Saturday, 29 December 2012

टू मिसेस वाल्या कोळी


सगळ्यांच्या पोटी
एकटं असायची भीती. 
नातेवाईक धरून ठेवणं. 
माणसं-बिणसं जोडणं-बिडणं. 
लोकांना रुचेल तसं(च) वागणं. 
सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं, 
तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं.
गोतावळ्यात रुतून बसणं.
वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,
गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं.

नाहीतर काय?
आपल्याच नाकात आपलेच पाय.
अपराधभावातून सुटका नाही.
समर्थन करताना 
दुसरा काय नि स्वत: काय,
समजुतीला पारावार नाही. 
जोरदार आणि समजूतदार समर्थन. 
'सारं काही सापेक्ष' असल्याचं स्पष्टीकरण. 
सगळंच सगळ्यांना रुचतं.
स्वत:सकट सार्‍यांना 
जेवणबिवण छान पचतं.

हे असं आहे खरं.
'असं का आहे?' विरून जातं. 
'असंच असतं'ची आळवणी,
मागून 'असंच चालणार' येतं.
विरोध संपला. 
ठिणगी संपली. 
संघर्ष संपला. 
चेतना संपली. 
सारं कसं शांत शांत.
टोटल बोअरिंग. 
एकदम निवांत.
कुणी कुणावर हल्लाबिल्ला केला
तर थोडी सनसनाटी.
स्वसंरक्षणासाठी
एखादी काठी.
सगळ्यांच्याच हाती.
एकटं पडायची भीती,
सगळ्यांच्याच पोटी.

यावर उपाय काय करावा?
एकान्ताचा वसा मनी धरावा.
खुशाल उतावे, खुशाल मातावे
तत्त्वाबित्त्वासाठी खुश्शाल भांडावे.
काही तोडून-मोडून घ्यावे,
काही सोबत जोडून घ्यावे.
काही वेचून फेकून द्यावे.
बरेच काही पोटी धरावे.
माणसे येतील, माणसे जातील,
आपण सुखें एकटे उरावे.
मिळतील थोडे सखे-सोयरे.
भांडा-तंटायला 
एकटे असायला,
न भिणारे.

जुन्या कविता



नव्यानं सुरू झालेल्या दिवसांच्या छाताडावर गुडघे रोवून.
नव्या आयुष्याच्या झिंज्या मुठीत पकडून.
ओळीत लावलेल्या दिनक्रमाची रासवटपणे कॉलर पकडून.
अनोळखी आविर्भावाला एक खणखणीत मुस्काटात खेचून.
फिरवलेल्या पाठीला एक आईवरची शिवी बिनदिक्कत हासडून.
सगळ्या सगळ्या बेईमानीवर थुंकून,
तुझ्या पौरुषावर उमटलेली माझी लाखबंद मोहर तुझ्याकडे परत मागितली -
तर तू कसा दिवाळखोरपणे रस्त्यावर येशील नाही?
जखमी झालेल्या तुला कुशीत घेऊन तुझ्या ओठांवर ओठ टेकू शकेन मी फक्त.
मग तरी उतरेल तुझ्या ओठांवर माझी ओळख?
सांग ना, मित्रा.

***

मातीत बी रुजतं तेव्हा माती असते का सजग?
की सर्जनाच्या आनंदात भिजत असते ती देहामनाच्या पार?
म्हणूनच,
म्हणूनच बीज असं रुजतं तिच्या गर्भात?
अशाच कुठल्यातरी पावसात.
मीही होते देहामनासकटच्या आनंदात अपरंपार.
तेव्हाच रुजत गेलास तू माझ्यात.
असण्या-नसण्याचं भान आलं, तोवर ओटीपोट टपोरलं होतं माझं.
पाहता पाहता आकारत गेलास माझं सर्वस्व व्यापत
आणि मग ते भीषण द्वंद्वही गेलं माझ्यात साकारत.

रुजलेल्या बीजानं अंकुरणं हा त्याचा देहधर्मच.
पण आपण मिळून ठेचून काढायचा ठरवला हा अंकुर.
तेव्हाच लिहिलं गेलं असेल आपलंही भवितव्य त्यासोबत?
ठरवून आयुष्याकडं निकरानं पाठ फिरवावी
तसे माघारी वळलो आपण.
आणि जगण्याची ही लसलसती इच्छा
थोपवून धरली आतल्याआत.
सोपं नाही,
नव्हतंच.
जगण्याचे अंकुर इतक्या सहजासहजी मरत नसतात,
कळायचं होतं आपल्याला.

आपल्याच असण्याच्या भिंतींना वेढत चिरफाळत आत वळलेला तो अंकुर.
आता गर्भपातही संभवत नाही मित्रा.
आणि जन्मही.

***

किती कविता तुझ्या हातात अल्लाद ठेवत गेले
हात पोळले तरी -
आता समजत नाही.
तू कधी स्पर्श तरी केलास का रे त्यांना?
की ती नुसतीच एखादी फॉरवर्डेड मेल होती तुझ्यालेखी?

कुणीतरी कुठेतरी लिहिलेली एक कविता.
त्यात रुजलेले माझे श्वास.
माझे स्पर्श.
दुसर्‍या कुणाची कविता आपल्या आत अशी हिरवाळते,
तेव्हा आपली होते ना ती?

तीच तर तुला पाठवली अनेक वार.
कधी संपृक्त बी.
कधी एखाद्या सुगंधी खोडाचा तुकडा.
कधी नव्हाळलेली ओलसर पानं.
कधी फुटावलेलं एखादं वयोवृद्ध मूळ.
फळांचा ऋतू आपल्यात कधी आलाच नाही,
एकदम मान्य.
पण,
फुलांचा तरी आला का रे?

आता माझी बोटं हिरवी नाहीत.
फक्त पोळल्याच्या काही खुणा.
आणि आपल्या कविता उगवल्यात का कुठेतरी,
की निर्वंश झाला आहे आपल्या जातीचा,
आणि एखाच्या नामशेष होणार्‍या प्रजातीच्या शेवटच्या स्पेसिमेनसारखे
नाहीसे व्हायचे आहे इथून निमूट?
असल्या प्रश्नांनी चिन्हांकित नजर.

तुझ्या बागेत कुठली कुठली झाडं आहेत, बाय दी वे?

***