Wednesday 13 July 2022

त्रांगडं

माझा एक प्रियकर म्हणायचा, "माणसांच्या आजूबाजूला असण्यातून ताकद शोषून घेतो मी. एकटा असलो, तर कंटाळून-विझून जातो." मला तेव्हा अजब आणि आकर्षक वाटलं होतं हे, इतकी स्वतःच्या माणूसघाणेपणाविषयी खातरी होती. आता काही वर्षांनंतर वाटतं, अर्थात, दुसरा काय रस्ता असतो आपल्यासारख्या नास्तिक माणसांना? 

पण माणसं जमवणं म्हणजे त्यांच्या सगळ्या म्हणण्यांना विनाअट शरण जाणं असतं का? नसतं. किंवा फॉर दॅट मॅटर त्यांना वरचेवर भेटत सुटणंही नसतं. वा ती कमावून, घडी घालून कपाटात ठेवून देणं नि लागतील तेव्हा काढून वापरणंही नसतं. 

मग काय असतं? 
 
आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो. एक ते बारा आकडे लिहायचे एकेका ओळीत चार-चार असे, मध्ये थोडंं अंतर राखून. मग एकानं पेन घेऊन एक आकड्यापासून सुरुवात करायची आणि दुसर्‍यानं त्याला दुसरा एक आकडा सांगायचा बारापर्यंतचा. त्या आकड्यापर्यंत जाताना तिसरा एखादा आकडा आणि आपण आधीच इकडून तिकडे जाताना मारलेल्या रेषा यांपैकी कुठल्याच नव्या रेषेचा स्पर्श न करता जायचं असे. सांगणारा आडवेतिडवे आकडे सांगून गुंता करून ठेवायचा प्रयत्न करी, तर पेन हातात घेऊन हिंडणारा कुठेच न चिकटणारी रेषा काढत हिंडण्याचा. असं बाराही आकडे फिरून पुन्हा एकपाशी परतता आलं नि वाटेत कुठेच रेषेला रेष लागली नाही, तर पेनवाला भिडू जिंकला. नाहीतर मग सांगणारा. असा खेळ. 

त्या खेळाची आठवण झाली. माणसं तर हवीत. पण अंगाअंगाशी येणारी नकोत. आपल्यावर भलभलत्या भावनिक जबरदस्त्या करणारी नकोत. आपल्याला कामापुरतंच वापरणारी नि ठेवणीत ठेवून देणारी नकोत. आपल्या भावनांवर कोरडेपणी बोळा फिरवणारीही नकोतच. नात्यागोत्यापायी मानगुटीवर बसणारी नकोत, पण आपल्यावाचून काहीच न अडणारीही नकोत. नि तरी बाराच्या बारा माणसं हवीतच. त्यातल्या एखाद्याही ठिकाणी रेषेला रेष लागली, की झालाच गुंता. गेम ओव्हर. 

आपल्यातल्या त्या दुसर्‍या 'सांगणार्‍या' भिडूला फितूर करून घेता आलं तर सोपं होईल? पण एकाकडून दोनाकडे नि दोनाकडून तिनाकडे जाण्यात काय गंमत? एक, मग बारा, मग सहा, मग तीन, मग नऊ, मग अकरा.. असं करत जाण्यातच आव्हान आहे! 

सालं त्रांगडंच आहे.