काही पत्रं लिहिली जातात, पण इच्छित मुक्कामी पोचतातच असं नाही. कधी पोचतात, पण वाचणाऱ्यापर्यंत पोचतात असं नाही. ही अशीच काही पत्रं. अर्ध्यात राहिलेली.
एक काळ असाही होता, जेव्हा तुला फोन करावा, तुझा फोन यावा असं सतत वाटत असे. आता तसं असत नाही. आपण हल्ली एकमेकांना लिहितोही क्वचित. नुसती भांडणं करण्यापेक्षा नकोच ते, असं वाटून थांबलो का आपण? माहीत नाही.
आपण भेटतो तेव्हाही काही हिशोबांची परतफेडच तर करायची असते फक्त. अपेक्षा असतात. अपेक्षाभंग असतात. मग वाट्टेल तसं अद्वातद्वा बोलणं असतं; नाही तर ओठ आवळून गप्प बसणं तरी असतं. प्रश्न असतात... असंच करायचं आहे का आयुष्यभर? याचसाठी केला होता अट्टाहास?
उत्तरं नसतातच.मग अजून भांडणं, चिडचिड, त्रागा, वैताग ...
खरोखर तुला नाही या साऱ्याचा त्रास होत? की तू इतका विचारच करत नाहीस या साऱ्याचा? तू खरोखरच मला गृहित तर धरून चाललेला नाहीस ना?
मलाच कितीतरी वेळा प्रश्न पडतो, का कुणाला तरी हवं असावं मी? तुला इरिटेट होईल इतक्या वेळा हा प्रश्न मी तुला विचारलेला आहे. होय ना? पण तो मला खरोखरच सतावतो. वाटतं, या मुलाने आपल्या असण्यात फक्त सोय तर नाही ना पहिलेली?
हा तुझ्यावर अन्याय असेलही कदाचित. पण तसा तो व्हायला माझ्याइतकाच तूही कारणीभूत आहेस मित्रा. तुझ्या आयुष्याबद्दल काय ठाऊक आहे मला?
तुझा जन्मदिवस, पत्ता, कुटुंबीयांचे तपशील, रंग-वजन-उंची-पगार हे सारे तपशील कदाचित सांगू शकेन मी. पण एकमेकांशी जोडलं जाणं इतकंच असतं फक्त? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच सांगता येणं शक्य नाही आणि तुला सांगितल्याशिवाय ज्याची पूर्तताही व्हायची नाही असं काहीतरी माझ्यापाशी असतं. आपण एकमेकांना हा मान, ही जवळीक देऊ करतो तेव्हा इतर कसल्याही तपशिलांनी येणार नाही इतके जवळ येतो. असा एकच क्षण येऊन पुरत नाही. त्या एका क्षणानं खूण पटेल कदाचित एकमेकांची. पण तिथेच थांबत नाही ते. अशा एका क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत, दुसऱ्यापसून तिसऱ्यापर्यंत ... असे असंख्य प्रवास करायचे असतात.
Am I sounding too romantic or filmy? May be...
हे इतकं बटबटीत आणि फिल्मी वाटत असेल तर मग माझी तोकडी भाषाच त्याला कारणीभूत आहे.
मी मागेही एकदा तुला लिहिलं होतं - कधी कधी सध्या, रोजच्या बोलण्यातून सूर जुळत जतात. समोरचा माणूस जे बोलत असतो, ते आणि तेवढंच बोलत नसतो तो. ऐकू न येणारं, पण जाणवू शकणारं असंही बरंच काही असतं. ते ऐकू यायला लागतं - पटतं, तेव्हा तर आपण अधिकाधिक मोकळे होत जातो.
कधी कधी मात्र असे सूर नाहीच जुळत. किती वचावचा बडबड केली, तरी आपण तस्से कोरडेच राहतो.
अलीकडे मला हे फार जाणवतं. तुझ्या असण्याबद्दल मनातून आनंद- आनंद नाही दाटून येत. आपण एखादी बिझिनेस मीटिंग आटपावी, तसे भेटतो. चार पुस्तकांबद्दल चार ताशेरे झाडतो, दोन टोमणे मारतो, आणि आपापल्या वाटेने चालते होतो.
इतकंच असायचं होतं का या साऱ्याचं आयुष्य? इतकंच मिळायचं होतं आपल्याला एकमेकांकडून?
माझ्याकडे उत्तरं नाहीत मुला. मला त्रास देणारे प्रश्न मी संगतवार मांडायचा प्रयत्न करते आहे फक्त. मी फार कोरडी आहे स्वभावानं. तुझ्या-माझ्या नात्यात तर फारच. आपल्याकडून कुठून कसल्या प्रेमा-मायेचा अंशही निसटता कामा नये, म्हणून स्वत:वर पहारा देत असल्यासारखी वागते मी. तसेच स्पर्शाबाबतचे माझे संकोच...
या साऱ्याला मी काहीच करू शकत नाही मुला. मी अशी अशी आहे, इतकंच म्हणता येतं फक्त. म्हणून का तू असा रेषा आखून दिल्यासारखा बाहेरचाच झालास?
परवा संध्याकाळी सैरभैर झाल्यासारखी झाले होते मी. उगाच रडायला येत होत. सिनेमा पाहताना मॅडसारखं एकटीनंच रडून घेतलं मी. कारण? ठाऊक नाही. वाटत होतं, किती मोठी मोठी स्वप्नं पाहतो आपण.. आणि प्रत्यक्षात मात्र हातात काहीच मिळत नाही. जेमतेम भाकर तुकडा मिळवण्याचे हिशेब, अजून पैसे मिळवण्याचे काटेकोर क्षुद्र बेत.. घर नि दार... हे काय होऊन बसलंय... असे काहीतरी निराशावादी विचार. आता नवे बेत करायचं वय सरत चालल्याची घाबरवून टाकणारी जाणीव. 'सामान्यपण’ स्वीकारणं फार जड जात होतं...
त्या क्षणी मला इतकं प्रचंड एकटं वाटलं -
आपल्याला जिथे तुटतं आहे, ते कुणालाच - दुसऱ्या कुणालाच - सांगून समजणार नाही अशी भयानक खात्री माझी मलाच. आणि त्याचंही वाईट वाटतंच आहे...
ब्रह्मांड अनुभवलं.
पण तेव्हाही, निसटता प्रयत्न तरी करून पाहू असं म्हणूनही, तू नाही आठवलास.
हे आत्ता. आपण अजुनी एकमेकांच्या आयुष्याशी अधिकृतपणे - समाजमान्य पद्धतीने जोडलेही गेलेलो नसताना.
का रे हे असं होऊन बसलं?
की हे असंच असायचं असतं?
इतकंच?