Showing posts with label सांगोवांगी. Show all posts
Showing posts with label सांगोवांगी. Show all posts

Saturday, 6 July 2024

आजीची गोष्ट ०४

(भाग ०३)

०४

ही गोष्ट माझ्या आजीची खरी. पण ती तिच्या एकटीची अर्थातच नव्हे. तिच्याकडे थोडं दुरून बघताना मला बाकीच्या सगळ्या गोष्टीही दिसत राहतात. त्या गोष्टी स्वतंत्र असल्या, तरी सुट्ट्या नव्हेत. त्या आजीच्या गोष्टीशी जोडलेल्या आहेत. किंबहुना तिनंच त्या निरनिराळ्या प्रकारे जोडून घेतलेल्या आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे आजीला तीन नणंदा. थोरल्या नणंदेनं आणि तिच्या नवर्‍यानं – राधा आणि अण्णा यांनी आजीचा संसार उभा करून दिलेला. गहू खरेदी करताना तो किती वेळ चावून बघावा नि त्याची गोडी नि चिकटपणा कसा पारखावा या विषयापासून ते आमच्या घरात सगळ्यांना प्रिय असलेल्या पत्त्यातल्या मार्कडावापर्यंत – अशा अण्णा आणि आजी यांच्या पुष्कळ गप्पा होत असत. त्यांची दोस्तीच होती असावी. अण्णांच्या मुली आणि उशिरा झालेल्या मुलग्यामध्ये पुष्कळ अंतर होतं. हा उशिरा झालेला भाचा आणि त्याची मामी – म्हणजे माझी आजी – यांचं अगदी कल्पनातीत गूळपीठ. दर सुट्टीत मामीकडे येणार्‍या या भाच्याचा तिच्यावर फार जीव होता. ती शिवणयंत्रावर बसलेली असली की तिला चहा करून देण्याचं काम त्याचं. त्याच्या चड्ड्या – लंगोट आणि पैरणीही मामीनंच शिवलेल्या असायच्या. तो कटिंग करून द्यायचा आणि मामी शिवून द्यायची. कौतुकाच्या, यशाच्या, दुःखाच्या सगळ्या गोष्टी येऊन तिला सांगायच्या. तो इंजिनिअर झाल्यावर निदान बाहेरच्यांसमोर तरी त्याला घरातल्या नावानं हाक न मारता नीट पूर्ण नावानं हाक मारावी, असं अण्णांना सुचवणारी आजीच.

तिचं लग्न होऊन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर तिनं आजोबांच्या पालगडातल्या मूळ घराची नीट माहिती करून घ्यायला सुरुवात केली. पालगडला गणपतीत मोठा उत्सव होत असे. अजूनही होत असेल. त्या उत्सवाला आजी दर वर्षी नेमानं हजेरी लावत असे, तिथली नाटकं हौसेनं बघत असे. तिचा तिथल्या अनेकांशी संपर्क असायचा. पुढे माझ्या धाकट्या मामानं ही उत्सवाची रीत पाळली. तो जाईपर्यंत दर वर्षी तोही न चुकता उत्सवाला जात असे. तो तसा कुटुंबातला आजीनंतरचा जनसंपर्क अधिकारीच म्हणायचा! पण हे नंतरचं झालं. आजी पालगडला जायला लागली, तेव्हा तिथे आजोबांच्या सावत्र चुलत भावाकडे उतरावं लागे. ते उभयपक्षी अप्रिय होत असावं. पण आजी जाताना शिध्यासकट सगळं सामान घेऊन जायची. एकदा आजी तिथे गेली असताना अण्णाही यायचे होते. अण्णांना चहा करून द्यायला म्हणून आजी स्वैपाकघरात गेली असता आजीची सावत्र पुतणी कमळी तिला खोचून म्हणली, “दे की काकू तो सकाळच्यातला. इथे उत्सवाला आलं की काम पडतं फार. इतकी कौतुकं कशाला?” त्यावर आजीनं “कमळ्ये, ते या घरचे जावई आहेत. आणि त्यांना ताजा चहा करून द्यायला मी शिधाही घेऊन आल्ये नि माझे हातही.” असं ठाम उत्तर दिलं होतं.  

आजीची दुसरी नणंदही खेडलाच एका सधन कुटुंबात दिलेली. घरची पुष्कळ शेतीवाडी होती. पण नवर्‍याच्या अंगी काही कर्तृत्व नव्हतं. बहुधा त्याला कामाला लावण्याच्या उद्देशानं तिनं त्याला भावाच्या घराजवळ स्वतंत्र बिर्‍हाड करायला लावलं आणि ती तळ्यात आली. धंदा? शेतीवाडी नसलेल्या आणि थोडकं भांडवलं असलेल्या कोकणातल्या ब्राह्मणांना जो आणि जितपत सुचे तोच. किराणा मालाचं दु-का-न. पण नवर्‍याचं यशापयश बघायची संधी तिला मिळालीच नाही. घरात काम करताना कधीतरी तिचा हात विळीवर चांगलाच कापला. तेव्हा गावात दवाखानाही नव्हता. तालुक्याहून एकदा डॉक्टर फेरी मारून जात असे. इंजेक्षन वगैरे कुठलं सुचायला नि मिळायला. तिला धनुर्वात झाला. खेडला नेईपर्यंत ती वाटेतच वारली.  

आजीची तिसरी नणंद – कुशी उर्फ कृष्णा – लग्नानंतर लगेचच काही वर्षांत विधवा झालेली. मूलबाळ नाही. पण तिच्या वागण्याबोलण्यात मिंधेपणा, कमीपणा अजिबात असलेला आठवत नाही. ती रत्नागिरीसारख्या शहराच्या ठिकाणी राहायला असायची हे कारण तर असेलच. पण नवर्‍यामागे काही वर्षांत मरून गेलेली सासरची माणसं आणि मग उत्पन्नाची चिंता न करता मुखत्यारपणी घर सांभाळण्याचं आणि निर्णय घेण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य हीदेखील कारणं असणार. आजीचं आणि राधाच्या धाकट्या मुलाचं जसं मेतकूट होतं, तसं राधाच्या थोरल्या मुलीच्या मुलांशी कुशीचं. राधाची थोरली लेक कुशीच्या शेजारीच राहायची. त्यामुळे तिची मुलं कुशीसमोरच वाढलेली. तिला त्यांच्याबद्दल विशेष ममत्व होतं. पण फक्त त्यांचंच नव्हे, कुशीनं येणार्‍याजाणार्‍या सगळ्यांचं आनंदानं केलं. आला-गेला, पै-पाहुणा, शिक्षणासाठी म्हणून कुणी येऊन राहिलेला विद्यार्थी, परीक्षेसाठी कुणी आलेला परीक्षार्थी, कसल्या सरकारी कामानं जिल्ह्याच्या ठिकाणी काम घेऊन आलेला कुणी परिचित... असं कुणीही तिच्याकडे पाहुणचार घेऊन जात असे. आजीच्या लेकीही शिक्षणासाठी कुशीच्या घरी राहिलेल्या. मी सगळ्यांचं सगळं केलंअसं ती किंचित अलिप्तपणे पण सूक्ष्म अभिमानानं म्हणतही असे. 

तिच्या म्हातारपणची आठवण उदास करून टाकते.

तिला होईनासं झाल्यावर तिनं तिचं घर विकून टाकलं. तोवर माझी आजी आणि आजोबा दोघंही देवाघरी गेले होते. त्या दोघांपैकी कुणीही असतं, तर घर विकल्यावर तिनं कुठं राहायचं हा प्रश्नच उद्भवता ना. पण ते नव्हते. घर विकल्यावर त्या व्यवहाराचे लाखावारी पैसे जवळ असताना आपल्याला कुणीही – म्हणजे राधाची मुलं-नातवंडं खरं तर – प्रेमानं बघतील, अशी तिची समजूत होती असावी. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. तसं तिला कधी कुणी तोंडावर म्हणालं नाही, पण एकाएकी उपटलेलं वृद्ध माणूस दोन-अडीच खोल्यांत सामावून घेणं थोडं जड गेलं असावं आणि तिला ते जाणवलं असावं. त्यानं ती अंतर्यामी दुखावली गेली. माझ्या आजीची मुलं – आई आणि मावशी – तिचं कर्तव्यभावनेनं करायला तयार असत. आजी असती, तर आपल्या नणंदेला तिनं इकडेतिकडे कुठेही जाऊ दिलं नसतं, ही खात्री त्यांच्या कर्तव्यभावनेच्या मुळाशी होती. पण कुशीला ते मनातून आवडत नसे. एकतर जावयांकडे राहणं म्हणजे... त्यात तिथली नातवंडं सवयीची आणि प्रेमाची नव्हेत आणि त्यांचे संस्कारही जुन्या वळणाचे नव्हेत. तिचे सतत सगळ्यांशी खटके उडत. आधुनिक विचाराच्या आई-मावशीशी वाद घालून तो जिंकायला ती पुरी पडत नसे आणि त्यांना काही पटवूनही देऊ शकत नसे. पण तिचे पीळही बदलण्यातले नव्हते. तुम्ही म्हणजे अगदी पुर्‍या पूर्णत्वाला गेलेल्या आहात हो! आम्हांला तुमच्यासारखं जमलं नाही.” असं ती थोड्या निरुपायानं आणि हताशेनं, कडवट होऊन म्हणत असे, ते मला अजूनही आठवतं. त्यात किंचित असूया मिसळलेली होती का? जन्म एकटीनं मुखत्यारपणी वावरण्यात गेलेला. जमवून घेणं शक्यच नसावं. प्रेमानं, हक्कानं राहवून घेणं तर सोडाच, पण आपण पैसे टाकले, की सगळं नीट होईलही तिची समजूतही खरी झाली नाही. तिला या अपेक्षाभंगाचा आणि नंतरच्या तडजोडीचा मनस्वी त्रास झाला असावा. त्यातूनच तिचं अल्सरचं दुखणं बळावलं असेल का? समजत नाही. व्हॅनिला आईस्क्रीम ती अतिशय आवडीनं खायची, इतकं आठवतं. हा भाचा, तो पुतण्या, असं करत काही वर्षं इथेतिथे राहण्यात गेल्यावर, शेवटी माझा मामा तिला तळ्याच्या घरी – माझ्या आजीच्या घरी घेऊन गेला. त्यामागेही प्रेम होतं असं म्हणवत नाही. ‘आई असती, तर तिनं हेच केलं असतं, ती नसताना मलाही केलं पाहिजेही ठाम कर्तव्यभावना मात्र नक्की होती. तिथेही तिचा वेळ वार्‍याशी भांडण्यात जाई. पुढेपुढे ती भ्रमिष्ट झाली. देहाच्या भुकांविषयी नाही-नाही ते वेडंवाकडं, आचकट-विचकट बोले. मला वृद्धाश्रमात नेऊन टाकाअसा हेका धरून बसल्यावर तिला तिथे नेऊन ठेवलं. तिथेच एकाकी अवस्थेत ती वारली.

नेमानं वर्तमानपत्रं वाचणारी, इकडेतिकडे हिंडाफिरायची मनापासून आवड असलेली, “माधुरी दीक्षित आमच्या रत्नागिरीची आहे हो!असं कौतुकानं सांगणारी ही आत्तेआजी. ती विलक्षण देखणी होती. तिच्या सत्तरीतही तिचा गोरापान-केतकी वर्ण आणि शेलाटा बांधा उठून दिसायचा. पूर्ण चंदेरी झालेल्या केसांचा नीटस अंबाडा बांधणं, नाजूक नक्षी असलेली, पांढरीशुभ्र, स्वच्छ सुती नऊवारी पातळं चापूनचोपून नेसणंतिचं राहणं आणि करणं-सवरणंही मोठं स्वच्छतेचं-निगुतीचं असायचं. नवीन गोष्टी शिकून घेण्याची हौस असायची. आजीकडे माहेरपणाला येताना अननसाच्या मोरंब्यासारखा, तेव्हा कोकणात नवलपरीचा असणारा पदार्थ, ती मुद्दाम करून आणत असे. तिच्या मोठ्याथोरल्या घराच्या पुढल्या अंगणापासून ते परसदारातल्या डेरेदार कृष्णावळ्याच्या अंगणापर्यंत सगळं स्वच्छ लोटून काढलेलं, देखणं सारवलेलं, लखलखीत नेटकं असायचं.  

नवरा पंचविशीत वारला, तेव्हा ती कितीश्या वर्षांची असेल? नवर्‍याकडून तिला मिळालेलं सुख म्हणजे तो गेल्यावर त्याच्या गैरहजेरीत मिळालेली मुखत्यारकी आणि आर्थिक स्वावलंबन – हेच काय ते. विधवा झालेल्या स्त्रियांच्या शरीरसुखाबद्दल बोलण्याचीही पद्धत आपल्याकडे नाही. तिच्याही ते कधी मनातही आलं नसणार. अवघं तरुणपण असं कुणाच्या डोळ्यात न येता, नीट रेषेवरून चालण्यात, शिस्त-वळण-सोज्ज्वळपण सिद्ध करत वावरण्यात, देवाधर्माचे-कीर्तना-पुराणांचे छंद लावून घेण्यात गेलं असेल. तिच्या काळाचा विचार करता तिला दुसरं काही करण्याचा पर्यायही नसावाच. तेव्हा स्वतःच्याही नकळत दाबून ठेवलेल्या देहाच्या भुका म्हातारपणी उसळून आल्या असतील?

तिच्या घरी तिनं स्वतःला पाणी प्यायला म्हणून मातीचा इवला खुजा घेतलेला होता. त्या खुज्याचा देखणा आकार, नाजूक डौलदार तोटी, कमानदार निमुळती मान... हे सगळं मला अजुनी आठवतं. आता माझी मावशीही तसाच खुजा कुठूनसा पैदा करून हौसेनं पाणी प्यायला वापरते. तेवढीच त्या आत्तेआजीची आठवण उरली आहे.

अशाच करड्या रंगाच्या गोष्टी आजीच्या आईच्या आणि बहिणींच्याही...

क्रमशः

 

 

Friday, 5 July 2024

आजीची गोष्ट ०३

(भाग ०२)

०३

तिला शिक्षणाची फार हौस. मुलाबाळांना आणि मग नातवंडांना चांगल्या शाळांतून शिकता यावं म्हणून तिनं पुढे नाना खटपटी केल्या. पण तिला स्वतःला मात्र चौथीपेक्षा जास्त शिकायला मिळालं नाही. घरातली सगळी कामं करून, आजीच्या सगळ्या अटी पुरतावून मगच शाळेत जाता यायचं. पण चौथी पास झाली आणि गावातली शाळाच संपली. मग वडलांना शेतात मदत करणं, गुरांमागे जाणं, घरकाम करणं, भावंडांना सांभाळणं.. तिचा तिच्या वडलांवर फार जीव होता. वडील गुरांमागे रानात गेले की काळजीनं तिचा जीव राहत नसे. तीही त्यांच्यामागून रानात जायची! घरी आजी म्हातारी आणि भावंडं लहान, आई नाही. करायला कोण, म्हणून मग तिनं तिचं लग्नही त्या काळाच्या हिशेबात जमेल तितकं लांबवलं आणि एकोणिसाव्या वर्षी बोहल्यावर चढली.

तिला लग्नात मुलाकडच्यांनी दागिन्यांनी मढवलं होतं, शालूही नेसवला होता. पण नंतर कळलं, की मुलाकडे स्वतःचं सत्तेचं काहीच नाही. शालू थोरल्या नणंदेचा, तसे दागिनेही तिचेच. “लग्नात काय घातलंत मला? दोन पातळं नि कुडं!” असं ती आजोबांना मधूनमधून चिडवायची!

लग्न होऊन आल्यावर तिनं आजोबांच्या संसाराला आकार-उकार आणला.

सात-आठ बाळंतपणं आणि पाच मुलं. स्वैपाकपाणी. सोवळंओवळं. सणवार. व्रतवैकल्यं. पैपाहुणा-आला-गेला. गडीमाणसं. दुकानची उस्तवार आणि हिशेबठिशेब.

तिच्या स्वैपाकाला मोलकरणीनं भरलेलं पाणी चालायचं नाही. त्यामुळे ते सोवळ्यात स्वतः भरायचं. आणि मग स्वैपाक. गावात गिरणी पुष्कळ नंतर आली. तोवर जात्यावर दळलेल्या पिठाच्या भाकर्‍या – तांदूळ, ज्वारी, नाहीतर नाचणी. कोकणातल्या आडगावी तेव्हा सगळ्या भाज्याबिज्या सहजी मिळत नसत. परसदारी घोळ, अळू, चाकवत, पोकळा असायचा. भेंडी, काकडी, पडवळ, घोसाळी, कारली या पावसाळी भाज्या. तोंडलीचा मांडव बारा महिन्यांचा. कधी कोबी स्वस्त मिळाला तर तो पातळ चिरून वाळवून ठेवायचा, कधी चाकवत वाळवून ठेवायचा. वर्षभराची कडधान्यं तीनतीन उन्हं देऊन, कडू तेलाचा हात देऊन साठवून ठेवायची. घरी कांडपीण बोलावून डाळी घरी सडून घ्यायच्या, तसेच पोहेही घरी कांडलेले. फणसाच्या आठिळा माती लावून, वाळवून ठेवायच्या. वर्षभराची लोणची आणि मिरच्या. पापड. चिकवड्या. फेण्या.

तिला देवाधर्माचीही चिकार हौस होती. चतुर्मासात लक्ष वाहण्याचे तिचे नेम असायचे आणि चार महिने ठरलेला प्रसाद. बकुळीचा, प्राजक्तीचा, तुळशीचा.. असे लक्ष आणि प्रसादाला स्वतः काढलेल्या गव्हल्यांची खीर. सोळा सोमवारासारखी व्रतं. तिनं एकूण तीनदा सोळा सोमवार केले. या सगळ्याची उद्यापनं आणि स्तोत्रं. हौस मोठी, पण कर्मठपणा मात्र नाही. देवासमोर बसलेली असताना पारोसं नातवंड जाऊन गळ्यात पडलं तर तिला विटाळ होत नसे!

घरी कायम पै-पाहुणा असायचा. दुकानात पहिली काही वर्षं सोळा गावचं रेशनिंग असे. त्यामुळे दुकानात सततची वर्दळ असायची. गावात कामासाठी येणारे कार्‍या माणसांना जेवायला गावात हॉटेलबिटेल नव्हतं. मग सरकारी नोकर, डॉक्टर, तलाठी, मास्तर... यांपैकी कुणी ना कुणी जेवायला असायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत कायम खेडच्या नणंदांची नातवंडं, तिच्या बहिणी-भावांची मुलं... असं करत वीसेक मुलंबाळं असायची. तिच्या भावांच्या संसारावर तिचं लक्ष असे. टीबी झाला आणि रोज इंजेक्षन लागतं म्हणून भाचीलाच दोन महिने ठेवून घे, कधी भावजयींचं बाळतंपण कर. कधी म्हातार्‍या वडलांचं माहेरी म्हणावं तसं आस्थेनं-जपणुकीनं होत नाही म्हणून त्यांना विश्रांतीला दोन-दोन महिने आण. कधी थोरल्या बहिणीला थोडा श्वास टाकता यावा म्हणून तिची गतिमंद तरुण मुलगी सांभाळायला महिनाभर ठेव. असं कायम चालायचं. गावातल्या गरीब घरांत कुणी आजारी पडलं, तर मामींकडे बामनाकडचंवाढून घ्यायला कुणीतरी येत असे. मग त्याला केळीच्या पानात मऊभात, लोणचं आणि लोट्यात ताक वाढून द्यायचं. दुकानात येणारे आडगावचे लोक अनेकदा वस्तीला राहायचे नि पहाटे उठून पुढे चालू लागायचे. त्यांनी भाकर बांधून आणलेली असायची, पण त्यांना कांदा-लोणचं वाढून द्यायचं. घरच्यासारखी दुकानच्या मालाचीही उन्हाळी वाळवणं असायची. गडीमाणसं असली, तरी देखरेख असेच. शंभरेक पत्र्याचे डबे कस्तर करून – म्हणजे सीलबंद करून – माडीवर ठेवलेले असायचे. त्याकरता घरी आलेला कल्हईवाला आठेक दिवस राहायचा. तो दुकानचं काम करी. त्याच्या बरोबरीनं काम करून, कल्हई करायला शिकून घेऊन, थोरल्या लेकीला हाताशी घेऊन घरातल्या भांड्यांना स्वतःच कल्हई करणं. चिवडे, लाडू, पेढे, लसणाची चटणी... असं करून दुकानात विकायला ठेवणं... एक ना दोन.

हळूहळू पै-पैसा गाठीशी बांधत तिनं सोनं घेतलं. कमी सोन्यात होतात म्हणून तिनं जाळीच्या पाटल्या केल्या होत्या, म्हणे. नि इतकी हौस असून, शिवणयंत्र घ्यायला पैसे कमी पडतात, म्हणून तिनं बांगड्या विकून टाकल्या. पफकंपनीचं शिवणयंत्र घेतलं.

मला तिच्या या निर्णयाचं फारच नवल वाटतं. ही ५७ सालची कोकणातल्या एका डोंगरी खेड्यातली गोष्ट. निर्णय घेणारी बाई चौथी पास. नवरा सातवी पास. पण दागिने महत्त्वाचे नाहीत, शिवणयंत्र ही गुंतवणूक जास्त महत्त्वाची, दीर्घकालीन फायद्याची आहे, हे तिला कसं सुचलं असेल? यंत्र चालवायला जमलं नाही नि ते तसंच पडून राहिलं तर, अशी भीती वाटली नसेल का? आजोबांनी आढेवेढे घेतले नसतील? तिनं ते त्यांच्या गळी कसं उतरवलं असेल? समजत नाही...

पण तिनं शिवणयंत्र घेतलं आणि चोळ्या–पोलकी, झबली-टोपडी, आणि कोपर्‍या असं शिवणाचं कामही ती घ्यायला लागली. वेळेला ती दिवसात चौदा-चौदा चोळ्या शिवत असे. घरातलं काम उरकून.

इतकं पुरलं नाही, म्हणून ही चौथी पास बाई तिच्या पाचही मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवून असायची. थोरल्या मुलाला गणितात फार गम्य नव्हतं, तर पार मॅट्रिकपर्यंत त्याच्या यत्तेचं अंकगणित स्वतः त्याला शिकवायची. तिची मुलं शिकली ते कुठे रत्नागिरीच्या आत्याकडे दोन वर्षं राहा, कुठे भांडूपच्या मावशीकडे दोन वर्षं राहा... असं करून.

थोरल्या लेकीला अठराव्या वर्षी मुंबईत नोकरी मिळताक्षणी तिनं पाच मुलांना ठाण्यात स्वतंत्र बिर्‍हाड थाटून दिलं. धाकटी लेक शिवणाच्या वर्गाला जायला लागली, थोरला लेक रिक्षा चालवू लागला, तर खालची दोघं ठाण्याच्या शाळेत शिकायला लागली. पाचच जण राहायचे, सगळ्यांत मोठी मुलगी एकोणीस वर्षांची, अविवाहित. हाही त्या काळातला तसा धाडसीच निर्णय. पण तो तिनं घेतला. जागा बर्‍या वस्तीत, सोयीच्या ठिकाणी, स्वच्छ असायला हवी, तर पागडी मोजावी लागणार होती. 

त्याकरता स्वतःच्या बांगड्या तिनं दुसर्‍यांदा विकल्या.

क्रमशः

Tuesday, 2 July 2024

आजीची गोष्ट ०२

(भाग ०१)

०२

आजीचं लग्न आयनीतच झालं. घरापुढल्या मांडवात.

लग्नाला किती लोक असतीलतिच्या मोठ्या दोन बहिणींची लग्नं तोवर झालीच असतील. पण मोठी सिंधू तिच्या घरची तशी परवडच होती. त्याबद्दल पुढे कधीतरी. ताईचं घरचं बरं असणार. ती आणि तिचा नवरा असे आले असतील का लग्नालाबहुधा असतील. पाठची वत्सूशिरू आणि बाळू हे दोन भाऊइतकी तरी भावंडं असतील. वडील अर्थात असतील. कनवटीला सुपारी लावून त्यांनी ग्रहमक ठेवलं असेलकसं करतात कन्यादान विधुर पुरुषकाय माहीत. आणि अर्थात आजी. पण ती बोडकी. म्हणजे घरात मागीलदारी कुठेतरी तोंड लपवून खपणारी.

नवर्‍यामुलाकडून तीन लोक नक्की असतील. खुद्द नवरा मुलगा. नवर्‍याची थोरली बहीण. राधा. आणि तिचे यजमान अण्णा. त्यांनीच पुढाकार घेऊन मेव्हण्याचं लग्नकर्तव्य पार पाडायचं मनावर घेतलेलं. नवर्‍याला अजून एक थोरली बहीण कृष्णा नावाची. तिला कुशी म्हणत. तिचं सासर रत्नागिरीत. तिचा नवरा ऐन पंचविशीत वारलेला. त्यामुळे तीही लग्नाला येण्याचा प्रश्नच नाही. पण ती विधवा होईस्तोवर काळ बदललेला असावा किंवा रत्नागिरी तरी थोडं पुढारलेलं असावं. कारण ती बोडकी झाली नाही. त्यामागची गोष्ट तिला विचारायला हवी होती. पण ते राहिलंच. तर - तिनं रत्नागिरीतलं आपलं घर नीट राखलंआला-गेला-पै-पाहुणा-नातंगोतं सांभाळलं. तिचीही गोष्ट चटका लावणारीच. पण तीही पुढे कधीतरी. ती काही लग्नाला आलेली नसणार. आणखी एक बहीण होती, तिचं सासर खेडमधलंच. घर चांगलं शेतीवाडी असलेलं, पण नवरा बशा. तिचीही गोष्ट... असो. तर ती कदाचित असेल. पण थोडक्यात, वर्‍हाड एकूण तीन-चार जणांचंच.

नवरा मुलगा गणेश. त्याचं मूळ गाव पालगड. त्यांच्या वडलांची पालगडात सावकारी होती. हे मी प्रथम ऐकलंतोवर मी ‘श्यामची आई’ वाचलं होतं. श्यामच्या आईचा अपमान करणारा तो हरामखोर वसुली कारकून आजोबांच्या वडलांच्या पदरचा कारकून तर नसेलया शंकेनं मला कितीतरी दिवस अतिशय अतिशय अपराधी वाटत राहिल्याचं आठवतं. पुढे कधीतरी त्या अपराधाचा डंख पुसट होत गेला. असो. तर गणेशचे वडील वारले तेव्हा तो अडीच-तीन वर्षांचा होता. अलीकडच्या काळातही कर्तृत्ववान नवर्‍याची बायको विधवा झाली आणि तिला नवर्‍याच्या पैशाअडक्याची काडीमात्र माहिती नव्हती, त्यामुळे परवड झाली... अशा कहाण्या ऐकू येतात. तेव्हा काय परिस्थिती असेलत्याची निव्वळ कल्पनाच करता येते. त्या परिस्थितीत त्याच्या आईला काय राखायचं सुचलं असेलसोन्याच्या पुतळ्या भरभरून गडवे घरात असतअसं नंतर कधीतरी आजोबा सांगायचेतेव्हा आम्ही आ वासत असू. आजोबांच्या आईचं कौतुक असं की नवरा वारल्यावर एकत्र कुटुंबात मुलांच्या भविष्याची धूळदाण होऊ नये, म्हणून तिला  त्यातला एक गडवा आणि थोडी चांदी नणंदेकडे ठेवायला द्यायचं सुचलं. थोडं सोनं तिनं एका जावयाकडेही दिलं होतं. पण... एनिवे! आजोबांचे आईवडील सहा महिन्यांच्या अंतरानं पाठोपाठ वारले. कसल्याश्या साथीत एका वर्षभराच्या अवधीत घरातली एकूण आठ माणसं मरून गेली. सोन्याच्या कंबरपट्ट्यासकट दागिने ल्यायलेल्या दहा सासुरवाशिणी घरात नांदवणारं ते घर. ब्रिटिश सरकारकडून उत्तम शेतकरीअसा किताब मिळवणारे आजोबांचे सावकार वडील. दारी हौसेनं त्यांनी बाळगलेला छकडा. सगळं उण्यापुर्‍या वर्षभरात होत्याचं नव्हतं झालं.

पुढे लग्नानंतर आजीनं हौसेनं माहिती काढून पालगडला उत्सवाला जायला सुरुवात करेपर्यंत आजोबांच्या आयुष्यातलं पालगड पर्व संपलं. 

त्या सावकारी घरातलं एक नक्षीदार लाकडी कपाट आणि एक पैशांची लाकडी पेटी एवढंच आजीच्या संसारात आलं. अजूनही ते मामाकडे आहे. आता त्या वस्तूंची सगळी रया अर्थात गेली आहे. कंबरभर उंचीची जड लाकडी पेटी, आत मखमलीनं मढवलेले बरेच कप्पे-चोरकप्पे, खण असलेली. ती उघडताना कुलपाच्या सात वळशांनिशी सात घंटा होत, म्हणे. आता घंटा, आतली मखमल, पेटी उघडल्यावर दरवळणारा अत्तराचा वासबीस... जाऊन नुसतीच पेटी उरली आहे. तरी कपाटाच्या दारांवरच्या कोरीव कामातून त्याच्या सरलेल्या वैभवाच्या खुणा दिसतात. त्या वस्तू वगळता आजोबांना घरातलं काहीच लाभलं नाही.

आजोबांची रवानगी कुठल्याशा सावत्र काकाच्या संसारात झाली. "माझं अंथरूण बहुतेकदा ओलं होई, मग ती काकू जेवायला देत नसे, ‘नखं टुपवून’ गाल ओढायची," अशीही एक आठवण आजोबा सांगायचे. मग कधी या नातेवाइकाकडे, कधी त्या. आईवडलांच्या आठवणीच नाहीत. त्यांना तर आईचं माहेर कुठलं, गाव कोण, आडनाव काय... हेही माहीत नाही, असं ते सांगायचे. दोनपाच वर्षं अशीच गेल्यावर त्यांची एक बालविधवा मावशी त्यांना उचलून पुण्याला घेऊन गेली. तिचीही गोष्टच. तिचं तालेवार सासर केळशीला. पण बालविधवा झालेली ती मुलगी त्या घरात सत्तेची मोलकरीणच असणार. ती चक्क उठून पुण्याला गेली. लोकांच्या घरी पोळ्या लाटून ती पोट भरत असे, पण तिनं स्वतंत्र बिर्‍हाड केलं होतं. पुढे होईनासं झाल्यावर तिचा पुतण्या तिला पुन्हा घरी घेऊन गेला. तर - तिनं आजोबांना उचलून आपल्याबरोबर नेलं. माधुकरी मागायची, चार घरी पूजा सांगायची, शाळा शिकायची – असं तिनं त्यांना सातवीपर्यंत शिकवलं. ती मोठी शिस्तीची होती, म्हणे. मोरीत पाण्याची बादली भरलेली हवी. तितकंच नव्हे, पाण्याचा गडवाही त्याशेजारी नीट भरून-झाकूनच ठेवलेला असायला हवा... अशी तिची नेटकी राहणी. आजोबांची सातवी झाल्यावर तिच्याकडचं राहणंही संपलं. पुन्हा परवड. कुठे कधी दुकानाच्या बाहेरच्या फळ्यांवर झोप. पार्ल्याच्या बिस्किटाच्या फॅक्टरीत नोकरी कर... असे तरुणपणापर्यंतचे दिवस. पण त्याही दिवसांची आठवण आजोबा मजेनंच सांगायचे. “आम्ही खिशातून हिरव्या मिरच्या न्यायचो. बिस्किटं खायची आणि मिरचीचा चावा घ्यायचापुन्हा बिस्किटं. की पाणी. पोटभर!असं ते सांगायचेतेव्हा त्यांच्या नजरेत आत्मकरुणेचा लवलेशही नसायचा. निव्वळ स्वतः केलेल्या ट्रिकबद्दल लुकलुकती मजा असायची! हे पुढे त्यांच्या सगळ्या मुलानातवंडांतही आलं. पडलं तरी नाक वर! एनिवे!

राधा नि अण्णांना स्थैर्य आल्यावर त्यांनी गणेशच्या आयुष्याची जबाबदारी घेतली. अण्णा धोरणी आणि जबाबदार गृहस्थ असणार. आजोबांच्या आईनं जावयाकडे ठेवलेल्या सोन्याबाबत जावयानं हात वर केले. पण नणंदेकडे ठेवलेलं सोनं होतं. ते वापरून आजोबांच्या आत्तेभावाला गणेशचं लग्न थाटात करून द्यायचं होतं. पण आण्णांनी ते थोपवलं. 'त्याच्या संसाराला कामी येतील' म्हणून ते पैसे राखून ठेवले. अण्णांचं घर खेडजवळच्या तळे-मांडवे गावात होतं. होयहेही जोडगावच. स्वत अण्णा खेडात राहायचे. कधीतरी  मेव्हणा घरी आला असता, त्याला त्यांनी विचारलं, “ना घर ना दार. कशाला पुण्यामुंबईत हाल काढतोस? त्यापेक्षा इथे राहा.” आजोबा राहिले. तिथल्या अण्णांच्या दुकानात वर्षाला पाचशे रुपये अशा बोलीवर नोकरी केली.

त्यांचं लग्न काढल्यावर तळ्यातल्या त्या घराच्या मागच्या पडवीत अण्णांनी त्यांना बिर्‍हाड थाटून दिलं. पडवीत एका अंगाला एक भाडेकरू होताच. दुसर्‍या अंगाला मेव्हण्याचं बिर्‍हाड. मधलं घर अण्णांसाठी राखलेलं. अण्णांची तब्बेत तशी नाजूकच होती. मग आजोबांचे राखलेले पैसे वापरून त्यांनी आजोबांना दुकानात सात आणे हिस्सा दिला, नऊ आणे हिस्सा भाडेकरूला विकला. दुकानाची जागा आणि त्यामुळे वर्षाकाठी रॉयल्टी आण्णांची. ते सगळ्या व्यवहारावर लक्ष ठेवून असत. 

आजी लग्न होऊन आली ती त्या घरात. 

मला ते घर आठवतं. माजघरातून खाली पडवीत उतरलं की डावीकडे आजीचं बिर्‍हाड. मध्ये लाकडी मांडणीचं कपाट ठेवून त्या अर्ध्या पडवीचे दोन भाग केलेले. शिरल्या शिरल्या बसायची खोलीपुढे आत चूल आणि मोरी. उजवीकडे तसंच शेजार्‍यांचं नलूआजी आणि भाऊआजोबांचं घर. त्यांचं घर पूर्वी कसं होतं ठाऊक नाहीमला आठवतं तेव्हापासून त्या पडवीला पोटपडवी काढून नलूआजीचं स्वैपाकघर केलेलं होतं. दोन्ही घरांच्या मधून मागीलदारी उतरलं की न्हाणीतिच्यापुढे मोठी दगडी द्रोणतसंच खाली उतरत गेलं की चिकूचं झाड आणि मग विहीर. नलूआजीच्या घराच्या उजवीकडून खाली उतरलंतर तिकडेही अजून एक पोटपडवी आणि पुढे त्यांचं न्हाणीघर. माजघरत्यातली बाळंतिणीची खोली वा काळोखाची खोलीजुनं आणि आता वापरात नसलेलं स्वैपाकघर हे सगळं मधलं घर दोन्ही घरं मिळून वापरत. पुढीलदारी ओटीअर्ध्या पडवीत दुकानअर्ध्यात दुकानाचा माल.  

आजोबा तेव्हा रोज अर्धा कप ‘घेत’ असत. कुठली असेलकुठून मिळवत असतीलगावातल्या कुणा मिल्ट्रीवाल्याकडून घेत असतील? काय माहीत! आजोबांबरोबर ही माहितीही गंगार्पण. पुष्कळ मोठं होईपर्यंत याचा पत्ता आईलाही नव्हताइतकं हे गुपचूप प्रकरण असायचं. पण या सवयीपायी नवरा कामातून गेला तरही भीती आजीच्या पोटात असणार. त्यामुळे तिला भागीदारी आणि अण्णांचा आजोबांना असलेला धाक हे दोन्ही मानवलं. तिला स्वतःला अंकगणित अतिशय आवडे. ती लक्ष घालून दुकानचे हिशेब तपासत असे.

त्या घरात आजीनं तिचा संसार तर मांडलाचपण तिची सगळी हौसमौजकर्तृत्वआवडीनिवडी… आणि मुख्य म्हणजे माणसं जोडून घेणारा तिचा स्वभाव या सगळ्याला तिथे धुमारे फुटत गेले.  

क्रमशः

Monday, 1 July 2024

आजीची गोष्ट ०१

आपल्याला आपले आईवडील आणि इतर नातेवाईक कुटुंबातल्या जुन्या आठवणी सांगतात. त्यात अर्थातच त्यांचे स्वतःचे बरेवाईट पूर्वग्रहआवडीनिवडीकाही प्रमाणात हितसंबंधही असतात. त्यामुळे त्या आठवणींच्या काचेतून आपल्याला दिसणार्‍या गोष्टी पूर्णतः नितळ नव्हेत हे खरंच. पण आपणही या चित्राचे पुढचे वाहकच असतो. आपलंही गुंतलेपण गृहीत धरता आलं आणि किंचित त्रयस्थपणा कमावता आलातर काचेची जातकुळीही थोडीफार ओळखता येऊ लागते. मग त्यातून दिसणार्‍या चित्राचे रंगही हळूहळू स्पष्ट होत जातात.

आईच्या आईच्या काही आठवणी नोंदून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या वाचण्यापूर्वी हा व्याप्तिनिर्देश वा मर्यादा वा डिस्क्लेमर लक्षात ठेवणं आवश्यक.

या आठवणींचं मोल तसं आमच्या कुटुंबाखेरीज इतर कुणाला नव्हे. पण असं म्हटलंतरी आपलं कुटुंब म्हणजे आपण तिघं-चौघंच फक्त नसतो. त्यापल्याड पुष्कळ गोतावळा असतो. त्यातल्या कुणाकुणाला यात रस असू शकेल. शिवाय कितीही व्यक्तिगत म्हटलंतरी त्यातून त्या काळाबद्दलचे थोडे मजेशीरथोडे उपयुक्तथोडे रसाळथोडे उद्बोधक तपशील सापडतात. बघू, काय मिळतं.

आजीचं नाव रंगू. तिचं नवर्‍यानं ठेवलेलं नाव ‘सरस्वती’ होतं. मला आजीनं भेट दिलेल्या चित्रकलेच्या पुस्तकावर तिनं तिचं नाव लिहिलेलं आहे. पण तिला तिच्या माहेरचे सगळे जण रंगू म्हणायचे.

रंगूला तिच्याहून मोठी दोन भावंडं - दोन बहिणीतर धाकटी तीन भावंडं - एक बहीण आणि दोन भाऊ. एकूण सहा भावंडं. आजी गेली तेव्हा ती जेमतेम ५९ वर्षांची होतीम्हणजे तिचं जन्मसाल १९३२ धरलं आणि तिच्या आगचीमागची भावंडं मिळून आठ-नऊ वर्षं धरलीतर तिच्या वडलांचं लग्न २५ सालच्या आसपासबरोबर शंभरेक वर्षांपूर्वी झालं असणार. आजी जेमतेम आठ वर्षांची असतानाच तिची आई गेली. वडलांनी पुन्हा लग्न केलं नाही. त्या सगळ्या भावंडांना सांभाळलंते आजीच्या आजीनं. 

तिचंही नाव सरस्वती.

आजीच्या या आजीची गोष्ट भलतीच सुरस आहे. तिचं लग्न म्हणे दुसरेपणावर झालं होतं. तत्कालीन लग्नांची नि बाळंतपणाची वयं धरून अंदाज करत करत मागे गेलंतर तिचं लग्न १९०० सालाच्या सुमारास कधीतरी झालं असावं. नवरा पंढरपुराकडे कुठेसा जज्ज होता. जज्ज हा हुद्दा ऐकून मी थोडी चकित झाले होते. पण या सगळ्या ऐकीवच गोष्टी. खरंच जज्ज होता की कुठलं सरकारदरबारचं पद होतंकुणाला ठाऊक. पण बर्‍याशा हुद्द्यावर असावा. बायकोच्या पदरात एक मुलगा घालून तो वारला. मुंबईत आलेली प्लेगची साथ १८९६ सालची. तिथून पुढची वीस-पंचवीस वर्षं प्लेग महाराष्ट्रात धुमाकूळ घालतच होता. त्यात तिचा नवरा वारला असेल कापण त्या काळात माणसं मरायला तशी थोडकी निमित्तं पुरी होत असावीत. कशानं तडकाफडकी वारलाकुणाला माहीत. इतकंच माहीतकी त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाची पुरती वाताहत झाली. बायकोला तिच्या माहेरचं कुणी बघणारं नव्हतं असावं. नवर्‍याच्या नावे कोकणातल्या आयनी मेट्याला थोडकी जमीन आणि जुनं घर आहेइतक्या माहितीवर वर्षाच्या आतल्या तान्ह्या पोराला पोटाशी घेऊनबैलगाडी जोडून ती पंढरपुराहून एकटीच कोकणात आली. सोबत घरातलं जमेल ते किडूकमिडूक बांधून आणलं होतं, म्हणतातपण होतं-नव्हतं ते त्या प्रवासात चोरापोरी गेलं. कोकणात पोचलीतेव्हा जमीन भाऊबंदकीतल्या कुणीकुणी लाटलेली. मग तिनं खोताकडे तक्रार गुदरली. रीतसर पंचनामे झाले आणि तिला तिच्या नवर्‍याच्या नावचा जमिनीचा तुकडा आणि घर मिळालं.

तिची गोष्ट ऐकताना माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. किती वर्षांची असेल ती मुलगीएकटंच पोर पदरातम्हणजे जेमतेम पंधरा-वीस वर्षांची पोर असेल. नवरा मरून गेलेलापाठीशी कुणी नातेवाईक नाहीतम्हणजे निराधारच. ती कधी कोकणात आली तरी असेल का त्यापूर्वीकी कोकणातलीच होती आणि नंतर नांदायला नवर्‍यामागे लांब पंढरपुरासारख्या देशावरच्या गावी गेली असेलसगळेच अंदाज. ती अगदी कोकणातली असली असं म्हटलंतरी त्या वयात अंगावरचं पितं पोर घेऊन एकटीनं इतका लांबचा प्रवास करायचा... येऊन भाऊबंदकीशी दोन हात करायचेकुणी अंगावर हात टाकलापोराचा जीव घेऊ पाहिला… तर ती काय करणार होतीयेताना कुणाची सोबत पाहिली असेल तिनंकुणाच्या जिवावर निर्णय घेतले असतीलकुणाच्या आधारानं हिंमत बांधली असेलसमजत नाही.

आयनी मेटं हे रत्नागिरीतलं डोंगरी गाव जोडगाव खरं तर. आयनी हे एक गाव आणि मेटं हे दुसरं. क्रांतिकारक अनंत कान्हेर्‍यांचं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. पंढरपुरापासून अडीचशे किलोमीटर अंतर. आता नकाशात आयनी मेटं शोधलंतर आयनीच्या जवळून जगबुडी नदी गेलेली दिसते आणि आयनीच्या समोरच्या बाजूला पेंडशांनी प्रसिद्ध करून टाकलेलं तुंबाड. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आयनी मेटं दुर्गमच असणार.

अशा गावात ती मुलगी घर धरून राहिली. ती आली तेव्हा घराची अवस्था काय असेलती कुठे राहिली असेलतिला पहिले काही दिवस कुणी जेवू-खाऊ घातलं असेलकुणाकडे तक्रार करायचीसाक्षीपुरावे कसे करायचे… हे तिला कसं कळलं असेलतिला कुणी धमकावलं-बिमकावलं तर नसेल?

त्या गावात तिनं मुलाला वाढवलं. तो काय शिकला होताकाय करत असेमाहीत नाही. थोडकी शेती आणि गुरं असावीत घरची. कारण तो मुलगा म्हणजे रंगूचे वडील - रानात गुरं चरायला नेत असेतो मुलगाही त्याच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून असावा. गाव अक्षरशः डोंगरात वसलेलं. आजूबाजूला गच्च रान. पुढे जाऊन जगबुडीला मिळणारा पर्‍ह्या म्हणजे ओढा घराजवळच्या घळीतूनच वाहणारा. तिकडे म्हसरांना पाणी पाजायला नेलं असताना एक वानर माणसाएवढा हुप्प्याच म्हणे त्याच्या मानगुटीवर येऊन बसला. तर त्यानं वानराचे पाय धरून त्याला खाली ओढलं आणि तसंच्या तसं पर्‍ह्यातल्या मोठ्या धोंडीवर आपटलं. हुप्प्या तिथल्या तिथे ठार. तसाच एक किस्सा त्याच्या शूरवीर म्हशीचाही ऐकलेला. म्हसरं चरताहेत आणि हा तिथल्या एका कातळावर बसलेला. जवळच्याच जाळीत वाघाची चाहूल लागली. वाघ नजरेला पडल्यावर त्या मुलाची जागचं हलायची हिंमत होईना. असा बराच वेळ गेला. ज्या क्षणी त्या जाळीतून वाघरानं बाहेर झेप घेतलीत्याच क्षणी पलीकडच्या म्हशीनं वाघावर झेप घेतली. बरोबर मोठाच कळप होता गुरांचा. त्यांनीही जिवाच्या आकांतानं वाघरावर उलटा हल्ला केला. मुलगा त्या रणधुमाळीत जागच्या जागी खिळलेला. अखेर वाघानं शेपूट घालून काढता पाय घेतला, तेव्हा मुलगा सुखरूप घरी परतला.

या आठवणींत कुणी-कुणी अर्थात पदरची भर घातली असणार. पण मुदलात काहीतरी असल्याखेरीज ती घालता येणं कठीण. बाकी काही नव्हेतरी तेव्हाचं किर्र जंगलातलं - डोंगरात वसलेलं आयनी गाव आणि ही जिगरबाज मायलेकरं, यांची कल्पना मात्र करता येते.

आजीची ही आजी कोकणात आली तेव्हाच सोवळी होती. लाल आलवणचोळीविहीन जगणंबोडकं डोकं. मुलाचं लग्न करून दिल्यावर तरी तिला चार दिवस सुखाचे दिसावेतपण ते नशिबात नव्हतं. तिच्यामागचे संसाराचे व्यापताप कधी संपलेच नाहीत. पोराचं लग्न करून दिलंपण सुनेशी पटत नसे. त्यामुळे सुनेच्या माहेरच्या गावी, जवळच बोरघरात त्यानं किडूकमिडूक किराणाचं दुकान घातलं आणि वेगळी चूल मांडली. आयनीच्या घरात आजी एकटी आपली आपण राही. पण सहा पोरं मागे ठेवून सून निवर्तली आणि वेगळं बिर्‍हाड संपलं. मुलानं पुढे दुसरं लग्न केलं नाही की ते होऊ शकलं नाहीकुणाला ठाऊक. थोडकी जमीन नि राहतं घर तेवढं गाठीला. कुणाचा आधार नाही. गरिबी मी म्हणत असणारच. त्याला कोण मुलगी देणार

त्या सहाही नातवंडांचं आजीच्या आजीनं केलं.

आजीकडे एक मोठा पेटारा होता. त्या पेटार्‍यावरच ती निजत असे. घर आणि जमीन मिळवण्यासाठी कागद कनवटीला लावून ती एकटी चिपळुणापर्यंत चालत जात असे. तिच्या त्या कज्जेदलाल्यांची कागदपत्रं तिनं त्या पेटार्‍यात मरेपर्यंत जिवापाड सांभाळली. “आता घर नि जमीन सगळं आपल्या नावावर आहे, आता करायचं काय ते जपून?” असं म्हणून ती गेल्यावर तिच्या नातवानं त्या रद्दीला काडी लावली. असो.

माझ्या मावशीला तिच्या लहानपणी आजोळी गेल्यावर पणजीआजीला बघितल्याचं आठवतं. म्हणजे त्या जिगरबाज बाईनं पणतवंडंही पाहिली.

बाईचं सोनं झालं.

क्रमशः

(भाग ०२)