Monday, 3 October 2016

हेही दिवस सरतात

कविता म्हणजे काय करतो आपण? 
आता कवितेनं पाठ फिरवल्यावर सोडवायचे हे प्रश्न. उन्हाळ्याच्या सुट्टीत पाढे लिहिल्यासारखे.
पण पाढे मला तितके काही नावडत नाहीत, नाहीतच. दाहोदरसे, तिहोत्रीदोन, चाळासे, त्रेसड्डासे… वगैरे प्रकरणं तेव्हा न समजता पाठ करून टाकली; तरी चिंचेबरोबर उगाच जिभेवर खडेमिठाचा धारदार खडा घोळवत राहावा आणि जीभ चरचरली तरी मजेशीरच वाटत राहावं, तशी त्यातली गंमत मला अजूनही आवडते. समोरचा माणूस कॅल्सी हुडकेस्तोवर आपण आकडा सांगूनही टाकतो. मग तो आपल्याला चक्क भ्यायला लागला आहे, हे लक्ष्यात येतं आणि तरी आपण निर्विकारपणाचं बेमालूम सोंग काढतो; तेव्हा मला अजूनच मजा येते.
होय, थोडी दुष्ट आहे खरी मी. असो. तर - कविता म्हणजे काय करतो आपण?
या प्रश्नाची उत्तरं कवीगणिक निरनिराळी (आणि कवित्वाच्या निरनिराळ्या तरतमपातळ्यांवरची) असणार आहेत हे कबूल करून टाकलं, तरीही आपली निराळी उत्तरं उरतातच. ती तरी कधी परजायची? तर आत्ताच. उन्हाळ्याच्या दिवसांत.
लोकांना म्हणे आनंद अनावर झाल्यावर कविता होते. मला असं काही झाल्याची आठवण नाही. आनंद झाल्यावर कामाधामाला दांड्या मारून मनसोक्त लोळावं, पुस्तकं नाहीतर स्टेशनरीच्या उधळखोर खरेद्या कराव्यात, काही रांधावं, काही खावं-प्यावं, सिनेमे पाहावेत - असल्या साध्यासरळ ब्याकबेंचर सवयी. आनंदाच्या प्रसंगी कवितेची आठवण होत नाही.
ती होते एकान्तात. प्रवास नामक गोष्टीच्या नावाखाली प्रवासाची निव्वळ लॉजिस्टिकं सोडवता सोडवता क्वचित कधीतरी मनाजोगती खिडकी मिळून जाते आणि खिडकीतून बाहेरच्या पळत्या रस्त्याकडे तंद्री लागते. मग शब्दांच्या माळकाच्या माळका डोक्यात फटाक्यांच्या लडींसारख्या एकामागून एक पेटत राहतात. कितीतरी पत्रं मी अशाच प्रवासात हवेवर लिहून काढली आहेत. मग पुढे त्यांचं पेपरवर्क तेवढं उरतं. अशाच वेळी कविता डोक्यात झुरमुरत राहतात. तशीच दुसरी वेळ म्हणजे - चहूबाजूंनी घेरून आल्यासारखं होतं, तेव्हाची. काही केल्या कशावरच वा कुणावरच रेलता म्हणून येत नाही आणि सगळं अनावर साचत जातं डोक्यात - तेव्हा कविता येते. आपल्याच सोबतीला आपणच जन्माला यावं, तशी माळावरच्या बाभळीसारखी वेडीवाकडी बेबंद उगवत जाते. शब्द भले की बुरे, जमलेले की न जमलेले, समकालीन की जडावलेले… या सगळ्यांचे हिशेब नंतर होत राहतात. पण त्या त्या वेळी कविता एक हक्काचं, जन्मजात, दिलखुश राजेपण बहाल करते. या इथे - इथे माझी सत्ता आहे, इथे मला टेकायला जागा आही. इथून मला कुणी ऊठ म्हणणार नाही - अशी, ध्रुवबाळाच्या जातीची, निरंतर आश्वस्तता कविता देऊन जाते; तेव्हा मी रिकाम्या भरधाव ट्रेनच्या दारात उभी असते आणि पुढे क्षितिजापार पसरत जाणार्‍या रुळांवरही माझंच राज्य असतं.
अधूनमधून सध्यासारखे न संपणारे उन्हाळेही येतात. अशा वेळी छापलेल्या कविता नकोनकोश्या होतात. त्यांना कोर्‍या कापडाचा, काहीसा परका वास असतो. कितीही देखण्या, नव्हाळीच्या, जिवंत असल्या; तरीही त्यांच्यात एक समारंभी तोरा असतो. आपल्याला शरमिंदं, अपुरं वाटायला लावणारा पूर्णत्वाचा रुबाब असतो. तो तोराही सोसेनासा होतो, असे हळवे दिवस. अशा वेळी मित्रांपाशी कविता उधार मागाव्यात. वापरून विटक्या, मऊ झालेल्या, धुऊन सुरकुतल्यावरही अंगचा वास ल्यालेल्या सुती कुडत्यासारख्या, त्या आपले लागेबांधे घेऊन येतात, आपल्यालाही देऊ करतात, उन्हाळे बघता बघता निभावून नेतात.
कधी हवेत निव्वळ वादंग आणि कडू आरोपप्रत्यारोप उरतात. अशा वेळी कवितांनी पाठ फिरवलेली असते. पण मी आता अनुभवानं शिकले आहे, की हेही दिवस सरतात. आपण नेटानं शब्दाला शब्द जोडत, किडूक मिडूक साठवत, रोजचे केरवारे नेटानं करत, कालच्या दिवसाला आजचा दिवस जोडत राहायचं असतं. त्या जोडकामाच्या चिकाटीतच कवितांच्या बिया सांडत-रुजत असतात़ कुठे कुठे. उद्या आपण नसलो, तरी त्यातल्याच एखाद्या कवितेचं झाड उगवणार असतं. उगवतंच.
त्यालाच तर कविता म्हणतो ना आपण?

11 comments:

  1. किती सुंदर लिहीलयस. माझ्याकडे शब्दच नाहीत किती आवडलं ते सांगायला, एवढं आवडलं मला.


    ReplyDelete
  2. मी कविता केल्या नाहीत त्यामुळे फ़ार माहित नाही, पण कविता अशा विशिष्ट वेळी डोक्यात झुरमुरत रहातात, शब्दांच्या माळका पेटतात वगैरे ठीक आहे, मस्तच आहे रादर.. पण मग त्या जशाच्या तशा उतरतात का कागदावर? की नम्तर कागदावर उतरताना जेव्हा त्यात क्राफ़्टचा भाग येतो (येतो ना?) तेव्हा त्या वेगळ्याच होतात? लेख, कथा लिहिताना एखादच वाक्य डोक्यात उमटलेलं असतं आणि मग ते कागदावर उतरताना त्यात पुढे मागे भरपूर काही प्रत्यक्षात, कागदावरच घडतं, तसं कवितेबाबत कितपत होतं? अर्थात या आपल्या उगीच न-कवीच्या शंका आहेत. हे जे लिहिलं आहेस ते सुंदरच. कवितेचं झाड उगवण्याची प्रोसेस मस्त मांडली आहेस.

    (बाकी ते अनेकांना आनंद दाटल्यावर -आणि मेघ दाटल्यावर वगैरे- कविता होतात तो प्रकार तापदायकच. ;) )

    ReplyDelete
  3. खिक! प्रतिभावंतांचं निराळं असेल कदाचित, पण सामान्य लोकांच्या बाबतीत अर्थातच क्राफ्ट असतेच. उत्स्फूर्तता वगैरे लाड एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच. पुढे घासूनपुसून साफसफाई करणे आणि झिलई चढवणे. आणि तरी मनासारख्या नाहीच उतरत गोष्टी.

    ReplyDelete
  4. मस्तच लिहिलंय! ओघवतं, साध्या-सोप्या भाषेत.... आवडलंय लेखन!

    ReplyDelete
  5. विजया आणि नामदेव, दोघांचेही मनःपूर्वक आभार.
    नामदेव, तुमचा ब्लॉग पाहिला, आवडला, ऍडवला. :)

    ReplyDelete
  6. निव्वळ अप्रतिम

    ReplyDelete
  7. खूप छान लिहिलंय. अतिशय आवडलं

    ReplyDelete
  8. मनापासून आभार, राजेश आणि मनोज. :)

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. मी अलिकडेच कविता लिहायला लागलोय. पण इतकी वर्षे कविता आवडीने वाचतोय. मी इतकेच म्हणेन कविता म्हणजे कल्लोळ. दुःख, भावना अनावर होतात. भावनांना पंख फुटावेत, तसे शब्द फुटतात, व कविता लिहीली जाते....आनंदाच्या भरात, उन्मादात मी क्वचितच कविता लिहीली. पण तसेही काहीजण लिहीतही असतील. ...खूप उन्मळून जावे, उद्वस्थ व्हावे असे काही वाचले तरी पाण्यातून बुडबूडे यावेत तशी कविता गिरक्या मारत येते. स्वतााचे असो, उसने असो, पुस्तकी असो दुःखाच्या, वेदनेच्या, अपेक्षाभंगाच्या आधारानेच कवितेची वेल आकाशाच्या दिशेने गिरक्या घेते....

    ReplyDelete
  11. @Rajendra

    होय, माझाही अनुभव असाच. :)

    ReplyDelete