Tuesday 29 October 2013

माझ्या मनातला का...

आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक.

शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार फार जवळचं, आत्मीय वाटलं.



मराठी वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधे अभिनेत्रींनी संवेदनशीलपणे इत्यादि लिहायची आपली समृद्धबिमृद्ध परंपरा आहेच खरी म्हणजे. पण ’कित्ती साधेपणी’ लिहिलं नि जपलेले संस्कार + तरल सर्जनक्षमता दाखवली, तरी त्या लिखाणातली अभिनेत्री काही केल्या लपत नाही असा अनुभव. लिखाण वाईट असतं असं नव्हे, पण ’कित्ती झालं तरी मी पडले नटीऽऽ’चा सूर पार्श्वभूमीला असतोच. या बाईच्या लिहिण्यात मात्र तिचं अभिनेत्री असणं गायबच आहे. खरं तर या लेखांमधले सगळे अनुभव तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या कामाच्या काठाकाठानं जाणारे. कधी शूटिंगच्या धावपळीत मनसोक्त / आवर्जून / सोसासोसानं / हौसेनं / चोखंदळपणे केल्या जाणार्‍या खरेदीबद्दल नि वस्तुसंग्रहाबद्दल लिहील. कधी शूटिंगच्या धावपळीत सहकलाकारांच्या नि निर्मात्यांनी खिलवलेल्या तृप्त करणार्‍या भोजनाबद्दल ऐकवेल. कधी शूटिंगच्या धावपळीत आपल्या घरापाशी थांबून राहिलेल्या, गळक्या भिंती-आवरायचा माळा-धुवायच्या चादरी वागवत समजूतदारपणे आपली वाट पाहणार्‍या आपल्या घराबद्दल सांगेल. कधी शूटिंगच्या धावपळीत मनापासून काम करताना, एखाद्या सिरियलमधल्या जिवाजवळच्या होऊन गेलेल्या एखाद्या भूमिकेबद्दल हळवी होईल. कधी शूटिंगच्या धावपळीत....

पाहिलंत?! शूटिंग हे तिचं आयुष्य आहे. तुमचं-आमचं ऑफीस असतं, शाळा असते किंवा घरकाम असतं, अगदी तस्संच. त्यातल्या शोकेसी झगमगाटाचा पदर तिनं मुळी पांघरलेलाच नाही. सांप्रतच्या धावपळीच्या, रोज नवे मोह पाडणार्‍या, स्पर्धेच्या मायाजालात आपलं निखळ-नितळ असणं जपू पाहणारी ती एक बाई आहे, बास.

तिची संवेदनशीलता (आयला, या शब्दाच्या तर...!) पुरेपूर महानगरी आहे. म्हणजे सोईस्कर, घडी घालून ठेवता येणारी, थोडीश्शी बेगडी? अहं. महानगरी संवेदनशीलता म्हणजे अनावर आणि अनावश्यक कढ न काढता, भावुकतेच्या उंबर्‍याच्या अलीकडे थांबणारी. पुरेशी कॉस्मोपॉलिटन होत गेलेली, समजूतदार, स्मार्ट, ग्लोबल.

तिचं ललित गद्य वाचताना मी नव्यानं ताजी होत गेले. नसेल तिच्या विस्कळीत ललित लेखनात गोष्टीच्या रचनेचं कौशल्य. पण म्हणून काय झालं? कशी मस्त प्रसन्नता, गाढ समजूत, ताजी कोवळीक आहे... याबद्दल तिचे आभार कसे मानणार? नाटकाच्या रंगपटात जाऊन, आपल्याच अनाकलनीय संकोचांच्या निर्‍या आवरत ’तुमचं लिखाण फार आवडतं बरं का मला’ असं अवघडत म्हणून टाकणं माझ्याच्यानं काही व्हायचं नाही. तिच्यातल्या दिलखुलास लेखिकेलाही ते अन्यायाचंच. म्हणून माझं खुशीपत्र हे इथंच.

मज्जा आली. लिहीत र्‍हावा. 

Thursday 10 October 2013

सूरजको मैं निगल गया....

खालच्या या जुन्या पोस्टनंतरही बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. पण कृतज्ञता आहे तशीच. तुझ्यासोबत एक आख्खं युग बघायला मिळाल्याबद्दल.
बाकी प्रश्नोत्तरं होत राहतील. शंकाकुशंका, आरोपप्रत्यारोप, आकडेवारी आणि भूमिकांचं विच्छेदन... होवो.

तूर्तास फक्त एक कृतज्ञ सलाम. मजा आणलीस यार, भरभरून!

सांग ना, काय वाटतं आहे तुला आत्ता?

***

ही कदाचित हे सगळं बोलण्याची योग्य वेळ नाहीय. कुठल्याही बाजूनं बोललं तरी त्याला एक विशिष्ट रंग येण्याचे हे दिवस.

बॅडपॅचचे दिवस. ’सो कॉल्ड’ उतरणीला लागण्याचे दिवस...
वेल... लेट्स नॉट गो इनटु दॅट. ऍट्लीस्ट आत्ता नको. मग ते सगळं आहेच...

एक्झॅक्टली काय वाटतं आहे तुला आत्ता?
येस. ’अभी वहाँ का माहौल कैसा हैं?’ या आचरट प्रश्नाइतकाच हाही एक क्वालिफाईड बिनडोक प्रश्न आहे. मान्य. पण तरी तो पडला आहे मला निरागसपणॆ.

त्या कुठल्याश्या इंग्लंडातल्या पोरीनं तुझ्या जिगरबाज खेळावर फिदा होऊन तुझी ’पापी’ घेतली होती तेव्हा काय वाटलं होतं असेल तुला एक्झॅक्टली, हाही प्रश्न पडतोच की मला. किंवा बाबांना अग्नी देऊन पुढच्या विमानाने परत खेळायला जाणं जरा अमानवीच नसेल वाटलं का तुला, हाही प्रश्न पडतोच मला.
मला हक्क आहे तुला हे आणि असले कितीही बिनडोक प्रश्न विचारण्याचा.

कारण?

कारण अजुनी कोणाला काय आणि किती आचरट वाटेल याचा विचार न करता - किंबहुना तो केला तरी ’काय वाटायचं ते वाटू दे, गेले खड्ड्यात...’ असं म्हणून - तुझ्यावरची निष्ठा स्वत:लाच सिद्ध करून दाखवायला म्हणतेच की मी - "सचिनची शप्पथ - "
किंवा
जुनी मॅच तर सोडाच; पण बिस्किटं किंवा बाईक किंवा अंडी किंवा कसल्याही जाहिरातीत जरी तू दिसलास की रिमोटवरचा हात थांबतोच.
किंवा
’जिनियस काय चाटायचंय?’, ’जिंकून दिलंय का त्याने कधी इंडियाला?’, ’सगळा पैसा हो हा..’ यांपैकी कुठलीही कमेण्ट कितव्यांदाही ऐकल्यावर अजूनसुद्धा अकरावीतल्या भाबड्या पोरासारखी मुद्देसूदपणे भांडायला मी तोंड उघडतेच.
किंवा...
जाऊ दे. मुद्दा काय, तर मला हक्क आहे. माझा मीच तो स्वत:ला देऊन घेतलाय.

तर... काय वाटतं आहे तुला आत्ता?

’अरे जा रे... काय वाट्टेल ते तोंडसुख घ्या आणि वाट्टेल तेवढे जळा. पण त्याला टीमच्या बाहेर बसवायची कुणाच्या बापाची टाप नाही...’ हा माझा कॉन्फिडन्स फोल ठरल्यावर मलाच इतकं भ्रमनिरास झाल्यासारखं, आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय -
तुला काय वाटतं आहे आत्त्ता?

की तुला काहीच फारसं वाटत नाहीय या सगळ्याचं? फक्त एक बॅडपॅच आणि पुन्हा सारं होणार आहे तसंच पहिल्यासारखं एकसंध?

आय डाउट...

स्वत:ला बदलताना आरशात दिसत नसलात, तरी रोज थोडे थोडे - रेषेरेषेनं बदलत असताच की तुम्ही . तूही बदलत गेला आहेस तसाच.


परत एकदा कर्णधारपद घेतलंस तेव्हा.

परत एकदा नाईलाजानं ते उतरवून ठेवलंस तेव्हा.

एखाद्या कारकुनासारखं तोंड वेंगाडून भूखंड मागितलास तेव्हा.
लोकांची मुक्ताफळं तोंड मिटून सहन करत बॅटनं बोलायचं अजून घट्ट ठरवत गेलास तेव्हा.

आणि चिखलफेक सहन न होऊन अखेर तोंड उघडलंस तेव्हाही.

तुझ्यापासून तू पुष्कळ पुढे आला आहेस आता. नाही?

’सूरजको निगलनेवाले सभी’ पुढे येताना अशीच आग ठिणगी-ठिणगीनं हरवत येतात का रे? की उरतो तरीही त्यांच्यात एखादा धपापता जिगरबाज स्फुल्लिंग?

तुझ्यातही आहे? आहे का रे?

सांग ना - काय वाटतं आहे तुला आत्ता?