Wednesday 26 September 2018

पुस्तक एक, पुस्तकं अनेक

कोणतंही पुस्तक वाचताना आपण फक्त तेवढं एकच पुस्तक वाचत नसतो. त्या-त्या जातकुळीची आणि पूर्णतः निराळी, वाचलेली आणि न वाचलेली पुस्तकं आणि लेख आणि स्फुटं आणि चर्चाधागे आठवत राहतात. त्या सगळ्यांनी मिळून आपल्या डोक्यात तयार केलेल्या जाळ्यात हेही पुस्तक जाऊन बसतं. क्वचित काही न वाचलेल्या-न पाहिलेल्या गोष्टींची नावं पुरवतं.  आपलं आकलन आणि आकलनाची असोशीही अधिक दाट, गहिरी करतं.

***

पशुवैद्य विनया जंगलेंचं 'मुक्या वेदना, बोलक्या संवेदना' वाचत होते. प्राण्यांवर उपचार करताना लेखिकेला आलेले अनेक सुरस आणि चमत्कारिक अनुभव त्यात आहेत. लेखिकेचं सुसंस्कृत, जिद्दी आणि प्राण्यांवर अतूट माया करणारं व्यक्तिमत्त्व या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. प्राण्यांबद्दलच्या कोणत्याही पुस्तकात असतं, तसं माणसाच्या अंदाधुंद विकासाबद्दलचं आणि त्यासमोर असहायपणे आटत चाललेल्या प्राणिविश्वाबद्दलचं चिंतेचं अस्तर याही पुस्तकाला आहे.


पुस्तक वाचनीय आहेच.

ते वाचताना सर्कशीतले रिंगमास्टर दामू धोत्रे यांनी लिहिलेलं 'वाघसिंह - माझे सखेसोबती' हे अद्भुत आत्मचरित्र आठवत होतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग शाळेत तिसरीत मराठीच्या पुस्तकात होता. सर्कशीचा खेळ चालू असताना, प्राण्यांच्या पिंजऱ्यात लेखक उभा असताना दिवे गेले आणि अंधार पसरला. लेखकानं प्रसंगावधान राखून 'प्रकाश... प्रकाश' एवढी एकच विनवणी खड्या आवाजात केली. बॅटऱ्या आणि टॉर्च सर्वदूर पसरण्यापूर्वीचे दिवस. मोबाईल नि जनरेटर्स तर दूरच.  क्षणार्धात कुण्या प्रसंगावधानी प्रेक्षकानं खिशातली माचीस काढून काडी शिलगावली. ते पाहून असंख्य विडीकाडीप्रेमी लोकांनी त्याचं अनुकरण केलं. लुकलुकत्या, विझत्या-पेटत्या शेकडो ज्योती. त्या प्रकाशात लेखक शांतपणे पिंजऱ्यातून बाहेर पडला. तो प्रसंग आणि कुण्या चित्रकारानं काढलेलं अंधारात लुकलुकणाऱ्या शेकडो काड्यांचं चित्र मला अजुनी लख्ख आठवतं. असे अनेक प्रसंग असले ते पुस्तक.

त्या मानानं विलास मनोहर यांचं 'नेगल' पुष्कळ लोकप्रिय. मीही त्याची असंख्य पारायणं केली आहेत. पुढे हेमलकसाला जाऊन आमट्यांचा प्रकल्प पाहिला तोही आमट्यांच्या कामानं प्रभावित होऊन नव्हे, तर नेगलच्या प्रेमापोटीच. आदिवासींसाठी काम करत असताना, आदिवासींनी भुकेपोटी शिकार करून मारलेल्या प्राण्यांची पिल्लं सांभाळण्यातून या प्रकल्पाला सुरुवात झाली. अर्थातच ते काम दुय्यम महत्त्वाचं होतं. पण पूर्वायुष्यात चक्क शिकारी असलेल्या लेखकाचं प्राणिप्रेमी व्यक्तीत झालेलं परिवर्तन 'नेगल'मध्ये आहे. त्यातली कितीतरी प्राण्यांची शब्दचित्रं इतकी जिवंत, अस्सल उतरली आहेत, की पुस्तकांमधल्या जिवाभावाच्या पात्रांची यादी करायची झाली, तर मी नेगल-नेगली, राणी अस्वल, पिलू माकड या मंडळींचा एखाद्दा विचार नक्की करीन.

डॉ. पूर्णपात्रे यांचं त्यांच्या लाडक्या सिंहिणीवरचं 'सोनाली' हे पुस्तकही लहानपणी वाचलेलं. पण त्याचा माझ्यावर खास ठसा नाही.

अलीकडे वाचलेलं रमेश देसाईंचं 'वाघ आणि माणूस' हे पुस्तकही रसाळ. वाघ आणि सिंह या प्राण्यांबद्दलची काहीशी विकीपिडीय पण गप्पिष्ट माहिती आणि काही प्राणिप्रेमी मंडळींच्या चटका लावून जाणाऱ्या प्रकल्पांच्या गोष्टी, असं काहीसं हे पुस्तक.

व्यंकटेश माडगूळकरांचं 'सत्तांतर' या सगळ्या माहितीवजा-किस्सेवजा पुस्तकांपेक्षा कितीतरी उंच गेलेलं. साहित्यकृती झालेलं. एका वानरटोळीचं शब्दचित्र इतकं त्याचं वर्णन पुरेसं नव्हे. त्यात एक पूर्ण जीवनचक्र आहे. 'बनगरवाडी'च्या तोडीचं.

'ऐसी अक्षरे' या संस्थळावर गवि या सदस्यानं उघडलेला एक जबरी धागाही कायमचा लक्ष्यात राहीलसा. या गृहस्थाच्या एसीच्या सज्जावर दुर्मीळ जातीच्या गव्हाणी घुबडाईनं अंडी घातली. या इसमानं त्या घुबडांना हुसकावून तर लावलं नाहीच. उलट सेन्सर्स बसवलेला एक कॅमेरा लावून ठेवून पिल्लांच्या वाढीचं अलगद चित्रण केलं. धागा अपडेट करत, चित्रण डकवत, पिल्लांच्या वाढीची बित्तंबातमी वाचकांना पुरवली आणि ही लाडाची घुबडाई घरटं सोडून जाईस्तो कितीतरी वाचकांचा जीव गुंतवून ठेवला.

'साकार' नामक ब्लॉग चालवणाऱ्या अर्निका परांजपेनं हत्तींच्या शुश्रूषा केंद्राला भेट देऊन लिहिलेला अनुभवही मी कदापि विसरू शकत नाही. आपल्याच वयाची मुलगी निव्वळ पुस्तकं वाचण्यापुरतं प्राणिप्रेम न दाखवता अशा एखाद्या प्रकल्पात जाऊम हत्तींशी मैत्री करते आहे, हे वाचणं चकित करणारं होतं माझ्यासाठी.

त्यावरून 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे कृष्णमेघ कुंटेचं पुस्तक आठवलं. कर्नाटकच्या जंगलात जाऊन राहणाऱ्या एका कलंदर जंगल अभ्यासक मुलाचं हे पुस्तक. पुढे त्याच्या वडलांची नर्मदा परिक्रमेवरची पुस्तकं हाती आली, ती कृष्णमेघच्या अस्सल अनुभवापुढे निव्वळ भरताड वाटली हा माझ्या नास्तिक नजरेचा दोष की त्या अनुभवाच्या जिवंतपणाचा? कुणास ठाऊक.

'देर्सू उझाला' हे जयंत कुलकर्णींनी भाषांतरित केलेलं पुस्तक रूढार्थानं प्राण्यांबद्दलचं नव्हे. पण निसर्गाशी एकरूप पावलेल्या - इतक्या, की शहरातलं वास्तव्य न सोसून जंगलात जाऊन प्राण सोडणाऱ्या - देर्सू या मानवप्राण्याबद्दलचं ते पुस्तक. त्यातली रौद्र निसर्गवर्णनं आणि त्या पार्श्वभूमीवरचा ओबडधोबड, निर्मळ देर्सू.

त्यावरून गो. नी. दांडेकरांचं 'माचीवरला बुधा' आठवणं क्रमप्राप्त होतं. पण आता मी भरकटतेय!

विनया जंगलेंच्या पुस्तकानं संतोष शिंत्रेंच्या 'गुलाबी सिर - दी पिंक हेडेड् डक' या कथेची आठवण करून दिलीच. शिवाय इंग्रजीतल्या अशा कितीतरी पुस्तकांचे संदर्भ आणून वाटेत टाकले. अजून जेन गुडालबद्दल वाचायचं राहिलंच आहे. तसंच उंटांचा सांभाळ करणाऱ्या रायला जमातीसाठी काम करणाऱ्या इल्सेबद्दलही.

पुस्तक एक, पुस्तकं अनेक.