Friday 21 June 2024

व्हॉट्सॅपचं स्टेटस आणि निवडणुका

मी व्हॉट्सॅपचं स्टेटस हा प्रकार अजिबात वापरत नसे. 

पण गेल्या फेब्रुवारीत एक मित्र भेटला होता. तेव्हा राममंदिरप्रकरण भलतंच जोरात होतं. मोदीच्या आणि भाजपच्या धर्माधारित प्रचाराच्या विरोधकांना निवडणुकीबद्दल अजिबात अपेक्षा नव्हत्या. आजूबाजूचे एरवी शहाणेसुरते म्हणावेत असे, शिकलेसवरलेले लोकही पूर्ण ताळतंत्र सोडून रामाच्या भजनी लागलेले होते. शिक्षण, महिला सुरक्षा, अर्थकारण, बेरोजगारी.. यांबद्दल बोलणं टॅबू होतं. माध्यमांबद्दल तर विचारूच नका. सेक्युलर लोकांमध्ये अतिशय निराशा होती. मीही राजकारणाचा अजिबात विचार न करता इतर कामात मन रमवू बघत होते. 

तेव्हा तो मित्र मला म्हणाला, की आपल्यासारखे उच्चमध्यमवर्गीय लोक हाताशी असलेल्या सगळ्या साधनांचा वापर करून भूमिका स्पष्ट लिहायला लाजतात. तू मोदीच्या द्वेषमूलक प्रचाराची ठार विरोधक आहेस, पण तू जाहीर लिहितेस-बोलतेस ते मात्र सिनेमाविषयी, पुस्तकांविषयी, खाण्यापिण्याविषयी. राजकारणाविषयी काही बोललीस तर आडवळणानं. असं का? तुला लाज वाटते का तुझ्या राजकीय भूमिकेची? लिहिणंबिहिणं तर सोडच, साधं एक व्हॉट्सअॅप  स्टेटस नाही ठेवू शकत का तू


त्या थेट विचारणेमुळे मी जामच विचारात पडले. त्याचं बरोबरच होतं. या सगळ्या राजकारणाचा आपल्या आयुष्यावर थेट परिणाम होतो हे मला मान्यच होतं. 
मग त्याबद्दल बोलण्यामध्ये लाजण्याजोगं काय होतं? 

तेव्हा फेसबुक बंद करून ठेवलं होतं. त्यामुळे काही मोठं लिहिण्या-बिहिण्याचा प्रश्न नव्हता. ब्लॉगला असलेला वाचक अगदीच तुरळक होता. मग एक प्रयोग म्हणून व्हॉट्सअॅप  स्टेटस वापरायचं असं ठरवलं. थेट आणि स्पष्ट राजकीय भूमिका दर्शवणारं, काहीही तिथे डकवायचं. त्यातून माहिती मिळत असेल, तर उत्तमच. पण त्याखेरीज नुसतं मत, विनोद, शेरा.. असंही काही ठेवायला हरकत नव्हती. मात्र फक्त आणि फक्त निवडणुकीच्या राजकारणाशी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जे संबंधित असेल, तेच लावायचं, असं ठरवलं. रोज ठरवून काही ना काही शोधून लावलं.

अतिशय धक्कादायक गोष्टी झाल्या. 

अनपेक्षित ठिकाणी, ऑफिसात, सोसायटीत, नातेवाइकांत... बाण लागले. 'तू राजकारणात पडलीयस का?', 'काय एकदम, प्रचाराला वाटतं?!', 'निवडणूक जास्तच सिरियसली घेतली का?'.. अशा करमणूक झालेल्या प्रतिक्रिया ऐकल्या. एरवी स्वतःला सुशिक्षित जागरुक मध्यमवर्गीय मानणारे काही लोक मी महागाईविरुद्ध बोलल्यामुळे माझ्यावर चक्क चिडलेभांडायला आले, वादायला आले. काहींनी मला विचार तपासून घ्यायला प्रवृत्त केलं, काहींना मी. अनेक जणांच्या बाबतीत आम्ही आपापले तट आणि गड कायम राखले फक्त! 

पण एरवी फोनमधला निव्वळ एक कॉन्टॅक्ट असलेले अनेक जण चॅट विंडोत येऊन बोलूही लागले. आपल्यासारखा विचार करणारं कुणीतरी आहे, असा सोबतीचा, दिलाशाचा भाग त्यात होता. अर्थातच ही सोबत दोहों अंगी झाली. खूप सोबत झाली. 

आम्ही वेळोवेळी, रात्री-अपरात्री एकमेकांपाशी निराशा, राग, तगमग, चिंता, व्याकूळता व्यक्त केली. राजकारणाशी संबंधित राहून काही ना काही, जमेल ते, झेपेल ते काम करण्याचे निश्चय बोलून दाखवले. धीर दिला, घेतला. बातम्या, व्हिडिओ क्लिपा, मीम्स्, पोस्टर्स, व्यंगचित्रं, मतं आणि चर्चा आणि विश्लेषणं, निरनिराळ्या यूट्यूबर्सची चॅनेल्स, पॉडकास्टं... असं किती काय काय दिलं घेतलं. या प्रकारच्या 'माला'ची देवाणघेवाण करणे हे रोजचं एक महत्त्वाचं कामच होऊन बसलं होतं! अतिशय महत्त्वाचं म्हणजे एरवी निव्वळ 'हाय-बाय' करणारे, त्यापलीकडे द्विमित राहिलेले अनेक मुस्लीम सहकारी, दाक्षिणात्य सहकारी माझ्याशी थोड्या का होईना, मोकळेपणाने बोलू लागले... 

कॉंग्रेसचं पूर्वी चुकलेलं नाही का, पुढे चुकणार नाही का, मोदीला पर्याय काय आहे.. हे नेहमीचे प्रश्न होतेच. त्यांना द्यायची ती तर्कशुद्ध उत्तरं दिली. पण त्यापलीकडे जाऊन 'इतकं करून विरोधकांनीही माती खाल्ली तर?' हा प्रश्न मला स्वतःलाही सतावत होता. त्यावर 'ही जोखीम लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही चुकलेली नाही, तेव्हा जी घ्यायची ती विरोधी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, घेता येईल' असा निस्संदिग्ध आणि वास्तववादी दिलासा आणखी एका मित्रानं दिला. ती या काळातली मूलभूत महत्त्वाची कमाई.    

हे अगदी वरवरचं आहे - मला कल्पना आहे. ही निव्वळ सुरुवातच असू शकते, याचीही कल्पना आहे.

पण मुख्य धारेतल्या माध्यमांनी पूर्ण लोटांगण घातलेलं असताना याची फार मदत झाली, हेही खरंच आहे. म्हैस, मंगळसूत्र, मटण, मुघल.. इथपासून ते 'मी मुळी बायोलॉजिकलच नाही' इथवर लज्जास्पद घसरण झालेली असताना - या सोबतीची गरज होती. 

ती देऊ करायला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारणीभूत झालेल्या मित्रांचे आणि मित्रेतरांचे आभार मानावेत, म्हणून हे नोंदवून ठेवलं - इतकंच. बाकी मागल्या पानावरून पुढे चालू. :)