Friday, 5 June 2020

लायब्र्यांचे दिवस ५

कागदी पुस्तकांशी असलेलं पातिव्रत्य सोडून मला पहिला व्हर्चुअल व्यभिचार करायला लावला तो हॅरी पॉटरच्या अखेरच्या भागानं. जगभर पुस्तक प्रकाशित झालंय, लोक वाचतायत, पण आपल्याला वीकान्तापर्यंत प्रत मिळणार नाही हे असह्य होऊन मी मिळेल तिकडे सॉफ्टकॉपी हुडकायला सुरुवात केली. 'शोधेल तो पाणी चाखेल' या इंटरनेट ॲक्टान्वये मला ती मिळालीही. फक्त रिक्षा, ट्रेन, टॅक्सीतच नव्हे, तर हापिसातही राजरोस पडफ उघडता येणे या फायद्याची चव कळल्यानंतर तर मला पापाची चटकच लागली. 

पायरसी चूक की बरोबर या वादात मी पडणार नाही. त्याची उत्तरं ज्यानंत्यानं आपापली शोधावीत, समर्थावीत आणि पचवावीत. मराठी पुस्तकांवर मिळकतीचा अमुक एक हिस्सा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे महाशहरातल्या इंच-इंच-लढवू घरातली तमुक इतकी जागा खर्चत असताना इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत तरी आपण थोडा बाहेरख्यालीपणा करावा अशी सूट मी मात्र मला देऊन घेतली आणि मग कायच्या काय एकेक मरुद्यानं सापडत गेली. इंग्रजीतलं माझं बहुतांश वाचन चाटकॉर्नरीच असे आणि असतंही. त्यामुळे मला कागदी प्रतींची तहान नसे. तरी मधूनमधून 'हारून ॲण्ड दी सी ऑफ स्टोरीज्' किंवा 'हॅंडमेड्स टेल'सारखी गाळीव रत्नं सापडतच. मग 'हे पुस्तक तरी कागदी हवंच आपल्याकडे' असं वाटून कागदी पुस्तकं घरी येत. माझ्या इंग्रजी वाचनात अशी माणकं विरळा असल्यामुळे जागेचं कसंबसं निभलं म्हणायचं. 

पण पुस्तकांच्या बरोबरीनं ब्लॉग्स, टम्ब्लर्स, फॅनफिक्स असं वाचन वाढत गेलं, तसतशा निराळ्या अडचणी सतावायला लागल्या. खरं फॅनफिक्स हे अस्सल ऑनलाईन वाचन. पण त्यातही काही फॅनफिक्स इ-त-क्या आवडल्या, की मी चक्क पानाला आठाणे देऊन त्या छापवून नि बांधवून घेतल्या. अर्थात, हा अंमळ चोचलाच म्हणायचा. तो अपवादात्मक म्हणून सोडून दिला नि कागदी साठेबाजी रद्दबातल मानली, तरी सतत अद्ययावत होणाऱ्या ऑनलाईन गोष्टींचा माग काढणे आणि आपल्या संदर्भासाठी त्यांच्या नोंदी ठेवणे ही एक गरज होऊन बसली. गूगलचा रीडर होता तोवर चिंता नव्हती. तिथे एकदा ब्लॉगलिंक डकवली, की तो इमानेइतबारे खबरबात आणि दप्तरखानाही राखून असे. पण गूगलच्या 'खपतं ते विकणार नाही' या पुणेरी धोरणानुसार रीडर अंतर्धान पावला आणि पंचाईत व्हायला लागली. मग आपली कस्टमाइज्ड व्यवस्था आपली आपण राखणं आलं. बरं, पुस्तकांच्याही बाबतीत इंटरनेटवर फक्त पायरेटेड सॉफ्टकॉप्याच मिळत असं नव्हे. हळूहळू प्रताधिकार कायद्याबाहेर निसटलेल्या अनेक जुन्या मराठी-इंग्रजी पुस्तकांच्या प्रतीही ठिकठिकाणी चढवल्या जायला लागल्या. दर काही महिन्यांनी 'अमक्या ठिकाणी बराच माल आला आहे' अशी टीप कुणीतरी समानधर्मी देई आणि मग बरेच दिवस तिथला माल हुडकत बसण्यात नि इतरांना वेचक मालाच्या खबरी पुरवण्यात जात. 'किशोर'सारख्या मासिकानं आपलं सगळं जुनं दप्तर जालावर आणलं, तेव्हा तर 'घेता किती घेशील दो करांनी…' अशी अवस्था. काही हौशी आणि संचयी मित्रांच्या सल्ल्यानं ड्राइव्हवरची चकटफू जागा वापरून या सरकारी मालाचा ब्याकप घेण्याचेही धंदे केले. हो, अनेक पारिभाषिक कोश देणारं एक सरकारी संस्थळ अकस्मात दगावलं किंवा काही दिवस इंटरनेटवर वसून मराठी 'चांदोबा' एकाएकी पंचतत्त्वांत विलीन झाला, तसे फट म्हणता अंक गायबले म्हणजे हो?

पण असल्या व्यवस्था करूनही - योग्य वेळी योग्य लिंका आणि योग्य पडफस्रोत हाती लाभण्याकरता माणसांवर अवलंबून राहण्याला पर्याय नाही, हे माझ्या लक्ष्यात यायला लागलं, ते वाचन अद्ययावत राखून असणाऱ्या काही शेलक्या व्हर्चुअल मैत्रांच्या मागावर राहिल्याचे फायदे भोगल्यावर. त्याच सुमारास एका टम्ब्लर लेखिकेचं एक टपोरं सुभाषित नजरेस पडलं. ही लेखिका व्यवसायानं ग्रंथपाल. फॅनफिक्स लिहिणं, वाचणं, वेचक गोष्टींच्या शिफारशी करणं आणि त्यांबद्दल गप्पा छाटणं हा छंद. तिच्या मते अचूक हॅशटॅग लिहिणं आणि डकवणं हे परीकथेतल्या ब्रेडक्रम्स टाकत आपला माग सोडण्याच्या क्लृप्तीसारखंच कौशल्याचं आणि मोलाचं असतं. किंबहुना हे ज्याला जमलं, तो आजच्या युगातला ग्रंथपालच.

हे वाचून मान डोलावली. इथल्या अमूर्त ग्रंथालयांबद्दल नि अनामिक ग्रंथपालांबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढची लिंक क्लिकवली.

Thursday, 4 June 2020

लायब्र्यांचे दिवस ४

शाळेत असतानाची बहुतेक वर्षं घरातल्यांचा मुख्य जाच जर काही असेल, तर तो म्हणजे हक्काची लायब्ररी नसणे. लहान मुलांची पुस्तकं पुरेनाशी झालेली आणि मोठ्यांची पुस्तकं वाचायला सेन्सॉर बोर्ड. परिणामी कुणीतरी भेट दिल्याशिवाय, कुण्या जबाबदार जाणत्या माणसानं सुचवल्याशिवाय, वा आईबापांनी वाचून संमत केल्याशिवाय पुस्तकं हाती लागत नसत. पण पुस्तकांकरता तर मी सदैव बुभुक्षित असे. आणि तत्कालीन मराठी लोकांच्यात सोज्ज्वळ संस्कार करू शकणारं साहित्य म्हणून मान्यता पावलेली पुस्तकंच आधी आणि अल्लाद हातात पडत. अर्थात माझी त्यांबद्दल तक्रार नव्हती. तेव्हा मिळेल ते सगळंच गोड लागण्याचे दिवस होते. पण त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या, चरित्रं, आत्मचरित्रं… असला निवडक कडबाच आधी हातात मिळत गेला, असं आता लक्ष्यात येतं. 

'स्वामी' ही कादंबरी बरी आहे की वाईट आहे ही चर्चा आपण बाजूला ठेवू. पण शाळकरी मुलांनी ती वाचावी का, याचं उत्तर मला आज निस्संदिग्धपणे हो असं देता येत नाही. सती जाण्याचं उदात्तीकरण वाईट हा तथाकथित 'फुरोगामी' मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी त्या गोष्टीत यत्ता पाचवी-सहावीतल्या मुलीला भावण्यासारखं काय आहे? वाचणारी माणसं - मग ती वयाने कितीही लहान का असेनात - ती त्यांच्या क्षमतेनुसार दिसेल ते ते भक्ष्यत सुटतात, शोषून घेतात आणि काहीतरी अंगी लावून घेतातच हे जरी खरं असलं, तरी मी काही आज पौगंडवयीन मुलांना ही कादंबरी सुचवणार नाही. नि हे तरी 'स्वामी'बद्दल झालं. 'ययाती'? का? का? का? पण 'स्वामी', 'मृत्युंजय', 'ययाती' या तीन एकमेकांशी साहित्यप्रकाराच्या अंगाने आणि साहित्यिक काळाच्या अंगानेही अर्थाअर्थी संबंध नसलेल्या आणि कुठल्याही प्रकारे मुलांसाठी नसलेल्या कादंबऱ्यांचं त्रिकूट अगोचर वाचणाऱ्या मुलांना सुचवण्याची प्रथा आजही मराठी माणसांच्यात आहे.


तशी शाळेला सुरेख लायब्ररी होती. पण ती मुलांसाठी वापरण्याची मात्र प्रथा नव्हती. बहुतकरून शिक्षकच तिचा वापर करत. शाळेच्या सगळ्या मिळून दहा वर्षांत एकदा कधीतरी कुणा तरुण शिक्षकांनी ऑफ तासाला एकेक पुस्तक हातात देऊन वाचा, अशी ऑफर दिल्याची आठवते. एरवी पुस्तकांनी खचाखच भरलेल्या कपाटांकडे आशाळभूतपणे फक्त पाहणे. माझ्या पालकांची शाळेत ओळख असल्याकारणे मला लायब्रीचा फायदा मिळे. पण तिथेही काही विशिष्ट पुस्तकंच थोर मानली जात. आणि तीही मिळायची, ती फक्त दिवाळीच्या वा उन्हाळ्याच्या सुट्टीत. आमच्या शाळासमूहामध्ये इतरही काही शाळा होत्या. पालकांच्या ओळखीचा फायदा घेऊन मी त्यांच्याही लायब्र्या पालथ्या घातल्या. सगळीकडे माझ्या वाचनाचं एक पारंपरिक आणि अपरंपार कौतुक - जे मी पथ्यावर पाडून घेऊन त्याचा नीट वापर करायला शिकले - आणि माझ्यावर संस्कार घडवण्याची एक जबाबदारी घेऊन वावरणारे लोक भेटत. मग रत्नाकर मतकरींचं 'ॲडम' चुकून माझ्या हाती लागलंच, तर कसनुसं होऊन ते घाईघाईनं काढून घेणे, 'पॅपिलॉन' मी वाचावं की नाही याबद्दल भवति न भवति होऊन माझ्या मनात त्याबद्दल अतीव उत्सुकता निर्माण करून ठेवणे, चरित्रांमुळे चांगले संस्कार होतात या समजुतीपायी हाती लागतील ती चरित्रं माझ्या हाती कोंबणे… असल्या लिळा होत.

उन्हाळी सुट्ट्यांच्यात लायब्ररी 'लावली', तरीही तिथेही हा प्रश्न उद्भवेच. मला अधिकृतरीत्या उपलब्ध असे, तो बालविभाग. आणि त्यात मी कसाबसाच जीव रमवून घेई. मग्रसंसारख्या अवाढव्य लायब्रीच्या बालविभागातही भारा आणि इतर काही मंडळीच कसाबसा किल्ला लढवत असत. तीही जेमतेम दोन बाय दोन फुटाच्या लाकडी खोक्यात. तुका म्हणे त्यातल्या त्यात तेच ते उचकत त्यातून मनाजोगतं वाचायला शोधताना चरफडाट होई. 

पण त्यामुळेच मी काय वाट्टेल ते वाचायला लागले. हे चांगलं झालं की वाईट झालं हे मला आजही ठरवता येत नाही. बालसाहित्य असं काही आखीवरेखीव, मापात-चौकटीत, बांधीवतोलीव असावं का, असतं का, या प्रश्नाचं उत्तरही मला कुठल्याच बाजूनं ठामपणे देता येत नाही ते त्यामुळेच असावं.


०१०२ ०३ । ०४ । ०५


Wednesday, 3 June 2020

लायब्र्यांचे‌‌ दिवस ३

लायब्री म्हटल्यावर वास्तविक पुस्तकं आठवावीत. पण माझ्या गावातल्या मग्रसंच्या बाबतीत पुस्तकं ही एक गृहीत धरलेली बाब आहे. सरकारी लायब्र्यांमधली पुस्तकं जुनाट, पिवळी पडलेली, जीर्ण, फाटकीतुटकी असतात, वाचावीशी वाटत नाहीत… वगैरे राजपुत्री तक्रारी करणार्‍या लोकांशी वाद घालण्याच्या अजिबात फंदात न पडता – अर्थात. असल्या लोकांना बहुतकरून ‘मी आजवर १७३ पुस्तकं वाचलीत’ वगैरे हिशेब ठेवायची सवय असते आणि जनरली ते ‘दिल चाहता है’मधल्या सुबोध-कॅटेगरीत मोडतात. असल्यांच्या तोंडी कुठला शहाणा मनुष्य लागेल? असो. डायवर्जन लांबलं. तर, त्यांच्या फंदात न पडता – मी सरकारी लायब्री हा माझ्या वाचनाचा मुख्य स्रोत ठरवून सुखी झाले खरी.
उदाहरणार्थ, त्यांच्याकडची पुस्तक निवडण्याची व्यवस्था. पुस्तकांना थेट हात लावून, पान पलटून, मलपृष्ठावरचा मजकूर वाचूनबिचून पुस्तकं निवडण्याची जगन्मान्य पद्धत मग्रसंला मान्य असत नाही. साधारण चपला-बूट ज्या खोकांतून मिळतात, त्या खोक्यांच्या आकाराचे लाकडी खोके आणि त्यात पुस्तक, लेखक, किंमत, पृष्ठसंख्या इ. नोंदलेली पोस्टकार्डाच्या आकाराची आडवी कार्डं. पुस्तकांचं वर्गीकरण – उदा. कादंबरी, संकीर्ण, कविता, नाटक, निबंध, चरित्र... – दर्शवणारा एक मोठा पुठ्ठा खोक्याच्या पाठीशी उभा खोचलेला. असे वीस-पंचवीस खोके टेबलावर हारीनं लावलेले. लोकांनी या खोक्यांमधली कार्डं पेटीच्या भात्यासारखी ओढून वाचत आपल्याला हवी ती दोन – दोनच हं, लाडात यायचं नाही – कार्ड निवडून काउंटरवर नेऊन द्यायची. मग देवघेव विभागातला कर्मचारी ती कार्ड घेऊन मागच्या कपाटांच्या रांगांत गडप होणार. जर पुस्तक तुलनेनं नवं असेल, तर त्याला फार खोल सुळकांडी मारावी लागत नाही. पण जर ते पुस्तक बाबा आदमच्या जमान्यातलं असेल, तर बुडी मारण्यापूर्वी मारक्या म्हशीसारखा एक कटाक्ष भेटीदाखल दिला जातो. आपण अपराधी लोचटपणानं तस्सं उभं राहायचं. ती पुस्तकं गहाळ नसतील, तर ती तुमच्या पुढ्यात यथावकाश दाखल होतील. मग त्यांतलं एक निवडून घ्यायचं. तुम्ही पुस्तक नेलंत की निवडलेलं कार्ड आत जमा होतं, जेणेकरून ते लायब्रीत परत जमा होईस्तो इतरांना लोकांना निवडता येऊ नये. व्यवस्था चोख. पण एकदा घरी नेलेल्या पुस्तकात खुपसलेली दुसर्याच कुठल्यातरी पुस्तकांची दोन कार्डं हाती आल्यावर या व्यवस्थेतला घपला माझ्या लक्ष्यात आला. आपल्याला आवडतीलशी तीन कार्डं एकदम मिळाली, तर चक्क ती लांबवायची, म्हणजे मग पुढचे तीन दिवस कार्ड हुडकायचे कष्ट नकोत! हे भलतंच आवडूनही मला ही ट्रिक वापरायचा धीर काही कधी झाला नाही! आमची मजल आपली सगळ्या खोक्यांमधली कार्डं पलटून ‘शास्त्र चुंबनाचे’, ‘लक्ष्मी, लक्ष्मी, कुठे चाललीस?’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ आणि तत्सम नावं माफक मोठ्यांदा वाचून दाखवून खुसफुसण्यापर्यंतच.
दर साली दिवाळी आटपून महिना-दोन महिने उलटले की दिवाळी अंक विकून टाकण्यासाठी लागणारा मग्रसंचा बंपर सेल ही त्यांच्या खाती जमा असलेली एक रोमहर्षक बाब. दहा आणि पंधरा रुपयांत मिळणारे दिवाळी अंक ही माझ्या विद्यार्थी खिश्याकरता चैनीची परमावधी होती. कित्तीतरी वर्षं मी या संधीत अक्षरशः हात धुऊन घेतले. महिनाभराचं वाणसामान आणण्याच्या दोन दणकट खाकी पिशव्या घेऊन मी लुटीला जाई आणि गोड ओझं वागवत हवेवर तरंगतच घरी पोहोचे.
पारंपरिक आणि जुन्या घरांना पडव्या-पोटपडव्या पाडून वाढवल्यामुळे त्यांना जसे विशिष्ट भोंगळ-प्रेमळ-अमिबाई आकार आलेले असतात, तशा आकारांच्या अघळपघळ इमारतींतून गावातल्या मग्रसंच्या दोन्ही शाखा नांदत. त्यांची उंच कौलारू छतं, वर्षानुवर्षांच्या वापरानंच होऊ शकतात तसे गुळगुळीत झालेले लोणकट लाकडी जिने, जुन्या शहाबादी फरश्या, लोकमान्य टिळकांची आठवण करून देणार्‍या संस्थापककालीन देणगीदारांच्या काळ्यापांढर्‍या तसबिरी, उंच पाठींची लाकडी बाकडी, तिथे बसणारी रिकामटवळी पेन्शनर मंडळी, तिथल्या सभागृहांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिथे हमखास भेटणारे गावातले उत्साही लोक, रुक्षपणाचा साक्षात अर्क म्हणावा असा कर्मचारिवर्ग, अपरिहार्यपणे त्यांच्याशी भांडणं केल्यावर ‘फूंक फूंक के रखने पडनेवाले कदम’ नि ओळख झाल्यावर होणारे लाड... आणि सरतेशेवती तिथली कितीकांनी शेरेबाजी केलेली, चिताडून ठेवलेली, पुन्हा पुन्हा बांधणी केल्यामुळे ओळीतल्या शेवटच्या शब्दापर्यंत पोचण्याकरता हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार्‍या नृसिंहाचा अवतार घ्यायला लावणारी, जुनी, नवी, पिवळी, पांढरी, फाटकी, गुलाबी बायंडिंगातली,… अक्षरशः अंतहीन पुस्तकं... हे सगळं मी पुरेपूर उपभोगलं.
लायब्री जुन्या इमारतीत नांदत असताना, इमारतीच्या बाहेरून काढलेला एक डुगडुगता माडीवजा जिना संदर्भविभागात नेत असे. तो साक्षात स्वर्ग होता. तिथलं बुटकं छत, जुन्या कपाटांच्या अंतहीन रांगा, तिथे भरून राहिलेला अस्सल जुन्या पुस्तकांचा धुळकट वास, पाणी प्यायला भीती वाटावी असा एक प्राचीन माठ, शंभरेक वर्षांच्या कालखंडात जमा होत गेलेली निरनिराळ्या आकारांची नि शैलीतली लाकडी नि धातूची खुर्च्या-टेबलं, नुसतं नावं नोंदून सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट्टेल ती पुस्तकं वाचत बसण्याची मुभा...
अलीकडे काही कामानिमित्त नव्या इमारतीच्या संदर्भ विभागात गेले असता तिथे बॅंकेच्या कॅशियर काउंटरला लाज आणेल असा एक जाळीदार-कुलूपबंद-अद्ययावत काउंटर, अनेक कॉम्प्युटरांचे जुनाट डबे ठेवल्यामुळे सगळ्या संदर्भविभागाला आलेली स्वस्त सायबर कॅफेची कळा, आणि ‘बाहेर बसण्यासाठीच्या जागा संपल्या आहेत, पुढच्या वर्षी प्रयत्न करावा’ ही पाटी पाहिली.
मी अक्षरशः हाय खाऊन परतले.

०१०२ । ०३ । ०४ । ०५

Monday, 1 June 2020

लायब्र्यांचे‌‌ दिवस २




आपल्या हक्काच्या शहरात असताना नाक वर करून, भवतालाला गृहीत धरून, आपल्याच तंद्रीत सुखेनैव चालणारी माणसं परक्या शहरात पडल्यावर जशी व्याकूळपणे आपल्या गावच्या खुणा हुडकत असतात; तसं होऊन मी बंगळूरच्या लायब्रीत गेले. आपण कुठल्यातरी अमराठी ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात जायचं आहे या कल्पनेनीच माझी नांगी इतकी मोडली होती, की गावढ्या गावातून तालुक्याच्या जागी चालत येण्यापूर्वी आठवून आठवून पिशवी भरणार्‍या एखाद्या कष्टकरी महिलेप्रमाणे वेळेआधी फोन करून, आज नक्की लायब्री उघडी असेल ना हे तीनतीनदा विचारून मी तिकडे मोर्चा वळवला. 
त्यांच्याकडे नाव नोंदवताना मात्र क्याटलॉगात नजर फिरवून घेतली आणि 'अरेच्चा! 'बाइंडर' आहे यांच्याकडे शाबूत!', ''नातिचरामि'ही घेतलंय अं? वाईट नाही. तसे अद्ययावत दिसतात.', ''मी भैरप्पा''! हे कधीचं राहिलंय वाचायचं...' अशा जिभल्या चाटत आणि मनोमन शेरेबाजी करतच विचार पक्का केला. तशी पुस्तकं बदलायला मुख्य शाखेत क्वचितच गेले असेन. कारण घराजवळ पंचवीस रुपये रिक्षाच्या अंतरात एक काकू ट्रंक भरून पुस्तकं आणून पोटशाखा चालवतात अशी माहिती मिळाली आणि मग एकशेपंचवीस रुपये रिक्षाला देणं अर्थातच मागे पडलं. पण सुमारे दोन-अडीच वर्षं वापरली ती लायब्ररी. आपल्या शहरात नसताना वीकान्ताचे रकाने भरून काढणं खरं दमवणारं असतं हा साक्षात्कार होता-होताच मला लायब्रीचा शोध लागलेला. त्यातही माझं मराठी नाक मनातल्या मनात सदैव वर असे. 'महाराष्ट्राबाहेर गोठवलेली मराठी जपणारे डबकीय लोक हे, नाईलाज आहे म्हणून वाचायचं झालं!' असा एक उगाचच्या उगाच आढ्यताखोर फणकारा असायचा. पण नाही म्हणता म्हणता मी चिकार नवं कायकाय वाचलं त्यांच्याकडे. 
सुरुवातीला त्यांच्या 'गेटेड कम्युनिटी'तल्या चकचकीत ड्युप्लेक्स फ्लॅटमधून ट्रंकभरून पुस्तकांची शाखा चालवणार्‍या काकूंची जिम्मा मीही पुलंच्याच असंवेदनशीलतेनं 'अतिविशाल' क्याटेगरीत करून टाकली होती. अर्थात - त्यांच्याही बाजूनं अढी कमी नसणार. कधीच एका शब्दाहून अधिक बोलायच्या नाहीत. शोधक नजरेनं बघायच्या मात्र मी काय वाचतेय ते. हळूहळू 'अमकं वाचलंय का?' इथवर प्रगती झाली होती, इतकंच. विशीच्या अल्याडपल्याडच्या पोरी खिदळत पुस्तकं न्यायला येतात, त्या काय डोंबल वाचणारेत, ओसरेल खूळ... अशी दबा धरून बसलेली, पन्नाशीच्या अल्याडपल्याडची, कमावलेली खातरी त्यांनाही असणारच. मी आपली हे सगळं नोंदूनच्या नोंदून वर खांदे उडवून खुशाल असे. दर चारेक महिन्यांनी तेवीस किलोंमधले पंधराएक किलोतरी मी पुस्तकांकरताच वापरत असे, ती काय उगाच होय! परिणामी वर्तुळात सावध अंतरावरून एकमेकींसमोर गोल फिरत एकमेकींचा अंदाज घेणार्‍या आणि क्वचित दात विचकून मग पवित्रा बदलणार्‍या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे आमची एकंदर पुस्तक देवघेव चाले. 
यात फरक पडला, तो विभावरी शिरूरकरांचं 'खरे मास्तर' हे पुस्तक मी उचललं तेव्हा. हे पुस्तक मला तोवर भेटलं नव्हतं. विभावरी शिरूरकरांचं 'कळ्यांचे निःश्वास' हे एकच पुस्तक ठाऊक. अत्यंत विपरित परिस्थितीत जिद्दीनं आपल्या लेकींना शिकवणार्‍या आणि मग त्यांचे पुरोगामी निर्णय पचवणार्‍या गरीब मास्तराची स्तिमित करणारी आधुनिक ओळख वाचून मी अतिशय अतिशय हरखून गेले. 


त्या आनंदात देवघेवीच्या पुढच्या शनिवारी माझ्याकडून अधिकचं वाक्य सुटलं, "काय सुरेख आहे पुस्तक!" यावर काकूंनी हातातला मटा खाली करून चश्मिष्ट नजर माझ्याकडे वळवली. हसू नाही. नुसती सावधपणे जोखणारी नजर. एक क्षण माझ्या काळजाचा ठोका चुकला असणार बहुतेक. पण मग हसल्या हलकंसं. नकळत हुश्श झालं मला! तेव्हापासून त्या आवर्जून एखाद्दुसरं वाक्य उच्चारायला लागल्या दर शनिवारी. सुचवायला लागल्या क्वचित एखादं पुस्तक. 
तितकीच ती मैत्री. कोणत्याही आबदार ग्रंथपालाशी हवी तितकीच आणि तशीच. काकू क्वचित हॉलमध्ये गवार मोडत असल्या, क्वचित यजमानांना सूचना देत असल्या - तरी त्या होत्या अंतर्बाह्य ग्रंथपालच, हे मी स्वीकारून टाकलं. तिथला मुक्काम संपतानाही त्या मैत्रीत विशेष भावनात्मक देवाणघेवाण झाली नाही. 'चाललात का? अच्छा.' इतपतच संवाद. 
पुढे पुष्कळ वर्षांनी एका दिवाळी अंकातला लेख वाचून काकूंनी आवर्जून वाचल्याचं कळवलं. 'वाचला. कुठे असता?' उत्तर. पूर्णविराम. इतकाच संवाद. पुढचा फापटपसारा नाही! मग मी त्यांचं ग्रंथपालपद अजूनच पक्कं करून टाकलं. 

०१ । ०२ । ०३ ०४ । ०५

कर्तव्य

संतुलित, सुरक्षित आणि साळसूदपणे क्रूर असलेल्यांची घरटी पसरत चाललीत दिवसेंदिवस वेगाने सर्वदूर.
अंडी उबताहेत.
योग्य वेळी अंड्यांतून बाहेर यावीत गोमटी, गोजिरवाणी, एकसारखी, स्वस्थ आणि संवेदनशील अणकुचीदार पिल्लं
आणि
सर्वत्र साधला जावा बहुमतांचा नैसर्गिक समतोल
म्हणून यथायोग्य तापमान राखणारे उष्ण पिवळे दिवे लावलेत थोडथोड्या अंतरावर.
शासन आहे सावध सर्वांसाठीच
डोळ्यांत तेल घालून.
सुज्ञ आणि सुजाण पक्षी असाल,
तर अधिकाधिक अंडी घालणं हेच तुमचं आणि माझंही विहित कर्तव्य आहे.
पुढे श्रीसरकार समर्थ आहेच.