Wednesday 24 February 2016

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे?

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे हे वाक्य एकूण पकाऊच. जन्मापासून ज्या गोष्टीला भवतालातली एक म्हणून गृहित धरली, तिच्यावर प्रेम आहे असं एकदम उठून म्हणणं भंपकच. तर प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस.

याच एका भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात. भांडण करताना संतापानं-भीतीनं गुडघे लटपटले, तरी या भाषेतले शब्द दगा देत नाहीत. आपलाच इमानेइतबारे काम करणारा अवयव असावा, तसे आपसूक शब्द सुचत जातात. याच एका भाषेतून मनःपूत प्रेम करता येतं. कविता लिहिता येते. शब्द मनाजोगते तोडलेमोडले नि मला हवे तसे घडवून मांडले तरी या भाषेत मला अपराधी, संकोचल्यासारखं, गंडल्यासारखं वाटत नाही. मस्त मोकळ्याढाकळ्या घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त अस्ताव्यस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. माझ्याआतला गोंधळ एका नीटस आकारात मांडून देते. उत्तर देतेच, नवे प्रश्नही काढून देते.

अक्षरं आणि पर्यायानं शब्द म्हणजे साकार नि निराकार वस्तूंची चिन्हं. इतर कुठल्या भाषेतली ही चिन्हं माझ्याकरता चिन्हंच उरतात. वस्तू नि संकल्पना सजीव होऊन त्यांच्यामागे उंबर्‍यात येऊन थांबत नाहीत. मग कोशांच्या मदतीनं चिन्हांचे अर्थ कळले, तरीही झोपताना ब्रा काढायला विसरून जावं, सारखं अस्वस्थपणे कूस वळवत राहावं नि काही केल्या शांतपणे झोप लागूच नये, तसं वाटत राहतं. तीच माझ्या भाषेतली चिन्हं वाचताना मात्र, चिन्हं उरतच नाहीत. बघता बघता चित्रं होतात. नाद होतात. वास होतात. रंग होतात. माणूस, झाड, जंगल, गाव, शहर... सत्य, न्याय, समता, कविता... होतात. एकातून अनंत होतात. जिवंत होतात.

ही एकच भाषा आहे मला अशी. माझे हातपायडोळे असल्यासारखी माझा भाग असलेली. मीच असलेली. ती संपली तर माझ्यातलं काहीतरी संपेल. मी अर्धीमुर्धी अपंग उरेन. म्हणून माझी भाषा नि पर्यायानं माझ्या भाषेत बोलणारे लोक उरावेत असं मला वाटतं. एरवी प्रेमबिम ठीकच.

तशा बाकीही भाषा ठाऊक आहेत मला. पण त्यांच्या-माझ्यात द्वैत आहे. आठवणींना सुरुवात होते त्याच्याही आधीपासून त्या माझा भाग असत्या, तर त्या माझ्या असत्याही. जशी माझी भाषा आहे तशाच. अशा अधिकाधिक भाषा असाव्यात माणसांना. श्रीमंतीच की ती. पण माझ्यापाशी नाहीत. ठीक.

माझा भाचा जी भाषा शिकतो, ती त्याची भाषा असेल; की शिकण्याआधी शिकतो, ती त्याची भाषा असेल? तो कुठली भाषा शिकतो? हा प्रश्न बहुधा चुकीचा आहे. तो कुठली भाषा बोलतो? परवा त्याच्या हातातला पोळीचा घास चुकून ताटात पडला, तर तो उत्स्फूर्तपणे ’च्यायला’ म्हणाला. तो सशाला ससा न म्हणता ’ससुल्ल्या’ म्हणतो, घरातल्या कुत्र्यावर भडकून त्याला ’ए कुतरड्या’ असं म्हणतो. लाडात आला, तर ’मेघना-आत्या’ असं लांबलचक न संबोधता ’आत्तू’ असं म्हणतो. पण त्याला राजकारणही नीटच कळतं. आईबापावर छाप पाडायची असेल, त्यांना नॉनप्लस करायचं असेल, त्यांना कौतुकावायचं असेल, की तो रीतसर एखादं अस्खलित इंग्रजी वाक्य फेकून देतो. त्याला इंग्रजीतून गोष्ट सांगितली, तर बावचळून बघत राहतो. पण त्याला त्याच्या वर्गात वापरली जाणारी आज्ञार्थी इंग्रजी मात्र बरोब्बर कळते.  मग त्याची भाषा कोणती? "उद्या शाळेत रेड कलरे बाबू, मला रेड कलरचं ऍपल दे!" असं म्हणतो नि "तांबडं पेन देऊ?" असं विचारल्यावर शुंभासारखा तोंडाकडे बघत राहतो किंवा "ए! तांबडा! तांबडा म्हंजे?" असं ओरडत खिदळत सुटतो.

कुठली आहे त्याची भाषा? पण हे काही नवं नाही. असे प्रश्न माझ्याही पिढीच्या बाबतीत नि त्याआधीही पडले असतीलच कुणालातरी कधीतरी. तरी अजून माझी भाषा मला आहेचे. मग ती नक्की किती टक्के ’शुद्ध’ असली की  एकसंध नि जिवंत नि रसरशीत नि पूर्ण म्हणायची?

काय की. असल्या शुद्धाशुद्धता नि टक्केवार्‍या वेडगळ. पण तरी एकालगतच्या एक अशा तीन पिढ्यांना तरी एकमेकांच्या बोलण्याचा सारांश कळावा, इतपत तरी सलगता, एकसंधता भाषेच्या प्रवाहात राहावी, अशी अपेक्षा रास्त म्हणायला पाहिजे. अजून तरी माझ्या आजीला मी काय बोलते हे कळतं. (कळतं का?! बहुधा हो. पिढीचा फरक वजा करायचा. "व्हॉट्सॅपवर पिंग आलं." म्हणजे तिच्या डोळ्यासमोर व्हॉट्सॅपचं चित्र तरळत नसेल. पण फोनशी संबंधित काहीतरी व्यत्ययसदृश झेंगट घडलं नि नात आता फोनमध्ये डोकं खुपसून बसणार हे बरोबर कळतं. म्हणजे भाषा कळते का? तर होच.) माझा भाचा काय बोलतो हेही मला अचूक कळतं. अजून तरी.

पण हे आजचं झालं. घराबाहेर नि घरातही माझी भाषा माध्यम म्हणून उरूच नये, अशा दिशेनं बदल होतायत. बदलांना ना नाहीय. ती असू शकतही नाही. पण भाषेत बदल होणं निराळं नि भाषाच न उरणं निराळं. मग हा प्रवाह खंडित व्हायला किती पिढ्या पुरतील? एक. फार तर दोन? दोन पिढ्यांत मी काही मरणार नाही बहुतेक. मी दोन पिढ्यांनंतरही उरेन. म्हणजे - मरता मरता माझ्याशी माझ्या भाषेत बोलायला कुणीच उरायचं नाही? उपर्‍यासारखं दुसर्‍या कुठल्या भाषेच्या आसर्‍याला जावं लागेल... नि इतक्या लांब जायची गरज नाही. आज-उद्यातही होईल हे कदाचित.

बाप रे.

या परावलंबित्वाची भीती वाटते. पूर्णपणे स्वार्थी, खरी, निखळ भीती वाटते. या भीतीपायीच इतर भाषांमध्ये थोडेतरी हातपाय मारले जातात. पॉप कल्चरशी जोडून राहून तरुणपणाशी संबंध बळंच तरी टिकून राहावा म्हणून थोडे कष्ट घेतले जातात, तसेच. तशा इतर भाषा तितक्या परक्या नाहीतही म्हणा. अखेरशेवट कायम माजघरात, रस्त्यावर आणि दप्तरात तीन निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांच्या देशातली आहे मी. तितकं तर जमेलच. जमतंच.

पण म्हणून माझ्या - माझ्या हक्काच्या - भाषेवरचा जीव कमी होईल? सॉरी बॉस. तिच्यासाठी होता होईतो हातपाय मारणं आलं. कारण ते माझ्यासाठीच आहे.

म्हणून हे रेषेरेषेचा कीस पाडत नवे शब्द पाडणं. घासून, वापरून पाहणं, प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते तयार आणि अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप माझ्या भाषेत आणि माझ्या लिपीत गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मांडणं...

एकुणात प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे.

मराठी भाषा दिन आहे २७ फेब्रुवारीला. शुभेच्छा.

***

या लेखाखाली झालेल्या चर्चेतून काही नवीन मुद्दे मिळाले. त्यांची भर घालून हाच लेख दोनेक दिवसांनंतर इथे प्रकाशित केला. त्याखालीही काही मुद्द्यांवरून चर्चा झाली आहे.

Monday 1 February 2016

यंदा

यंदा मला कुठेतरी मस्त चंपी करून घ्यायला जायचंय.

सगळी जुनी कोरडी त्वचा उतरवून टाकायची आहे. गुंजभरही वजन कमी करून न घेता हलकं हलकं, मऊ व्हायचंय. तेच ते संकल्प, त्याच त्या नॉस्टाल्जिक गोष्टी, त्याच त्या चमकदार बेगडी शब्दांच्या जरतारी माळा, तेच ते आउटिंग आणि तेच ते गेट्टुगेद्री निर्जीव संबंध... सगळं एका मिश्कील हसण्यासोबत एखाद्या तळ्यात सोडून द्यायचंय. हळूहळू तळ्याच्या पोटात ते सगळं गडप होईल नि ’पाथेर पांचाली’मध्ये धरते तशी विश्वासू शेवाळाची अलगद साय त्याच्यावर धरेल. त्याच्याकडे बघताना मीही आतून निवांत, आश्वस्त होत जाईन आणि सैलावून, पाण्यात पाय सोडून बसेन तिथेच. उतरती उन्हं असतील. निवांतपणा असेल, पण शांतता मात्र जिवंत असेल. एखादा चुकार बगळा. हात लांबवला तर सहज बोटाला लागेल अशी एखादी हवेवरची सुरेल हाळी. थोड्या तुरतुरमुंग्या.

’आता थोड्या वेळात परतूच...’ असं म्हणता म्हणता किती वेळ जाईल कुणास ठाऊक. पण अंधार पडेल तोही आपण जागरणं करता करता स्वैपाकघरात जातो नि दिवा न लावता सवयीनं पाणी पिऊन परत येतो, तेव्हा भोवती असतो तसा - मायाळू. मग कुठेही परतावं - ते घरच असेल!

यंदा. नक्की.