याव्या लागणार्या निर्णयांमधून अपरिहार्यपणे दुखावले जाणारे आप्त, वार्धक्यामधली असहायता, एकंदर मानवी आयुष्यातलं स्वयंनिर्णयाचं कःपदार्थ स्थान... अशा, मोठा आवाका असलेल्या प्रश्नांकडे वळण्याकरता एका अद्भुत अनाकलनीय अनुभवाचा माग वापरावा, तशी ती कथा.
दात विचकत आणि बाहू फुलवून दाखवत, एकमेकींसमोर गोल-गोल फिरून एकमेकींच्या शक्तिसामर्थ्याचा अंदाज घेत, धीम्या पण निश्चित गतीनं, बाहेरच्या वर्तुळांतून अधिकाधिक आतल्या स्नेहवर्तुळांमध्ये शिरत जाणार्या दोन टोकदार स्त्रियांविषयीची कथा म्हणजे ‘माझ्या मुलीचा गॉडफादर’. हिंदी सिनेमानं भावनातिरेकी केलेल्या मैत्री नावाच्या एका नातेसंबंधात किती प्रकारची सूक्ष्म राजकारणं, डावपेच, खेळ्या-प्रतिखेळ्या असतात त्याचं भान ही कथा आणवून देते. मात्र तिचा शेवट कडवट नाही. त्यात मैत्री या नात्याविषयीचा उमदा आशावाद आहे.
‘स्पर्शाची’ ही कथा पूर्णतः वेगळ्या वाटेवरची. कुणी नेटके शब्द साठवावेत, कुणी सुरांचा छंद करावा, तशी निरनिराळे स्पर्श भोगून पाहणारी, साठवून ठेवणारी, त्यांद्वारे संवाद साधू पाहणारी एक मनस्वी स्त्री आणि तिच्या मैत्रीत पडलेली नायिका. या कथेच्या विषयात आणि कथानकात वेधक निराळेपण आहेच. पण त्याहूनही मला अतिशय आवडते, ती लेखिकेनं रेखाटलेल्या नायिकेची स्वतःच्या संकुचितपणाकडे हसत हसत लक्ष वेधणारी दृष्टी. मैत्रिणीच्या जगावेगळ्या छंदावर आक्रमकपणे हल्लाबोल करताना नायिकेचा आवाज ‘चिरकतो’ आणि अखेर ती ‘धांदरटासारखी’ माघार घेत मैत्रिणीच्या बोलण्याचा खुल्या मनानं विचार करू बघते. तिला आपल्या चौकटी मोडायच्या नाही आहेत, पण त्याच वेळी त्याबाहेरच्या जगाविषयी तुच्छता नाही, उत्सुकता आहे. हे मिश्रण सुरेख तर होतंच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे माझ्या पिंडाला आणि जडणघडणीला जवळचं वाटणारं होतं.
बहुतांश स्त्रीवादी लेखिकांना त्यांच्या आविष्कारासाठी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर शहरी अवकाश उपलब्ध झाला, हे सत्य आहे. पण हा अवकाश पद्मजाच्या कथांचा – खरं तर सगळ्याच लेखनाचा – आतलेपणानं हिस्सा झाल्याचं दिसतं. तिच्या अवघ्या लिहिण्यातून त्याच्या खाणाखुणा सतत दिसत राहतात. तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून, सुशिक्षित-कमावती-प्रॅक्टिकल आई आणि नास्तिक-नि-प्रेमळ वडील लाभण्यातून, चौकोनी कुटुंब मिळण्यातून, शहरातला जन्म नि वास्तव्य असण्यातून, चिकित्सक नि विवेकी संवेदनशीलतेतून, अगदी उच्चवर्णीय उच्च-मध्यमवर्गीयपणातूनही - तिच्या लिहिण्याला जो विशिष्ट आकार आला, तो मधली चाळीस वर्षं ओलांडून माझ्यापर्यंत थेट येऊन पोचला, मला भिडला. कॉस्मोपॉलिटन शहरांमधल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर्स, लेखन-वाचन-सिनेमे-नाटकं-शिक्षण-परिसंवाद इत्यादी सारस्वती वर्तुळं, उच्चवर्णीय समाजातल्या जन्मामुळे आणि सुधारकी कुटुंबांमुळे परंपरांशी झगडावं न लागता त्यांचे फायदे तितके मिळणं नि तरी त्यांकडे पाहायची जबाबदार नजर म्यान न करता येणं, स्त्रीत्वाचा अहं वा न्यून असा कुठलाच गंड नसणं... हे सगळं मॅचिंग असल्यामुळे - वा निदान हवंहवंसं असल्यामुळे – ती मला एखाद्या समवयस्क मैत्रिणीसारखी भासली.
पुढे अतिशय आवडीनं मिळवलेल्या तिच्या सगळ्या लेखनात तिचा हाच स्वभाव बर्करार राहिलेला जाणवला. उतारवयात किडण्या निकामी झाल्यावर करावं लागलेलं किडणीचं रोपण, त्यासाठी मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, सतत विवेकी दृष्टीकोनातून आपल्या कृतींची योग्यायोग्यता तपासत राहणं, तसं करताना किडणीच्या आजारपणाचे तपशील-त्याबाबतची सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं-आत्मपरीक्षण नोंदणं... हे सगळं लीलया कवेत घेणारं ‘हसरी किडणी’ हे पुस्तक काय; किंवा अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास अशा ढोबळ वर्णनात कसंबसं(च) बसेल असं ‘बाराला दहा कमी’ हे पुस्तक काय. विवेकी-अभ्यासू-व्यापक-आधुनिक नजर आणि त्याच वेळी स्वभावातला गमत्येपणा ही तिच्या लिहिण्याची व्यवच्छेदक लक्षणं. बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची वैज्ञानिक स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक समाजांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.
मराठीत सशक्त स्त्रीवादी ललितलेखनाची परंपरा आहे. त्यांच्याशी तुलना करता काय दिसतं? गौरी जवळ जवळ परग्रहावरची वाटावी अशा जगातली भासणारी. तिच्या साहित्यातल्या विश्वाला मराठी मध्यमवर्गीय मर्त्य जगाचे नियम जणू लागूच नाहीत. सानिया कमाल गंभीर आणि अनेकदा वाचकावर विसंबून अनेक गोष्टी न उच्चारता सोडून देणारी. मेघना पेठेचं नातं मला गौरी वा सानिया यांच्यापेक्षाही जी. ए. कुलकर्णींशी अधिक जवळचं वाटतं. पद्मजाच्या लिहिण्यात आणि जीवनदृष्टीत एक प्रकारचा रसरशीतपणा, जीवनसन्मुखता, निकोपता दिसते - लोभस वाटते.
आमच्यात इतकं सगळं मॅचिंग नसतं नि मी एखाद्या खेड्यात जन्मलेली, शिक्षण घेणार्या पहिल्याच पिढीतली, पारंपरिक स्त्री – किंवा अगदी पुरुषच असते – तर आमची अशी नि इतकी मैत्री झाली असती का? कदाचित झाली असतीही. पण मी तिला एकेरीत संबोधू शकले नसते. तितकं अंतर तरी आमच्यात राहिलंच असतं.
~
दिवेलागणी
पद्मजा फाटक
विमल प्रकाशन
१९८८

(पूर्वप्रसिद्धी : आदले-आताचे, लोकरंग, लोकसत्ता, जून २०२३)

इतक्यात वाचलेली पुस्तकं : अर्ली इंडियन्स


सुमारे पासष्ट हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघालेली काही आदिमाणसं भारतीय उपखंडात आली. काही युरोपात गेली. पण ‘अर्ली इंडियन्स’ हे टोनी जोसेफ लिखित पुस्तक इतरत्र गेलेल्या माणसांकडे फार निरखून बघत नाही. त्याचा रोख आहे तो भारतीय उपखंडातल्या माणसांच्या इतिहासाकडे.
ही आदिमाणसं भारतीय उपखंडात कुठे-कुठे स्थिरावली. पण सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वीपर्यंत शेतीचा शोध लागला नव्हता. लोक नुसतेच भटकत, शिकार-सावड करत जगत होते. साहजिक पोटापलीकडचं उत्पन्न नव्हतं आणि त्यामुळे संस्कृतीही नव्हती. पण पाचेक हजार वर्षांपूर्वी इराणमधल्या झाग्रोस नामक डोंगराळ भागातली काही माणसं आपण ज्याला हडप्पा संस्कृती म्हणतो त्या भागापर्यंत आली असावीत. आत्ताच्या भारतातला गुजरात नि आसपासचा भाग, पलीकडचा पार बलुचिस्तानपर्यंतचा भाग, आणि अलीकडे अगदी गंगा-यमुनेच्या संगमापर्यंतचा भाग असा विस्तीर्ण भूभाग हडप्पा संस्कृतीचा मानला जातो. पण हा त्याचा विस्तार पुढच्या दीडेक हजार वर्षांमध्ये झालेला. तर – भारतात राहू लागलेली आफ्रिकी आदिमाणसं नि इराणच्या झाग्रोसमधून आलेले लोक एकत्र राहू लागले असावेत. त्यांच्या वंशजांनी हडप्पा संस्कृती वाढवली. तत्कालीन पृथ्वीवरची ही सगळ्यांत मोठी संस्कृती – भूभागाचा आकार नि लोकसंख्या अशा दोन्ही अर्थांनी. (तरी लोकसंख्या फार तर भारतातल्या आजच्या एखाद्या सेमीशहराएवढी असेल! हे ‘प्रचंड’ लोकसंख्येचा आवाका ध्यानी यावा म्हणून.) शेतीवर आधारित जीवनशैली, मोठाल्या देवळांची अनुपस्थिती, हिंसा वा संघर्ष यांचं चित्रण अजिबात न सापडणं, राजापेक्षाही निवडक उच्चवर्णीयांच्या हाती कारभार असल्यासारखी लक्षणं, पाण्याचं नि सांडपाण्याचं उत्तम नियोजन, नद्यांना बंधारे घालून आणि पूरनियंत्रण करून खेळवलेलं पाणी, रस्ते-स्नानगृहं, इत्यादींमधली शास्त्रशुद्ध गुंतवणूक, शिस्नपूजा, युनिकॉर्नसदृश्य प्राण्याचं पूजन, हंडी उर्फ लोटा या नमुन्याच्या भांड्याची निर्मिती आणि प्रसार, तत्कालीन जागतिक संस्कृतींशी व्यापार, बांगड्या या दागिन्याचं प्राबल्य, घोडा या प्राण्याची अनुपस्थिती तर रेडा-म्हैस या प्राण्याला असलेलं महत्त्व, मातृदेवतांची उपासना… या काही गोष्टी हडप्पा संस्कृतीचे विशेष म्हणून मानल्या जातात. तीनेक हजार वर्षांपूर्वी काही एकापाठोपाठ एक आलेल्या नैसर्गिक आपदांमुळे तिचा र्हास होऊ लागला. वसवलेली नगरं सोडून लोक परागंदा झाले. जगायला इतर भूभागात गेले. त्यांच्यापैकी काही लोक भारताच्या दक्षिणेकडे गेले. दक्षिणेत आधीही स्थलांतरं झाली असणारच. पण हे महत्त्वाचं स्थलांतर असणार. हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा आजही पूर्ण उलगडा झालेला नसला, तरी दक्षिण भारतातल्या द्रविडभाषांची आदिभाषा आणि हडप्पामधली आदिभाषा यांच्यात म्हणण्याजोगी साम्यं आढळली आहेत.
हडप्पा संस्कृतीचा र्हास अंतिम टप्प्यात असताना कधीतरी स्टेप्समधून – गवताळ कुरणांच्या प्रदेशातून काही टोळ्या या दिशेनं आल्या. त्यांची जीवनशैली भटकी होती. घोडा हा प्राणी त्यांच्याकरता साहजिकच अतिमहत्त्वाचा होता. धातुकाम आणि पर्यायानं शस्त्रास्त्रं याही बाबतीत ते प्रगत असावेत. गुराढोरांना महत्त्व होतं, पण एका जागी स्थिरावून नगरं वसवणारे ते लोक नव्हते. आपण ज्यांना ‘आर्य’ म्हणतो ते हे लोक असावेत. तोवर वेदनिर्मिती झालेली नव्हती, तसंच संस्कृतही पूर्ण विकसित नव्हती. त्या दोन्ही बाबी या प्रदेशात आल्यानंतर घडल्या. पण त्यांच्या संस्कृतीत – बहुधा येताना अफगाणिस्तानात वाटेत आलेल्या हरवैती – सरस्वती? – नदीला महत्त्व होतं. नद्यांना बांध घालणं पाप मानलं जात असावं. शिस्नपूजेबद्दल तिरस्कार होता. आणि मुख्य म्हणजे हे लोक पुरुषबहुल टोळ्यांतून आले.
आधीच र्हासकालात असलेल्या हडप्पा संस्कृतीला हा संघर्ष पेलवला नसावा. आर्य पुरुषांनी इथल्या स्त्रिया मिळवणं, त्यातून वंश वाढवणं, हळूहळू वेदरचना होत जाणं, संस्कृतची प्रगती होत असतानाच स्त्रिया (कारण त्या बहुतांश परक्या वंशातल्या!) आणि शूद्र (हडप्पातले, उर्फ परके) यांच्या संस्कृत बोलण्यावर बंधनं असणं, यज्ञ-बळी-युद्ध इत्यादी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असणं… हे यथावकाश घडत गेलं. आजच्या भारताच्या वरच्या भागात डावीकडून उजवीकडे एखाद्या उथळ यूसारखा एक रुंद पट्टा ओढला, तर जो आकार मिळेल, साधारण त्या भागात आर्यांची संस्कृती बहरत गेली. त्या-त्या प्रदेशातल्या इंडो-युरोपीय भाषांचा अभ्यास या स्थानाला पुष्टी देतो.
हडप्पा आणि आर्य या दोहोंची वैशिष्ट्यं एकत्र येत राहिली. सुरुवातीला शिस्नपूजेचा तिरस्कार करणार्या आर्यांनी शिवलिंग स्वीकारलं. हडप्पा संस्कृतीमधली हठयोग्याची मुद्रा आणि योग स्वीकारला. आधीच्या हडप्पाजनांची मातृदेवतांची उपासना मागे पडली. त्यांनी यज्ञयाग आपलेसे केले. संस्कृत आणि वेद आपलेसे केले. या सगळ्या काळात भारतीय उपखंडात जगभरातून इतरही स्थलांतरं होतच होती. कुठे-कुठे मूळ आफ्रिकी वंशाचे ‘अर्ली’ भारतीय लोकही होते. या सगळ्यांमध्ये ‘मुक्त संचार नि संकर’ घडत होता. हा ‘भारतीय’ संस्कृतीचा सर्वांत सर्जनशील कालखंड. उपनिषदनिर्मितीचा कालखंड. मुक्तविहाराचा, मिश्रणाचा, विविधतेचा, विपुलतेचा आणि निर्मितीचा कालखंड.
इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षं कधीतरी वर्णसंकर थांबलेला आढळतो. त्यावर बंदी तरी आली असावी वा वर्णसंकरात काहीतरी चूक आहे अशी समजूत जनमानसात रुजली असावी – रुजवली गेली असावी. मजेशीर बाब अशी की वेदांत आढळणारी चातुर्वण्याची संकल्पना तत्कालीन समाजात अस्तित्वात असूनही त्याआधी वर्णसंकर थांबलेला दिसत नाही. तसे ठोस जनुकीय पुरावे आता मिळाले आहेत. इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षांपूर्वी तो थांबला. त्या सुमारास जातिव्यवस्थेचा उदय झाला असावा, असं म्हणता येईल.
इतिहासाच्या पटाच्या तुलनेत वर्णसंकर निषिद्ध मानण्याची घटना तशी अलीकडची (!) असल्यामुळे भारतीय लोकांमध्ये जनुकीयदृष्ट्या फरक नाही. थोडं वैविध्य आहे, पण आपण सगळे जण थोडे थोडे सगळ्यांसारखेही आहोत. आफ्रिकी वंशाचे भारतीय, आ०वं०भा० + झाग्रोसमधले शेतकरी = हडप्पा, हडप्पा + आ०वं०भा०= द्रविड उर्फ दक्षिण भारतीय, हडप्पा + आर्य = उत्तर भारतीय, भारताच्या ईशान्येकडून आलेले मंगोल वंशीय आणि त्यांचे इतरांशी झालेले संकर, आणि या सगळ्यांचे आपापसांत झालेले संकर... असा भारतीयांचा जनुकीय आणि पर्यायानं सांस्कृतिक-सामाजिक इतिहास आहे. एका पिझ्झ्याची अतिसुलभीकृत (हा लेखकाचाच शब्द) उपमा देत ही घडण समजावली जाते. खालचं पीठ आ०वं०भा०चं, वरचा सॉस हडप्पाचा, चीज आर्यांचं, तर इतर लोकांचे टॉपिंग्स – असं सगळं मिळून आपण उर्फ आजचा आपला पिझ्झा घडलेला आहे.
हा सगळा पट ‘अर्ली इंडियन्स’च्या पूर्वार्धात उलगडतो. त्याकरता पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र, जनुकशास्त्र, भाषाशास्त्र, शिलालेखन-ताम्रपट आणि बोलींचा इतिहास, इतर सांस्कृतिक-सामाजिक इतिहासलेखन – या सगळ्यांची मदत घेतली जाते. मात्र गेल्या पाचेक वर्षांपूर्वींपर्यंत या सगळ्या इतिहासात असलेली संदिग्धता संपवून ठोस नेमकेपणा आणि अचूकपणा आणण्याचं काम प्राचीन जनुकीय पुराव्यांनी केलं असल्याची ठाम नोंद होते.
ही गोष्ट अत्यंत दिलखेचक तर आहेच. त्याखेरीज ती आपल्याला विचारात पाडते. हा हजारो वर्षांचा इतिहास ओलांडून बघता बघता आजच्या भारतातल्या उत्तर विरुद्ध दक्षिण अशा संघर्षांपर्यंत येऊन ठेपते. ब्राह्मणवाद आणि बहुजनवाद यांची मुळं दाखवून देते. शाकाहार आणि मांसाहार, दुग्धसेवन आणि मांसाशन यांमागच्या जनुकीय कारणांवर प्रकाश टाकते. गांधी-आंबेडकर वादाची मुळं शोधू पाहते. मगध आणि आर्यवंशीय यांच्यातल्या संघर्षाची कारणं पाहते. बुद्ध नि जैन धर्मांच्या उदयामागची नि प्रसारामागची पार्श्वभूमी दाखवून देते... आणि या सगळ्या द्वैतांच्या पलीकडे जाणारी – या भूमीतल्या वैविध्यात नांदणार्या एकात्मतेचा, मिश्रणाचा, संकराचा, संगमाचा, सहजीवनाचा... आणि त्यातून निर्माण झालेल्या अद्वितीय वारशाचा धागा दाखवते.
वाचताना पुष्कळ काही पूरक आठवत, दिसत राहिलं. त्यानं या गोष्टीला अनेक आधार पुरवले. उदाहरणं दिली. स्पष्टीकरणं दिली. दिलासाही दिला. पुस्तक अतिशय अतिशय आवडलं हे तर सांगायला नकोच. ते सतत निरनिराळ्या कारणांनी डोक्यात पृष्ठभागापाशीच राहील, पुन्हापुन्हा त्याकडे संदर्भाला, तुलनेला परतणं होईल – हे महत्त्वाचं. आणि तसं दुर्मीळ.
बाकी – हा निव्वळ न राहवून करून दिलेला परिचय आहे. तपशिलात काही चूक असेल, तर ती माझी.
~
अर्ली इंडियन्स : द स्टोरी ऑफ अवर अॅन्सेस्टर्स अॅंड व्हेअर वी केम फ्रॉम
टोनी जोसेफ
प्रथमावृत्ती 2018
जगरनॉट पब्लिकेशन

इतक्यात वाचलेली पुस्तकं : एका श्वासाचं अंतर

अंबिका सरकारांबद्दल निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. पोटच्या तिन्ही मुलांचा मृत्यू पाहावा लागणं. अर्थशास्त्राचं अध्यापन. सळसळता उत्साह. गौरी देशपांडेशी असलेली मैत्री आणि तिच्या तोंडचं ‘माझी अंबू’ हे संबोधन. ‘द रीडर’चं अंबिकाबाईंनी केलेलं भाषांतर. ते भाषांतर आणि सिनेमा या दोन गोष्टी अजिबात वेगळ्या न काढण्याजोग्या एकमेकींवर सुपर इंपोज झाल्यासारख्या होत्या डोक्यात.
पण या सगळ्या ओळखी ओलांडून त्यांची ओळख माझ्या डोक्यात कायम ‘एका श्वासाचं अंतर’ लिहिणारी लेखिका अशीच राहील.

कथानक अगदी साधं सरळ आहे त्या कादंबरीचं. एक कमावती बाई. एक मुलगा झाल्यानंतर नवर्याच्या नादानपणाला कंटाळून वेळीच घटस्फोट घेते. लोकांची बरीवाईट, शहाणी-कुजकी बोलणी झेलते, पचवते. दुसरं लग्न करते. संसार करते, यथाशक्ती निभावते. मरून जाते. यापल्याड त्या पुस्तकात विशेष सांगण्याजोग्या घटना नाहीत. पुस्तक संपल्यावर हे जाणवतं, तेव्हा चकित व्हायला होतं. कारण या सरळसाध्या आयुष्यात किती काय-काय प्रवास घडतात त्या बाईचे! जराही मेलोड्रामा न वापरता, उत्कटतेचे रंग गडद न करता, माणसांना काळ्या-पांढर्या रंगांमध्ये न रंगवता, स्त्रीवाद या शब्दातला ‘स’ही न उच्चारता, तटस्थतेचा आव न आणता – आयुष्याबद्दलच बोलणारी गोष्ट इतक्या परिणामकारकपणे कशी काय लिहू शकतं कुणी, असं वाटतं.
यातली सगळीच पात्रं हाडामांसाची माणसं आहेत. नायिकेचा दुसरा नवरा – बाप्पा, त्यांचा अश्राप चांगुलपणा आणि तरीही कुणापर्यंतच न पोचता येण्यातला अभागीपणा बघताना पोटात तुटतं. मुलाचं - कार्तिकचं - आईवर उत्कट प्रेम आहे. आणि तरी एक प्रकारचा हट्टी आक्रसलेपणाही आहे. तो त्याला आईपल्याड कुणापर्यंतच धड पोचू देत नाही. त्याच्या बायकोचा - रेखाचा - स्वतःचा असा इतिहास-भूगोल आहे. त्यातून येणार्या तिच्या धारणा आहेत. त्यांची नि तिच्या नवर्याच्या स्वभावाची अशी काही करकचून गाठ बसलेली आहे, की संसार सोन्यासारखा, नातं घट्ट, दोन गोजिरवाणी मुलं, एकमेकांबद्दल प्रेमही आहे - पण कुठेतरी काही विस्कटून बसलेलं...
या सगळ्या गुंत्याकडे नायिका साक्षीभावानं पाहते. तिला त्या-त्या वेळी दुःखं होतात, राग येतो, माया वाटते, काळजी वाटते. पण त्यापल्याड बघणारी नजर तिच्यापाशी आहे. त्यानं सगळ्यांमधली असूनही ती निराळी होते.
तिच्या ऑफिसातल्या एका सहकार्याचं – नवलकरचं - एक पात्र कादंबरीत आहे. मनमोकळेपणी चावट कोट्या करणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, भरभरून जगणारा असा तो माणूस. त्याच्या बोलण्यामुळे त्याच्यापासून फटकून राहिलेल्या नायिकेला एका क्षणी त्याच्या वाह्यात बोलण्यापल्याडची खरीखुरी आस्था, जगण्यावरचं प्रेम जाणवतं. धागा जुळल्यासारखा होतो, काहीतरी चमकून गेल्यासारखं होतं.
तिथेच लेखिका थांबते.
आपण थांबून अर्थ लावू पाहतो, पण गोष्ट पुढचं वळण घेते.
असे अनेक क्षण गोष्टीत येतात. अर्थपूर्णता आणि निरर्थकता यांच्यातला लपंडाव घडत राहावा, माणसांनी सर्वस्व पणाला लावून जगू पाहावं आणि भ्रमनिरास व्हावा, पण काहीतरी सापडल्यासारखंही व्हावं. थबकून काही चिमटीत धरू पाहण्याआधीच आयुष्यानं पुढचं वळण घ्यावं - असे ते क्षण. बघता-बघता निसटून जाणारे, जगण्या-मरण्यातलं अंतर दाखवून देणारे.
हे अनलंकृत, जिवंत, कसलाही आव न आणणारं, शहाणं पुस्तक लिहिणारी लेखिका म्हणून अंबिकाबाईंची जागा कायम मनात राहील. त्यांना आदरांजली.
एका श्वासाचं अंतर
अंबिका सरकार
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९०