Tuesday 11 May 2021

दिङ्मूढ

आपल्यातला ओबडधोबड, अर्धकच्चा जिवंतपणा लोपून 
बघता बघता त्याची जागा घेते एक सराईत सवारी.
भल्याभल्यांना नाही लागत चाहूल.
ऐकू येतात थेट टापाच.
कितीकांना तर त्यांचीच पडते भूल.
हालचालींमधल्या सावध, श्वापदी, 
काळीज लक्कन घशात आणून सोडणाऱ्या
भीतीच्या अणकुचीदार पकडीतून निसटत राहण्याहून,
सोपं वाटतं सेफगेममध्ये दुडकत रमलेलं पाऊल.
फार थोड्यांना दिसतात यातले धोके.
तरीही सवयींचे प्रदेश सोडवत नाहीत, सुटत नाहीत.
पण दिवसाच्या ढळढळीत उजेडात दिवाभीतासारखी दडून बसलेली थोडी शरम,
रात्रीबेरात्री उतरते त्यांच्या अंगणात.
चखणा म्हणून बघावी थोडी चाखून,
इतकीच.
या सगळ्यांहून निराळा
एखादाच कुणी,
अभागी भाग्यवंत
सरावाची आणि सवयींची मैदानं धीरानं मागे टाकून
कसल्याशा अनामिक ओढीनं निघतो
सगळे पाश सोडवून.
कुणास ठाऊक कसल्या धपापत्या स्वप्नाच्या मागावर?
हेमिंग्वेच्या म्हाताऱ्यानं दिलेला शाप विसरून.
शाप की वर?
किनाऱ्यावर आपण दिङ्मूढ होऊन.

Sunday 9 May 2021

पुस्तके साठत जातात : १

'पुस्तके साठत जातात' नावाची काळसेकरांची एक कविता आहे. तशी साठत गेली आहेत पुस्तकं. पुस्तकांच्या गठ्ठ्यातले कणे बघून एका नजरेत हवं ते पुस्तक बाहेर काढणाऱ्या मला एका पुस्तकासाठी ही उलथापालथ करावी लागली, तेव्हा एक नवाच किडा चावला. लहानपणी अधाश्यानं चवढव न बघता टोपलीभर अन्न चुटकीसरशी फस्त करावं तशी फस्त केलेली पुस्तकं आता निराळी दिसतात का, हे बघण्याचा किडा. पुस्तकं तीच असली तरी आपण तेच नाही. लहान तर नाहीच, उत्कट ताजे-टवटवीतही नाही. तेव्हा भिडलेलं आताही भिडेलच असं नाही. तसंच बेहोशीत वाचलेलं काही अंगावरून वाहून गेलं असेल गद्धेपंचविशीत, आता कदाचित निराळं दिसेल. असं काय-काय वाटत राहिलं. दोन दिवस 'अंगावर काढून' तरीही वाटत राहिलं.

म्हणून घरातल्याच नव्याजुन्या पुस्तकांवरून हात फिरवताना खरडलेल्या नोंदी.

~

माझ्याकडच्या प्रतीवर २०१६ सालातली तारीख लिहिलेली आहे, म्हणजे निदान पाच वर्षं तरी माझ्याकडे उर्मिला पवारांचं 'आयदान' आहे. मी ते कधीतरी वाचल्याचंही मला पक्कं आठवतं. पण पुस्तकात काय आहे याबद्दल डोकं पार कोरं करकरीत. वाचायला घेतलं तरीही वाचल्याचं अजिबात आठवेना. जरा हबकायलाच झालं. पण असे शोध लागणारच, याची खूणगाठ बांधली आणि नव्यानं वाचल्यासारखं वाचलं. 

सगळ्यांत जास्त तीव्रतेनं काय जाणवलं असेल, तर लेखिकेचं स्वतःला कॅज्युअली हसू शकणं. आपल्या फजित्या, चेष्टा, अपमान, आबाळ, काबाडकष्ट... या सगळ्यांकडे पाहण्याची साधीसरळ, मिश्किल नजर आहे बाईंकडे. जातीय अपमान झाल्याच्या आठवणी कमी नाहीत. पण त्याबद्दलही कुठे कडवटपणा बाळगलेला नाही. 'असं अमुक एक माणूस वागलाच कसा?' असा अविश्वास, त्यातून बसलेला धक्का, अपमानानं जळत राहणं... या कशाचाही मागमूस नाही. खणखणीत आत्मविश्वास असलेल्या माणसालाच हे जमू शकतं. 

सांस्कृतिक फरकांकडे बघणारा, उच्चनीचतेचं हलकं पण पक्कं भान असलेला, सपाट पुस्तकीपणा लेखिकेपाशी नाही. तिच्या बिवलकर या शिक्षिकेची थुंकी या गोष्टीकडे बघणारी ब्राह्मणी अधिक 'पुस्तकी शास्रीय' नजर एकीकडे, तर तोंडात खोबऱ्याचा तुकडा चावून, त्याला सुटलेलं दूध आलेल्या पाहुण्याच्या अंगाखांद्याला रगडून, त्याला गरम पाण्यानं न्हाऊमाखू घालणं ही प्रेम व्यक्त करण्याची घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत एकीकडे. या दोन्ही एकाशेजारी एक मांडताना लेखिका काहीही गुळगुळीत साचेबद्ध पुस्तकी बोलत नाही. 'सुशिक्षित' झाल्यावर कुठेही थुंकण्याची सवय सुटली हे सांगते, बस. कुठल्याश्या आदिवासी जमातीतले लोक विशिष्ट जातीची फळं एकत्र जमून चावून चोथा करतात आणि मग त्या एकत्रित चोथ्यापासून दारू तयार केली जाते, हा मधल्या काळात मी कुठेतरी टिपलेला माहितीचा कण नकळत आठवला.

कोकणातल्या दरिद्री महाराघरच्या खाद्यसंस्कृतीचे तटस्थ नजरेनं टिपलेले तपशील हा फार काळ लक्ष्यात राहील असा आणखी एक भाग. त्यात सवर्ण अन्न आणि दलिताघरचं अन्न यांतल्या सुबत्तेतले मूलभूत भेद नोंदणं आहे, त्याला असलेली विखारी जातिभेदाची किनार आणि त्यातून भोगावी लागलेले अपमान आहेत, परवडणाऱ्या अन्नाचं निकृष्टपण आणि वासा-चवींचा वाढत गेलेला उग्रावा आहे, हे अन्न कमावताना - विशेषतः बायांनी - केलेल्या अमानवी कष्टांचं तपशीलवार चित्रणही आहे. 

लेखिकेचं लग्नानंतरचं शहरातलं मोकळं-सुटवंग जगणं, शिक्षणासह तीव्र होत गेलेलं आत्मभान, लिहिण्यानं सापडत गेलेला सूर, टोकदार होत गेलेला स्त्रीवादी दृष्टीकोन... हे सगळं अपेक्षितच. पण साठनंतरच्या काही दशकांमधल्या आणि बाबरी मशीद प्रकरण होण्यापूर्वीच्या मुंबई शहरात जगलेल्या माणसांच्या मोकळ्या वातावरणात गेलेल्या आयुष्याचा मला किंचित हेवा मात्र वाटला. त्यानं मला चकित व्हायला झालं.

~

पुन्हा वाचायला घेतलेलं शांता गोखल्यांचं 'रीटा वेलिणकर' वाचताना हा हेवा अधिकच गडद होत गेला. 

'रीटा' न आठवण्याचा प्रश्नच नव्हता, नाही. त्यांतली वाक्यंच्या वाक्यं तशीच्या तशी आठवून येत राहिली पुढे वाचण्याआधीच. पण पुस्तकानं मला तरीही गच्च धरून मात्र ठेवलं. त्यातला चिरेबंदीपणा, जहालपणा, शारीरिक गरजांतून येणारं डळमळीतपण निभावून पार होताना रीटानं सर्वार्थांनी कमावलेली प्रगाढ, प्रसन्न शांतता आणि एखाद्या दगडी, थंडगार बांधकामातून खेळवलेलं जिवंत पाणी प्रकटावं, तसं तिच्याभोवतीच्या जिवलग स्त्रियांनी तिच्याभोवती जवळिकीनं केलेलं कडं... सगळं काही तेच, तस्संच खणखणीत. उणं नाही. उलट बदलेल्या मुंबई शहरात आणि स्त्रीवादाची गरज पटवून द्यावी लागत असतानाच्या विपरीत, बधीर आयुष्यात अधिकच अर्थपूर्ण.

~


पुस्तके साठत जातात, जावोत.