Sunday 24 February 2008

जगता जगता...

गर्भाशयातल्या अंधाराची स्पष्ट आठवण नाही उरली जगता जगता.

काही पुसट हृदयखुणा फक्त.
काही अनोख्या शांततेचे निरव प्रदेश.
सगळी दु:खं विसरून विसावावं अशा काही अंधार्‍या ऊबदार जागा.
कसल्याही हक्कांविना पोटाशी घेणारे काही कोवळ्या सावलीचे दगडी पार..

अशा प्रदेशांचे पत्ते नसतात कधीच. चालता चालता अवचित सापडून जाणार्‍या या भाग्यखुणा. पावलांना पुन्हा तहान लागलीच, तरी गवसतीलच याची काहीच शाश्वती न देणार्‍या. गूढ. आकर्षक. आश्वासक...

थेटराच्या अंधारात क्वचित सापडून जातो त्यांचा माग. काळोख उतरतो हलक्या मांजर-पावलांनी. पाहता पाहता क्षुद्र कुजबुजी विरत जातात. उत्सुक गाढ शांतता जन्म घेते आसमंतात. या शांततेला मरणाचा गर्द-भीषण वास नाही. जन्माच्या आतुरतेचा एक कोवळा गंध केवळ. उण्यापुर्‍या काही सेकंदांचं आयुष्य या शांततेचं. भारून टाकणार्‍या दमदार आवाजानं मेंदूचा कब्जा घेण्याआधीचं. या अल्पायुष्यामुळेच असेल तिचं गूढ सौंदर्य कदाचित.. आणि पोटाशी धरणारी जिवंत ऊबही.

कधी गाण्याच्या कोवळ्या सुरात सापडतात अशा प्रदेशांच्या वाटा. गाणी एकेकटी येतात थोडीच? गर्द रानात नेणार्‍या आठवणींच्या गूढ वाटांचं जाळं घेऊन येतात गाणी त्यांच्यासोबत. त्या वाटांवर पाऊल ठेवणं-न ठेवणं हातातलं नव्हेच. केवळ पूर्वसंचिताचं खुणावणारं आव्हान. शब्द, सूर आणि मधले अर्थानं भारलेले मौनाचे तुकडे. एकाच वेळी निवांत आणि कासावीसही करण्याची ताकद असणारे. त्यांच्या आव्हानाला सामोरं जायचं ताठ मानेनं. दोन हात करायचे असेल नसेल ती सगळी ताकद एकवटून आणि मग थकून विसावायचं तिथेच... कुणीच हटकायला नाही येणार तिथं, याचं आश्वासन उशाला घेऊन.

तशा कविता जीवघेण्याच. विषारी संवेदनांची शस्त्रं पोटात बाळगणार्‍या. विषकन्यांसारख्याच विश्वासघातकी आणि आकर्षकही. पण त्यांच्यापाशीही कधी कधी मिळून जातो हा मऊ अंधार. एकेका शब्दाचं बोट धरून हलके हलके उतरत जाव्यात एखाद्या खोल अंधार्‍या विहिरीच्या पायर्‍या, तशा अर्थाच्या तळाशी घेऊन जातात कविता कधी कधी. एखाददा पायाखालचा दगड निसटतोही, नाही असं नाही. मग कपाळमोक्ष चुकत नाही. पण हा धोका पत्करून त्या अंधारात पाऊल ठेवावं अशी लालबुंद रसरशीत स्वप्नं असतात कवितांच्या पोटी दडलेली.. क्वचित कधी बोटांना त्याचा निसटता स्पर्श होतो आणि जन्माला पुरेल अशी धगधगती ऊर्जा पाहता पाहता वस्तीला येते आपल्याआत...

एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी माणसंही घेऊन येतात हे असे प्रदेश त्यांच्या पावलांसोबत. पुरेश्या अंतरावरून माणसं न्याहाळण्याची सुरक्षित सवय स्वतःला लावून घेतलेले आपण बिचकतो मग. काहीश्या अविश्वासानं मागे सरतो. अंग आक्रसून घेतो. पण एका जादूभरल्या क्षणी सगळी अविश्वासाची वर्तुळं विरून जातात आणि कुशीत शिरावं कुणाच्या, तसे नि:संकोचपणे नात्यात शिरतो आपण.

तश्या दुर्मीळच या गोष्टी... पण गर्भाशयाच्या पुसट आठवणी जागवणार्‍या... जगता जगता विसरून गेलेल्या त्या विश्वात परतून नेणार्‍या...

Monday 11 February 2008

खरंच...

खरंच...
पावलांखालचे प्रदेश बदलत जातात.
सवयींचे संगही अलगद निसटून जातात.
पाहता पाहता आपल्याच स्वप्नांचे रंग बदलत जातात.

खरंच...
नात्यांमध्ये बदल होत जातात.
पण बदलांना वाढ म्हणावं, सूज म्हणावं,
की धीम्या गतीनं मृतावस्थेकडे होणारा अटळ प्रवास,
हे ठरवण्याची ताकद तर असतेच आपल्यात.

खरंच...
तू ही ताकद वापरण्याची हिंमत केली आहेस कधीतरी?
अमानुष ताकदीच्या प्रश्नांची ही भीषण लाट पेलली आहेस तू कधीतरी?
जगता जगता काय होतं इतक्या उत्कट नात्यांचं,
हा जीव शोषून घेणारा प्रश्न पडला आहे तुला एखाद्या बेशरमपणे ठणकणार्‍या संध्याकाळी?

खरंच...
अजून जाणवतात तुला माझे श्वास त्यांच्या धुंदावणार्‍या लयीसकट?
अजून जाणवतो माझा गंध तुझ्या स्वप्नांच्या अगदी निकट?
अजून चढतो माझा रसरशीत रंग तुझ्या अंगावर त्यातल्या सगळ्या सगळ्या छटांसकट?

नाही.
कसल्याच प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असावीत असा हट्ट नाही आता.
इच्छा असतील... पण त्यांच्याही मर्त्यपणाचा स्वीकार आहे आता.
सवयींचे प्रदेश आणि स्वप्नांची माती पाहता पाहता बदलत जाते आपल्याच नकळत हे कळतं आहे आता.

पण खरंच,
सगळ्या विध्वंसासकट
बदलणार्‍या रंगांसकट
जगताना स्वप्नं अपरिहार्यच -

हे शिकलो आहोत का आपण?
खरंच...

Saturday 9 February 2008

...अफलातूनच!

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

उदाहरणार्थ ऑफीसमध्ये एका भिकार डॉक्युमेण्टमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करून मी प्रचंड दमलेली. आत्ता चहासाठी ब्रेक घेतल्यास किंवा निवांतपणे गूगल टॉक उघडल्यास नवा मॅनेजर आपल्यावर कितपत खूश होईल हा विचार चेहर्‍यावर दिसू न देता साळसूदपणे कामात दंग.

एवढ्यात एक आंग्लाळलेली बया एक म्युझिक सिस्टिम घेऊन अवतीर्ण होते. 'इट्स टाइम टू एक्झरसाइज्' असं म्हणते आणि गर्दीनं भरलेला, मरगळलेला प्लॅटफॉर्म दूरवरची लोकल पाहून जसा एकदम सळसळतो, तसं अवघ्या ऑफीसमधे एकदम चैतन्य सळसळतं.

काही लोक उघडपणे दात काढत बाहेर पडतात.
काही लोक 'आपल्याला देणंघेणं नाय' अशा मख्ख आविर्भावात मॉनिटरमधे घुसतात.
काही लोक सूर्यफूलसदृश तत्परतेनं तिच्याकडे तोंडं वळवतात.
काही लोक शीपिशली हातातली कामं टाकून, खुर्च्या बाजूला सारून जागीच उभे राहतात.

आणि भर ऑफीसमधे दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत ती एरोबिक्सचा वॉर्म अप् सुरू करते.

जेन फोंडा माझी आई असल्याच्या थाटात निर्विकारपणे आणि सराईतपणे एरोबिक्स करताना मला वाह्यात हसायला यायला लागतं.

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडणं एकंदरीत मस्तच.

उदाहरणार्थ एकाच सिग्नलला तीन प्रदक्षिणा घालूनही मला घर सापडतच नाही. पत्ता तोंडपाठ. पण जायचं कसं विचाराल तर आपली बोलती बंद. बरं, मला नाही तर नाही, रिक्षेवाल्याला तरी माहीत असावं? नपेक्षा त्यानं ते कुणाला तरी विचारावं? पण एकतर तो अभिजात मंदबुद्धी तरी असावा किंवा स्वतःच्याच शहरात कुणाला पत्ता विचारण्यानं त्याचा इगो दुखावणार असावा.

परिणामी आम्ही मारतोय आपल्या गरागर चकरा एकाच सिग्नलला.

शेवटी मी बळंच रिक्षा थांबवून त्याला त्याची दक्षिणा देऊन टाकते आणि ट्रॅफिक पोलिसाकडे मोर्चा वळवते. 'कन्नडा बरुन्दिल्ला' हे माझं कन्नडचं ज्ञान, 'व्हेअर गो?' हे पोलिसाचं इंग्लिशचं ज्ञान आणि आजूबाजूच्या तत्पर लोकांचं कामचलाऊ हिंदी यांच्या बळावर माझी वरात स्वगृही पोचते.

आणि पगार ठरवताना कोळणीला लाजवेलशी हुज्जत घालणार्‍या आणि दिवसभर होता होईल तेवढी उद्धट अडवणूक करणार्‍या एचआरवाल्या मॅनेजरचा फोन येतो - डिड यू रीच सेफली? आय वॉज वरिड् यू नो...

मी नीट सुखरूप पोचलेय. आता कॅबचा पिक अप्-ड्रॉप मिळेपर्यंत मी घरी पोचल्यावर एक मिस्ड् कॉल देत जाईन... हे त्याला पटवून देता देता मला परत अनावर हसायला यायला लागतं.

कुठे येऊन कुणासोबत काय चाललंय!

अशीच एक भयानक उदास संध्याकाळ. आपण म्हणजे एक गरीब खाणकामगार असून एकटेच जन्माला आलो आहोत व एकटेच मरणार आहोत, अशा प्रकारचे भीषण विचार डोक्यात चालू. वेळ सरकता सरकतच नसलेला. आपण असेच मरून गेलो तरी कुणाला काही कळणार नाही, असं वाटण्याच्या सुमंगल मुहूर्तावर जुन्या मित्राचा फोन येतो.

माझे बारा वाजलेले त्याला कळू नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न करून मी हसरा आवाज काढण्याच्या प्रयत्नात असतानाच साहेब सेण्टी होतात. 'आता गप्पांचा अड्डा बसत नाही. सगळे एकेकटे आपापला जीव रमवत असतात. मला प्रचंड एकटं वाटतं. तिकडे एखादी नोकरी मिळेल काय..' या त्याच्या एकंदर मूडवर मी उत्तरादाखल भली मोठ्ठी उपदेशाची फैर झाडते.

एकटं असण्याची सवय करून घेतली पाहिजे..
नाही तिथे इमोशनल होऊन कसं चालेल..
सेल्फ पिटी बंद करायला कधी शिकणार..

या वाक्यावर मला इतकं हसायला का येतंय ते बिचार्‍याला कळतच नाही.

काही म्हणा, आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.