Friday, 20 December 2024

बुजरी गाणी ११

हे गाणं आपल्या नॉस्टाल्जियाचा भाग असल्यामुळेच आपल्याला आवडत असणार, एरवी यात काय आहे, अशी मी स्वतःची समजूत काढत असे. कारण पडद्यावर चित्ते, वाघ, झेब्रे इत्यादींची आठवण करून देणारी टाइट्समधली शिल्पा शेट्टी आणि केसाळ छाती दाखवणारा अक्षयकुमार. त्यांच्या नाचाच्या मुद्रांचा - खरं तर हातवाऱ्यांचा, let's be realistic! - गाण्याच्या बोलांशी काहीही संबंध नाहीय. पूर्ण गाणंभर ते एकमेकांवर शरीराच्या मांसल भागांनिशी धडका देणे, घासणे, कुरवाळणे, जवळ येणे-लांब जाणे... अशा गोष्टी करतात. 'शरीराचा आवेग नावरे आवरीता' हेच काय ते कोरिओग्राफीमधलं विधान आहे. 

पण तरीही... गाणं नुसतं ऐकलं, तर ते कमालीचं गोड आहे. 

शब्दांत एक प्रकारची चलबिचल, अनिश्चितता आहे. 'या माणसावर जीव जडलाय खरा, पण हा देईल ना साथ, की दुसऱ्या कुणाला जवळ करेल लहर फिरल्यावर?', 'बोलून दाखवू का हिला मनातले मोह? की लाजून दूर करेल?'... अशा शंकाकुशंका बोलून दाखवणारे - न दाखवणारे दोन नवे प्रेमिक. आणि त्या हळुवार संकोचांना आणि आवेगांना साथ दिल्यासारखी गाण्याची सुरावट. 

कडव्याची सुरुवात अगदी खालच्या सुरात, मनातलं गूज बोलून दाखवावं हलकेच, अशी तिच्या आवाजात होते. मग तिथून तिचा हात हातात घेऊन दाणदाण पायऱ्या चढून वर जावं तसा गायक वर जातो आणि खड्या आवाजात तिला उत्तर देतो. तिथून तिनं लाजून त्याला पुन्हा थोडं खाली आडोशाला न्यावं, तशी धीम्या सुरातली कबुली... ध्रुपद... पुन्हा हाच खेळ.  अशी जुगलबंदी या गाण्यात कुमार सानू आणि अलका याज्ञिक मनसोक्त रंगवतात.

पडद्यावर हे हाताळू शकणारा कुणी दिग्दर्शक मिळाला असता, तर हे गाणं कुठच्या कुठे गेलं असतं, अशी चुटपुट वाटल्याशिवाय राहत नाही.

~



चुरा के दिल मेरा गोरिया चली - २

उड़ा के निंदिया कहाँ तू चली 

पागल हुआ दीवाना हुआ 

कैसी ये दिल की लगी 

चुरा के दिल तेरा चली मैं चली 

मुझे क्या पता कहाँ मैं चली 

मंज़िल मेरी बस तू ही तू 

तेरी गली मैं चली... चुरा के दिल मेरा...

अभी तो लगे हैं चाहतों के मेले 

अभी दिल मेरा धड़कनों से खेले 

किसी मोड़ पे मैं तुमको पुकारूं 

बहाना कोई बना तो ना लोगे 

...अगर मैं बता दूं मेरे दिल में क्या है 

...तुम मुझसे निगाहें चुरा तो ना लोगे 

...अगर बढ़ गयी है बेताबियां 

...कहीं मुझसे दामन छुड़ा तो ना लोगे 

कहता है दिल धड़कते हुए 

तुम सनम हमारे हम तुम्हारे हुए 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली...

चुरा के दिल मेरा गोरिया चली

चुरा के दिल तेरा चली मैं चली...

नही बेवफ़ा तुम ये मुझको खबर है 

बदलती रुतों से मगर मुझको डर है 

नई हसरतों की नई सेज पर तुम 

नया फूल कोई सजा तो ना लोगे 

...वफ़ाएं तो मुझसे बहुत तुमने की है 

...मगर इस जहाँ में हसीं और भी हैं 

...कसम मेरी खा कर इतना बता दो 

...किसी और से दिल लगा तो ना लोगे 

धीरे धीरे चोरी चोरी आके मिल 

टूट ना जाये प्यार भरा दिल 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली 

चुरा के दिल मेरा गोरिया चली 

~

गाण्याचे बोल इंटरनेटवरून ढापलेले असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.

Sunday, 20 October 2024

या वाटा वळणावळणांनी

या वाटा वळणावळणांनी घनदाट अरण्यात घेऊन जातात
भर दिवसा किर्र अंधार असतो पायातळी
हिरवेकंच ओलेगर्द उग्रधुंद गंध पानोपानी 
महाकाय वृक्षांच्या फांद्या बघत वर जाणारी नजर घरंगळत जाते भलतीकडे
कुठे पिवळेजर्द नाग, कुठे चमचमते काजवे, कुठे पाखरं निळीभोर, कुठे गुंजांचे विषारी सडे...
घामेजलेला हात तरीही असतो हातात
उरात धसका, जिवात मोह, मनात कांचनमृगाचा ध्यास.
ओलांडल्या जातात लक्ष्मणरेषा,
कधी कुणा मायावी बैराग्याची चाहूल... 
अखेर जमिनीच्या पोटातच असते जागा
माझी आणि तुझीही.
पण म्हणून या वाटा का टाळायच्या आहेत?
या वाटा वळणावळणांनी घनदाट अरण्यात घेऊन जातात.

Sunday, 21 July 2024

थँक्स टू हिंदी सिनेमे ०४

लग्नामधली गाणी हा बॉलिवुडमधला एक हुकमी एक्का. भरपूर गजरे ल्यायलेल्या, दागदागिन्यांनी मढलेल्या, खिदळणार्या, लाजणार्या , हसणार्याहसवणार्या खूप बायका, खूप रंग आणि रोषणाई वापरून केलेल्या सजावटी, आणि सनईचे सूर. रॉकी और रानी की प्रेमकहानीमधल्या तेरी कुडमायी के दिन आ गयेबघताना त्यातलं करणजोहरीय सौंदर्यशास्त्राला अनुसरून असलेलं, काहीसं बटबटीत, पण तरीही निव्वळ वेगळेपणामुळे टवटवीत वाटणारं रोल रिव्हर्सल जाणवलं आणि एकापाठोपाठ एक गाणी आठवत गेली. त्यातलेही निरनिराळे प्रकार दिसत गेले.

एक प्रकार म्हणजे सरळच लग्न ठरलं आहे, वा उद्यावर वा आत्तावर येऊन ठेपलं आहे, डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनात उत्कंठा आणि आतुरता, आणि आईबापापासून विरहाचं दुःख. पण मजा अशी, की बॉलिवुडचा स्वभाव हिंदी आणि त्यामुळे उत्तर भारताला जवळचा. त्यातलं विरहाचं दुःख बाबुल का अंगनासोडून जाण्याचं. आईला तितकासा भाव गीतकारही देत नाही. बाबुल की गलीयाँ छोड चली’! अर्थात, अगदी माहेराला महत्त्व असलेल्या महाराष्ट्रातही कितीतरी ठिकाणी वधूच्या आईला लग्न बघायचीही परवानगी नसत असे, म्हणताना... ठीकच म्हणायचं! अशा गाण्यांमध्ये विशेषतः नवर्या मुलीवर शुभेच्छांची नुसती खैरात असते. तिला खुशीयाँमिळाव्यात म्हणून दुवाएँ’; तिच्या पदरात चंद्र, तारे; तिचा चेहरा कसा चंद्राच्या तुकड्यासारखा, तिची कांती कशी दुधासारखी, झूमर असं, झुमका तसा, बिंदी अशी, कंगन तसं, हातावर मेंदी कशी, पायातले पैंजण कसे... एक ना दोन. नवर्या मुलीचं काम नुसतं गोरेपान नितळ खांदे आणि कर्दळीसारख्या पोटर्या उघड्या टाकून नाजूक हातांनी हळद-चंदन लावून घेण्याचं नाहीतर पॅसिव्हली साजशृंगार करून घेत, आरशासमोर बसून लाजत, सुंदर दिसत हळूच हसण्याबिसण्याचं. मेंदीला मोठाच भाव. बहनों ने रोशनी कर ली मेहंदी से जला के उंगलीयाँकाय किंवा चक्क मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’. साजण येईल तेव्हा त्याच्याकरता तय्यार राहायचं, बस. अॅक्टिव्ह रोलची जबाबदारी पियाच्या गळ्यात घालून या नवर्या मस्त मोकळ्या झालेल्या असतात. डोळ्यांत विरहाचं माफक पाणी, पण मुख्यत्वे तिकडची स्वप्नं. मेरे बन्नो की आयेगी बारातपासून बन्नो तेरी अखियाँ सुरमेदानीपर्यंत आणि मेहंदी है रचनेवाली, हाथोंमें गहरी लालीपासून नवराई माझी लाडाची लाडाची गोपर्यंत. छलका छलका रे कलसी का पानीपासून हम तो भये परदेसपर्यंत. इथल्या सख्यांच्या, आईबापाच्या विरहाचं दुःख आहे. पण त्याला तरी काय इलाज! मैं तो भूल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे...

राजीतल्या उंगली पकड के तूने चलना सिखाया था नामध्ये याला अपवाद होता. कारण नवरी मुलगी फक्त नवरी मुलगी नव्हती. पण असे अपवाद नियम सिद्ध करण्यापुरतेच. बाकी बहुतेक वेळा साजनजी घर आये दूल्हन क्यों शर्माये’…

यात नवर्या मुलीला शंभरातून पन्नास वेळा तरी ह-म-खा-स बन्नो हे नामाधिधान लावलेलं असतं. मग तिला सल्लेबिल्लेही दिलेले असतात. ते पोक्त आजीबाईछाप सल्ले असतातच. पण फक्त तितकेच असतात असंच काही नाही. देखो बन्नो मान न जाना, मुखडा उनको ना दिखलाना, पहले सौ बातें मनवाना, केहना बोलो, कर के सलामी, बन मैं करूंगा तेरी गुलामी...असाही व्यावहारिक वळसा असतो. वास्तविक नवर्या मुलाला तसं परफॉर्मन्सचं किती प्रेशर असतं. नवर्या मुलीला जाऊन निदान पहिल्या रात्री तरी मेलेल्या माशासारखे भाव सलज्ज डोळ्यात घेऊन पुतळा होऊन बसायचं असतं. करायचं ते नवरा मुलगा करणार असतो. पण ज्याला काही करून मर्दानगी सिद्ध करायची असते, त्याचं काय? त्या बिचार्याला सल्लेबिल्ले देण्याची काही पद्धत बॉलिवुडमध्ये नाही.

नवर्या मुलीच्या मनात नुसतीच प्रियाची ओढ असते असंही नाही. शृंगाराची स्पष्ट आतुरताही असते. जिया जले जान जलेच्या शब्दांत उघडच अंग अंग में जलती हैं, दर्द की चिंगारीयाँ, मसले फूलों की मेहक में तितलीयोँ की क्यारियाँ...असं होतं, ते काय उगाच? ‘रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ...हा त्याचाच एक अवतार. धीरे धीरे खटिया पे खटखट होने लगी...यात कल्पनेला वावबीव तरी कुठे आहे?! थेट मुद्द्याला हात!

अलीकडे लापता लेडीजमध्ये नवर्या मुलीच्या पोटातली अनिश्चिततेची भीतीही सुरेख चितारली होती. आंगन में पेड वहाँ होगा के नही, होगा तो झूला उसपे होगा की नही…’ इथपासून ते नवरा घोरत तर नसेल... इथपर्यंत.

पण कायम सिनेमाची नायिकाच नवरी मुलगी असेल असंही काही नाही. मैत्रिणीच्या नाहीतर बहिणीच्या लग्नात मिरवणारी आगाऊ नायिका आणि हीरोचा तसलाच आगाऊ कारा मित्र हा बॉलिवुडमधल्या प्रेमकथांमधला एक हमखास ट्रोप. हम आप के हैं कौनमधली जूते दे दो पैसे ले लोतशातलंच.

पण हम आप के हैं कौनअसल्या गाण्यांची बॅंकच बाळगून आहे म्हणा. लग्नातल्या गाण्याचा कुठलाही प्रकार सांगा, तो त्यात सापडणारच. आगाऊ बहीण आणि भाऊ यांची चेष्टामस्करी आणि पुढे प्रेमात पडायची तयारी? ‘जूते दे दो पैसे ले लो’. नायिकेचंच लग्न आणि नायक विरहानं व्याकूळ? ‘मुझ से जुदा हो कर’. लग्नासाठी उतावीळ लेक? ‘माईनी माई मुंडेर पे तेरे...लग्नातली नवरा-नवरींची चेष्टामस्करी आणि दुवाएँ? ‘वाह वाह रामजी’. चावट आणि वाह्यात मस्करी? आहे की. दीदी तेरा देवर’. अगदी गलोलीनं नितंबावर फुलं फेकून मारण्यापर्यंत सबकुछ. विहीण आणि व्याह्यांमधली चेष्टा? काळजी सोडा, तेही आहे – ‘आज हमारे दिल में...

तर – ‘हम आप केचं सोडून देऊ!

आपलं स्वतःचं लग्न जमवण्याच्या भानगडीत इतरांची लग्नं मनापासून अटेंड करणारे स्मार्ट लोक बॉलिवुडमध्ये चिकार. हम दिल दे चुके..मधलं आँखों की गुस्ताखीयाँ..’, ‘कभी खुशी कभी गममधलं बन्नो की सहेली रेशम की डोरी’ (पाहा, इथेही बन्नो आहेच!), ‘प्यार तो होनाही थामधलं आज है सगाई’…. अशी कित्तीतरी गाणी मिळतील. या गाण्यांमधला मूड प्रसन्न, उजळ, रंगीत असतो. नायिका आगाऊ असते थोडी, पण नायकानं थोडी मर्दगिरी केल्यावर तिच्या डोळ्यांत एकदम लाज उमटून जाते. नायकनायिकांना इतर लोक सतत कट केल्यागत एकत्र आणत असतात. कधी तिच्या नि त्याच्या ओढण्यांची गाठ, कधी त्याच्या कुर्त्याच्या बटणात तिची ओढणी, कधी दोघांना एका फेट्याच्या कापडात एकत्र आणपूरी कायनात दोनों को... असो!

अजून एक प्रकार म्हणजे असफल प्रेम आणि त्याचं वा तिचं लग्न अटेंड करावं लागणं. या सिच्युएशनमध्ये एकट्या राहिलेल्या इसमाला (वा इसमीला) कम्माल म्हणजे कम्माल अॅटिट्यूड आलेला असतो. एकतर माझं काय व्हायचं ते होवो, तुझं भलं होवोअसा स्वार्थत्यागाचा उमाळा, किंवा मग नुसते अर्थपूर्ण दुःखी टोकदार कटाक्षच कटाक्ष... पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागण्याची पार हद्द. या प्रकारातलं मूळपुरुष गाणं म्हणजे अजीब दास्ताँ है ये’. आता झालंय ना त्याचं लग्न? मग का उगा त्याच्या हृदयाला डागण्या देतीस बाई? जा ना गप निघून. पण नाही. असं केलं तर ती नायिका कसली! राजा की आयेगी बारात...त्यातलंच. तुमबिन जीवन कैसा जीवनमध्ये बैलगाडीच्या मागून विद्ध-संतप्त चेहर्यानं चालणारा जया भादुरीचा प्रियकर आठवा. किंवा स्वतः मरणार असल्यामुळे प्रेमपात्राला नीटस नवरा गाठून देऊन वर तिला त्याच्या प्रेमात पाडणारा 'माही वे'मधला शारुख. किंवा मग अलीकडच्या सुना है के उन को शिकायत बहुत हैमधली गंगूबाई... काय तो कफन पेहन के कुर्बान होण्याचा भाव... हाय अल्ला!

याचाच एक पोटप्रकार म्हणजे लग्न करायचं, पण मनात मात्र प्रियकर किंवा प्रेयसी. वीर-झारातलं मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ...किंवा देवदासमधलं हमेशा तुमको चाहा’. पण देवदाससगळाच तसा... पुनश्च असो!

अजून एक खास प्रकार म्हणजे निव्वळ चावटपणा. मेरे हाथों में नौ नौ चूडीयाँ हैंमधली कल चोली सिलाई आज तंग हो गईम्हणत धुंद होऊन नाचणारी श्रीदेवी, ‘इश्शकजादेमधल्या मेरा आशिक छल्ला वल्लातला पैजामे से लडते हुए रात बितानेवाला आशिकही काही उदाहरणं. रुकमणी रुकमणीत्यांपैकीच, आणि लग्नातलं नसलं तरी डोहाळे पुरवता न येणार्या बावळट साजणाची चेष्टा करणारं दीदी तेरा देवर दिवानाही त्यांपैकीच. होता होईतो पुरुषांना बघा-ऐकायला मनाई करून खास स्त्रीवर्गाला गोळा करून शृंगारविषयक चावट चेष्टामस्कर्या करणं हा या गाण्यांचा विशेष हेतू.

अशी कितीतरी गाणी निरनिराळ्या कारणांनी लक्षात राहून गेलेली, आवडलेली. पण या ठरीव साच्यांमधली असूनही त्यांना बगल देऊन जाणारी, वेगळेपणानं ठसलेली गाणी अगदी क्वचित.

सत्यातलं सपनों में मिलती हैत्यांपैकी एक. ते गाणं अगदी मुंबई पद्धतीच्या लग्नाचं आहे. नवरा-नवरी समोर स्टेजवर आणि प्रेक्षक खाली खुर्च्यांमध्ये बसलेले. पुरुष एकतर निवांत बसलेले तरी नाहीतर पार कायच्या काय हालचाली करून नाचम्हणायला जड जाईल, असा नाच करणारे. निखळ पुरुषी ऊर्जा. निळाशार सोनेरी बुंदक्यांचा आणि गुलाबी काठाचा शालू नेसलेली शेफाली छाया त्या गाण्यात बघून घ्यावी. काय तिचा चार्म! मागे येणार्या नवर्याला लटक्या रागानं रिकाम्या रिक्षाची उपमा काय देते, मध्येच लाडात येऊन त्याच्या थोबाडीत काय मारते, कमाल लालित्यानिशी ठुमकते काय... ते सगळं गाणं तिच्याभोवती फिरतं. साथीला आशाचा मुरलेला खट्याळ आवाज आणि बॅकग्राउंडमध्ये कुठेतरी स्वप्नदृश्यातली शालीन उर्मिला.

बॉम्बेतलं केहना ही क्यावास्तविक प्रेमात पडू बघणार्या नायक-नायिकांचंच. पण मणिरत्नम आणि रेहमान अशा एक सोडून दोन-दोन परिसांचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे ते कुठल्या कुठे गेलं आहे. भित्र्या हरणीसारखी पण अनुरक्त झालेल्या प्रेमिकेची भिरभिरती-लाजरी नजर... तबल्याचा दिलखेचक ठेका... सोनेरी झालरी लावलेल्या झिरझिरीत ओढण्या ल्यालेल्या बायकापोरीउंचच उंच अवकाश असलेल्या इमारती... आणि स्वप्नील छायाप्रकाशाचा खेळ.

बधाई होमधलं सजन बडे सेंटीअसंच मजेशीर. त्यातल्या लग्नात वावरणारे नीना गुप्ता आणि गजराज राव चाळिशी-पन्नाशीच्या आसपासचे. पण नीना गुप्ता गरोदर असल्यामुळे स्वतःच्या पौरुषाच्या कामगिरीवर निहायत खूश असलेला गजराव राव तिला नव्याच कौतुकानं न्याहाळणारा. कधी गच्चीवरून खालच्या तिच्याकडे प्रेमभरानं बघणारा, तर कधी जिन्यावरून उतरणार्या पत्नीच्या पूर्ण स्त्रीदेहाचा दिमाख विस्फारल्या, चकित नजरेनं बघणारा. कधी हळूचकन तिच्या पोटाची अलाबला घेणारा. कधी आईची करडी नजर जाणवून गोरामोरा होणारा... त्यातला त्या दोघांमधला चोरटा पण लोभस शृंगार बघताना खूप मजा आली होती, किंचित भरूनही आलं होतं.

गँग्स ऑफ वास्सेपूरमधलं तार बिजली से पतले हमारे पियाहे अजून एक रत्न. त्याला लोकसंगीताची डूब आहे आणि लग्नातल्या मेहंदी-संगीत समारंभाचा अस्सल ढोलक ठेका. तशा गाण्याबजावण्यात भांड्यावर चमचा वाजवत ठेका धरतात असं स्नेहा खानविलकरला कुणीतरी म्हटलं म्हणून तिनं गाण्यात टटक टटक टटक टटक...असे शब्दच चपखलपणे वापरले आहेत. विधवा सासू आणि विधवा थोरली जाऊ नव्या सुनेच्या स्वागतासाठी कौतुकानं गाताहेत, हवेत आनंद आहे, शब्दांमुळे आलेली हलकी मस्करी आहे, हसर्या मुद्रा आहेत... पण सासर्याच्या आठवणीनं कातर झालेल्या सासूला बघून चमकलेली नवी सून बघता बघता तिला सावरून घेते. तिची त्या घराचं होऊन जाण्यातली परिपक्वता आणि पाठीमागच्या गाण्यातल्या सुरातली विद्धता... त्या गाण्यातली मूळ मिश्किली ओलांडून ते गाणं कुठल्या कुठे उंचीवर निघून जातं. हुमा कुरेशीचं कौतुक करायचं, की रिचा चढ्ढाचं, की स्नेहा खानविलकरचं, शारदाबाईंचं की अनुराग कश्यपचं... कळेनासं होतं.

मीरा नायरचा मॉन्सून वेडिंगलग्नातच घडणारा. त्यातलं दिल्लीकर श्रीमंती लग्न आणि त्यातले नात्यांचे अस्सल भारतीय गुंते लक्षात राहतातच. पण श्रेयनामावली सुरू असताना वाजणारं कावा कावाबघताना आपण सिनेमातल्या कंत्राटदाराचं आणि मोलकरणीचं झेंडूच्या केशरी रंगांत न्हालेलं लग्नही आठवून खूश होत राहतो, ही त्या सिनेमाची प्रसन्न खासियत.

ही काही समग्र यादी नव्हे. तशी ती बॉलिवुडबाबत शक्यही नाही. अजून तासभर गप्पा ठोकत बसलो तर अजून अशीच पन्नासेक गाणी आपण सहज काढू शकू. तूर्त ही आवडलेल्या चंदेरी लग्नगाण्यांची आठवण नुसती...

अशीच एक आठवण एकदा पार्टीतली गाणी या प्रकाराची काढायची आहे, एकदा वयात आल्या-आल्या तारुण्यानं मुसमुसून गात सुटणार्या नायक-नायिकांच्या गाण्यांची... इरादे काय, चिकार आहेत. फिर कभी.

Wednesday, 17 July 2024

आजीची गोष्ट ०५

(भाग ०४)

तिला शिक्षणाची हौस होती, म्हणजे किती होती! तिच्या लहानपणी तिला फारसं शाळेत जाता आलं नाही. काळही वेगळा, मुलींना शिकवण्याला फारसं महत्त्वच नव्हतं. ती ज्या खेड्यात जन्मली तिथे शाळाही नव्हती तेव्हा चौथीच्या पुढे. शिवाय घरची गरिबी.

सकाळी कामं करून शाळेत जायची, तर जाताना काही खाऊन जाणं जमत नसणार, इतकी कामाची धावपळ. तेव्हा डबा वगैरे नेण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी तीन-चार वाजता घरी यायची, तेव्हा तिच्या वाटचा गुरगुट्या भाताचा थिजून गारगुट्ट झालेला वाटीएवढा गोळा केळीच्या पानाखाली झाकून ठेवलेला असायचा. तो जेवताना तिला काय वाटत असेल? कधीच्या काळी केळीचं पान बघायला मिळणार्‍या आम्हां शहरी मुलांना केळीच्या पानावरजेवण्याचं कोण आकर्षण. गरम अन्न केळीच्या पानावर वाढलं की त्या वाफेनं केळीच्या पानावर असलेलं एक मेणसदृश रसायन वितळतं आणि अन्नात मिसळतं. त्याचा विशिष्ट वास अन्नाला येतो. तो वास मला फार आवडतो. पण आजीला त्या वासानं कसंसंच होत असे. घरी काही विशेष समारंभ वगैरे असला, एकत्र जेवणं असली की भांडी घासायला कमी असावीत, म्हणून मुद्दाम केळीची पानं आणवून घेतलेली असायची. पण ती मात्र केळीच्या पानात कदापि जेवायची नाही. तिचं जेवण ताटात. त्या नकोसेपणामागे काय-काय असेल!

इतकं करून शाळेचं शिक्षण जेमतेम चौथी पास. ती राहून गेलेली हौस तिच्यात मूळ धरून राहिली असावी. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर तिनं खूप कष्ट केले. अंकगणितात तिला गती होती. आई सांगते त्यानुसार पार डीएडच्या अभ्यासक्रमातल्या अंकगणिताच्या अडचणी ती सोडवून देत असे. मामाला गणितात फारसा रस नसायचा. शाळेतून घरी आल्यावर तो आजीला बजावून ठेवायचा, “ही रीत बघून ठेव गं गणित सोडवायची. नंतर मी विसरीन. मग तू मला सांगायला हवीस.” मग ती रीत शिकून ठेवून आजी त्याचा अभ्यास घेणार! सातवी-आठवीपासून पुढच्या शिक्षणासाठी मुलांना कुठे नणंदेकडे रत्नागिरीत, कुठे बहिणीकडे भांडूपला राहायला ठेवून त्यांच्या शिक्षणाची सोय होईलसं तिनं पाहिलं. सगळ्यांत मोठी मुलगी हुशार होती. म्हणती तर डॉक्टर होती. पण तिलाच एकटीला शिकवत बसलं, तर बाकीच्या चार मुलांची शिक्षणं कशी व्हायची? या विचारानं मावशीचं मॅट्रिकचं शिक्षण होऊन तिला नीटस नोकरी मिळाल्या मिळाल्या आजीनं पाच मुलांना ठाण्यात बिर्‍हाड थाटून दिलं. तेव्हा एखादा ब्लॉकही स्वस्तात मिळाला असता. पण पाच मुलंच राहायची, सगळ्यात मोठी मुलगी एकोणीस वर्षांची. आजूबाजूला बरीशी सोबत हवी. स्वच्छता हवी. सुरक्षितता हवी. येणंजाणं फार गैरसोयीचं नको. बरं, भाडंही पुढे त्यांचं त्यांना कमावून परवडेलसं हवं. अशा सगळ्या विचारानं तिनं एका चाळीतली तळमजल्यावरची जागा निवडली. पागडी जास्त लागणार होती, तर स्वतःच्या बांगड्या विकल्या.

या सगळ्यातला तिचा धोरणीपणा, निर्णय घेताना न डगमगणं, दूरवरचा विचार करण्याची वृत्ती, व्यावहारिकपणा... हे सगळं तर थक्क करतंच. पण सगळ्याच्या तळाशी असलेली दिसते, ती तिची चांगल्या शिक्षणासाठीची कळकळ.

मुलांपैकी दोन शाळेत जाणारी, दोन कॉलेजच्या वयातली, एक मुलगी नुकती नोकरीला लागलेली. अशा पाचच्या पाचही मुलांना घरापासून दूर स्वतंत्र राहायला ठेवताना तिला काळजी वाटली नसेल? असणारच. लोकांनीपण काहीबाही ऐकवलं असेलच. पण आजीचीच धाकटी बहीण म्हणायची, “लोक काही तुम्ही काय जेवता ते बघाला येत नाहीत की करून घालाला येत नाहीत, आपला आपल्यालाच पिठलंभात कराचा असतो...” आजी तिचीच मोठी बहीण, कुणी काही बोललं असेलच, तर तिनं सरळ काणा डोळा केला असणार! गावातला कुणी एसटीत काम करणारा, कुणी अजून कसला चाकरमानी... तिचं सगळ्यांशी चांगलं. त्यांच्यातलं कुणी-कुणी या मुलांकडे चक्कर टाकून येऊन-जाऊन असायचं. त्यांच्याकरवी ती सतत मुलांसाठी काही ना काही पाठवत असायची. दारच्या अळवाच्या अळवड्यांचे शिजवलेले उंडे, कोहाळ्याच्या वड्या, आंब्याच्या रसाचा आटवून वाळवलेला गोळा, फणसाची साटं, खरवसाचा चीक... गावातल्या दवाखान्यातून सलाईनच्या मोठ्याशा बाटल्या आणून स्वच्छ धुवायची. त्यांची बुडं नि अंग रुंद असायची, तर गळे अगदी निरुंद. त्या बाटल्यांतून घरचं दूध किंचित विरजण घालून तेही पाठवायची.

तेव्हाच्या त्या काळजीनं उडून जाणार्‍या दिवसांतच तिला डायबेटिस सुरू झाला असेल का? काय ठाऊक.

दुर्दैवाची गोष्ट अशी की तिन्ही मामांना शिकण्यात फार गती नव्हती. हे कळेस्तोवर मुलींची शिक्षणाची वयं उलटून त्यांनी बर्‍याश्या नोकर्‍या धरल्या होत्या. पण यानं निराश-बिराश होईल तर ती आजी कसली! तेव्हाच्या आणि त्यापूर्वीच्या कोकणातल्या निम्नमध्यमवर्गीय वा मध्यमवर्गीय ब्राह्मण पुरुषांना एक शाळामास्तरकी, भिक्षुकी, नाहीतर किराणा मालाचं दुकान यापलीकडचा चौथा धंदा सुचलेला दिसत नाही. पण मामांनी रिक्षा चालवण्यापासून ते फिशरी चालवण्यापर्यंत, टेम्पो-ट्रक्स चालवण्यापासून ते पोल्ट्र्या चालवण्यापर्यंत, मासळीचं खत विकण्यापासून ते कौलं विकण्यापर्यंत... स-ग-ळे धंदे केले. सगळ्याला आजीचा सक्रिय पाठिंबा असायचा. पुढे मामानं पुष्कळ टेम्पो दाराशी उभे केले. पण त्याच्या पहिल्या रिक्षा-टेम्पोत चालवणार्‍या मामाच्या शेजारी, एक तृतीयांश सीटवर बसून फिरून आलेली आजी मला आठवते आणि तिचं अजब वाटतं.

आईची नोकरी सुरू झाल्यावर पहिलं मूल तिनं कसंबसं पाळणाघरं, प्रेमळ शेजारणी, वहिनीची आई... असं करून शाळेच्या वयाचं केलं. पण दुसर्‍या मुलाच्या वेळी मात्र हे सगळं करणं तिच्या जिवावर आलं. सासूनं हात वर केलेले. तेव्हा आजीच उभी राहिली. माझी धाकटी बहीण तीन महिन्यांची असताना आजी तिला घेऊन गेली आणि ती साडेतीन वर्षांची – शाळेच्या वयाची होईपर्यंत आजीजवळ राहिली. आईची नोकरी बिनघोर सुरू राहिली. आईबापापासून लांब आहे हो पोर!म्हणून तिची जी काही कोडकौतुकं त्या घरादारानं केली त्याबद्दल निराळं लिहावं लागेल! आजी! तू नि मीच फक्त झोपाळ्यावर बसायचं. बाकी कुण्णी नको!” हे किंवा “आजी! मी तुझ्या मांडीवर झोपणार. तू मागे भिंतीला टेकायचं नाहीस!” या आमच्या दोनवर्षीय बहिणाबाईंनी काढलेल्या फर्मानांच्या कथा अजूनही अर्धवट थट्टेनं – अर्धवट कौतुकानं सांगितल्या जातात, इतकं म्हणणं पुरे आहे!

तिच्या मुलांसाठी आणि मुलीच्या मुलांसाठी तिनं इतकं केलं. मग मुलांच्या मुलींना - नातींना तळ्यासारख्या गावातल्या शाळा थोड्याच पुरणार‍! त्या शाळेच्या वयाच्या झाल्या. मुलांचे गावातले धंदे जोरात. मग पन्नाशीपुढची आजी नि साठीतले आजोबा असे दोघं स्वतः शहरात चार नातींना घेऊन राहिले!

शिक्षणाची हौस... असं मी पुन्हापुन्हा म्हणते आहे खरी. पण आजीला एकूणच हौस पुष्कळ. तिची मुलंबाळं, पैपाहुणा, गडीमाणूस, शिवण, स्वैपाक... वगैरे बारदाना तिला दिवसभराला पुरवत असणार. पण रात्रीच्या जेवणानंतर हातावर पाणी पडलं की अडकित्त्या नि सुपारी घेऊन पुढल्या पडवीत निदान अर्धा तास तरी येऊन बसणं चुकत नसे. पुढल्या पडवीत एक पट्ट्यांची पाठ नि टेकायला हात असलेला, वापरून वापरून मऊ-गुळगुळीत झालेला डौलदार लाकडी बाक होता. त्या बाकात बसायला नि वारा खायलाआजी रात्री येऊन बसायची. तिथे गप्पा रंगायच्या. सारीपाटासारखा कवड्यांनी आणि फाशांनी खेळण्याचा एक खेळ ती आणि शेजारची नलूआजी, आणि आजीच्या दोघी नणंदा खेळत असत. तोही तासंतास चालणारा खेळ. मार्कडाव उर्फ तीनशे चार हा तर आमच्या घरातला फार लाडका डाव. काळ्या बिल्ल्यांचे चोरून लाल बिल्ले केले म्हणून एकमेकांच्या उरावर बसणार्‍या नातवंडांची भांडणं आजीनं बघितली असती, तर ती चिडली असती की आधी ओरडून मग कौतुकानं हळूच हसली असती, असा प्रश्न मला अनेकदा पडून गेला आहे. गावातले डॉक्टर घरी जेवायला असायचे. त्यांनी आणलेला चित्रलॅडिजचा खेळ, कॅरम, कवड्या नाहीतर खुब्या वापरून एकमेकांवर मात करण्याचा फरं-मरं नामक एक मजेशीर खेळअसं सगळं कायम चालू असायचं. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये घरी आलेल्या सगळ्या पोरासोरांसकट थोरांचा पत्त्यांचा डाव पडायचा. त्यात कुणीही खेळायला बसायची मुभा असायची. अट एकच – “खोटं खेळाचं नाही!”

साधं भरतकाम म्हणू नका, नाड्यांचे तुकडे जोडून केलेलं भरतकाम म्हणू नका, व्रतवैकल्यं म्हणू नका, नाटकं म्हणू नका, खेळ म्हणू नका, सासरमाहेरच्या नातेवाइकांना जीव लावून त्यांचं कष्टांनी-पैशांनी करणं म्हणू नका, तीर्थयात्रेपासून ते लग्नामुंजींपर्यंत आईबापापासून लांब असलेल्यानातीला खाकोटीला मारून भटकणं म्हणू नका... आजीची जीवनेच्छाच जबर. त्यात तिला आजोबांची तशीच साथ असायची. एकदा गावात बूड स्थिरावल्यानंतर ते गावाची वेस ओलांडून बाहेर पडायला फारसे उत्सुक नसायचे. पण तुला हवी तितकी तू भटक.” मुलांना मारायचं नाही” हे आजीचं सांगणं. डोक्यात मारून मुलांना इजा होऊ शकते, कानफटीत मारून तेच, पाठीत धबका जोरात बसला तर मूल तोंडावर आपटेल.... म्हणून मग आजोबांनी हिरकूट पैदा केलेला असायचा. मार म्हणजे गुडघ्याच्या खाली, पोटरीवर हिरकुटाची शिपटी, बास! कायम घरातली अंथरुणं घालण्यापासून ते आजी दमली तर तिच्या पायांना रॉकेल लावून मालीश करून देण्यापर्यंत सगळं काही आजोबा करायचे. वेळी विरजलेल्या सायीचं ताक करून, लोणी काढून, तूप कढवण्यापर्यंत सगळं.

त्या दोघांच्यातलं भांडण कधी पाहिलंच नाही, असं आई आणि तिची भावंडं एकमुखानं सांगतात. अनेक वर्षं ते दोघंच जण रात्री एक तरी डाव रमीचा खेळायचे. काहीतरी जादू व्हावी नि त्या दोघांच्या पानांमध्ये आळीपाळीनं डोकावत त्यांचा डाव बघता यावा, असं फार वाटतं.

क्रमशः

Monday, 15 July 2024

एक मोठी रेष...

सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री... सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानं-अप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही. ते अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकीपणी सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले... अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार?

मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल. 

सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णतः बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता... हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं. 

त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं. 

आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणार्‍या – समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात. 

सुनीताबाई तशा होत्या. 

त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण 'आहे मनोहर तरी' प्रकाशित झाल्याच्या अल्याडपल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. पुल या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणार्‍या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवर्‍याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं. 

'आहे मनोहर तरी'मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वतः पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. 'वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे,' या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा'च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर - कडवट नव्हे - भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दुःखं कळतील असं वाटलं होतं…’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्या पुस्तकातली 'आहे मनोहर तरी गमते उदास'मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती. 

दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना भय्या या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.      

पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याश्या प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणार्‍या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वतःच्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या - आणि खरं तर आजच्याही - स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवर्‍याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वतः निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं. 

हे जगावेगळं होतं.   

सुनीताबाईंनी आपल्या नवर्‍याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे - आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे - फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचाराचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला. 

पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वतःला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी  त्यांची संवेदनशक्ती... या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.   

पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो. 

न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार. 

त्या स्वतः सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वतःही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वतःशी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे! 

बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.

(लोकरंग, लोकसत्ता, १४ जुलै २०२४)

Monday, 8 July 2024

कधीतरी

ध्यानीमनी नसताना,
कधीतरी कुणीतरी गाणं ऐकवतं,
फलक, गुजारिश आणि चांद असलेलं,
अथपासून इतिपर्यंत गुलजार.
टाकतं तिरपा कटाक्ष तेजतर्रार...
जीव उगाचच कातर-कासावीस झालेला असताना,
थांबता थांबत नाही पावसाची संततधार.
ध्यानीमनी नसताना,
सळसळत येतात कुठूनसे कवितांचे जहरी सर्प...
सरता सरत नाहीत ठसठसत्या रात्री -
काळ्यानिळ्या, गप्पगार.

Saturday, 6 July 2024

आजीची गोष्ट ०४

(भाग ०३)

०४

ही गोष्ट माझ्या आजीची खरी. पण ती तिच्या एकटीची अर्थातच नव्हे. तिच्याकडे थोडं दुरून बघताना मला बाकीच्या सगळ्या गोष्टीही दिसत राहतात. त्या गोष्टी स्वतंत्र असल्या, तरी सुट्ट्या नव्हेत. त्या आजीच्या गोष्टीशी जोडलेल्या आहेत. किंबहुना तिनंच त्या निरनिराळ्या प्रकारे जोडून घेतलेल्या आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे आजीला तीन नणंदा. थोरल्या नणंदेनं आणि तिच्या नवर्‍यानं – राधा आणि अण्णा यांनी आजीचा संसार उभा करून दिलेला. गहू खरेदी करताना तो किती वेळ चावून बघावा नि त्याची गोडी नि चिकटपणा कसा पारखावा या विषयापासून ते आमच्या घरात सगळ्यांना प्रिय असलेल्या पत्त्यातल्या मार्कडावापर्यंत – अशा अण्णा आणि आजी यांच्या पुष्कळ गप्पा होत असत. त्यांची दोस्तीच होती असावी. अण्णांच्या मुली आणि उशिरा झालेल्या मुलग्यामध्ये पुष्कळ अंतर होतं. हा उशिरा झालेला भाचा आणि त्याची मामी – म्हणजे माझी आजी – यांचं अगदी कल्पनातीत गूळपीठ. दर सुट्टीत मामीकडे येणार्‍या या भाच्याचा तिच्यावर फार जीव होता. ती शिवणयंत्रावर बसलेली असली की तिला चहा करून देण्याचं काम त्याचं. त्याच्या चड्ड्या – लंगोट आणि पैरणीही मामीनंच शिवलेल्या असायच्या. तो कटिंग करून द्यायचा आणि मामी शिवून द्यायची. कौतुकाच्या, यशाच्या, दुःखाच्या सगळ्या गोष्टी येऊन तिला सांगायच्या. तो इंजिनिअर झाल्यावर निदान बाहेरच्यांसमोर तरी त्याला घरातल्या नावानं हाक न मारता नीट पूर्ण नावानं हाक मारावी, असं अण्णांना सुचवणारी आजीच.

तिचं लग्न होऊन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर तिनं आजोबांच्या पालगडातल्या मूळ घराची नीट माहिती करून घ्यायला सुरुवात केली. पालगडला गणपतीत मोठा उत्सव होत असे. अजूनही होत असेल. त्या उत्सवाला आजी दर वर्षी नेमानं हजेरी लावत असे, तिथली नाटकं हौसेनं बघत असे. तिचा तिथल्या अनेकांशी संपर्क असायचा. पुढे माझ्या धाकट्या मामानं ही उत्सवाची रीत पाळली. तो जाईपर्यंत दर वर्षी तोही न चुकता उत्सवाला जात असे. तो तसा कुटुंबातला आजीनंतरचा जनसंपर्क अधिकारीच म्हणायचा! पण हे नंतरचं झालं. आजी पालगडला जायला लागली, तेव्हा तिथे आजोबांच्या सावत्र चुलत भावाकडे उतरावं लागे. ते उभयपक्षी अप्रिय होत असावं. पण आजी जाताना शिध्यासकट सगळं सामान घेऊन जायची. एकदा आजी तिथे गेली असताना अण्णाही यायचे होते. अण्णांना चहा करून द्यायला म्हणून आजी स्वैपाकघरात गेली असता आजीची सावत्र पुतणी कमळी तिला खोचून म्हणली, “दे की काकू तो सकाळच्यातला. इथे उत्सवाला आलं की काम पडतं फार. इतकी कौतुकं कशाला?” त्यावर आजीनं “कमळ्ये, ते या घरचे जावई आहेत. आणि त्यांना ताजा चहा करून द्यायला मी शिधाही घेऊन आल्ये नि माझे हातही.” असं ठाम उत्तर दिलं होतं.  

आजीची दुसरी नणंदही खेडलाच एका सधन कुटुंबात दिलेली. घरची पुष्कळ शेतीवाडी होती. पण नवर्‍याच्या अंगी काही कर्तृत्व नव्हतं. बहुधा त्याला कामाला लावण्याच्या उद्देशानं तिनं त्याला भावाच्या घराजवळ स्वतंत्र बिर्‍हाड करायला लावलं आणि ती तळ्यात आली. धंदा? शेतीवाडी नसलेल्या आणि थोडकं भांडवलं असलेल्या कोकणातल्या ब्राह्मणांना जो आणि जितपत सुचे तोच. किराणा मालाचं दु-का-न. पण नवर्‍याचं यशापयश बघायची संधी तिला मिळालीच नाही. घरात काम करताना कधीतरी तिचा हात विळीवर चांगलाच कापला. तेव्हा गावात दवाखानाही नव्हता. तालुक्याहून एकदा डॉक्टर फेरी मारून जात असे. इंजेक्षन वगैरे कुठलं सुचायला नि मिळायला. तिला धनुर्वात झाला. खेडला नेईपर्यंत ती वाटेतच वारली.  

आजीची तिसरी नणंद – कुशी उर्फ कृष्णा – लग्नानंतर लगेचच काही वर्षांत विधवा झालेली. मूलबाळ नाही. पण तिच्या वागण्याबोलण्यात मिंधेपणा, कमीपणा अजिबात असलेला आठवत नाही. ती रत्नागिरीसारख्या शहराच्या ठिकाणी राहायला असायची हे कारण तर असेलच. पण नवर्‍यामागे काही वर्षांत मरून गेलेली सासरची माणसं आणि मग उत्पन्नाची चिंता न करता मुखत्यारपणी घर सांभाळण्याचं आणि निर्णय घेण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य हीदेखील कारणं असणार. आजीचं आणि राधाच्या धाकट्या मुलाचं जसं मेतकूट होतं, तसं राधाच्या थोरल्या मुलीच्या मुलांशी कुशीचं. राधाची थोरली लेक कुशीच्या शेजारीच राहायची. त्यामुळे तिची मुलं कुशीसमोरच वाढलेली. तिला त्यांच्याबद्दल विशेष ममत्व होतं. पण फक्त त्यांचंच नव्हे, कुशीनं येणार्‍याजाणार्‍या सगळ्यांचं आनंदानं केलं. आला-गेला, पै-पाहुणा, शिक्षणासाठी म्हणून कुणी येऊन राहिलेला विद्यार्थी, परीक्षेसाठी कुणी आलेला परीक्षार्थी, कसल्या सरकारी कामानं जिल्ह्याच्या ठिकाणी काम घेऊन आलेला कुणी परिचित... असं कुणीही तिच्याकडे पाहुणचार घेऊन जात असे. आजीच्या लेकीही शिक्षणासाठी कुशीच्या घरी राहिलेल्या. मी सगळ्यांचं सगळं केलंअसं ती किंचित अलिप्तपणे पण सूक्ष्म अभिमानानं म्हणतही असे. 

तिच्या म्हातारपणची आठवण उदास करून टाकते.

तिला होईनासं झाल्यावर तिनं तिचं घर विकून टाकलं. तोवर माझी आजी आणि आजोबा दोघंही देवाघरी गेले होते. त्या दोघांपैकी कुणीही असतं, तर घर विकल्यावर तिनं कुठं राहायचं हा प्रश्नच उद्भवता ना. पण ते नव्हते. घर विकल्यावर त्या व्यवहाराचे लाखावारी पैसे जवळ असताना आपल्याला कुणीही – म्हणजे राधाची मुलं-नातवंडं खरं तर – प्रेमानं बघतील, अशी तिची समजूत होती असावी. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. तसं तिला कधी कुणी तोंडावर म्हणालं नाही, पण एकाएकी उपटलेलं वृद्ध माणूस दोन-अडीच खोल्यांत सामावून घेणं थोडं जड गेलं असावं आणि तिला ते जाणवलं असावं. त्यानं ती अंतर्यामी दुखावली गेली. माझ्या आजीची मुलं – आई आणि मावशी – तिचं कर्तव्यभावनेनं करायला तयार असत. आजी असती, तर आपल्या नणंदेला तिनं इकडेतिकडे कुठेही जाऊ दिलं नसतं, ही खात्री त्यांच्या कर्तव्यभावनेच्या मुळाशी होती. पण कुशीला ते मनातून आवडत नसे. एकतर जावयांकडे राहणं म्हणजे... त्यात तिथली नातवंडं सवयीची आणि प्रेमाची नव्हेत आणि त्यांचे संस्कारही जुन्या वळणाचे नव्हेत. तिचे सतत सगळ्यांशी खटके उडत. आधुनिक विचाराच्या आई-मावशीशी वाद घालून तो जिंकायला ती पुरी पडत नसे आणि त्यांना काही पटवूनही देऊ शकत नसे. पण तिचे पीळही बदलण्यातले नव्हते. तुम्ही म्हणजे अगदी पुर्‍या पूर्णत्वाला गेलेल्या आहात हो! आम्हांला तुमच्यासारखं जमलं नाही.” असं ती थोड्या निरुपायानं आणि हताशेनं, कडवट होऊन म्हणत असे, ते मला अजूनही आठवतं. त्यात किंचित असूया मिसळलेली होती का? जन्म एकटीनं मुखत्यारपणी वावरण्यात गेलेला. जमवून घेणं शक्यच नसावं. प्रेमानं, हक्कानं राहवून घेणं तर सोडाच, पण आपण पैसे टाकले, की सगळं नीट होईलही तिची समजूतही खरी झाली नाही. तिला या अपेक्षाभंगाचा आणि नंतरच्या तडजोडीचा मनस्वी त्रास झाला असावा. त्यातूनच तिचं अल्सरचं दुखणं बळावलं असेल का? समजत नाही. व्हॅनिला आईस्क्रीम ती अतिशय आवडीनं खायची, इतकं आठवतं. हा भाचा, तो पुतण्या, असं करत काही वर्षं इथेतिथे राहण्यात गेल्यावर, शेवटी माझा मामा तिला तळ्याच्या घरी – माझ्या आजीच्या घरी घेऊन गेला. त्यामागेही प्रेम होतं असं म्हणवत नाही. ‘आई असती, तर तिनं हेच केलं असतं, ती नसताना मलाही केलं पाहिजेही ठाम कर्तव्यभावना मात्र नक्की होती. तिथेही तिचा वेळ वार्‍याशी भांडण्यात जाई. पुढेपुढे ती भ्रमिष्ट झाली. देहाच्या भुकांविषयी नाही-नाही ते वेडंवाकडं, आचकट-विचकट बोले. मला वृद्धाश्रमात नेऊन टाकाअसा हेका धरून बसल्यावर तिला तिथे नेऊन ठेवलं. तिथेच एकाकी अवस्थेत ती वारली.

नेमानं वर्तमानपत्रं वाचणारी, इकडेतिकडे हिंडाफिरायची मनापासून आवड असलेली, “माधुरी दीक्षित आमच्या रत्नागिरीची आहे हो!असं कौतुकानं सांगणारी ही आत्तेआजी. ती विलक्षण देखणी होती. तिच्या सत्तरीतही तिचा गोरापान-केतकी वर्ण आणि शेलाटा बांधा उठून दिसायचा. पूर्ण चंदेरी झालेल्या केसांचा नीटस अंबाडा बांधणं, नाजूक नक्षी असलेली, पांढरीशुभ्र, स्वच्छ सुती नऊवारी पातळं चापूनचोपून नेसणंतिचं राहणं आणि करणं-सवरणंही मोठं स्वच्छतेचं-निगुतीचं असायचं. नवीन गोष्टी शिकून घेण्याची हौस असायची. आजीकडे माहेरपणाला येताना अननसाच्या मोरंब्यासारखा, तेव्हा कोकणात नवलपरीचा असणारा पदार्थ, ती मुद्दाम करून आणत असे. तिच्या मोठ्याथोरल्या घराच्या पुढल्या अंगणापासून ते परसदारातल्या डेरेदार कृष्णावळ्याच्या अंगणापर्यंत सगळं स्वच्छ लोटून काढलेलं, देखणं सारवलेलं, लखलखीत नेटकं असायचं.  

नवरा पंचविशीत वारला, तेव्हा ती कितीश्या वर्षांची असेल? नवर्‍याकडून तिला मिळालेलं सुख म्हणजे तो गेल्यावर त्याच्या गैरहजेरीत मिळालेली मुखत्यारकी आणि आर्थिक स्वावलंबन – हेच काय ते. विधवा झालेल्या स्त्रियांच्या शरीरसुखाबद्दल बोलण्याचीही पद्धत आपल्याकडे नाही. तिच्याही ते कधी मनातही आलं नसणार. अवघं तरुणपण असं कुणाच्या डोळ्यात न येता, नीट रेषेवरून चालण्यात, शिस्त-वळण-सोज्ज्वळपण सिद्ध करत वावरण्यात, देवाधर्माचे-कीर्तना-पुराणांचे छंद लावून घेण्यात गेलं असेल. तिच्या काळाचा विचार करता तिला दुसरं काही करण्याचा पर्यायही नसावाच. तेव्हा स्वतःच्याही नकळत दाबून ठेवलेल्या देहाच्या भुका म्हातारपणी उसळून आल्या असतील?

तिच्या घरी तिनं स्वतःला पाणी प्यायला म्हणून मातीचा इवला खुजा घेतलेला होता. त्या खुज्याचा देखणा आकार, नाजूक डौलदार तोटी, कमानदार निमुळती मान... हे सगळं मला अजुनी आठवतं. आता माझी मावशीही तसाच खुजा कुठूनसा पैदा करून हौसेनं पाणी प्यायला वापरते. तेवढीच त्या आत्तेआजीची आठवण उरली आहे.

अशाच करड्या रंगाच्या गोष्टी आजीच्या आईच्या आणि बहिणींच्याही...

क्रमशः