Sunday, 11 February 2018

गौरी : धाडसी प्रतिमानाच्या पलीकडे

स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणार्‍या कोणत्याही आधुनिक, मराठी साहित्यप्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. तो एक अपरिहार्य टप्पा असतो, असंच तिचं लेखनकर्तृत्व आहे. कादंबरी, कथा, भाषांतरं, कविता, ललितलेखन अशा अनेक माध्यमांतून केलेला मुक्तसंचार; रचनेचे अनोखे प्रयोग; विलक्षण मोहक भाषा; आणि लेखणीचा 'धीट'पणा अशा अनेक रास्त कारणांमुळे तर ती गाजलीच. दुसरीकडे तिच्या सुधारकी कुटुंबाचा वारसा; तिचे ढगळ कुडते आणि आखूड केस; बिनधास्त वावर; आणि तिची सर्वसाधारण मराठी बायकांपेक्षा थोडी जास्त असलेली उंची अशा अनेक साहित्यबाह्य कारणांमुळेही मराठी जनांना ती ठाऊक असते. 

माझीही ती अत्यंत आवडती लेखिका. 

पण तिच्या बाबतीत माझी गोचीच होत असे. तिचे चाहते पुष्कळ दिसत. पण त्यांच्या गौरीप्रेमाचे उमाळे आणि कढ आणि कारणं बघून 'ई! मी नाहीय हां तुमच्यात.' असा फणा माझ्याकडून नकळत निघे. 'हस्तिदंती मनोर्‍यातल्या बेडरूमबद्दल तर लिहायची ती! त्याचं किती कौतुक करायचं?’ असा निषेध करणारेही असत. त्यांच्यासमोर माझा 'मोडेन पण वाकणार नाही' असा बाणा. त्यामुळे हे इतकं सोपं, एकरेषीय नव्हतं. मला या लेखिकेबद्दल नक्की काय वाटतं हे तपासून बघायला मध्ये थोडा काळ जाऊ द्यावा लागला. कुणाला तिची ओळख करून द्यायची झाली तर मी काय सांगीन तिच्याबद्दल, या प्रश्नानं मला विचार करायला भाग पाडलं. तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित होऊन तब्बल अडतीस वर्षं उलटून गेल्यानंतर सांप्रतकालातही ती तितकीच महत्त्वाची वाटत राहते ती कशामुळे - हा माझ्या मते कळीचा प्रश्न होता. त्या प्रश्नाच्या काठाकाठानं जात राहिले.

मी तिचं 'एकेक पान गळावया' वाचलं, तेव्हा मी जेमतेम कॉलेजच्या वयात होते. मला घंटा काही कळलं नव्हतं. पण हे जे काही आपण वाचतो आहोत त्यात काहीतरी जबरदस्त वेगळेपण आहे, इतकं मात्र जाणवलं होतं. ते असंच टिकमार्कून बाजूला पडलं. मग 'थांग'मधल्या दिमित्री या नायकाचा थांबा लागला. यच्चयावत मराठी मध्यमवर्गीय नवतरुणांना आणि पुढेही नवतरुणच राहिलेल्या अनेकांना पडते, तशी दिमित्री-कालिंदीच्या प्रेमाची भूल मलाही पडली हे इथे निमूटपणे नमूद केलं पाहिजे. साक्षात कृष्ण फिका पडेल असा तो नायक होता! सगळं काही न बोलताच समजून नेमकं, चतुर नि जागं करणारं बोलणारा; देखणा, तरुण, परदेशी. शिवाय विवाहित आणि विवाहबाह्य संबंधांचा मोह जाणणारा. आणि वर अप्राप्य! त्या दिवसांत माझ्या बरोबरीच्या पण साहित्यिक भानगडींपासून लांब असणार्‍या मैत्रिणी प्रेमात पडल्या, पण मी काही प्रेमाबिमात पडले नाही - यातलं इंगित माझ्या आता लक्ष्यात येतं. दिमित्रीच्या पासंगाला तरी कुणी पुरणार होतं का! ही भूल पुष्कळ टिकली. गौरीच्या भारून टाकणार्‍या, लखलखीत मराठी भाषेतली, इंग्रजी वळणाचा बांधाच तेवढा नेमका उचलून मिरवणारी एकेक पल्लेदार वाक्यं तेवढी आठवत राहिली. त्या दिवसांतल्या माझ्या गौरीप्रेमामुळे आता मलाच थोडं शरमायला होतं. त्यातल्याच 'दुस्तर हा घाट'मधली नमू ज्याला प्रेम समजते, पण प्रत्यक्षात जी 'विषयपिपासा किंवा मदनविव्हलता' असते, तशातलंच ते माझं गौरीप्रेम. अल्पवयीन आणि अल्पकालीन अफेअरसारखं. 

पुलाखालून थोडं पाणी वाहून गेल्यावर काही कारणानं पुन्हा 'एकेक पान गळावया' हाती आलं. तेव्हा मात्र तिच्या नायिका बघून मी चमकले. त्यातल्या तिन्ही कादंबरिकांची नावंही विलक्षण आहेत. 'कारावासातून पत्रे', 'मध्य लटपटीत' आणि 'एकेक पान गळावया'. स्त्रीच्या वाढीचे एकापुढचे एक तीन टप्पेच असावेत अशा, म्हटलं तर स्वतंत्र आणि म्हटलं तर एकसंध चित्राचा भाग असलेल्या गोष्टी. निरनिराळ्या टप्प्यांवर चाकोरीतून सुटवंग होत जाणार्‍या बायांच्या. उत्कट प्रेमातून पाय मोकळा करून घेणारी प्रेयसी, लग्नामधली एकनिष्ठा म्हणजे काय नि तिचा प्रेमाशी काय संबंध असतो हे तपासून पाहणारी पुरम्ध्री, आणि अपत्यप्रेमाची आखीव रेष ओलांडून जाणारी प्रौढा. मग मला वाटणारं दिमित्रीचं अप्रूप हळूहळू ओसरत गेलं. त्याच्यातल्या पालकभाव असलेल्या पुरुषाबद्दल कपाळी पहिली आठी पडली!

नंतर 'दुस्तर हा घाट'मधली नमू दिसली. तीही अत्यंत मोहकपणे बंडखोर आहे. तरी तिला देखणे, परदेशी, आणि कृष्णासारखे कैवारी मित्रही आहेत. नि तीही येऊन अडखळते त्याच त्या पुरातन निष्ठांपाशी! तिच्या नवर्‍याचं तिच्यावर निरतिशय प्रेम आहे. मात्र तो तिच्याशी एकनिष्ठ नाही. त्याला इतर मैत्रिणीही आहेत नि त्यानं हे लपवलेलं नाही. हे स्वीकारायचं की नाकारायचं हा नमूचा झगडा आहे. हे मला गंमतीशीर वाटलं. जर चौकटी मोडायच्याच असतील, तर त्याचे व्यत्यासही असणार आहेत आणि ते आपल्याला दुःखाचे ठरणार असले तरीही भोगावे लागणार आहेत याचं भान आलं. 

मग 'मुक्काम', 'तेरुओ आणि काहिं दूरपर्यंत', 'निरगाठी आणि चंद्रिके गं सारिके गं', 'गोफ' यांचा टप्पा. त्या-त्या वेळी त्या कादंबर्‍या मी हरखून जाऊन वाचल्या. त्यांत तिनं शारीर प्रेमाचे आविष्कार मोकळेपणी रंगवले होते. डोळे विस्फारून ते नजरेसमोर आणले. जसपाल, वनमाळी, अ‍ॅलिस्टर, दिमित्री, शारूख, जसोदा, इयन, वसुमती, दुनिया, दयाळ, भन्ते, बेन... अशा हटकून परप्रांतीय आणि चित्रविचित्र नावांमुळे भिवया उंचावल्या. तिच्या कथानकांमध्ये हमखास दिसणार्‍या परदेशी आणि कैवारी पुरुष-मित्रांना उद्देशून नाक मुरडायला शिकले!  

आणि तरीही या सगळ्याशिवाय त्यातल्या कशानंतरी मला घट्ट बांधून घेतलं होतं. ते काय याचा उलगडा करायला हटून बसल्यावर ध्यानात आलं, त्यात नुसता भाषिक लखलखाट वा वेगळेपणाची चूष वा धीट संभोगचित्रण इतकंच नव्हतं. स्त्रीकडून असलेल्या तिच्या स्वतःच्या आणि समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक अपेक्षा या कथांच्या माध्यमातून गौरीनं सतत निरनिराळ्या प्रकारे धुडकावून, ढकलून, ओलांडून, मोडून, बदलून पाहिल्या होत्या. एकनिष्ठतेबद्दल, प्रेमाबद्दल, मुलाबाळांशी वागण्याच्या नि त्यांना वाढवण्याच्या तरीक्यांबद्दल, मुलाबाळांकडून होणार्‍या निराशांबद्दल, प्रियकरांबद्दल, शारीरिक प्रेमाबद्दल, फसवणुकींबद्दल, सासू-सुनेच्या नात्याबद्दल, नवराबायकोच्या एकसुरी नात्याबद्दल, व्यसनाधीन पतीच्या बायकोबद्दल.... स्त्रीवादाबद्दलही. 

'गोफ' मला या संदर्भात विशेष वाटली. त्यातली वसुमती ही स्वतंत्र बाण्याची तडफदार नायिका आहे. तिची सासू पारंपरिक स्त्री. घुंगटही पाळून राहिलेली. जगण्याच्या-टिकण्याच्या गरजेतून कर्तबगार झालेली, पण परंपरेला कधीही धुडकावून न लावणारी. एका टप्प्यावर त्या दोघीही एकाच नशिबाला सामोर्‍या जातात. व्यसनाधीन नवरा आणि त्याच्या मृत्यूनंतर धीरानं, एकटीनं मुलाला मोठं करण्याचं आव्हान. त्यात कोळपत गेलेलं तारुण्य. या दोघींना समोरासमोर उभं करून त्यांच्या दुर्दैवांमधली आणि लढ्यांमधली साम्यं अधोरेखित करणं... स्त्रीच्या स्वातंत्र्याची - म्हणजे एका परीनं आपल्या स्वतःच्या भूमिकेची - इतकी रोखठोक तपासणी करायला किती जबरदस्त डेअरिंग आणि बांधिलकी लागत असेल! 

तिच्या सगळ्या कथांमधूनही असे प्रयोग दिसत राहतात. सहजीवनापासून ते दत्तक मुलापर्यंत आणि अविवाहितेपासून ते प्रौढ प्रेमिकेपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या एका खास मूर्तिभंजक प्रयोगशील पद्धतीनं चितारून पाहणं. पुढे दिवाळी अंकांमधून तिनं लिहिलेल्या काही छोटेखानी 'लोक'कथाही याच मासल्याच्या आहेत. नवर्‍यानं टाकलेल्या स्त्रीनं हातात पोळपाट-लाटणं घेणं हा ट्रोप वास्तविक किती घासून गुळगुळीत झालेला! पण तिच्या हातात आल्यावर त्या गोष्टीनं वेगळंच रुपडं धारण केलं. त्यातली मूळची सवर्णेतर सून ब्राह्मण नवर्‍याच्या मर्जीखातर महाकर्मठ कटकट्या सासूच्या हाताखाली ब्राह्मणी स्वयंपाकात पारंगत झालेली. पण नवर्‍यानं टाकल्यावर ती त्याच साजूक सुगरणपणाचा वापर करून पैसे कमावू लागते, स्वतःच्या पायावर उभी राहते. सासूला मात्र पोराच्या मर्जीतलं पारतंत्र्य नकोनकोसं होऊन सुनेच्या हातच्या 'सूंसूं करायला लावणार्‍या लालभडक्क कालवणाची' आठवण येत राहते. पारंपरिक कथेला दिलेला हा खास गौरी-टच होता. 

तिच्या श्रीमंत, सुखवस्तू, उच्चमध्यमवर्गीय भावविश्वाबद्दल अनेकांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्याला जणू उत्तर दिल्याप्रमाणे तिच्या नंतरच्या कादंबर्‍यांतून तळागाळातल्या, शोषित-वंचित आयुष्यांचे संदर्भ येतात. मला ते कधीही आवडले नाहीत. उपरे, चिकटवलेले वाटले. स्त्रीविषयक सामाजिक धारणांना आपल्या कथाविश्वातून आव्हान देऊन पाहणं, त्यांची विधायक - प्रयोगशील मोडतोड करणं हेच तिचं अस्सल काम होतं. आणि तिनं ते चोख केलं. ते करताना शरीरसंबंध चितारायला अजिबात न भिणं आणि आपल्या भाषेनं डोळे दिपवून टाकणं हा निव्वळ आनुषंगिक भाग. त्यासाठी तिला महर्षी कर्वे ते इरावती कर्वे व्हाया रधों असा खंदा वारसा होताच. असला धीटपणा तिनं नाही दाखवायचा, तर कुणी! 

काही वर्षांपूर्वीचा लेखक आज-आत्ताही तितकाच महत्त्वाचा ठरतो का, हे तपासून बघण्याची माझी चाचणी काहीशी कडक आहे. 'ती कोणत्या काळात लिहीत होती ते बघा. तेव्हा असलं लिहिणं म्हणजे....' असे उद्गार काढणं मला ग्रेस मार्कं देऊन विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात ढकलल्यागत अपमानास्पद वाटतं. तसलं काहीतरी म्हणून गौरीच्या तथाकथित 'धीट' लेखनाचं कौतुक करायचं असल्यास मी साफ नकार देईन. तसं न म्हणताही गौरी आज मला महत्त्वाची वाटते का? 

तर निःसंशय वाटते. 

ज्या स्त्रीवादाचा तिनं अंगीकार केला, ज्याचा वारसा मिरवला, ज्याचा जन्मभर पुरस्कार केला; त्याचे निरनिराळ्या कोनांतून दिसणारे अनेकानेक पैलू ती सातत्यानं तपासत राहिली. तपासताना हाती येणारे निष्कर्ष आपल्या भूमिकेला आणि प्रतिमेला सोयीचे आहेत की गैरसोयीचे आहेत याचा हिशेबी विचार न करता, स्त्रीवाद या शब्दासह येणारे अनेक क्लिशेड साचे बिनदिक्कत झुगारून देत, वेळी हस्तिदंती मनोर्‍यातून लिहिण्याचा आरोप पत्करून, मनाला पटेल तेच करून पाहत, बनचुकेपणा कटाक्षाने टाळत अज्ञातातल्या आडवाटांवर न कचरता चालत राहिली. 

हे मला कायच्या काय प्रामाणिक, थोर आणि दुर्मीळ वाटतं. 

(BBC Marathiवर पूर्वप्रकाशित)

Tuesday, 6 February 2018

पुस्तकी टिपणे : ०१

पुस्तके विकत घेऊन वाचण्याला एक अंगचेच मूल्य अलीकडे चिकटवले जाते आहे. मी त्याच्याशी अजिबात म्हणजे अजिबात सहमत नाही. थोडे मऊपणाने बोलायचे, तर तो उधळेपणा आणि थोडे कठोरपणे बोलायचे तर पैसे फेकून साहित्यप्रेम विकत घेण्याचा प्रकार वाटतो.

मी स्वतः खूप पुस्तके विकत घेतली, अजूनही घेते. पण 'स्वतःच्या मालकीच्याच' पुस्तकाने भान हरपायला लावले, असा काही अनुभव नाही. कितीतरी वेळा खूप आवडलेले पुस्तक लायब्रीतून तीन-तीन चार-चार वेळाही आणून वाचल्याची आठवण आहे. त्याची हाताळलेली बांधणी, कुणीकुणी केलेल्या खुणा या गोष्टी तर मनोरम असतातच. पण वाचकापासची मर्यादित जागा आणि पैसे नि पुस्तकांचा अमर्यादित पैस यांचे भान त्यात राखलेले असे. कितीतरी पुस्तके मित्रमैत्रिणींची असत, असतात. त्यांच्याकडे असली काय आणि आपल्याकडे असली काय, एकच की - असे म्हणून आपले स्वतःचे पुस्तक विकत घेणे उद्धटपणाचे आणि परके करणारे वाटून शरमून हात माग घेतल्याचीही मला आठवण आहे. लोकांना पुस्तके उधार देण्याच्या बाबतीतल्या खडूसपणाचे किस्से सांगण्याची एक टूम आपल्याकडे आहे. मीही तिच्या लाटेवर वाहवून माझ्या खडूसपणाला खतपाणी घालून घेतले आहेच, खोटे का बोला. पण माणसे आपलीशी झाली की आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकांच्या शिफारशी त्यांना करणे, त्यांच्या मागे ती वाचण्यासाठी लकडे लावणे, त्यांची आवडती पुस्तके त्यांचेकडून उसनी आणणे, ती महिनोन् महिने ठेवून घेत वाचणे आणि त्या माणसांच्या आवडीनिवडींचा अंदाज करत बसणे, पुस्तके जोवर उभयपक्षी चिंध्या होत नाहीत वा गायब होत नाहीत तोवर सहनशीलपणा दाखवणे आणि दाखवायला भाग पाडणे, क्वचित कधी पुस्तक गेले तरी माणूस आहे की या दिलाशाने शांत राहणे... अशा अनेक लिळा कालपरत्वे अंगवळणी पडत गेल्या आहेत. विद्यार्थिदशेत तर पुस्तके इतक्या सहजी विकत घेणे शक्यच नसे. तो एक साजरा करण्याचा विशेष प्रसंगच. तेव्हाही पुस्तक आपल्या मालकीचे आहे की कसे, याला फार मूल्य नसून वाचनाच्या आवडीला आणि सवयीला ते होते. तेही मूल्य कितपत ग्राह्य मानावयाचे याबद्दल विचारविनिमय संभवतोच, पण काही हजार वर्षांच्या अनुभवाने फायदेशीर ठरलेली आणि कमालीची रंजक असलेली सवय इतक्या सहजी सोडणेही जडच जाईल.

पण विकतच घ्या? का बुवा? त्यातून बाजारालाच खतपाणी घालावयाचे ना? लेखक-प्रकाशकांनी जगावे कसे, असा गळा कृपया काढू नका. असली चिकटमूल्ये येण्यापूर्वीही लेखक-प्रकाशक-संपादक सगळे सुखनैव जगत होते, पेनेबिने न मोडता-लेखकीय आत्महत्या न करता-बैलबिल म्हणवून न घेता जगत होते, स्वाक्षऱ्या देत होते. त्यांनी लेखन हाच आपल्या उपजीविकेचा प्रथमपर्याय करावा आणि आपण तो पुस्तके विकत घेऊघेऊ चालवावा इतकाच पर्याय आहे काय? अशा कितीशा लेखकांना आपण वाचक म्हणून जगवू शकू अशी आपली समाज म्हणून वाचनभूक नि क्रयशक्ती आहे आणि अशा प्रकारच्या अवलंबित्वातून येणारा वाचकानुनयाचा धोका ओलांडूनही लेखक म्हणून आपले सत्त्व टिकवून ठेवण्याची किती लेखकांची क्षमता आहे? त्याहून महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत असेच घडावे ही काय जबरदस्ती आहे? 

माझा पुस्तके विकत घेण्याला विरोध नसून पुस्तके विकत घेण्याच्या तद्दन भौतिक कृतीला चिकटवलेल्या मूल्याला विरोध आहे हे चाणाक्ष वाचकांच्या तरी ध्यानात आले असेलच अशी आशा मनी धरून थांबते.