Tuesday 21 December 2021

या मौनाची जात निराळी

या मौनाची जात निराळी

उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी

या मौनाची जात निराळी.

कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी

या मौनाची जात निराळी.

संध्याकाळी, उदास वेळी, हुरहुर काहूर, काळीज जाळी

या मौनाची जात निराळी.

अशाच वेळी साथ देतसे, अस्फुट सोबत जणू अबोली

या मौनाची जात निराळी.

संथ शांतता पाण्यावरली, आत नांदते अथांग खोली

या मौनाची जात निराळी.

डोहामधले विश्व आगळे, खळबळ न्यारी निळीसावळी

या मौनाची जात निराळी.

कुणी जाणावे होईल का कधी या मौनाची मुखरित बोली?

या मौनाची जात निराळी.

उंबऱ्यापाशी अडते पाऊल, हर प्रहराची आण निराळी

या मौनाची जात निराळी.


संपादित आवृत्ती –

या मौनाची जात निराळी
उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी
या मौनाची जात निराळी.
कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष जिव्हाळी
या मौनाची जात निराळी.
संध्याकाळी, उदास वेळी, हुरहुर काहूर, काळीज जाळी
या मौनाची जात निराळी.
अशाच वेळी साथ देतसे, अस्फुट सोबत जणू अबोली
या मौनाची जात निराळी.
संथ शांतता पाण्यावरली, आत नांदते अथांग खोली
डोहामधले विश्व आगळे, निळेसावळे लालप्रवाळी
या मौनाची जात निराळी.
खळबळ न्यारी निळीसावळी, मुरकत जाते कुणी मासोळी
कधी उन्हाची तिरीप चमकते, कभिन्नकाळी कधी सावली
या मौनाची जात निराळी.
या मौनाशी त्या मौनाची अखंड चाले गूढ गजाली
या मौनाची जात निराळी.
कुणी जाणावे होईल का कधी या मौनाची मुखरित बोली?
या मौनाची जात निराळी.
उंबऱ्यापाशी अडते पाऊल, हर प्रहराची आण निराळी
या मौनाची जात निराळी.

Saturday 11 December 2021

वाचकपण

एखाद्या तालेवार दिवशी तुम्हांला लेखक सापडतो.

मग तुम्ही त्याची इतर पुस्तकं उत्सुकतेनं शोधता. काही आवडतात. क्वचितच पहिल्या पुस्तकाइतकं काही आवडतं. तसं झालं, की समजावं, आता नीट मागे टेकून बसावं लागणार. लांब जायचंय. अनेकदा हे प्रवास नुसतेच दीर्घ नाही, कायमचेच ठरतात. आपल्या बशीतून लेखक उतरतच नाही कधीच. पण तसं न झालं, तरी ठीकच. कमी आवडलेल्या, कमी जमून आलेल्या, नव्हाळीच्या काळातल्या पुस्तकांमध्ये तुम्हांला ओळखीच्या खुणा भेटत राहतात. क्वचित आधी न भेटलेला अनघड, रानगट कोवळेपणाही भेटतो आणि अधिकच जवळीक जुळून येते. काही उतरणीवरची पुस्तकं 'बनचुकी' वाटू शकतात. अशा वेळी जड मनानं अच्छा करायला तयार राहावं लागतं. पण असंही होतंच असं नाही. सगळे सराईत आणि संभावित पवित्रे जोखूनही एखाद्याची बदमाशी अतीव प्रिय वाटत राहू शकते हे तुम्ही आयुष्यात इतरत्र अनुभवलेलं असेल, तर तुम्हांला यातलं इंगित कळेलच! तर - असं होऊ शकतं.

कधीकधी काही पुस्तकं मिळतच नाहीत. पुस्तकदुकानी लोक तुम्हांला 'अनेक वर्षं औटॉफप्रिंट आहे.' असं म्हणून आणि 'एवढंही ठाऊक नाही? कोणकोण येतात हल्ली पुस्तकं मागायला...' इतकं सगळं न म्हणून नुसत्या कटाक्षानं बोळवतात. लायब्र्यांच्या नोंदवह्यांमध्ये परिश्रमानं नोंद हुडकावी, तर पुढ्यात हमखास लाल अक्षरात 'प्रत गहाळ' असं लिहिलेलं सापडतं. मग त्या पुस्तकाबद्दल भलतीच हुरहुर वाटायला लागते. कधीतरी, कुठेतरी, ध्यानीमनी नसताना, कितीदा अनेक वर्षांनीही, रद्दीत, स्नेह्यांच्या कपाटात, आडगावच्या लायब्र्यांत एखादी प्रत गवसते. मग त्या पुस्तकाच्या आशयापेक्षाही अधिकचं मूल्य येऊन त्याला चिकटतं. अर्थात त्याच्यावर अपेक्षांचं अधिक जड ओझंही असतंच.

कधी मुलाखती सापडतात कुठेकुठे. प्रेमानं टाळी द्यावी असं काहीतरी बोललेला असतो गडी. कधी भिवई उंचावायलाही लावतो म्हणा. पण इथवर येऊनही तुम्ही त्यानं टाकलेल्या ब्रेडच्या चुऱ्याच्या खुणा हुडकत असाल, तर करता करता हळूहळू लेखक तुमचा होऊन गेलेला असतो, तात्कालिक आवडनावड-नाकमुरड नॉटविथस्टॅंडिंग. अप्रूपाचा तीक्ष्ण भाग हळूहळू बोथटून गेलेला, त्याऐवजी सवयीचं- लग्नानंतर वीसेक वर्षांनंतर नवराबायकोंना एकमेकांबद्दल वाटतं तसलं काहीतरी - वाटत राहतं.

मात्र अशा अनेकानेक लग्नांनंतर आणि ती लग्नं श्रीकृष्णाच्या चतुराईनं नांदती राखत असूनही पुन्हा नव्यानं इकडेतिकडे डोळे घालत, डोळे मोडत फिरण्याच्या तुमच्या बाहेरख्याल क्षमतेवर तुमचं वाचकपण अवलंबून असतं, हा खरा मजेचा भाग.

तर - मला अलीकडेच एक नवा लेखक 'लागला' आहे. तुम्ही वाचक म्हणून अजून खेळताय की गेलात तंबूत?