Monday, 18 October 2021

नकाशे

मनगटाच्या आतल्या नाजूक बाजूला असलेल्या,

दिसे न दिसेश्या तिळासारखा,

एखादाच सवयीचा, झिजून मृदावलेला शब्द.

प्रेडिक्टेबल चिडचिड,

कोपरावरच्या ओबडधोबड खळीसारखी.

एखाद्या सर्कसपटूच्या सराईतपणे,

मान वळवता वळवता अचूक फेकलेला,

तिरका कटाक्ष धारदार.

वा,

बर्फाच्या पिसासारखं, 

नजरेस पडता पडताच वितळून जाणारं हसू जिवणीच्या कोपऱ्यातलं.

काळोखातही बोटांनी अचूक गिरवता यावेत,

अशा प्रदेशांचे हे अंतहीन पसरलेले नकाशे.

कुठवर आवरून बांधून ठेवशील,

सांग.

Tuesday, 7 September 2021

to friends...

'शाळेतली मैत्रीण ही माझी' असं म्हणून माझ्या ऑलमोस्ट चाळिशीच्या मैत्रिणीची ओळख करून दिली, की लोक एकदम आदरानं बघतात, हेच मला कमालीचं अचंबित करणारं वाटे. आमची मैत्री इतकी 'जुनी' असल्यामुळे वयोवृद्धांना भारतात दिला जातो तशापैकी अकारण आदर आपल्याला दिला जातोय असं वाटून चिडचिडही होई. आम्ही शाळेत भेटलो नि एकत्र चित्रकलेच्या वर्गात कुचकुचलो तेव्हाची मैत्री निराळी; नंतर वाढताना, बदलताना, निरनिराळे मित्रगट वागवताना कशा कुणास ठाऊक एकमेकींबरोबर असतच राहिलो तेव्हाची मैत्री निराळी; एकमेकींना अजिबात ठाऊक नसलेली वयाला साजेशी प्रेमप्रकरणं करून, एकमेकींची मुक्यानं काळजी करत राहून, सरतेशेवटी एकमेकींपाशीच येऊन बोललो, नि आपल्याला कुठे दुखलं आहे समोरच्या व्यक्तीला अचूक कळतं आहे हे जाणवून चकित झालो नि सुखावलो तेव्हाची मैत्री अजूनच निराळी. या सगळ्या जणू निरनिराळ्या माणसांनी केलेल्या मैत्र्या होत्या नि कर्मधर्मसंयोगानं ही सगळी माणसं आम्हीच वागवत आलो होतो, म्हणून आमची मैत्री शाळेतली, असं म्हणता येत होतं. तरी 'शाळेतली मैत्रीण! किती भारी!' अशातलंच कौतुक? अगदीच झंपट वाटायचं.

पण मग वयाच्या निरनिराळ्या टप्प्यावर, तथाकथित जाणतेपणी, पारखून-निरखून, सावडून-निवडून, मनापासून, झोकून देऊन केलेल्या अनेक मैत्र्यांमध्येही विश्वासघात होतच राहिले नि आम्ही पुन्हापुन्हा एकमेकींशी बोलत राहू शकलो, तेव्हा हळूहळू या जुनेपणाची किंमत थोडीथोडी कळू लागली. त्यात निव्वळ जुनेपणाला दिलेला आदर नव्हता, नसावा. इतक्या वर्षांचा सहवास घडावा, त्यात दोन माणसं साधारण एकाच वेगानं समांतर चालत राहावीत, आणि त्यांच्या नात्यात इतक्या वर्षांच्या कालखंडानं कसलाही मोठा कडवटपणा आणू नये, रक्ताच्या नात्याविना-शृंगाराच्या बांधलेपणाविनाही जवळीक टिकावी... या विलक्षण योगायोगाच्या गोष्टीला नकळत दिलेली दाद होती असावी.

हे कळू लागलं, तेव्हा कुठे, तोवर मैत्रीभंगानं प्रेमभंगाइतकीच उद्ध्वस्त होणारी मी किंचित प्रौढ झाले असणार. मग मला दर पंधरा माणसांनंतर एकदाच मिळू शकण्याच्या शक्यतेची शक्यता बाळगणारी एक लखलखीत मैत्री गृहीत न धरण्याची सवय स्वतःला जाणीवपूर्वक लावून घ्यायला पाहिजे हे मान्य करता आलं. सगळ्याच मैत्र्या सगळीकडून आपल्याला अशा अंगासरशी होणाऱ्या, जुन्या, मऊ, विटक्या कुर्त्यासारख्या 'होणार' नाहीयेत आणि तरी त्यांचं ठेवणीतलं असणं ही आपल्या भाग्याचीच बाब आहे, हे थोडथोडं समजू लागलं. आपण उधळून मैत्री करण्यात घेत असलेल्या जोखमीची बूज न राखता कुणी वेड्यासारखं वागलं, तरी तितकं खोलवर दुखेनासं झालं. आपण निबर झालो की काय अशा भीतीनं धस्सही झालंच! पण हेही ज्यांना सांगून कोरडं, समंजस, पण खोल हसू शेअर करता येईल, अशा समवयस्क, विषमवयस्क, नात्यातल्या, नात्याबाहेरच्या, अंतरं अर्थहीन करणाऱ्या, सामाजिक वर्तुळं किंचित का होईना ओलांडणाऱ्या, नव्या, उत्कट मैत्र्या मिळत राहिल्या.

हे श्रेय माझं अर्थातच नव्हे. माझ्या क्षमाशील आणि प्रयोगशील आणि वायझेड मित्रांच्या जिवावर मी टिकवून धरलेल्या, माझ्यातल्या वेडसरपणाचं आहे. सगळ्यांना असेच वायझेड मित्र मिळावेत, टिकावेत, आणि नव्यानं मिळत राहावेत, यापल्याड काय म्हणायचं असतं?

Friday, 16 July 2021

पुस्तकं राहतात साठून

निरर्थक सामान साचत जावं एखाद्या श्रीमंत होत गेलेल्या मूळच्या गरीब माणसाच्या घरात, 
तशी पुस्तकं राहतात साठून.
कणाकणानं, क्षणाक्षणानं ससंदर्भत्वावर साचत राहते धूळ. चिऱ्याचिऱ्यानं ढासळत राहतात त्यांचे आयुष्याशी बांधलेले पूल. 
साठवणाऱ्यानं कधीमधी उघडून पाहिल्यावर 
स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाला ऐकू यावी पूर्वायुष्यातली एखादी आर्त धून,
विलक्षण ओळखीची भासावी, 
पण काही केल्या तिच्या कडा स्मृतीत रेखीव कळीदार होऊ नयेत, 
तस्सेच राहावेत धूसर अपरिचयाचे हट्टी ढग चंद्राला ग्रासून.
का हात घालतो आहे हा साधासुधा बिनभावनांचा मजकूरही आपल्या काळजाला,
आणि का येताहेत डोळे उगाच काठोकाठ भरून?
मजकुराच्या शिड्यांनी कधीकाळी अपरिचित विश्वात लीलया संचारू शकणाऱ्या आपल्याच पूर्वजन्माखेरीज,
दुसऱ्या कुठल्याच विश्वात न नेऊ शकणाऱ्या
या मोडक्यातोडक्या वाटा पाहताना,
मनोमन थरकापत असतील का माणसं,
आपलं वठू लागलेलं कुतूहलशून्य मन दिसून?
अशा वेळी पुस्तकांना पडत असतील का स्वप्नं,
ससंदर्भ घराची,
तरण्याबांड याराची,
येत असेल ऐकू कुण्या अनाघ्रात मनाची कोवळी अल्लड धून?
निरर्थक सामान साचत जावं एखाद्या श्रीमंत होत गेलेल्या मूळच्या गरीब माणसाच्या घरात, 
तशी भारंभार पुस्तकं राहतात साठून.

Thursday, 3 June 2021

मला पुन्हापुन्हा रोज...

मला पुन्हापुन्हा रोज नव्यानं प्रेमात पडायचंय तुझ्या. 
किती आनंदानं चमकत राहतात माझे डोळे.
दुःख, मरण, कष्ट बघून भरून येतात, 
वाहतात दुथडी भरून.
अन्याय बघून पेटून उठतात.
पण तरी तुला नजर करण्याकरता 
इवली-इवली रानफुलंही टिपत राहतात अथकपणे.
मिटले, तरी स्वप्नात तुला बघत राहतात.
विसावतात. 
उद्याच्या दिवसाची पाखरं बघायला नव्यानं आतुर होतात,
उद्याच्या दिवसाचं ऊन बघायला नव्यानं सज्ज होतात,
रोज.
मला प्रेमात पडायचंय.
पुन्हापुन्हा.
रोज.
नव्यानं.
तुझ्या. 
किंवा खरं तर कुणाच्याही.
आनंदानं चमकत राहतात माझे डोळे...

Tuesday, 11 May 2021

दिङ्मूढ

आपल्यातला ओबडधोबड, अर्धकच्चा जिवंतपणा लोपून 
बघता बघता त्याची जागा घेते एक सराईत सवारी.
भल्याभल्यांना नाही लागत चाहूल.
ऐकू येतात थेट टापाच.
कितीकांना तर त्यांचीच पडते भूल.
हालचालींमधल्या सावध, श्वापदी, 
काळीज लक्कन घशात आणून सोडणाऱ्या
भीतीच्या अणकुचीदार पकडीतून निसटत राहण्याहून,
सोपं वाटतं सेफगेममध्ये दुडकत रमलेलं पाऊल.
फार थोड्यांना दिसतात यातले धोके.
तरीही सवयींचे प्रदेश सोडवत नाहीत, सुटत नाहीत.
पण दिवसाच्या ढळढळीत उजेडात दिवाभीतासारखी दडून बसलेली थोडी शरम,
रात्रीबेरात्री उतरते त्यांच्या अंगणात.
चखणा म्हणून बघावी थोडी चाखून,
इतकीच.
या सगळ्यांहून निराळा
एखादाच कुणी,
अभागी भाग्यवंत
सरावाची आणि सवयींची मैदानं धीरानं मागे टाकून
कसल्याशा अनामिक ओढीनं निघतो
सगळे पाश सोडवून.
कुणास ठाऊक कसल्या धपापत्या स्वप्नाच्या मागावर?
हेमिंग्वेच्या म्हाताऱ्यानं दिलेला शाप विसरून.
शाप की वर?
किनाऱ्यावर आपण दिङ्मूढ होऊन.

Sunday, 9 May 2021

पुस्तके साठत जातात : १

'पुस्तके साठत जातात' नावाची काळसेकरांची एक कविता आहे. तशी साठत गेली आहेत पुस्तकं. पुस्तकांच्या गठ्ठ्यातले कणे बघून एका नजरेत हवं ते पुस्तक बाहेर काढणाऱ्या मला एका पुस्तकासाठी ही उलथापालथ करावी लागली, तेव्हा एक नवाच किडा चावला. लहानपणी अधाश्यानं चवढव न बघता टोपलीभर अन्न चुटकीसरशी फस्त करावं तशी फस्त केलेली पुस्तकं आता निराळी दिसतात का, हे बघण्याचा किडा. पुस्तकं तीच असली तरी आपण तेच नाही. लहान तर नाहीच, उत्कट ताजे-टवटवीतही नाही. तेव्हा भिडलेलं आताही भिडेलच असं नाही. तसंच बेहोशीत वाचलेलं काही अंगावरून वाहून गेलं असेल गद्धेपंचविशीत, आता कदाचित निराळं दिसेल. असं काय-काय वाटत राहिलं. दोन दिवस 'अंगावर काढून' तरीही वाटत राहिलं.

म्हणून घरातल्याच नव्याजुन्या पुस्तकांवरून हात फिरवताना खरडलेल्या नोंदी.

~

माझ्याकडच्या प्रतीवर २०१६ सालातली तारीख लिहिलेली आहे, म्हणजे निदान पाच वर्षं तरी माझ्याकडे उर्मिला पवारांचं 'आयदान' आहे. मी ते कधीतरी वाचल्याचंही मला पक्कं आठवतं. पण पुस्तकात काय आहे याबद्दल डोकं पार कोरं करकरीत. वाचायला घेतलं तरीही वाचल्याचं अजिबात आठवेना. जरा हबकायलाच झालं. पण असे शोध लागणारच, याची खूणगाठ बांधली आणि नव्यानं वाचल्यासारखं वाचलं. 

सगळ्यांत जास्त तीव्रतेनं काय जाणवलं असेल, तर लेखिकेचं स्वतःला कॅज्युअली हसू शकणं. आपल्या फजित्या, चेष्टा, अपमान, आबाळ, काबाडकष्ट... या सगळ्यांकडे पाहण्याची साधीसरळ, मिश्किल नजर आहे बाईंकडे. जातीय अपमान झाल्याच्या आठवणी कमी नाहीत. पण त्याबद्दलही कुठे कडवटपणा बाळगलेला नाही. 'असं अमुक एक माणूस वागलाच कसा?' असा अविश्वास, त्यातून बसलेला धक्का, अपमानानं जळत राहणं... या कशाचाही मागमूस नाही. खणखणीत आत्मविश्वास असलेल्या माणसालाच हे जमू शकतं. 

सांस्कृतिक फरकांकडे बघणारा, उच्चनीचतेचं हलकं पण पक्कं भान असलेला, सपाट पुस्तकीपणा लेखिकेपाशी नाही. तिच्या बिवलकर या शिक्षिकेची थुंकी या गोष्टीकडे बघणारी ब्राह्मणी अधिक 'पुस्तकी शास्रीय' नजर एकीकडे, तर तोंडात खोबऱ्याचा तुकडा चावून, त्याला सुटलेलं दूध आलेल्या पाहुण्याच्या अंगाखांद्याला रगडून, त्याला गरम पाण्यानं न्हाऊमाखू घालणं ही प्रेम व्यक्त करण्याची घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत एकीकडे. या दोन्ही एकाशेजारी एक मांडताना लेखिका काहीही गुळगुळीत साचेबद्ध पुस्तकी बोलत नाही. 'सुशिक्षित' झाल्यावर कुठेही थुंकण्याची सवय सुटली हे सांगते, बस. कुठल्याश्या आदिवासी जमातीतले लोक विशिष्ट जातीची फळं एकत्र जमून चावून चोथा करतात आणि मग त्या एकत्रित चोथ्यापासून दारू तयार केली जाते, हा मधल्या काळात मी कुठेतरी टिपलेला माहितीचा कण नकळत आठवला.

कोकणातल्या दरिद्री महाराघरच्या खाद्यसंस्कृतीचे तटस्थ नजरेनं टिपलेले तपशील हा फार काळ लक्ष्यात राहील असा आणखी एक भाग. त्यात सवर्ण अन्न आणि दलिताघरचं अन्न यांतल्या सुबत्तेतले मूलभूत भेद नोंदणं आहे, त्याला असलेली विखारी जातिभेदाची किनार आणि त्यातून भोगावी लागलेले अपमान आहेत, परवडणाऱ्या अन्नाचं निकृष्टपण आणि वासा-चवींचा वाढत गेलेला उग्रावा आहे, हे अन्न कमावताना - विशेषतः बायांनी - केलेल्या अमानवी कष्टांचं तपशीलवार चित्रणही आहे. 

लेखिकेचं लग्नानंतरचं शहरातलं मोकळं-सुटवंग जगणं, शिक्षणासह तीव्र होत गेलेलं आत्मभान, लिहिण्यानं सापडत गेलेला सूर, टोकदार होत गेलेला स्त्रीवादी दृष्टीकोन... हे सगळं अपेक्षितच. पण साठनंतरच्या काही दशकांमधल्या आणि बाबरी मशीद प्रकरण होण्यापूर्वीच्या मुंबई शहरात जगलेल्या माणसांच्या मोकळ्या वातावरणात गेलेल्या आयुष्याचा मला किंचित हेवा मात्र वाटला. त्यानं मला चकित व्हायला झालं.

~

पुन्हा वाचायला घेतलेलं शांता गोखल्यांचं 'रीटा वेलिणकर' वाचताना हा हेवा अधिकच गडद होत गेला. 

'रीटा' न आठवण्याचा प्रश्नच नव्हता, नाही. त्यांतली वाक्यंच्या वाक्यं तशीच्या तशी आठवून येत राहिली पुढे वाचण्याआधीच. पण पुस्तकानं मला तरीही गच्च धरून मात्र ठेवलं. त्यातला चिरेबंदीपणा, जहालपणा, शारीरिक गरजांतून येणारं डळमळीतपण निभावून पार होताना रीटानं सर्वार्थांनी कमावलेली प्रगाढ, प्रसन्न शांतता आणि एखाद्या दगडी, थंडगार बांधकामातून खेळवलेलं जिवंत पाणी प्रकटावं, तसं तिच्याभोवतीच्या जिवलग स्त्रियांनी तिच्याभोवती जवळिकीनं केलेलं कडं... सगळं काही तेच, तस्संच खणखणीत. उणं नाही. उलट बदलेल्या मुंबई शहरात आणि स्त्रीवादाची गरज पटवून द्यावी लागत असतानाच्या विपरीत, बधीर आयुष्यात अधिकच अर्थपूर्ण.

~


पुस्तके साठत जातात, जावोत.

Wednesday, 21 April 2021

बोलाफुलाची

एखादा लहानसा नजरानजरीचा क्षण 
सुकलेल्या फुलासारखा.
हळूच खिशात लपवून ठेवायला,
विरघळून जाईस्तो
दिवसचे दिवस बोटांनी चाचपून बघायला,
खूश खूश होऊन 
पुन्हा पुन्हा जगायला,
आवडतं मला.
तुला पुरतात, 
दिसल्या न दिसल्याशा सोबती.
वळून पाहावं,
तर होत्या की नव्हत्या होऊन जाणाऱ्या.
दिवसचे दिवस हुलकावणी देणाऱ्या
गाण्याच्या चालीसारख्या
निसटत्या.
सांग,
कशी पडावी गाठ,
फुलाची 
अन्
बोलाची?

Thursday, 15 April 2021

अपूर्णब्रह्म

दाताखाली आलेल्या घासातला रस

चवीचवीनं गिळत असताना

हातातल्या तुकड्याची ऑटोपायलट मोडवर

प्राणपणानं राखण करताना

पोटातला खड्डा भरत असल्याची

सुखद जाणीव अंगभर अनुभवताना

आपण आहोत आणि नाही त्या क्षणात

हे डोकावून जातं डोक्यात.

तरी चव कळतच राहते.

रस पाझरताना कळतोच गळ्याखाली.

आणि खड्डा भरल्यानं बरंही वाटतं –

तरी काहीच बरं वाटत नाही जगात,

तेव्हा होत असेल का अन्नाचं ब्रह्म?

Saturday, 10 April 2021

आता उद्वेगाची कविता

उद्वेगाची कविता लिहिण्याची हिंमत होत नाही.
'माण्साने' नावाचा अंगार खोदून गेलेल्या माणसानंतर आपण अधिक काय म्हणू शकत असतो?
एकदाचं खरंच माणसानं म्हटलेलं सगळं-सगळं व्हावं,
नि मग चिखलातून एखादं बी रुजून वर यावं इतकं मात्र वाटतं.
आपण चिखल व्हावं
बीच्या पायाच्या पायाच्या पायाच्या तळाशी धुमसणारा, दडपला गेलेला, धपापणारा.
बीच्या पायाच्या पायाच्या पायाच्या तळाशी उबदार, मऊ, जिवंत अंथरलेला..
आपल्यातून उद्वेग उगवू नये,
बीनं उगवावं. 
आता उद्वेगाची कविता लिहिण्याची हिंमत होत नाही.

Thursday, 11 March 2021

इस मोड़ से जाते हैं...

इथेच कुठेतरी आहे ती वाट.
दोन भिंतींच्या मधल्या सापटीत लपून बसलेली. 
तोंडावर एक अजस्र सिमेंटी शिळा घेऊन.
नुसतीच गद्य नाही ती.
त्या शिळेला बघून दचकायला होतं एकेकदा.
धीरानं पाय टाकताना बिचकायलाही.
पण तिच्या रंगरूपाला न बिचकता अलगद तिच्या कुशीत शिरलं,
की जोडीनं फुललेले दोन पळस अवचित सामोरे येतात -
लालबुंद.
मग दिसतेच ती.
लपतछपत लचकतमुरडत नाजूक वळणं घेत जाताना.
तिच्या सोबतीनं पोचतो आपण,
ते एकदम निरोपाच्याच वेळेशी.
पुढे सगळा वैराण माळच.
वाटेवर मात्र...
असो.
पळसाची खूण मनात रुजवून ठेव.
सापडेल मग.
वाट 
आणि
पुढचं 
सगळं...

ताजं लिखाण

नकाशे

मनगटाच्या आतल्या नाजूक बाजूला असलेल्या, दिसे न दिसेश्या तिळासारखा, एखादाच सवयीचा, झिजून मृदावलेला शब्द. प्रेडिक्टेबल चिडचिड, कोपरावरच्या ...