Wednesday 31 October 2007

शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...

सांस्कृतिक कार्यक्रम तसे गावाला नवे नव्हेतच. गाणं, नाटक, चर्चा-बिर्चा, मुलाखती, व्याख्यानं... सगळ्यात तशी वरघटून गेलेली मी. पण परवाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाताना मात्र बर्‌याच दिवसांनी जुन्या घरी परतल्याचा ’फील’ यावा, तसं झालं. प्रत्यक्षात अप्रूप-कौतुक किती होतं मला कार्यक्रमाचं कुणास ठाऊक.. ’फॉर ओल्ड टाईम्स सेक...’ प्रकारच्या हुरहुरत्या-निसटत्या आनंदाचाच भाग जास्त असल्यासारखा...

नाटकाच्या जादूनं इतकं भारल्यासारखं व्हायचं, की साधं ग्रीन-रूममधे शिरतानाही बेक्कार धडधडायचं छातीत. त्याला कितीसे दिवस झाले? ए. सी., पर्फ्यूम्स, मेक-अप आणि चहा यांचा तो विलक्षण उत्तेजक गंध. आनंद, एक्साईटमेंट आणि एक विचित्र दडपण यांनी वाढलेले छातीचे ठोके. तिथल्या मंद-सोनेरी प्रकाशातला, धीरगंभीरपणे मेक-अप उतरवणारा वीरेन्द्र प्रधान आणि त्याचा शांत आत्ममग्न चेहरा. इतका लख्ख कोरला गेला आहे तो डोक्यात, की अजुनी ’स्ट्र’ला त्याचाच चेहरा दिला जातो आपसूक...

प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या बापाची जहागीर असल्याच्या थाटात उत्सुक चाहत्यांवर डाफरणारे मंडळाचे दीडशहाणे कार्यकर्ते आणि त्यांना शहाजोगपणे बाजूला सारून, चुपचाप आत घुसून आशुतोष गोवारीकरला गाठणारी मी. त्याच्या रोखठोक प्रामाणिक मुलाखतीचे रंग डोक्यात पुरते ताजे. त्याच्या किंचित मिश्कील, प्रश्नार्थक मुद्रेला तसंच हसर्‌या नजरेचं उत्तर देत त्याला विचारलं होतं, द्याल का सही? ’हात्तेरेकी!’ असं म्हणून त्यानं झोकात सही करून दिली तेव्हा त्याच्यावरही क्षणभर विश्वासच नव्हता बसला...

तसाच मारे जागा धरून ठेवायला म्हणून घाईघाईत गाठलेला सेवासंघातला सानेकरांच्या गज़लांचा कार्यक्रम आणि जेमतेम साडेतीन प्रेक्षकांनी ’भरलेला’ तो भला मोठा हॉल. आयोजक, माझ्यासारखे कुणी तीन-साडेतीन अतिहौशी रसिक आणि चक्क वाती वळायला येऊन बसलेल्या एक ’ए’कारान्त आजीबाई. आयोजकांच्या वतीनं मलाच मनापसून शरमल्यासारखं झालेलं. आणि तरी आश्चर्यकारक चढत्या गतीनं रंगत गेलेला तो कार्यक्रम. त्यातल्या ’तुझ्या डोळ्यांमधे गहिर्‌या, असा मी हिंडतो आहे’नं किती काळ साथ पुरवलीय...

शनिवारची रिकामी संध्याकाळ बळेच भरून टाकायला ’मॅजेस्टिक’मधे टाकलेली चक्कर आणि काउंटरपाशी गप्पा मारणारे चक्क आख्खे जिवंत खरे-खुरे सामंत. त्यांच्या हातात त्यांचंच कोरं पुस्तक कोंबत त्यांची सही मागितली, तेव्हा ’अरेच्चा, मला ओळखता की काय’ असं काहीसं पुटपुटत त्यांनी नाव विचारलं. आणि ते सांगितल्यावर ’वा, वा... पेठे व्हा’ असं म्हणाले. त्या सगळ्या अनपेक्षितपणाच्या आनंदात मित्राशी झालेलं एक मोठ्ठं भांडण आपणहून मिटवून टाकलेलं आणि ती उदास रिकामी संध्याकाळ पाहता पाहता रंगीत-झगमगती होऊन गेलेली...

’ग्रहणम्‌’ नावाचा एक अप्रतिम सुरेख सिनेमा फेस्टिवलमधे पाहिलेला. बाईच्या आयुष्याचे सगळे चढ-उतार आणि त्याबद्दलची तिची सोशीक सखोल समजूत... हे सगळं टिपलं होतं त्यानं त्या लहानश्या कथानकात. तेही काळ्या-पांधर्‌या रंगांत. त्याचं जाडेभरडेपण अधोरेखित करून दाखवायला म्हणून त्यानं अखेरीस वापरलेल्या काही लख्ख रंगीत, उजळ फ्रेम्स... काय माध्यमावरची पकड म्हणावी ही, अशा कौतुकात थेटराबाहेर पडत असतानाच समोर उभा राहून हसतमुखानं अभिनंदनं स्वीकारणारा दिग्दर्शक. अगदी आपल्या वयाचाच असावा इतका पोरगेलासा ताजा-हसरा चेहरा. परवा-परवापर्यंत त्याचं कार्ड जपून ठेवलं होतं नकळत...

आभारप्रदर्शन ऐकून उगाच रसभंग होईल याची प्रामाणिक भीती आणि म्हणून उद्धटपणाचा आरोप पत्करून मेघना पेठेची मुलाखत ऐकून घाईघईत काढलेला पळ. तेव्हा खुद्द तिची सही घ्यायला जायचीही भीतीच वाटली होती, इतका अनाघ्रात ताजा अनुभव रक्तात साठवलेला. मग तो सगळा अनुभव कागदावर ओतेपर्यंत कुणाशी बोलायलाही जमलं नव्हतं धड...

आणि तरीही...

परवा सौमित्रची मुलाखत ऐकायला जाताना मलाच माझा उत्साह लटका वाटणारा. तिथे जाऊनही मी ’हॅट, मराठी पुस्तकांच्या दुकानाचा वर्धापनदिन आणि जमलेली सगळी टाळकी पेन्शनीत निघालेली, मरणार वाटतं खरंच भाषा माझी..’ असल्या व्यर्थ चिंतेत चूर. सौमित्र आणि प्रभावळकर अशी स्टार दुक्कल समोर असूनही मी मुलाखतकार बाईंच्या शाळा-मास्तरू प्रश्नांवर उखडलेली. सौमित्रनं सादर केलेली कविताही चक्क ’बिलंदर सराईत परफॉर्मन्स’ वाटला मला...

घरी परतताना ’वा, मजा आली’ असं म्हणायचं असल्यास, तशी मुभा होतीच. पण का कुणास ठाऊक, असं म्हणायला जीभ रेटेना... एक्साईट होण्याच्या स्वत:च्या संपून गेलेल्या क्षमतांवर, उलटणार्‌या दिवसांसोबत स्वत:त येत गेलेल्या निबरपणावर चरफडावं; की ’आता असे उठल्या-सुटल्या कशानंही भारावून नाही जात आपण... शहाणे-बिहाणे झालो की चक्क’ अशी स्वत:चीच पाठ थोपटावी ते कळेचना...

संदीपचे शब्द आठवले परत एकदा (!) - ’शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...’

तसंच की काय हे?

वाढत्या वयासोबत येत गेलेली ही ’सो कॉल्ड’ मॅच्युरिटी की नुसतंच मद्दड कातडीचं निबरपण...

की एकाच नाण्याच्या दोन अपरिहार्य बाजू?

Monday 29 October 2007

तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा


'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.


तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

आणि आता,
थेट 'शोले'मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

प्रदेश उजाड खरेच...
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.

'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

Monday 22 October 2007

दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून - वाचनालयांतून - घरोघरी - देशी - परदेशी - रद्दीवाल्याकडे - तिथून पुन्हा एखाद्या हौशी वाचकाकडे... रिसायकल होत राहतात. दुसर्‌या कुठल्या भाषेत या अशा वार्षिकांची परंपरा नाही. अनियतकालिकांची चळवळ क्षीण होऊन गेल्यानंतरही हे सो-कॉल्ड स्वस्त साहित्य अजूनही जीव धरून आहे. त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहांचं प्रतिबिंब अजूनही लख्खपणे दाखवतं आहे.

’खरं साहित्य कुठे फळतंय ते त्या ’yz’ ना माहीतच नाहीये’ हे संवेदचं वाक्य खरंच. कारण एरवी साहित्यातल्या अनेक प्रवाहांचं प्रतिबिंब दाखवणार्‌या दिवाळी अंकांनीही ब्लॉगविश्वाची दखल घेतलेली नाहीच! आता निव्वळ ’आठवणींचे कढ’ किंवा ’स्वरचित कविता छापण्याची हौस’ या प्राथमिक अवस्थांतून ब्लॉगविश्व काहीसं बाहेर पडत असलं तरीही.

तरीही... तरीही त्यांचं मोल कमी होत नाही. वर्षानुवर्षं दर्जा टिकवून असणार्‌या - चाकोरीबाहेरचे दमदार विषय देणार्‌या ’अक्षर’पासून खानदानी बैठक सांभाळून असणार्‌या ’मौजे’पर्यंत... धूमकेतूसारख्या लख्ख चमकून लुप्त झालेल्या ’चार्वाक’पासून संपादिकेचा आगळावेगळा ठसा घेऊन येणार्‌या ’शब्द’पर्यंत... काहीश्या बोजड म्हणता येतील अश्या चर्चांनी विद्वत्त्जड-भारदस्त वाटणारे ’सत्याग्रही’-’युगांतर’ आणि टिपिकल पुणेरी बाजाचा पण, काटेकोरपणे दर्जा आणि वेगळेपण सांभाळून असणारा ’साप्ताहिक सकाळ’...

किती नावं घेतली तरी काही ना काही सुटून जाणारच...

या निमित्तानं तुम्हीही लिहा दिवाळी अंकांवर. टॅग करणं तसं निमित्तमात्रच. मी या मंडळींना टॅग करतेय.. पण ’खो’ तुमच्यापर्यंत पोचण्याआधीही तुम्ही लिहू शकताच!

नंदन
अभिजीत कुलकर्णी

ट्युलिप

Saturday 20 October 2007

गणपती बाप्पा मोरया!

गणपती आणि इन जनरलच देव-धर्म-संस्कृती-सण-समारंभ-सोहळे यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यामुळे कुणाच्या भावना दुखावणार वगैरे असतील तर पुढे वाचू नका. हा मजकूर तुमच्यासाठी नाही.

मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पाहिलाय, की आपल्यालाही चार लोकांसारखं गणपती आल्यानंतर उत्साही वगैरे वाटावं. पण तसं होत नाही. आधीच पावसाची नवलाई संपून ’पुरे आता, टळा’ या प्रकारचा मूड झालेला असतो. रिपरिपणारा पाऊस, खड्डे, चिखल, रस्त्यावरून तुंबलेलं पाणी आणि त्यात तरंगणारा कचरा... आणि मग शिवाय गणपती.

गणपती, त्याचा लडिवाळ आकार, त्याचं बुद्धीची देवता वगैरे असणं आणि संस्कृती-बिंस्कृती सगळं ठीक आहे, पण आता मला नाही त्यात फारशी मजा वाटत, तर कुणाची काही हरकत आहे का? पण नाही. एकदा गणपती हा शब्द उच्चारला की तुमच्या भावना कश्या उचंबळून इत्यादी आल्याच पाहिजेत. नाहीतर तुम्ही उद्धट. बरं, तेवढ्यावर भागत नाही. आपण ज्यांना वर्षाकाठी फक्त एकदाच पाहतो अशा नातेवाईक कम परिचितांकडे जा, त्यांच्या थर्माकोलच्या भीषण सजावटी पहा, तळलेल्या पोह्यांचा (किंवा मक्याचा) भयानक गोड चिवडा आणि ते पिठूळ लागणारे, त्रिकोणी खोक्यातून येणारे (यात काय मस्णी गोम आहे कुणास ठाऊक), ’काजू मोदक’ नावाचा अपमान करणारे गोळे खा आणि कोरे कपडे चिखलापासून सांभाळायची कसरत करत दिवसाकाठी साधारण तेरा-साडेतेरा घरं घ्या. काय डोंबलाची गंमत?

हां, आता कुणाला बोंबलायची हौस फिटवून घ्यायची असेल, तरी मी समजू शकते. पण मला तीही हौस नाही. मॅडसारखं देवाच्या पुढ्यात उभं राहून ’येई हो विठ्ठले...’ किंवा ’गरुडावर बैसोऽऽऽऽऽऽऽऽनी’ ओरडण्यात नाही बुवा मज्जा वाटत. ते नाही तर नाही, ब्राह्मणी पद्धतीत शांतपणे अथर्वशीर्षाची आवर्तनंही करून पाहिलियेत मी. पण ह्यॅ:! पार मूर्खासारखं वाटतं. एकच एक स्तोत्र आपलं परत परत परत परत म्हणायचं. काय अर्थ?

मोदक या कम्पल्सरी लोकप्रिय पक्वान्नाचंही मला प्रेम नाही. एखादा बरा लागतो गरम असेल (उकड लुसलुशीत शिजली असेल, सारण खमंग असेल आणि तूप रवाळ-ताजं असेल) तर. पण तेवढ्यासाठी तो गणपती आणि आरत्या नावाचा तासंतास ताटकळवणारा प्रकार आणि बेक्कार ध्वनिप्रदूषण सोसायचं? एवढे काही छान नाही लागत मोदक.

भरीत भर म्हणून तो टिळकांनी माथी मारून ठेवलेला सार्वजनिक गणपती नावाचा प्रकार. कसली जागृती आणि आणि कसलं काय! ’ओ’ येईस्तोवर केलेल्या त्या फिरत्या लाइटिंगमधे सौंदर्य असतं, की त्या निर्बुद्ध हलत्या पुतळ्यांच्यात? की तिथे केलेल्या दारूबंदी इत्यादी देखाव्यात?

यात विरुद्ध बाजूनं बोलण्यासारखेही बरेच मुद्दे आहेत. सार्वजनिक उन्मादाला वाट काढून देण्याची गरज, सांस्कृतिक भूक भागवण्याची सोय, विचार न करता माथा झुकवण्यामधली सोईस्कर मानसिक शांती, ’साजरं’ करण्यासाठी निमित्त इत्यादी इत्यादी. थोडीफार फिरवाफिरवी केली तर ते गोकुळाष्टमी, नवरात्र, दिवाळी या सगळ्या सणांनाही लागू पडतात. पण अर्थपूर्णता संपून गेलेली प्रतीकं निव्वळ कर्मकाडातल्या गंमतीसाठी जपणं मला करायचं नसेल, किंवा मुळात मला त्यात फारशी गंमत येत नसेल, तर ती न करण्याचं, तिच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य मला असणार आहे की नाही हा मुद्दा आहे. की तिथेही भावना दुखावल्या अशी सोईस्कर बोंब आपण मारणार आहोत?

Saturday 13 October 2007

तीच तर गंमत...

पुन्हा एकदा मी का लिहितेय त्याचं समर्थन करणार होते॥ पण नको। डझण्ट मेक एनी सेन्स. :)

आत्ता आपण खरोखरच एकमेकांच्या समोर नसतो तर फार बरं झालं असतं। माझा जीव खरोखरच इतका अडकला आहे का तुझ्यात, की हे नुसतेच आकर्षणांचे मोह... हट्टीपणाने घर-दार व्यापून बसलेले... ते पडताळून पाहता आलं असतं. समोर माणूस नसताना, तो तसाच्या तसा जागता राहिला मनात... कुठलंच प्रतीक वा मृत आठवण बनून न राहता... जिवंत संवाद घडला त्याच्याशी तो समोर नसूनही... तर म्हणावं... की होय, माझा जीव गुंतला आहे तुझ्यात.

पण आत्ता?

आत्ता तू रोज दिसतोस. एकमेकांच्या अवस्थांचे अंदाज न लावण्यातच सगळी असेल नसेल तेवढी शक्ती खर्च होऊन जाते. रात्रीला आपण पार कंगाल. विखुरलेल्या स्वत:ला कसंबसं गोळा करून निवार्‌याला जाऊन पडणे एवढं एकच माफक ध्येय जपू शकणारे. कसली स्वप्नं आणि कसली ध्येयं...

म्हणून जमेल तितक्या लवकर तुझ्या डोळ्यांसमोरून उठून जायचंय. तू खरंच मजेत आहेस का..... हा विकृत प्रश्न नको आणि जीवघेणे अंदाज नकोत. स्वत:ची रोज उठून परीक्षा पाहणं नको आणि तुझी घेऊन तुला नापास होताना पाहणं नको. माझी गोची किती अवर्णनीय सुरेख... तू पास झालास तरी मलाच दुखणार आणि नापास झालास तरी स्वत:वर संतापून मीच कळवळणार! आहे की नाही मजा?

काय अर्थ?

कुणास ठाऊक...
आत्ता उद्धृत करायला सौमित्रची एक भीषण सुंदर कविता आठवतेय... पण नको.... कविता नकोत.

असेच वार्‌यावरचे निरुत्तर करणारे अनेक प्रश्न...

आणि आपण नुसते पाहत बसलेले... अगतिकपणे.

तो विचारतो मग स्वत:लाच... ’काय अर्थ?’

तर अर्थ काहीसुद्धा नाही...

जगातल्या सगळ्या कविता साल्या कुठेतरी खोल पुरून टाकल्या पाहिजेत.
कदाचित मी नीट नॉर्मल वागीन.
कुणास ठाऊक. कदाचित नाहीnaahiihii..
मग कदाचित मी स्वत:च लिहीन एखादी कविता नाईलाजानं. काय अर्थ?तर अर्थ काहीसुद्धा नाही!



मरो.......
सालं स्वत:चं असं काहीतरी सापडायला पाहिजे. म्हणजे जगदीशचंद्र बोसांना कशी झाडं सापडली, किंवा व्हॅन गॉगला रंग-रेषा किंवा सौमित्रला शब्द.... स्वत:मधली असेल नसेल तेवढी सगळी मस्ती, सगळी ऊर्जा... आत उसळणारं हे सगळं सगळं... तिथे उधळून टाकायचं...
कधी सापडेल? शोधत राहायला पाहिजे. स्वत:पासून सुटण्याचा तेवढाच एक मार्ग. शोधला पाहिजे. काय वाट्टेल ते झालं तरी शोधला पाहिजे..... मरायच्या क्षणापर्यंत शोधत राहायला पाहिजे.....त्यात हे असे दुखण्या-खुपण्याचे रस्ते अनिवार्यच. त्याची भीती नाही. दुखण्याच्या भीतीनं पाय मागे घेतला असता, तर इथवर आलेच नसते...मला दु:ख हवं, सुख हवं, अपेक्षा हव्यात, अपेक्षापूर्तीच्या अपेक्षा हव्यात आणि अपरिहार्य असतील तर अपेक्षाभंगही... सगळं सगळं हवं. दोन्ही हातांनी भरभरून हवं.. कितीही रक्ताळला जीव तरीही..
’जगातलं एकपण सुख नाही सोडणार...’ असं म्हणाला होतास तू, अगदी फिल्मी उत्कटपणे, दूर क्षितिजापार वगैरे नजर रोखून... आठवतंय? किती शर्थीनं निभावलंस ते! आणि मीही. फक्त आपल्या संदर्भबिंदूंची पाऽऽर उलटापालट झालेली. तीच तर गंमत...

Thursday 11 October 2007

बाकी सारे तसे आलबेलच...

तसा दुष्काळ नाही

आणि वादळ-बिदळही.
सूर्य उगवतो, चंद्र मावळतो,
दुपारींमागून संध्याकाळी,
संध्याकाळींमागून रात्री,
एका लयीत उलगडत जातात.
पाऊस-बिऊसही पडतो सालाबादप्रमाणे नियमित.
सारे तसे आलबेलच.


काही झाडे मात्र अबोलपणे सुकत जातात.
पानांचा जगण्यातला रस संपून
त्यांनी झाडाची बोटे अलगद सोडून द्यावीत,
ऊन-पाऊस सोसत मुकाट उभे राहण्याखेरीज
खोडालाही काही सुचूच नये,
फुला-फळांनीही आतल्या आत घट्ट मिटून घ्यावे स्वत:ला
एखाद्या गरिबाघरच्या अपंग वेडसर मुलासारखे
निमूट समंजसपणे,
तसेच.
तसेच घडत जाते सगळे
काही झाडांच्या बाबतीत.


तसा दुष्काळ नाही आणि वादळ-बिदळही..
सूर्य-चंद्र, दिवस-रात्र, उन्हाळे-पावसाळे...
पाऊसही पडतो नितिमत्तेचे सारे संकेत पाळत सालाबादप्रमाणे नियमित.


काही झाडे मात्र या सगळ्यातून निर्विकारपणे उठून गेलेली.
बाकी सारे तसे आलबेलच.

***


उद्मेखून तुला टाळत कामा-बिमाचे कृत्रिमपणे उभे करत नेलेले ढीग। तुझ्यातून आरपार पाहत लोकांशी मारलेल्या गप्पा. महत्प्रयासानं का होईना, पण चेहरा पुरता कोरा करून निभावलेल्या काही सोशल वेळा. कडेकोट बंद करून घेणं निर्दयपणे.


तेव्हा तुला प्रथम इतकं निर्लज्जपणे हताश झालेलं, त्यातून मला खवचटपणे टोमणे मारताना पाहिलं। तेव्हा चुकचुकली होती पहिली शंकेची पाल. वाटलं, मित्रा, तू नसणार आहेस. लेट मे गेट यूज्ड टु इट... का दोन दगडांवर पाय ठेवायला पाहतो आहेस?


पण इतकं सोपं थोडंच असतं? अजून बर्‌याच वाटा काटायच्या शिल्लक...


***


मीटिंग्ज्‌, रिपोर्ट्‌स, टारगेट्स आणि अचीव्हमेंट्स। आयुष्य कसं यथासांग यशस्वीपणे आणि बिनबोभाट चाललंय असं स्वत:लाच समजावत राहण्याचे रस्ते आपल्याला मिळाल्यासारखे. शक्यतोवर एकमेकांना टाळणं, गोष्टी ऐकून न ऐकल्यासारख्या करणं, समोरसमोर यायची वेळ आलीच तर दात काढून ती साजरी करणं या सगळ्या आयुधांचा वापर करण्यात आपण एकदम तरबेजच झाल्यासारखे.


अशात कधीतरी एकदा भंकस करत असताना कुणीतरी तुझ्या मनगटावरच्या ओरखड्यावरून तुझी यथेच्छ चेष्टा करायला घेतली। ’मी इथे असणं बरोबर नाही’ असं म्हणून धडाम्‌दिशी तिथून उठून जाण्याचं स्वातंत्र्य घेतल्यास गैरसमज होण्याची शक्यता असल्यामुळे मी चुपचाप पुतळा होऊन जागच्या जागीच गप. ’लाज तर वाटतेय, पण एरवी माझ्या अनुपस्थितीत हसत बेदरकारपणे उडवून लावली असती अशी गोष्ट आता नको इतकी अवघड होऊन बसलीय...’ अशातली तुझी गत. खोटं कशाला बोलू, उठून जाता येत नाही म्हटल्यावर, आय स्टार्टेड एन्जॉइंग इट. शेवटी तुझा गोरामोरा चेहरा न पाहवून, मीपण मस्करीत भाग घेतल्यासारखं केलं आणि हसत हसत उठून चालती झाले.


तेव्हा तुला हायसं वाटल्याची नोंद घेतली होती, पण मी हसत उठून गेल्यावर तुझा झालेला, कळे-न कळेसा अपेक्षाभंग? असूयेचा धागाही नाही उरलेला... अशी हताशा? प्रामाणिक खरं-खुरं दु:ख? कुणास ठाऊक। तेव्हा हे सगळं नोंदायचं राहूनच गेलं....


***


असाच कधीतरी धीर करून माझ्या डेस्काशी गप्पा मारायला आला होतास तू. मीपण निर्ढावून निवांत गप्पा मारल्या काफ्फा आणि मिलेनाच्या पत्रांवर. मराठी नाटकांवर. शाहरुखच्या इण्टेन्सिटीवर. इंग्रजी वृत्तपत्रांवर.


बोलता बोलता सहज बोलल्यासारखं करत म्हणालास - आमच्या घरी इंग्रजी पेपर फक्त मीच वाचतो. नाटकं-बिटकं काय आम्हांला आवडत नाहीत। आणि पुस्तक वगैरे तर माफीच....


तेव्हा कुणीतरी कानफटीत मारावी तसा माझा चेहरा झाल्याचा माझा मलाच नीट आठवतो। म्हणजे एखादी गोष्ट मोडून बाहेर पडण्याचे गट्स नाहीत आपल्यात, तर त्याचा दोष बरोबरच्या माणसाच्या सो-कॉल्ड सामान्यपणाला देणार तू? आणि अशा तुला मी इतकं माझं म्हणावं? आत्ताच्या आत्ता इथून उठून चालतं व्हावं, वणवणावं उन्हातान्हातून, किंवा निवांतपणे झोपावं घरी जाऊन... कुठेही असावं, पण इथे असू नये असा लालभडक संताप आल्याचा आठवतो स्वत:चाच.


मग अशा अनेक वेळा येत गेल्या आणि मी बोलणंही टाळायला लागले नकळत...


***


तरीही तुझ्या वाढदिवसाला तुला चार जणांसारखं ’हॅपी बर्थडे’ म्हणणं नाहीच जमलं मला। ’काय देऊ’ असं विचारलंच मी. पुरेसे आढेवेढे घेऊन माझ्यावरच उपकार करत असल्यासारखा ’पुस्तक दे, पण नाव नको घालू, म्हणजे मी निवांतपणे वाचीन...’ असं म्हणालास, तेव्हा वाटलं, आता कसं, अगदी शेवटची वीट रचून कुणीतरी पुरं चिणून टाकावं तसं सगळं नीट पुरं झालं!


***


नीती-अनीतीच्या सर्वमान्य संकेतांमधले आणि असल्या कुंपणावरच्या बेईमानीमधले वाद तर पहिल्या दिवसापासून घालत आलो आपण.


आता प्रात्यक्षिकांतून तावून-सुलाखून बाहेर पडण्याचे दिवस।


हे सगळं इतकं अवघड असणारेय हेही ठाऊक होतंच. पण तरीही वाटा काटून संपवण्याचे दिवस.


तुझा आणि तुझ्यापेक्षाही स्वत:चा इतका कडकडून राग राग करतानाही एक मात्र येतं मनाशी अजूनही। वाटतं, या सगळ्या भ्याड तडजोडींच्या पलीकडे एक दिवस असा येईल, जेव्हा तुला स्वत:ला जाब द्यावा लागेल... तेव्हा काय होईल तुझं? तेव्हाच्या तुझ्या भीषण एकटेपणाच्या जाणिवेनं पोटात अक्षरश: खड्डा पडतो...


सालं हे तुझ्या काळजीनं पोटात खड्डा पडणं थांबेल ना, तर बर्‌याच गोष्टी सोप्या होतील...


अर्थात बर्‌याच गोष्टी बिनबोभाट मरूनही जातील...


चालायचंच. इतक्या सगळ्या पसार्‌यात काही झाडं जगली काय अन्‌ मेली काय...


बाकी सगळं आलबेल असल्याशी कारण... ते तसं आहेक

Thursday 4 October 2007

मला कंटाळा आलाय

बेक्कार खूप निष्क्रिय सुस्त उदासवाणा वांझोटा कंटाळा आलाय.

तो गेला की मग लिहा-बिहायचं बघू.

Tuesday 2 October 2007

जे जे उत्तम...

नंदन, टॅग केल्याबद्दल मनापासून आभार.


’जे जे उत्तम...’मागची नंदनची भूमिका इतकी नेमक्या शब्दांत मांडलेली आहे, की ती तशीच्या तशीच इथे देते:

(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)


***


आपण रस्त्याने जाताना कुणी वळून तर पाहिले, पण नुसतेही पाहणार नव्हते, आणि अखेर आपल्या येण्याजाण्याने हवा तरी इकडची तिकडे हलते की नाही असेच वाटायला लागते. कुणाचे काही कारणाने लक्ष जावे असे आपल्यात काही नाही ही शंका जरी मधूनमधून आलेली असली तरी तारुण्यसुलभ आशेने तिच्याकडे दुर्लक्ष करायला पहिलेले असते; पण तो आशावाद किती मूर्ख आहे हे मनापासून आणि उपकार करायच्या हेतूने गळी उतरवण्यात आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना जेव्हा अपेक्षेबाहेर यश येते, तेव्हा (आपणच शोधून काढलीय जणू, अशी!) एक कल्पना काही काळ आधारभूत होते: आपल्या भल्या-बुर्‌या कसल्याही बाह्य रूपाच्या आत डोकावू शकणार्‌या कुणा विशेष संवेदनाक्षम आणि काकदृष्टीच्या अंतर्ज्ञानी व्यक्तीला आपल्या मनाचे आणि बुद्धीचे गुण दिसतील (जे आपल्यात आहेत असे सगळ्यांना वाटते) आणि ती आपल्याला जवळ करील. अर्थात ’ती’ व्यक्ती म्हणजे एक पुल्लिंगी माणूस, (आणि कल्पनाच करायची तर का नाही?) देखणा, हुशार, श्रीमंत इ. इ. अशी माफक अपेक्षा (मूर्खासारखी)! पण तिच्यातही राम नाही हे (खरे तर मूर्ख नसल्यामुळे) उमजते आणि मग उरते एक नैसर्गिक ऊर्मी: स्त्रीलिंगी मनुष्य म्हणून जी एक मर्दुमकी - म्हणजेच औरतकी - गाजवता येण्यासारखी आहे, ती बिनबोभाट गाजवावी. ह्या ऊर्मीमागेही आशाळभूत विश्वास असतो, की आपण निर्माण केलेल्या त्या माणसाला तरी (काही काळ) आई म्हणजे बिनतोड परिपूर्णता, असे वाटेल! पण त्यासाठी हरतर्‌हेच्या तडजोडी करूनही जेव्हा सगळी वासलात लागते तेव्हा आधीच माफक असलेला आत्मविश्वास संपूर्ण नष्ट होतो. खांदे पाडून, मान कासवासारखी आत घेऊन, शक्य तितक्या निरुपद्रवीपणे आयुष्य काटताना एकच मागणी उरलेली असते: इतका काळ जसा कुणाच्या नजरेस न पडता काढला तसा उरलेलाही काढून कुणाला तोशीस न पडता होत्याचे नव्हते होऊन जावे.


आयुष्याच्या अशा आखीव आणि ’सुरक्षित’ टप्प्यावर जेव्हा ध्यानीमनी नसता जाणवते, की ज्यांच्याबद्दल विचार करायचे कैक वर्षांपूर्वी सोडून दिले होते ती ’अंतर्ज्ञानी’ माणसे जगात आहेत, इतकेच नाही तर सरळ पुढ्यात उभी राहून विचारताहेत, की तुमच्या मनाची आणि बुद्धीचे जे गुण (ते आपल्या ठायी आहेत ही समजूतही तोपर्यंत सोडून दिलेली असते) आम्हांला दिसताहेत त्यांचे तुम्ही काय करताहात? तेव्हा मग चाकोरीत स्तब्ध उभे राहून स्वत:संबंधे पुनर्विचार करायचा येऊन पडतो.


हे कठीण, कारण आयुष्याची इतकी वर्षे आपण फुकट घालवली की काय, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर द्यायची तयारी करायला लागते. बहुतांश लोकांनी ठरावीक मार्गाने वाटचाल करण्यात ज्यांचे भले असते अशांनी आखून दिलेल्या मार्गाने आपण आजवर का चालत आलो? आणि तेही त्याच्यात आपले फारसे भले दिसत नसताना? कुठलेही प्रश्न न विचारता पुढे जाणार्‌या आळशी अथवा अंध अथवा हतबल अथवा प्रवाहपतित जनांच्या ओघामागून आपण पावलामागे पाऊल का टाकत राहिलो? काही रूढ कौटुंबिक वा सामाजिक संकेतांत ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांची हुकूमशाही का सहन करत आलो? त्या नव्या ’अंतर्ज्ञानी’ मित्रांनी विचारलेल्या प्रश्नाचे प्रतिध्वनीच जणू, असे हे सारे प्रश्नही जेव्हा मनात अखंड आणि कर्कशपणे निनादू लागतात, उत्तरांसाठी हटून बसतात, तेव्हा आजवर मुकाट काटली त्याव्यतिरिक्त दुसरी वाट कुठे आहे का याचा शोध घेणेही भाग पडते.


- ’मुक्काम’, गौरी देशपांडे


***


मी या मंडळींना टॅग करतेय -




मॅड्‌झ