सगळ्यांत पहिल्यांदा तिला कधी पाहिलं हे आता मला नीटसं आठवत नाही. अर्थात, मुक्ताला ही दाद वाटणं शक्य नाही. तिला बघावं आणि ती लक्ष्यात राहू नये, अशी तिच्या अभिनयाची शैलीच नाही. चार्म्स आणि हेक्सेस आणि स्पेल्सची आतिषबाजी करत एखाद्या जादुगारणीनं एखाद्या द्वंद्वात एंट्री घ्यावी, तशी तिची शैली. भक्ती बर्वेंना बघताना मला कायम मुक्ताची आठवण येत आली आहे. हे वाक्य उलट असायला हवं, ना? आय नो. पण मी भक्ती बर्वेंना रंगमंचावर बघितलेलं नाही. आणि माझ्या डोक्यात मुक्ताच इतकी 'छाई हुई' आहे, की आहे बाबा हे असंच, उलट. तर – भक्ती बर्वेंच्या अभिनयात ही एक "बघ हं, आता मी कशी गंमत करणार आहे!" असं सांगणारा एक सूक्ष्म पण झगझगीत धागा आहेसा मला वाटतो. अचूक तीच छटा मुक्ताच्या कामात आहे. त्यामुळेच तिचं 'चारचौघी'तलं काम बघायला जाण्यापूर्वी मी किंचित धास्तावले होते. पण... छे! हे पुष्कळ पुढचं.
तर – तिला अगदी सुरुवातीला पाहिल्याचं आठवतं, ते टीव्हीवर. 'पिंपळपान'मध्ये सानियाच्या 'आवर्तन'वर आधारित असलेल्या कथानकात – स्वरूप या काहीशा बोल्ड, अमेरिकेत वाढलेल्या बहिणीच्या भूमिकेत. स्वरूपचा प्रॅक्टिकल आणि प्रेमळ सूर तिनं अचूक पकडला होता. पण त्या भूमिकेत काही मेस्मरायझिंग नव्हतं. उलट त्याआधी 'घडलंय बिघडलंय'मध्ये ती आणि आतिशा नाईक पाणवठ्यावर जाणार्या दोन गावरान बायकांची सोंगं काढत असत. त्यात आतिशा नाईक वयाला साजेसं लुगडं नेसून असे. तर मुक्ता – गावातल्या सेमी-तरुण पोरी परकर नेसून त्यावर शर्ट घालतात, तसल्या अवतारात. शर्ट आणि परकर, कमरेवर घागर, घट्ट वळलेल्या वेणीला रिबीन, तरी लटा काढलेल्या. आणि दोघींच्याही चेहर्यावर अत्यंत बेरकी – स्मार्ट – मापंकाढू भाव. ती आणि आतिशा अक्षरशः हैदोस घालायच्या त्यात. मग तिचं संजय मोने आणि जितेंद्र जोशीबरोबरचं 'हम तो तेरे आशिक है' पाहिलं होतं. त्यात ती मुस्लीम मुलीच्या भूमिकेत होती. जितू आणि मुक्ता दोघं एकत्र असतील, तर काय होईल, अशा कल्पनेनं चेकाळून नाटकाला गेलेल्या मला, तितकीशी मजा आली नव्हती. त्यात नाटकाचा भाग होता, तसा 'मुक्ता जरा स्वतःच्या प्रेमात आहे का?' अशी शंका चाटून जाणंही होतं. ती पहिली धोक्याची सूचना. पण ती कायम धक्के देतच राहिली. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' नावाची (बहुधा सतीश राजवाडेची) मालिका होती. त्यात तिनं तिच्या 'मुंबई पुणे मुंबई'मधलाच, शहरी, लग्नानंतरच्या तडजोडींना बिचकणार्या आधुनिक मुलीचाच पार्ट कंटिन्यू केला होता. पण काय लाजवाब केला होता! स्वप्नील जोशी आणि ती यांचे प्रसंग दोन चांगले नट एकत्र आले की व्हायचेच, तितपत चांगले व्हायचे. पण तिच्या वडलांच्या भूमिकेत असलेल्या विनय आपटेंबरोबर?! काहीच्या काहीच केमिस्ट्री. आईवेगळी, एकुलती एक लेक. तिला तिचा बाप लग्नाआधी पोळ्या करायला लावतो असा एक प्रसंग होता. कधीही स्वैपाकाला हात न लावलेल्या मुलीचं अशा वेळी जे होईल तेच तिचं होतं. त्यात बापाची दंडेली. पण बापावर प्रेम आहेच. त्या सगळ्यानं उडणारा तिचा भडका, फ्रस्टेशन, बापाच्या बोलण्यात काहीतरी रास्त असल्याचा भाव, चिडचिड, रडू कोसळणं.... हे सगळं अक्षरशः अ – फा – ट होतं. विनय आपटेंना दाद द्यावी की तिच्याकडे बघावं हे न कळून चिडचिड झाली होती माझी, इतकी खास त्यांची केमिस्ट्री. 'कबड्डी कबड्डी'मधलं तिचं काम कबड्डीपटू मुलीचं. विनय आपटे बापाच्या भूमिकेत. दारुड्या भावाचं कबड्डीचं वेड नि त्यातून झालेली त्याची फरफट सोसणारा तो माणूस कबड्डीच्या पूर्ण विरोधात. त्यातून झालेली पोरीची नि बापाची जुगलबंदी होती त्यात. एखाद्या खेळाडूचेच असावेतसे न ठरणारे पाय, अंगातली न संपणारी ऊर्जा, उसळतं बंड... असं सगळं असलेली ती भूमिका मुक्तानं कहर केली होती. तीनेकदा तरी मी ते नाटक पाहिलं. तसंच 'फायनल ड्राफ्ट'ही. ते तर तिचं 'घरचं' नाटक. ती, मिलिंद फाटक, रसिका, नि गिरीश जोशी स्ट्रगलच्या काळात एकत्र राहत म्हणे. त्यामुळे तिचं गिरीशबरोबर ट्यूनिंग असणार यात शंका नव्हतीच. त्यातलीही भूमिका अशीच खास. गावातून आलेली, थापेबाज, बेरकी, पण अंगात लिहायचा किडा असलेली, काहीतरी सच्चं सांगण्याजोगं जवळ असलेली तरुण मुलगी. तिचा बनचुका, आयुष्याचं दार लावून कोरडा झालेला, जगण्यातला रस हरवून गेलेला शिक्षक. त्या दोघांच्यातली देवाणघेवाण होताना ठिणग्या उडाल्याचा भास होई. त्या नाटकाच्या एका प्रयोगात अत्यंत इंटेन्स प्रसंग चालू असताना प्रेक्षकांतलं कुणीतरी बोलायचं थांबेचना. शेवटी गिरीश जोशी बेअरिंग सोडून, थांबून, थेट तिकडे बघून म्हणला, "हे असं नाही चालू शकत. मी थांबतोय. तुम्ही बाहेर जा. मगच मी सुरू करीन." त्यात एक फायनॅलिटी होती. त्या बाई बाहेर पडल्या. त्यात दहा मिनिटं तरी गेली असतील. तोवर मुक्ता तिच्या भांबावलेल्या-चिडलेल्या-हट्टी मुद्रेत तशीच्या तशी पुतळा होऊन थांबलेली. "हां, सुरू करू." या गिरीश जोशीच्या एका वाक्यासरशी फ्रीज केलेली फ्रेम सुरू व्हावी, तशी सुरू. मी नाटकाइतकीच या हुकुमतीच्या दर्शनानं अवाक झाले होते.
नंतर तिला पाहिल्याचं आठवतं ते 'एक डाव धोबीपछाड' या वाह्यात सिनेमात. त्यात ती अशोक सराफांनी रंगवलेल्या एका श्रीमंत बापाची आईवेगळी लेक होती. नसलेल्या आईचा वास्ता देऊन, बापाला कसं गुंडाळायचं याचं रामबाण शास्त्र बनवणारी ती पोरगी. तिच्या बोलण्यातला गावरान लहेजा, छानछोकीची हौस असल्यानं नि तंत्रज्ञानाच्या एक्स्पोजरमुळे आलेले चुकीच्या उच्चारांतले इंग्रजी शब्द नि त्यातला स्टाईलमारूपणा, बेरकीपणा... एकुणात तर्हतर्हेच्या पुरुषांना खेळवण्यातलं कौशल्य नि ते आपल्याकडे आहे याचं भान... असं सगळं त्या कामात ठासून भरलेलं होतं. अशोक सराफांबरोबरचे तिचे प्रसंग बघणं म्हणजे... काय टायमिंग, काय प्लेसिंग, काय सफाईदार मेळ... असो. याबद्दल मी कितीही वेळ बोलू शकीन. दुसरी अशीच भूमिका म्हणजे तिचं 'जोगवा'मधलं उपेंद्र लिमयेबरोबरचं काम. केसांत जट आल्यामुळे देवदासी झालेली ती मुलगी. अंधश्रद्धेपोटीच लुगडं नेसून तृतीयपंथी म्हणून फिरणार्या उपेंद्र लिमयेशी तिचं सूत जुळतं. 'जीव रंगला' या गाण्यात त्या दोघांची शारीरिक जवळीक घडताना दिसते. अजय-अतुलचं संगीत, दिग्दर्शक राजीव पाटलांनी वापरलेल्या जुन्या घराच्या माडीच्या पावसाळी चौकटी, आणि अर्थात उपेंद्र लिमये – या सगळ्यांची कामगिरी थोरच आहे. पण मुक्ता – उफ्फ्! त्याच्या पोलक्याची बटणं काढून त्याच्या रुंद छातीवर हात फिरवताना तिचं बिचकणं आणि अखेर मोहाला शरण जाणं नि तेव्हाची तिची मुद्रा... देवा, इतका अस्सल शृंगार पडद्यावर पाहिल्याची आठवण मला नाही.
मुक्तावर इतकं प्रेम असल्यामुळे आणि तिच्यातल्या त्या भक्ती-बर्वे-धाग्याची धास्ती असल्यामुळे 'चारचौघी' बघायला जाताना मला किंचित ताण होता. इतक्या सुंदर, भावखाऊ भूमिकेत, इतक्या वर्षांनी रंगमंचावर येताना आपलं पाणी सिद्ध करून दाखवण्याच्या दडपणाखाली तिच्याकडून काही अधिक-उणं होऊ नये अशी ती धाकधूक. अतिप्रेमापोटी आलेली. पण बाई आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं! नवर्याच्या विश्वासघातानं आलेलं हबकलेपण, त्यातून आईपाशी उलटा कांगावा करणं, उद्ध्वस्त होणं, आईनं झापल्यावर भानावर येणं, हळूहळू स्वतःचा करारी सूर शोधत जाणं, कणखर होणं... दृष्ट लागण्याजोगं सगळं. त्यात ती तिच्या नवर्याशी फोनवर बोलते असा एक मोठा प्रसंग आहे. त्या प्रसंगातला तिचा संताप, नवर्याबरोबरच्या शृंगाराच्या आठवणीनं आलेली कासाविशी, दुसर्या बाईच्या कल्पनेनं आलेला घायाळपणा, मुलीच्या आवाजानिशी एकाएकी बेभान होऊन रडकुंडीला येणं.. मध्ये बोलणार्या आईवर तिरमिरून तिला गप्प करणं... त्या प्रसंगानंतर पहिल्या अंकाचा पडदा पडतो. तो पडदा पडला नसता, तर पुढचं नाटक बघणं जड जावं – असा तो परफॉर्मन्स. रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे... या सगळ्या लोकांची तितकीच जबरदस्त, सहज साथ – हा शब्द त्या तिघींना अन्यायकारक आहे, मला कल्पना आहे, पण त्यांच्याबद्दल लिहिण्याची ही जागा नाहीय – आणि नाटकातली भाषा-आशय... हेही तितकंच मोठं आहे, खरं आहे. पण त्यातली मुक्ता – एखाद्या कोंदणात अचूक शोभणार्या हिर्यावर एकच प्रकाशतिरीप पडल्यावर तो लखलखतो, तशी ती त्या प्रसंगात झळाळून उठते.
अलिबागजवळ एका कौटुंबिक ट्रिपला गेलो असताना तिथे मुक्ताही आली होती. तीन दिवस सतत दिसत राही ती आजूबाजूला. सुरूंच्या बनातल्या एका टेकाडावर, समुद्राकडे टक लावून, एकटीच निवांत बसलेली दिसायची. तिची तंद्री भंगावीशी वाटली नाही. अखेर आपल्याला इतक्या आवडणार्या एखाद्या कलावंताला "तू जाम भारी आहेस!" यापल्याड काय सांगणार, नि त्यावर तो काय म्हणणार, असा नेहमीचाच पेच. त्यापोटी बोलायला जाणं टाळलं. तिच्या सगळ्या भूमिकांमागे आता मला तिची समुद्राकडे बघणारी शांत मुद्रा एखाद्या बॅकड्रॉपसारखी आठवत राहते, हे मला त्याबद्दल मिळालेलं बक्षीस.