Thursday 24 September 2020

हकनाक

एखाद्या कोळ्यानं 
दुसरं काहीच न सुचून 
विणत राहावेत धाग्यामागून धागे,
तसे 
मऊ-चिवट-नाजूक-टणक मूडी सुरांनी वेढलेले,
शिळोप्याच्या निरर्थक तपशिलांचे शब्द 
विणत राहते मी,
तुझ्या अबोल, तंद्रीदार हुंकाराच्या एका सुईभोवती.
हळूहळू उमलत जाते 
ऊबदार हलकीफूल तलम शांतता.
नुसत्या निःश्वासाच्या चाहुलीनंही झिन्नाट थरथरावी
अशी.
आता इकडे येऊ नयेस तूही...
हकनाक फसत जायचा पाय तुझ्या निष्पाप जिवाचा.

ऊन हवंय चमचाभर

ऊन हवंय चमचाभर.
सगळं ब्लर झालंय 
कधी रिपरिप
कधी पिरपिर
कधी नुसतीच धुकट धुवट ड्रेपरी
वाळता वाळता पुन्हा थबथबत गेलेले खड्डे डांबरी
कपडे आंबटओले
पंखे बंद केले 
तर घामाचा वनवास
सगळीभर कुबट वास
डासांची लयलूट करणारी पैदास.
ऊन आणा थोडं गरमागरम
घोट घोट शेकत शेकत
होऊ द्या हवा जरा खरपूस.
झापड उतरायची नाही शहराची तोवर
ऊन हवंय चमचाभर.