Monday, 2 June 2025
अंतर
Wednesday, 28 May 2025
गिचमीड
Sunday, 20 October 2024
या वाटा वळणावळणांनी
Monday, 8 July 2024
कधीतरी
Saturday, 13 April 2024
पहिल्यापासून
Wednesday, 12 April 2023
गोष्ट
Wednesday, 11 January 2023
निरुपाय
Tuesday, 15 November 2022
मासोळ्या
खूप वेळ स्वस्थ बसलात,
तर हळूहळू...
एकेकच मासोळी जवळ येते आधी.
जराश्याही हालचालीनं धुम् पळून जाते..
हालचाल न करता,
हसू आलं तरी गालातच जिरवत,
बसून राहिलात देवासारखे,
पण देवासारखे नव्हे हां -
जिवंत, शहाण्या, मन काठोकाठ भरलेल्या, भल्या, अस्सल नि स्व-स्थ माणसासारखे -
तर एकीच्या दोन, दोनाच्या चार, नि चाराच्या आठ होतात.
इवल्या दाताओठांनी पावलांना लुचतात.
तरीही स्वस्थच राहायचं बरं का!
त्यांच्या शेपट्या झिळमिळतात.
कोवळ्या उन्हाची वेळ असेल, तर सोन्याच्या तिरिपी अचूक झेलत चमकतात-विझतात,
नजरबंदी करतात.
गुदगुल्या होऊन पोटातून हसू आलं, तर हसायचं मनमुराद.
पण चक्रमपणी भिऊन जाऊन पाय खस्सदिशी ओढायचे मात्र नाहीत.
असं सगळं बयाजवार नि खूपच्या खूप वेळ जमलं,
की मग,
कधीकधी,
कधीकधीच -
हलके-हलके कुशीत शिरावं कुणाच्या,
तसे आपले पाय नि मासोळ्या नि आपण नि पाणी नि ऊन नि आणखीन सांगताच न येणारं काहीतरी...
असं सगळं फेर धरायला लागतं.
अर्थात -
इतकं जमायला जिवंत, स्वस्थ आणि किंचित आवंढा गिळणारं...
माणूसपणच लागतं,
साक्षात देवाचाही काही उपयोग नाही,
कबूलाय.
पण ते तर म्हटलंच ना आपण आधी.
लहानश्या ओढ्यावर पाण्यात पाय सोडून बसलाहात तुम्ही कधी?
Thursday, 13 October 2022
चेहरा
Thursday, 6 October 2022
वीज
Tuesday, 27 September 2022
दिवस
Friday, 16 September 2022
कितीही असोशीनं
Saturday, 28 May 2022
पुढचं सोपंय.
Friday, 29 April 2022
अजुनी
Friday, 1 April 2022
कुठवर
Sunday, 27 March 2022
सगळीकडे कसं शांत शांत आहे
Tuesday, 18 January 2022
प्रायश्चित्त
Saturday, 8 January 2022
आत्ताचा अभंग
कोवळेसे ऊन,
मोतियाची आभा,
असण्याचे सुख,
अपुरेसे.
रोखलेला श्वास,
खिळलेले डोळे,
बोट घेई वेध,
भविष्याचा.
पसरला पंख,
मारला की सूर,
तरंगता क्षण,
मासोळीचा.
भाळलेले चित्त,
डोळ्यातसे स्वप्न,
सुखाचा ठणका,
हवाहवा.
बुडो आले बिंब,
केशरीशी आभा,
गाभ्यातली बोच,
कुणासाठी?
आसमंता यावी,
आताचीच गुंगी,
उद्यासाठी काही,
उरो नये.
Tuesday, 21 December 2021
या मौनाची जात निराळी
या मौनाची जात निराळी
उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी
या मौनाची जात निराळी.
कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी
या मौनाची जात निराळी.
संध्याकाळी, उदास वेळी, हुरहुर काहूर, काळीज जाळी
या मौनाची जात निराळी.
अशाच वेळी साथ देतसे, अस्फुट सोबत जणू अबोली
या मौनाची जात निराळी.
संथ शांतता पाण्यावरली, आत नांदते अथांग खोली
या मौनाची जात निराळी.
डोहामधले विश्व आगळे, खळबळ न्यारी निळीसावळी
या मौनाची जात निराळी.
कुणी जाणावे होईल का कधी या मौनाची मुखरित बोली?
या मौनाची जात निराळी.
उंबऱ्यापाशी अडते पाऊल, हर प्रहराची आण निराळी
या मौनाची जात निराळी.
Monday, 18 October 2021
नकाशे
मनगटाच्या आतल्या नाजूक बाजूला असलेल्या,
दिसे न दिसेश्या तिळासारखा,
एखादाच सवयीचा, झिजून मृदावलेला शब्द.
प्रेडिक्टेबल चिडचिड,
कोपरावरच्या ओबडधोबड खळीसारखी.
एखाद्या सर्कसपटूच्या सराईतपणे,
मान वळवता वळवता अचूक फेकलेला,
तिरका कटाक्ष धारदार.
वा,
बर्फाच्या पिसासारखं,
नजरेस पडता पडताच वितळून जाणारं हसू जिवणीच्या कोपऱ्यातलं.
काळोखातही बोटांनी अचूक गिरवता यावेत,
अशा प्रदेशांचे हे अंतहीन पसरलेले नकाशे.
कुठवर आवरून बांधून ठेवशील,
सांग.