Saturday, 26 May 2007

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे...

खरंय...

आपल्याला कित्ती कित्ती वाटलं असं असावं म्हणून, तरी आपल्याला एकाएकी उडता थोडंच येणार असतं? नसतंच.

’आत्त्त्त्ताच्या आत्त्त्त्ता पाऊस हवाय’ असं कित्ती पोटातून वाटत असेल तरी आपल्यासाठी एप्रिलमधे पाऊस येतो थोडाच? नाहीच येऊ शकत.

’जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पुरून आपण विनासंध्याकाळच्या प्रदेशात राहायला जावं’ असं किती मनापासून वाटलं तरी संध्याकाळ चुकवता येते थोडीच? रोजच्या रोज देणेकऱ्यासारखी संध्याकाळ येतेच. ऑफिसातही येते...

’संदीपला खरंच कळत असेल का तो म्हणतो ते सगळं, की बाकी साऱ्यासारखा हाही भ्रमच?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं असं किती वाटलं म्हणून ते मिळतं थोडंच? समोरच्या माणसापर्यंत नेमकं काय आणि किती पोचतंय, त्याचे अंदाज करणं तेवढं हातात आहे, हे कितव्यांदातरी कळून घ्यावं लागतंच.

ही मेघना पेठे एवढं सगळं समजूनसुद्धा एखाद्या निगरगट्ट आणि शूर माणसासारखी कसं पेलू शकते जगणं, असा आदरयुक्त अचंबा वाटला तरी आपण तिच्याएवढे शूर होऊ शकतो थोडेच? आपण परत परत त्याच त्या आशाळ तडजोडी करत राहतोच.

आपल्या काळजाच्या देठापासून हवं म्हणून, आपली जिवाजवळची गरज म्हणून ... काही घडत नसतंच.

’आवर्तन’मधली सुरुचीची बहीण नाही का म्हणते प्रॅक्टिकली - ’आपल्याला हवं असणं आणि ते मिळणं यांचा आयुष्यात एकमेकांशी काही संबंध तरी असतो का दीदी? तूच सांग.’

खरंय. नसतोच.

Monday, 14 May 2007

रिश्तोंकी परछाईयाँ...

"भंकस ही कधीपण क्रिएटिव्हच असते..दर वेळी नवीन करावी लागते ना ती!"

"हे काय च्यायला, तुम्ही एखादी गोष्ट शिकवणार, म्हणून काय आयुष्यभराचे राजे? जमणार नाही."

असली त्याची मुक्ताफळं ऐकून सुरुवातीला मी त्याला सिरियसली घेतलंच नाही. तसा फारसा नव्हताच तो ऑफिसात. आधी हात मोडला म्हणून, मग पाय मोडला म्हणून; साहेब जवळ जवळ चार महिने रजेवरच होते. नंतरच आमची जरा जरा ओळख व्हायला लागली. संध्याकाळी फारच वैतागला तर गप्पा मारायला म्हणून येत असे तो माझ्या डेस्कजवळ. कॉलेजमधली मस्ती, फिल्म फेस्टिवल, नाटकं, संदीप, कंटाळा.... असल्या कसल्याही गप्पा. मग हळूहळू त्याचं एखादं वाक्यं नकळत डोक्यात राहून जायला लागलं.

”’आपण’ का नाही लिहित काहीतरी?"

"शोधा म्हणजे सापडेल. पण काय शोधायचं ते माहीत नाही, असंच झालंय ना ’आपलं’?"

"मग? पुढे काय शिकायचा विचार आहे ’आपला’? हे टीचर्स ट्रेनिंग का काय ते ’आपण’ नाही करणारे का?"

हा ’आपण’चा खास वापर - समोरच्याला ऑफ गार्ड पकडणारा. ही त्याची खास लकब लक्षात यायला लागली, तेव्हाच त्याला ’हॅपी गो लकी’ म्हणून टाईपकास्ट करायचं मी बंद केलं असावं. निमित्त त्याचं झालं. पण मग आजूबाजूची सगळीच, मी द्विमित म्हणून फुली मारून टाकलेली, माणसं माझ्या लेखी हळूहळू त्रिमित व्हायला लागली ती त्याच सुमारास.

सतत पॅटर्नल वागून समोरच्याला पंखाखाली घेऊ पाहणारा एक मित्र. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून त्याच्या आक्रमक पालकत्वाचा राग येऊ न देता त्यातली फक्त आस्था तेवढी उचलायला शिकत होते. मात्र त्यातही त्याचं समोरच्या माणसाबद्दलचे आडाखे बांधणं थांबत नाही हे जाणवलं तेव्हा मला ’जग उफराटं आहे’ असा धक्कादायक साक्षात्कार झाल्याचा आठवतो...!

नवीन काहीही करा-शिकायचा प्रचंड उत्साह असलेला एक मित्र. त्याचं फ़्रस्टेशन आणि ’क्या यार, कम से कम सपने तो बडे देखने चाहिये...तभी तो कुछ कर सकते हैं..’मधून लख्ख दिसणारा त्याचा निरागस स्वप्नाळूपणा. तो पाहूनच मी माझ्या निष्क्रिय कडवटपणाला दटावायला लागले नकळत.

जाड भिंगांचा चष्मा आणि चेहऱ्यावरचे ’बाळू’छाप निरागस भाव घेऊन असलेला एक मित्र. बोलता बोलता कधी विकेट काढेल याचा काही नेम नाही मात्र. ऐकणारा पार गारच.

पुरुष हा विषय आयुष्यातून एका समंजस शहाणपणाने बंद करूनही कडवट न झालेली एक मैत्रीण...

इतक्या सरळपणे - खरं तर मूर्ख म्हणावं इतक्या सरळपणे - वागून इतकी वर्षं कसे टिकले असतील इथे, असं आश्चर्य मला नेहमी वाटायला लावणारे फिलॉसॉफर बॉस...

ज्याला पाहून मला न चुकता दर वेळी भारत सासणेंच्या ’रंगराजाचा अजगर’ या कथेची आठवण येते, असली राजकारणं खेळणारा एक टीम लीडर. पण तशीच त्याची अंगावर घेतलेले पंगे एन्जॉय करत निभावून नेण्याची खुजलीही....

ही आणि अशी कितीतरी माणसं. जिवंत. आपापला इतिहास-भूगोल घेऊन येणारी. माझ्या असण्यावर रिऍक्ट होणारी. मला रिऍक्ट व्हायला भाग पाडणारी. एकाच वेळी प्रेमळपणे काही देऊ करणारी आणि त्याच वेळी आपल्या निखळ स्वार्थानं मला चकित करून टाकणारी...

त्यांच्या असण्याचं भान मला त्यानं पुरवलं. त्याचा तसा उद्देश होता असं अजिबातच नव्हे. कदाचित त्याचा अंगभूत चांगुलपणा असेल किंवा स्वत:चा अहंकार सुखावण्याची गरजही. किंवा दोन्ही. किंवा या दोन्हीबरोबर कुठेतरी काठ शोधायची माझी आत्ताची गरज.

काहीतरी झालं खरं.

म्हणूनच परवा तो बोलता बोलता सहज बोलून गेला ते वाक्य तेव्हा मी चमकले.

" तुला असं नाही वाटत मी बरेच दिवस तुझ्याशी बोलून या सगळ्याची तयारी करून घेतोय...? It's time to get married..."

म्हणजे? तू कोण माझ्या आयुष्यात काहीतरी ठरवायला येणारा? मी तो हक्क अद्याप दिलेला नाही कुणाला. इतकी माझी काळजी का करावी कुणी? मला नाही आवडत कुणी इतकं पर्सनल झालेलं...
अशा संतप्त, कडवट प्रतिक्रिया उमटून गेल्या डोक्यात. पण मागोमाग आवंढाही आला एकदम. पुढे-मागे काही बोलताच येईना. तो क्षण तसाच रेटून नेताना पुरेवाट झाली...

आणि मग कळलंच मला एकदम - इतके दिवस या माणसांना खोटी खोटी, आपल्या आयुष्यात नसलेली, निव्वळ सोईपुरती माणसं समजत होतो आपण. ते तसं नाहीय.

One can't afford to treat the world like a lifeless thing. It's a whole, live, throbbing life... react to it.

Thanks friend, for making me see it. Thanks.

Wednesday, 9 May 2007

रक्तात उतरली होती संध्याकाळ...

प्रेम वाटलं म्हणजे नक्की काय झालं? किंवा गौरी देशपांडेच कोट करायची सरळ तर आपण म्हणूया की ’पुरुषांना आणि स्त्रियांना एकमेकांना पाहून होणाऱ्या स्रावांना प्रेम-बिम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं.’

पण तरी तुझ्याबद्दल मला किंवा माझ्याबद्दल त्याला ओढ वाटली किंवा काहीतरी हवंसं वाटलं म्हणजे काय झालं? या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कुठून होत असते? की सुरुवात वगैरे असं काही नसतंच? नुसत्याच गोष्टी घडत जातात, असं?

म्हणजे उदाहरणार्थ तुझे गुलाबी रंगाचे ओठ आठवतात मला. तुझं किंचित चाचरत प्रचंड एक्साईट होऊन बोलणं किंवा एखादी गोष्ट फारशी मनात नसताना ’हॅ हॅ हॅ’ असं मोठ्यांदा कृत्रिम हसून ते गोष्ट उडवून लावणं किंवा तुझी काहीशी बुटकी शिडशिडीत एकरेषीय अंगलट...
हे सगळं फारच शारीर होतंय नाही? पण ’फार शारीर’ किंवा ’कमी शरीर’ असं कुठे काय असतं? मन-बिन म्हणजे तरी काय? या शरीरातल्या पेशींनी एकमुखानं केलेली मागणीच ना? ’शारीर’ या संकल्पनेला बिचकणं थांबवायला हवं. मग कदाचित या सगळ्यातून मला वाटणारा प्रचंड अपराधी भाव संपेल.

कठीण... वेल.... आहेच.

तो आणि मी बोलत असू खूप. फारच ना. सी. फडके पद्धतीत सांगायचं झालं तर तसे उपवर आणि उपवधूही असणारच आम्ही एकमेकांना. उदाहरणार्थ पुस्तकं आणि सिनेमे आणि अंगातला जास्त शहाणपणा आणि ओढून-ताणून आणलेला एकटेपणा आणि कदाचित इम्मॅच्युरिटीही. मला जमू शकणाऱ्या सगळ्या पद्धतीत संवादही साधायचा प्रयत्न केला मी त्याच्याशी. असं समजूनही पाहिलं, की ’येस, या मुलावर आपलं प्रेम आहे’. आणि खरं सांगू, त्या त्या वेळी मला वाटलंही ते खरं...

खरं असणं-नसणं शेवटी वाटण्यावरच अवलंबून असतं की काय? कुणास ठाऊक...

पण इट डिडण्ट वर्क आऊट. तसं तर सारं काही आलबेलच होतं. इथे बिनसलंय, असं काही कुणाला बोट ठेवून म्हणता आलं नसतं. पण ते तसं नाही हे मला कळत गेलं आणि एखाद्याला न समजणारी गोष्ट त्याला ’समजावून देणं’ अशक्य असतं हे माझं मतही दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत गेलं.

तसे स्पर्श वर्ज्य कधी नव्हतेच. म्हणजे थिऑरॉटिकली! कधी कधी हातात हात घेणं वा चारचौघांत वावरताना होणारे स्पर्श विनासंकोच चालवून घेणं हे चालेच. पण कधी स्पर्शाची भाषा वापरून पाहावीशी नाही वाटली मला त्याच्यासोबत. माझी नसलेली तयारी स्पष्टपणे नोंदल्यावर त्यानंही कधी निसटते म्हणूनही स्पर्श केले नाहीत हेही खरंच.
आणि तरीही एखाद्या नियत क्षणी त्याच्यासोबत असताना मला जाणवून गेलेलं माझं सगळं शरीर आठवतंच आहे मला...

पण आमच्या नात्यात हे सारं फारच मुकं राहिलं कायम. ज्या नात्यात त्या ओढीनंच होतात लहान-सहान तपशीलही जिवंत, त्यात आम्ही ते असं मुकाट मिटून टाकावं - हेच किती बोलकं आहे ना?

आणि मग मनात नकळत येत राहिलास तू. आता मागे वळून पाहताना वाटतं, हेही सहज घडलेलं की आपणच घडवून आणलेलं, सहजपणाच्या बनावाखाली? किती सहज-स्वच्छ संगती दिसते ना या साऱ्यांत? आपण कितीही नाकारायची, लपवायची म्हटली तरी ती असतेच आणि देनिस म्हणतो तशी ’कधी ना कधी रहस्याला वाचा फुटतेच...’

संदीपची ती कविता ठाऊक आहे का रे तुला -

मी जाता जाता तुला बोललो काही,
ते खरेच सारे असेल ऐसे नाही
रक्तात उतरली होती संध्याकाळ,
वदवून घेतले तिनेच काहीबाही...

म्हणजे ही रक्तातली संध्याकाळ फक्त? बाकी काही नाही?

मेघना पेठेसारखं नाट्यपूर्ण उत्कटपणे म्हणावंसं वाटतं आहे, ’या इलाही, येह माजरा क्या है...’