सगळं काही शेवटी आलबेल होतं. सगळ्या अडचणी सुटतात. सगळ्या अनाकलनीय कोड्यांची नीट संगतवार उत्तरं मिळतात. सगळ्या दुष्ट लोकांचं वाट्टोळं होतं. सगळ्या सज्जन लोकांचं अखेर यथासांग भलं होतं. नायकाला नायिका मिळते. ते एकमेकांवर संपूर्ण आणि सखोल प्रेम करू लागतात. आणि दोघे सुखाने नांदू लागतात.
असले शेवट असणारी पुस्तकं लिमिट डोक्यात जातात. काहीतरी उंचावरून खाली फेकून द्यावं, काहीतरी तोडून-मोडून-जाळून टाकावं, कुणाच्यातरी उगाचच कानफटात हाणावी, अश्या अनेक अनावर हिंसक इच्छा असल्या पुस्तकांचं शेवटचं पान संपवल्यावर जाग्या होतात. सगळं जग बेतशीर सुबकपणे आपल्या दीडवितीच्या शब्दकोड्यात चपखल बसवणार्या लेखकाची आणि वाचणार्या आपली दया-दया येते.
बाकी सगळ्याचं ठीक आहे. पण हॅरी पॉटरचं हे असं नेमकं कधी झालं?
नेमका पान क्रमांक वगैरे आता आठवत नाही.
उलट त्यातलं समांतर अद्भुत विश्व पाहिलं, तेव्हा भारावून जायला झालं होतं.
'मिरर ऑफ डिझायर'मधे साध्यासुध्या आरशासारखं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तर आपल्या अंतर्मनातल्या तीव्र इच्छा मूर्त झालेल्या दिसतात, हे कळलं तेव्हा त्यातल्या अर्थपूर्ण कल्पनेची भन्नाट मजा वाटली होती.
'विझार्ड नेव्हर चूजेस वॉण्ड, इट्स दी वॉण्ड हू चूजेस दी विझार्ड' हे अजब वाक्य वाचलं, तेव्हा चक्रावून जायला झालं होतं. पण मग त्यातून छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला.
'सॉर्टिंग हॅट'ची कल्पनाही अशीच अफलातून. आपल्याला जे व्हायचं असतं, ते आपल्याला होता येतंच. फक्त तितकी तीव्र इच्छा आणि निर्णयाचा ठामपणा असायला हवा, असं श्रीमंत तर्कशास्त्र सांगत होती बाई.
प्रत्येकाचा पॅट्रोनस फॉर्म (च् च्! पॅट्रोनस म्हणजे तुमच्या मनातल्या होकारात्मक भावनांनी तुमच्या वॉण्डमधून समूर्त होणं.) निरनिराळी रूपं घेतो इथवर ठीक आहे. पण लिलीवर नितांत प्रेम करणार्या स्नेपच्या पॅट्रोनसनं लिलीच्या पॅट्रोनसचा आकार घ्यावा? हे अद्भुत होतं.
राक्षसाचा प्राण कुठल्यातरी पोपटात असण्याची कल्पना आपल्याला कुठे नवीन होती? त्याच धर्तीवर व्होल्डरमॉटनं आपल्या जिवाचे सात तुकडे केले आणि अमर होण्याकरता ते कुठेकुठे दडवून ठेवले. पण त्याच्या जिवाचा एक अंश असावा चक्क हॅरीमधे. आणि त्यातून त्या दोघांमधे एक जिवंत दुवा निर्माण व्हावा? बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं.
प्राणिसृष्टी म्हणू नका, भाषा म्हणू नका, मंत्र म्हणू नका, खेळ आणि विज्ञान म्हणू नका... एक संपूर्ण नवीन विश्व.
सर्वसाधारण कल्पना जर एकरेषीय असतील, तर हे कल्पनेचं विश्व म्हणजे एखाद्या प्रसरणशील ताकदवान विस्फोटासारखं होतं. दाही दिशांना विस्फारणारं. विस्फारत राहणारं.
दुर्दैवानं ते तसं राहिलं नाही. दर गोष्टीचा एक साचा ठरत गेला. नियम बनत गेले. दर वर्षी काहीतरी संकट यावं. हॅरीनं त्यावर मात करावी. सरतेशेवटी प्रोफेसर डंबलडोरनी सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची संगतवार उत्तरं द्यावीत... सगळं कसं संतापजनक प्रेडिक्टेबल होत गेलं. शेवटच्या वर्षी हॅरीनं व्होल्डरमॉटवर मात केल्यावर त्याचं गिनीशी लग्न व्हावं, त्याला तीन मुलं व्हावीत (दोन मुलगे आणि एक मुलगी!) आणि त्यातल्या एकाचं नाव 'अल्बस सिव्हेरस' असावं हा तर गलिच्छपणाचा कळस होता.
अखेरशेवट हॅरीला पूर्ण भाग गेलाच.
फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो.
एरवी खरंतर एखाद्या संख्येला पूर्ण भाग गेलेला मला आवडतो. सगळं आलबेल चालू असल्याचा, सगळ्यावर आपला ताबा असल्याचा, सगळं नीट आवरून ठेवल्याचा एक फील येतो...
पण पुस्तकं, सिनेमे आणि माणसं? त्यांना पूर्ण भाग न जाण्यातच गंमत आहे.