वादात पडणं तसं फार शहाणपणाचं नव्हे.
पण कधीकधी आजूबाजूला उठलेला मतामतांचा गल्बला इतका तीव्र असतो आणि तरीही आपल्याला जे म्हणायचं आहे, नेमकं तेच सोडून, इतक्या भलभलत्या गोष्टींवर लोक भलभलतं व्यक्त होत असतात, की आपण तोंड उघडणं ही आपली निकड होऊन बसते. पण संदिग्धपणे हवेत तीर मारून मग ते योग्य ठिकाणी जावेत म्हणून प्रार्थना करत बसणं फारच वेळखाऊ नि बचावात्मकही वाटतं. त्यामुळे थेटच मुद्द्यावर येते. सचिन कुंडलकर यांनी त्यांच्या स्तंभलेखनातून
स्त्रीवादाबद्दल व्यक्त केलेली मतं, त्याला सुनील सुकथनकरांनी दिलेलं उत्तर आणि या सगळ्यावर उडालेला धुरळा यांमुळे हात शिवशिवताहेत.
गेली अनेक वर्षं मीही स्त्रीवादाबद्दल संमिश्र भावना मनात वागवल्या आहेत.
मी अशा वर्गात वाढले आणि अजूनही वावरते,
जिथे मूलभूत संघर्ष करण्याची वेळ फारशी येत नाही. माझ्यावर बाई म्हणून कोणतेही थेट अन्याय झाले नाहीत. मला माझ्या कुटुंबात वा समाजात कोणतीही थेट बंड करावी लागलेली नाहीत. स्वातंत्र्य या गोष्टीसाठी मला कधीही झगडावं लागलेलं नाही. मला अनेकच गोष्टी आयत्या आणि सहज मिळाल्या. मला शिक्षणासाठी झगडावं लागलेलं नाही. माझ्यावर लग्नाची वा इतर जबरदस्ती झालेली नाही. रस्त्यातून जाताना कुणीसं गलिच्छ नजरेनं पाहण्याचा वा हात लावण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही.
या पार्श्वभूमीमुळे वरवर पाहता स्त्रीच्या दडपणुकीबद्दल मी काही बोलणं खरंतर फारसं सुसंगत असणार नाही.
पण वरवर दिसतं आहे, तितकं हे सहजसोपं नाही. मी आणि माझ्यासारख्या
अनेक जणी या परिस्थितीपर्यंत येऊन पोचल्या आहेत,
त्यामागे कुणीतरी कधीतरी केलेलं बंड आहे. शिक्षण, मतदान, मनासारखा वेश, आपल्या जीवनाबद्दलचे-शरीराबद्दलचे मूलभूत अधिकार... या स-ग-ळ्या गोष्टींसाठी कुणी ना कुणी, कधी ना कधी केलेलं बंड आहे. आज ज्याला लोक आक्रस्ताळेपणा
म्हणतात, तशा आक्रस्ताळेपणानं आणि कोण काय म्हणेल याची बूज न राखता त्याचा उघडपणे केलेला उच्चार आहे. त्याचे तत्कालीन समाजात जे पडसाद उमटले, ते त्या माणसांनी सोसले आहेत वा परतवले आहेत वा त्यातून मार्ग काढत त्यातून एक नवी पायरी गाठली आहे. मला असाही प्रश्न पडलाच एका टप्प्यावर, की मी हे सगळं रोज का स्मरायचं? 'गायमाउली क्षीरमाउली देते, तिला वंदन करून क्षीरमाउलीचं प्राशन करू या'छाप कृतज्ञतेची टिंगल उडवण्यात मीही अहमहमिकेनं सहभागी झाले आहे. मग या कृतज्ञतेचं महत्त्व काय?
तर
- एक म्हणजे मी आणि माझ्यासारखे काही जण-जणी इथवर येऊन पोचले, म्हणजे सगळा समाज इथे येऊन पोचला असा त्याचा अर्थ होत नाही. दोन प्रकारे आपण अजूनही मागे आहोत. एक तर सवर्णेतर आणि / किंवा ग्रामीण आणि /
किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय ते अतिगरीब समाजांमध्ये माझ्याइतकी सोयीस्कर आणि सुखवस्तू जागा बाईला आजही लाभत नाही. तिथले लढे अजूनही पुष्कळ प्राथमिक पातळीवरचे, धारदार, मानेवर सुरी ठेवणारे आहेत. गरीब ग्रामीण दलित मुलीला आणि गरीब ग्रामीण दलित मुलाला शिक्षण घ्यायचं असेल, तर ते कुणाला कमी कष्टांत मिळेल हे अजूनही स्वयंस्पष्टच आहे. दुसरं म्हणजे - जरी माझ्यासारख्या
लोकांनी भौतिक पातळीवर समानतेची एक दृश्य पातळी गाठलेली असली,
तरीही हे चित्र वरवरचं आहे. सांस्कृतिक संदर्भ तपासले असता; थोडं खोलात जाऊन, थोडं कडेला जाऊन तपासलं असता; ढोबळ उदाहरणं न घेता जरा आडबाजूचे आणि 'ट्रिकी' प्रश्न तपासले असता - माझ्याही सामाजिक स्तरात संपूर्ण समता आल्याचं दिसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आधुनिकता आल्यावर मी सहजी सिगारेट ओढू शकते. सहजी अर्ध्या चड्डीत फिरू शकते. पण लग्न न करता मला एक मूल दत्तक घ्यायचं झालं, तर मला हे सहजासहजी करता येतं का? कागदोपत्री मला मार्ग सहजसाध्य असला, तरी कायदा चालवणारी वा वापरणारी जी हाडामांसाची माणसं असतात, ती मला पदोपदी अडथळे आणतात. त्याहून कमी धीट आणि साधं उदाहरण द्यायचं झालं, तर पुरणपोळी करता येणं हे बाई म्हणून माझ्यावर असलेलं सांस्कृतिक दडपण आहे असं मी म्हटलं, तर मला भलेभले लोक अजूनही तर्कहीन पद्धतीनं, आपल्या विचारातल्या विसंगतीचा विचारही न करता फांदाडतात. मी व्यक्ती म्हणून जरी एकविसाव्या शतकात वावरत असले, तरीही माझ्यासोबतचे अनेक लोक - पर्यायानं माझं अंशतः भवताल मधून मधून अठराव्या वा एकोणिसाव्या शतकात पाय ठेवून असतं आणि याची निराळी दडपणं असतात. सूक्ष्म असतात. प्राणघातक नसतात. पण अ-स-ता-त.
त्यांचा
बाऊ मी किती करायचा,
हा व्यक्ती म्हणून माझ्या शहाणपणाचा भाग आहे आणि तो व्यक्तीपरत्वे
अर्थातच बदलेल.
पण परिस्थिती संपूर्णतः समतेची आहे काय? तर ती असावी की नसावी, असणं स्वप्नवत आहे की वास्तववादी हे प्रश्न बाजूला ठेवून आपण इतकं मान्य करू; की स्त्रीपुरुषसमता अस्तित्वात नाही.
अशा परिस्थितीत निरनिराळ्या पेचप्रसंगी मला ऐतिहासिक परिस्थितीशी आणि तत्कालीन निर्णयांशी तुलना करून पाहणं क्रमप्राप्त असतं. ती करण्याचे रस्ते मला कृतज्ञतेतून - किंवा कमी भावुक-कमी भाविक शब्द वापरायचा झाला, तर इतिहासाच्या स्मरणातून - मिळतात. त्यामुळे मला ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले, आगरकर, कर्वे इत्यादी लोकांचं स्मरण पुसलं न जाणं महत्त्वाचं वाटतं.
आता सगळे जण काही माझ्याइतके शहाणे नि प्रांजळ नसणार.
(होय, हसलात तरी चालेल. हा एक सेमी-विनोद होता!) त्यामुळे काही जण या भेदांचा बाऊ करणारे असणार. काही जण या भेदांचं भांडवल करणारे असणार. काही जण त्यातून मिळणार्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणारे असणार. काही जण ठामपणाला वळसा घालून नुसताच आक्रस्ताळेपणा
करणारे असणार.
काही जण विचाराचा गाभा समजून न घेता निव्वळ शब्दावर बोट ठेवून वाद घालणारे असणार... हे सगळं असणारच. पण मुद्दा असा आहे, की हे फक्त स्त्रीवादी चळवळीतच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक बदलाच्या चळवळीच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर असणारच! आरक्षणाचा गैरफायदा घेणारे लोक असणार. हुंडाविरोधी कायद्याचा गैरफायदा घेऊन पुरुषांना लुबाडणारे लोक असणार. मानवी स्वभावाचा तो विशेषच आहे. पण त्याचं प्रमाण असं कितीसं आहे? किती सीमित भागात आणि समाजांत आहे? त्यापलीकडे काय दिसतं? खरवडलं असता काय दिसतं? या प्रश्नांचा विचार न करता त्यावर बोट ठेवून आपण नक्की काय सिद्ध आणि साध्य करू पाहतो आहोत?
अर्थातच
- प्रश्न विचारण्याला ना नाहीच.
तो कोणत्याही माणसाचा अधिकारच आहे. मीही प्रश्न विचारतेच, की लग्न आणि मूल ही जोखडं आहेत, ही भाषा स्त्रीवादानं आता का सोडू नये? पुनरुत्पादन करू पाहणारा एक सजीव म्हणून या गोष्टी मला कराव्याश्या वाटतात, हे स्त्रीवाद्यांनी मान्य करायला काय हरकत आहे? पुरुष या प्राण्याला निव्वळ खलनायक ठरवून आपण निव्वळ भूमिकांमध्ये अदलाबदल करण्यापेक्षा सहजीवनाचा विचार करणारे, वा निदान प्रणयाराधनाबाहेर तरी लिंगनिरपेक्ष होऊ पाहणारे,
जीव होण्याकडे आपली वाटचाल असायला नको का? पुरुषाची प्रणयप्रेरणा ही जोवर व्यक्ती म्हणून असलेल्या माझ्या भौतिक वर्तुळावर आक्रमण करत नाही, तोवर मी त्या प्रेरणेला शोषण का म्हणावं? पुरुषाला शारीर इच्छा आहेत आणि त्यानं त्या व्यक्त करणं म्हणजे थेट माझ्यावर बलात्कारच करणं आहे, अशी बोंब ठोकणं मी बंद का करू नये? स्वावलंबन आणि अर्थार्जन हे मी सबलीकरण म्हणून का वापरू नयेत? गेल्या आणि गेल्याच्या गेल्या पिढीत बायांनी केलेला त्याग वा त्यांच्यावर झालेला अन्याय गहाण टाकून मी कुठवर माझं तथाकथित सबलीकरण साधणार आहे? बाजार बाई म्हणून माझ्यावर अन्याय करत असेल, तर माझ्या मित्रावरही तो निराळ्या प्रकारे करतोच आहे हे मी कधी ओळखणार आहे?
हे सगळे प्रश्न मीही विचारतेच आहे. आणि ते कोणत्याही 'वादी' लोकांनी स्वतःला आणि आपापल्या वादाला विचारावेतच. तिथे देव्हारे माजवता उपयोग नाही.
पण कृपा करून काही नमुनेदार लोकांची टर उडवण्याचं निमित्त करून पूर्ण चळवळीलाच मोडीत काढू नये. थोडी जबाबदारी बाळगून लिहावं. सरसकटीकरणाच्या मोहातून अर्कचित्र काढत सुटणं हे लेखक म्हणून किती सवंग आणि आत्मघातकी आहे, हे तर झालंच. पण माणूस म्हणून हे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणारं आहे, याबद्दल तरी शंका नसावी.