Friday 29 May 2020

लायब्र्यांचे दिवस १

लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इतकुशीच होती ही जागा?’ असा विश्वासघात होऊन खट्टू व्हायला होतं. माझ्या पहिल्या लायब्रीच्या बाबतीत तसं होण्याची वेळ सुदैवानं कधीच आली नाही. मी इतरत्र मोर्चा वळवण्याच्या वयात असतानाच कधीतरी ‘माणिक वाचनालया’नं आपला गाशा गुंडाळून तिथे रंगांचे डबे विकणार्‍या कुणालातरी जागा करून दिली. पण ती जागा माझ्या स्मरणात इतकी पक्की आहे, की अजुनी कधी स्वप्नात लायब्री आलीच, तर तिला त्या गाळ्याचंच नेपथ्य असतं. सोबत पुस्तकांबद्दलचं एक हव्यासयुक्त, असुरक्षित, आतुर आकर्षण. लायब्र्यांच्या बरेवाईटपणाचे निकष मनात आकाराला येण्यापूर्वी मिळालेली ही लायब्ररी जेमतेम एका गाळ्यात वसलेली होती. लांबुळका गाळा. तिच्या तिन्ही भिंतींना काचदरवाजे असलेली, पुस्तकांची पातळ कपाटं. मधे लांबुळका काउंटर. गाळ्याच्या दर्शनी भागात, काउंटरला लंबरेषेत मासिकं मांडलेली. लहान मुलांची पुस्तकं भिंतीवरच्या कपाटांच्या पायथ्याशी. तिथल्या ग्रंथपालांच्या – हा शब्द मला पुष्कळ पुढे कळला. तेव्हा ‘खडूस’, ‘राखुंड्या’, ‘ढापण्या’ इत्यादी विशेषणं विशेषनामासारखी वापरलेली ऐकू येत – खडूसपणाबद्दल वाडीतल्या अनेकांची ठाम मतं होती. पण त्यांना माझ्याबद्दल ममत्व असावं. माझ्यातला भावी वाचक वेळीच हेरून आपल्या व्यवसायबंधूंसाठी एक गिर्‍हाईक पोसण्याचाही त्यांचा मनोदय असू शकेलच. पण ते काहीही असलं, तरी माझ्या अंगावर तिथे कुणी कधी खेकसत नसे. मी म्हणीन ती पुस्तकं म्हणीन तितका वेळ बघायला मुक्तद्वार असे. सगळ्याच लायब्रर्‍यांमध्ये हाती लागलेल्या विशेष पुस्तकांच्या आठवणी कायम आपल्या हाती पडलेल्या तिथल्या प्रतींची छबी घेऊनच येतात. तशा तिथून आणून वाचलेल्या ‘हॅन्स अ‍ॅंडरसनच्या परीकथा’ मला अजूनही तशाच्या तशा आठवतात. त्यांतल्या एका कथेचं मधलं पान गहाळ होतं, तर अलीकडे कधीतरी नवीकोरी प्रत विकत मिळाल्यावर मी अचूक त्या पानापाशी जाऊन अधाश्यासारखा तो मजकूर वाचून घेतला.

तिथल्याच कपाटातून आणलेलं शरलॉक होम्सच्या कथांपैकी एक वाचून मला भीतीनं अक्षरशः ताप भरलेला आठवतो. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत सोडलेल्या घंटेच्या दोरीवरून साप सोडून पुतणीचा खून करवणार्‍या काकाची ती कथा होती. भाषांतरात तिचं नाव ‘कृष्णकारस्थान’ होतं नक्की, पण भाषांतरकार काही केल्या आठवत नाही. ‘शिवणाच्या दोर्‍यानं हत्ती जखडण्याइतकं महाकर्मकठीण काम’ किंवा ‘’ग’ची बाथा होणे’ इत्यादी वाक्प्रचार शिकून मग जमेल तिथे त्यांचा यथाशक्ती वापर करणे आणि घरातल्या लोकांना चिमखडे बोल ऐकण्याचा आनंद पुरवणे हेही गुन्हे माझ्या खाती जमा आहेत. मातापितर सुज्ञ असल्यामुळे म्हणा किंवा तत्कालीन आईबापांना चिमखडे बोल नामक चाळे ऐकवण्यातली मज्जा ठाऊक नसल्यामुळे म्हणा – माझी तितकी बदनामी झाली नाही, इतकंच. आता नवल वाटतं, पण लायब्री तशी शुद्ध धंदेवाईकच असूनही तिथे ‘जादूची अंगठी’, ‘उडता खजिना’ आणि तत्सम पुस्तकं कधीही दिसली नाहीत. साधं चंपक आणि ठकठकही नसे. परीकथा, साहसकथा, नीतिकथा, बोधकथा, पंचतंत्र, बिरबल-तेनालीरामा वगैरे चातुर्यकथा, ताम्हनकरांची पुस्तकं, किशोर-आनंद-कुमार यांसारखी मासिकं, थोरांची चरित्रं इत्यादी प्रकरणं असत. याचा अर्थ ग्रंथपालांना – तेच लायब्रीचे मालक होते – काहीएक भूमिका होती असणार. त्याचं आता अप्रूप वाटतं. आता ते भेटण्याची शक्यता कमीच, पण मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडलं असतं. ‘मीच ती आगाऊ बारकी पोरगी’ असं सांगून थोडे नॉस्टाल्जिक लाड वसूल करण्यापलीकडचं मूल्य त्या गप्पांना येऊ शकलं असतं. बाकी काही जरी नाही, तरी तत्कालीन लोकांच्या वाचनाबद्दलचे आणि वाचनाच्या सवयींबद्दलचे त्यांचे शेरे-ताशेरे ‘किमान शब्दांत कमाल जहाल वर्णन’ या चाचणीला उतरणारे असले असतेच. ते आता होणे नाही. आता असे ग्रंथपाल-चालक-मालक अस्तंगत होण्याचा जमाना आहे…
०१०२०३०४ । ०५

2 comments:

  1. ठाण्याचे माणिक वाचनालय? कमाल झाली - मी अनेक वर्षे तिथला मेंबर होतो, ८४ पासून अगदी २००० पर्यंत. ते ग्रंथपाल नसून मालक होते, गोखले त्यांचे नाव - आणि लायब्ररीच नाव त्यांनी आपल्या मुलीच्या माणिकच्या नावावरून ठेवला होत - एवढी सगळी माहिती असायचे कारण त्यांचे सक्खे बंधू आमचे शेजारी होते.

    ReplyDelete
    Replies
    1. ओह, सहीच! दुनिया गोल आहे!

      Delete