Wednesday, 24 February 2016

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे?

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे हे वाक्य एकूण पकाऊच. जन्मापासून ज्या गोष्टीला भवतालातली एक म्हणून गृहित धरली, तिच्यावर प्रेम आहे असं एकदम उठून म्हणणं भंपकच. तर प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस.

याच एका भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात. भांडण करताना संतापानं-भीतीनं गुडघे लटपटले, तरी या भाषेतले शब्द दगा देत नाहीत. आपलाच इमानेइतबारे काम करणारा अवयव असावा, तसे आपसूक शब्द सुचत जातात. याच एका भाषेतून मनःपूत प्रेम करता येतं. कविता लिहिता येते. शब्द मनाजोगते तोडलेमोडले नि मला हवे तसे घडवून मांडले तरी या भाषेत मला अपराधी, संकोचल्यासारखं, गंडल्यासारखं वाटत नाही. मस्त मोकळ्याढाकळ्या घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त अस्ताव्यस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. माझ्याआतला गोंधळ एका नीटस आकारात मांडून देते. उत्तर देतेच, नवे प्रश्नही काढून देते.

अक्षरं आणि पर्यायानं शब्द म्हणजे साकार नि निराकार वस्तूंची चिन्हं. इतर कुठल्या भाषेतली ही चिन्हं माझ्याकरता चिन्हंच उरतात. वस्तू नि संकल्पना सजीव होऊन त्यांच्यामागे उंबर्‍यात येऊन थांबत नाहीत. मग कोशांच्या मदतीनं चिन्हांचे अर्थ कळले, तरीही झोपताना ब्रा काढायला विसरून जावं, सारखं अस्वस्थपणे कूस वळवत राहावं नि काही केल्या शांतपणे झोप लागूच नये, तसं वाटत राहतं. तीच माझ्या भाषेतली चिन्हं वाचताना मात्र, चिन्हं उरतच नाहीत. बघता बघता चित्रं होतात. नाद होतात. वास होतात. रंग होतात. माणूस, झाड, जंगल, गाव, शहर... सत्य, न्याय, समता, कविता... होतात. एकातून अनंत होतात. जिवंत होतात.

ही एकच भाषा आहे मला अशी. माझे हातपायडोळे असल्यासारखी माझा भाग असलेली. मीच असलेली. ती संपली तर माझ्यातलं काहीतरी संपेल. मी अर्धीमुर्धी अपंग उरेन. म्हणून माझी भाषा नि पर्यायानं माझ्या भाषेत बोलणारे लोक उरावेत असं मला वाटतं. एरवी प्रेमबिम ठीकच.

तशा बाकीही भाषा ठाऊक आहेत मला. पण त्यांच्या-माझ्यात द्वैत आहे. आठवणींना सुरुवात होते त्याच्याही आधीपासून त्या माझा भाग असत्या, तर त्या माझ्या असत्याही. जशी माझी भाषा आहे तशाच. अशा अधिकाधिक भाषा असाव्यात माणसांना. श्रीमंतीच की ती. पण माझ्यापाशी नाहीत. ठीक.

माझा भाचा जी भाषा शिकतो, ती त्याची भाषा असेल; की शिकण्याआधी शिकतो, ती त्याची भाषा असेल? तो कुठली भाषा शिकतो? हा प्रश्न बहुधा चुकीचा आहे. तो कुठली भाषा बोलतो? परवा त्याच्या हातातला पोळीचा घास चुकून ताटात पडला, तर तो उत्स्फूर्तपणे ’च्यायला’ म्हणाला. तो सशाला ससा न म्हणता ’ससुल्ल्या’ म्हणतो, घरातल्या कुत्र्यावर भडकून त्याला ’ए कुतरड्या’ असं म्हणतो. लाडात आला, तर ’मेघना-आत्या’ असं लांबलचक न संबोधता ’आत्तू’ असं म्हणतो. पण त्याला राजकारणही नीटच कळतं. आईबापावर छाप पाडायची असेल, त्यांना नॉनप्लस करायचं असेल, त्यांना कौतुकावायचं असेल, की तो रीतसर एखादं अस्खलित इंग्रजी वाक्य फेकून देतो. त्याला इंग्रजीतून गोष्ट सांगितली, तर बावचळून बघत राहतो. पण त्याला त्याच्या वर्गात वापरली जाणारी आज्ञार्थी इंग्रजी मात्र बरोब्बर कळते.  मग त्याची भाषा कोणती? "उद्या शाळेत रेड कलरे बाबू, मला रेड कलरचं ऍपल दे!" असं म्हणतो नि "तांबडं पेन देऊ?" असं विचारल्यावर शुंभासारखा तोंडाकडे बघत राहतो किंवा "ए! तांबडा! तांबडा म्हंजे?" असं ओरडत खिदळत सुटतो.

कुठली आहे त्याची भाषा? पण हे काही नवं नाही. असे प्रश्न माझ्याही पिढीच्या बाबतीत नि त्याआधीही पडले असतीलच कुणालातरी कधीतरी. तरी अजून माझी भाषा मला आहेचे. मग ती नक्की किती टक्के ’शुद्ध’ असली की  एकसंध नि जिवंत नि रसरशीत नि पूर्ण म्हणायची?

काय की. असल्या शुद्धाशुद्धता नि टक्केवार्‍या वेडगळ. पण तरी एकालगतच्या एक अशा तीन पिढ्यांना तरी एकमेकांच्या बोलण्याचा सारांश कळावा, इतपत तरी सलगता, एकसंधता भाषेच्या प्रवाहात राहावी, अशी अपेक्षा रास्त म्हणायला पाहिजे. अजून तरी माझ्या आजीला मी काय बोलते हे कळतं. (कळतं का?! बहुधा हो. पिढीचा फरक वजा करायचा. "व्हॉट्सॅपवर पिंग आलं." म्हणजे तिच्या डोळ्यासमोर व्हॉट्सॅपचं चित्र तरळत नसेल. पण फोनशी संबंधित काहीतरी व्यत्ययसदृश झेंगट घडलं नि नात आता फोनमध्ये डोकं खुपसून बसणार हे बरोबर कळतं. म्हणजे भाषा कळते का? तर होच.) माझा भाचा काय बोलतो हेही मला अचूक कळतं. अजून तरी.

पण हे आजचं झालं. घराबाहेर नि घरातही माझी भाषा माध्यम म्हणून उरूच नये, अशा दिशेनं बदल होतायत. बदलांना ना नाहीय. ती असू शकतही नाही. पण भाषेत बदल होणं निराळं नि भाषाच न उरणं निराळं. मग हा प्रवाह खंडित व्हायला किती पिढ्या पुरतील? एक. फार तर दोन? दोन पिढ्यांत मी काही मरणार नाही बहुतेक. मी दोन पिढ्यांनंतरही उरेन. म्हणजे - मरता मरता माझ्याशी माझ्या भाषेत बोलायला कुणीच उरायचं नाही? उपर्‍यासारखं दुसर्‍या कुठल्या भाषेच्या आसर्‍याला जावं लागेल... नि इतक्या लांब जायची गरज नाही. आज-उद्यातही होईल हे कदाचित.

बाप रे.

या परावलंबित्वाची भीती वाटते. पूर्णपणे स्वार्थी, खरी, निखळ भीती वाटते. या भीतीपायीच इतर भाषांमध्ये थोडेतरी हातपाय मारले जातात. पॉप कल्चरशी जोडून राहून तरुणपणाशी संबंध बळंच तरी टिकून राहावा म्हणून थोडे कष्ट घेतले जातात, तसेच. तशा इतर भाषा तितक्या परक्या नाहीतही म्हणा. अखेरशेवट कायम माजघरात, रस्त्यावर आणि दप्तरात तीन निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांच्या देशातली आहे मी. तितकं तर जमेलच. जमतंच.

पण म्हणून माझ्या - माझ्या हक्काच्या - भाषेवरचा जीव कमी होईल? सॉरी बॉस. तिच्यासाठी होता होईतो हातपाय मारणं आलं. कारण ते माझ्यासाठीच आहे.

म्हणून हे रेषेरेषेचा कीस पाडत नवे शब्द पाडणं. घासून, वापरून पाहणं, प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते तयार आणि अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप माझ्या भाषेत आणि माझ्या लिपीत गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मांडणं...

एकुणात प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे.

मराठी भाषा दिन आहे २७ फेब्रुवारीला. शुभेच्छा.

***

या लेखाखाली झालेल्या चर्चेतून काही नवीन मुद्दे मिळाले. त्यांची भर घालून हाच लेख दोनेक दिवसांनंतर इथे प्रकाशित केला. त्याखालीही काही मुद्द्यांवरून चर्चा झाली आहे.

19 comments:

  1. I have never quite understood "anthropomorphism" people use when it comes to language...At this stage in my life, 55, I feel language is just convenience...I like (love?) Marathi when the expression is good...like you, I understand it better...literature in it, aesthetic of expression in it, convenience, habit...that's all...let it rule or go to hell after I die...

    ReplyDelete
  2. Apaplya pareene samvardhan karane changale ahe pan mazya mate original expressed bhiti anathayee ahe, ghabaraycha kahee karan nahee.
    Kay farak padato martana aplya bhashet aplyashee bolnare koni nasale tar - aplya vicharanchee bhasha tar teech raheel. (ulat ashee bhasha with special personalized flavor, jee anyway baher koni bolu shakat nahee)

    ReplyDelete
  3. @AGK
    माझाही प्रेमाबिमाचा दावा नाही. शाळकरी वयात आला ऊरफिर भरूनफिरून. गुन्हा कबूल आहे. पण फुटलेली शिंग झिजली नि गळली, तसतसं भाषेसारख्या अमूर्त गोष्टीवर प्रेमाचा दावा किती कमाल गाढव आहे ते कळलं. आप मरो, जग बुडो हे तर झालंच. पण आपण मरेस्तोवर आपल्यासोबत ही बया राहणारच. जॄंभणश्वान म्हणतो आहे तशी आपल्यासकट नि आपल्यामुळे बदललेली का होईना, पण राहणार. आणि आपली कमीअधिक ताकद, ही भाषा हे माध्यम म्हणून वापरण्यावर अवलंबून असणार. ती माध्यम असायचीच थांबली की आपलीच मेजर गोची होणार, बाकीच्यांची होईलच असं नाही. म्हण्जे शक्ती का असंतुलन आलं! म्हणून... एनीवे. हॅप्पी मराठीदिन. ;-)

    @YD
    तुम्ही हल्ली लिहीत नाही भूभूमहाशय तो एक गुन्हाच (होय, होय. निखिल वागळेच्या सुरात वाचा. गुन्न्हा.) होय. पण जे लिहायचं ते रोमन मराठीत लिहिता म्हणजे कमालच झाली. असे होलसेल परके होऊ नका राव. अजून आपल्याला मरायला थोडा अवकाश आहे. तोवर तरी वापरू द्या की. :D
    बादवे, मी काही मराठीचं संवर्धन वगैरे कूडतुंबडी उद्योग करत नाहीय. मला सोयीचं जावं म्हणून थोडे प्रयत्न. तेपण चिरकूट. बाकी मरतानाचं लांब राहिलं, आत्ता जित्तेपणीच तुम्ही रोमन वापरताय तर मला कस्तंरीच होतंय. मरताना तर माणूस आणिक हळवाफिळवा होतो. नाही का राव भीती वाटणार? आपले आपले विचार करून पुरतात होय? हे असं कुठेतरी विचार हाणायला (गप्पा हाणतात, तसे विचार हाणणे) लागतंच की. तिथे कॉमन ग्राउण्ड मिळाल्यावर आपापली पर्सनलाइज्ड भाषा परजून घ्यायला मजा येते. (दारूचंपण असंच असतं म्हणे. (खांदे उडवून) काय की बॉ. ;-)) तर मज्जेत र्‍हावा, (मराठीत गावा) हॅप्पी मराठीदिन.

    ReplyDelete
  4. पण खुल्या दिलानं म्हणायला काय समस्या आहे? माझे तर माझ्या मायमराठीवर नितांत प्रेम आहे बुवा! आणि तू म्हणतेस तसं नवनवे प्रयोग, शब्द, रचना, अलंकार यांचे स्वागतच आहे. पण मी गेल्यावर ती भाषा जगो का मरो ही कॄतघ्नता झाली. आणि मग जागतीक मराठी दिन तरी का साजरा करावा या "अँथ्रोपोमॉर्फिझम" वाल्यांनी? भाषा हे आपल्याला सुख, आनंद आणि "हवं ते" मिळवून द्यायचं एक साधन नाही का? तिच्या विषय़ी एव्हढा तुसडेपणा का?
    २७ फेब्रुवारी च्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  5. @आंबट-गोड
    प्रेमाबद्दल: पण माझं नाहीच आहे प्रेम माझ्या भाषेवर. हे आता जरा ऑफ दी ट्रॅक आणि मूलभूत प्रकारचं होणार आहे. पण होऊन जाऊ द्या. तर माझं नाहीच आहे प्रेम माझ्या भाषेवर. प्रेम या शब्दाच्या व्याख्येत, मला वाटतं, आपले मतभेद आहेत. ज्यात स्वतंत्र निवड अंतर्भूत आहे आणि खेरीज ओढ, आपुलकी, लळा, जिव्हाळा, लिप्ताळा... इत्यादी गोष्टी आहेत त्याला मी प्रेम म्हणते आहे. त्यामुळे माझं माझ्या आईवडिलांवरसुद्धा किंवा फॉर दॅट मॅटर देशावरसुद्धा प्रेम नाहीच आहे, असं मला हल्ली वाटतं. मायाबिया वाटते. मी जन्माला आले ती या आईबापांपाशी आले. ते मला उपलब्धच होते कायम. सहवासानं माया वाटते. आपलेपणा वाटतो. कम्फर्ट झोन (मराठी शब्द काये?!) तयार होतो. हीच एखाद्या चणेवाल्याच्या किंवा वेश्येच्या पोटी आले असते, तर त्यांच्याबद्दल वाटली असती माया. तसंच देशाचं. पाकिस्तानात जन्माला आले असते तर पाकिस्तानाबद्दल वाटलं असतं असं. मुद्दा असा आहे की, हे जे वाटतं, त्याला मी प्रेम म्हणत नाही.
    दुसरं असं की ओढ नि जिव्हाळा... इत्यादि गोष्टी वाटतात, हे उरतंच. तशीच आईबापाबद्दल (आणि कुणाकुणाबद्दल) एक बेसिक अशी कृतज्ञताही वाटते. पण हीच कृतज्ञता नामक गोष्ट मला जीव नसलेल्या गोष्टींबद्दल वा संकल्पनेबद्दल वाटणं हल्ली जरा विनोदी वाटतं. दगडावर पाणी ओतल्यासारखं. म्हणजे ओतावं, ज्यांना त्यात रस वाटतो त्यांनी. मला नाही वाटत रस. भाषा काय किंवा देश काय किंवा देव काय, या गोष्टींना उलटून काही वाटायला भावनाच नाहीत. तर त्यांच्यावर कृतज्ञता ओतत बसायला मला काय तुकारामासारखा मुक्तीचा किडा चावला आहे थोडाच? तर - असो. मुद्दा असा की, दिव्याबद्दल कृतज्ञता, पंख्याबद्दल कृतज्ञता, चाकाबद्दल नि एसीबद्दल नि नेटबद्दल... अशी जनरल कृतज्ञता हल्ली माझ्यातून गेली आहे. हे जरा कोरडं का काय म्हणतात तसलं आहे. पण तसंच आहे. त्यामुळे भाषेबद्दलही मला कृतज्ञता नाही वाटत.
    राहिला मराठीभाषादिन. कुलकर्णी तर तो साजरा करत नाहीच आहेत. मी मात्र कृतज्ञता ही भावना अमूर्त नि निर्जीव गोष्टींबाबत असंबंद्ध ठरवलेली असली, तरी अजून तिची जनरल निमित्तं नाकारलेली नाहीत. कारण मला सत्यनारायण हा प्रकार एकूण बिलंदर वाटत असला, तरी त्या एकूण वातावरणातला गोडाचा शिरा नाकारलेला नाही. तसंच मराठीभाषादिनाचं. तर त्याचं आपलं विचाराला निमित्त. उपचार म्हणून शुभेच्छा वगैरे.
    हे एकूणच उत्तर जंक्शान तुसडं वगैरे वाटावं असं झालं आहे. भावना दुखावल्या गेल्या असल्या, तर माफी मागते. पण माझ्याकरता हे फारच इंट्रेष्टिंग असं वळण निघालं. यातून मेजरच गोष्टी क्लिअर झाल्या. तर मनापासून आभार. :)

    ReplyDelete
  6. मेघना, अगदी नेमकंच समजलं.....तुला काय म्हणायचंय ते! (आणि मेन म्हणजे......पटलंही! :-))
    म्हणजे जीव नसलेल्या गोष्टींबाबत...त्या कितीही जवळच्या आणि उपयुक्त असल्या तरी- कॄतज्ञता वाटावी किंवा कसे हा फार मस्त मुद्दा मिळाला यातून!
    पण आई बाबांबद्दल नक्की काय वाटतं याबद्दल तू अजून खूपच कंफ्यूजड दिसतेस!! कंफर्ट झोन ला मलाही मराठी शब्द सुचत नाहीये.

    ReplyDelete
  7. 1> निखिल वागळेच्या सुरात वाचा. गुन्न्हा!!! You are funny...
    2> दारूचंपण असंच असतं म्हणे....yes...."booze and language" is probably the most interesting and under-discussed subject...I am positive a lot of creativity- over the centuries- in Marathi too is owed to ethyl alcohol
    3> "भाषा हे आपल्याला सुख, आनंद आणि "हवं ते" मिळवून द्यायचं एक साधन नाही का? तिच्या विषय़ी एव्हढा तुसडेपणा का?"...who said anything about hatred/hostility (तुसडेपणा)? Absence of love is not hatred/hostility...I say I am indifferent to language and interested in expression...I love or hate expression...

    ReplyDelete
  8. p.s. I love सत्यनारायण गोडाचा शिरा with banana and lots of ghee

    ReplyDelete
  9. म्हणतो की नाही निखिल वागळे 'गुन्न्हा' आणि 'पुन्न्हा'?! आवडतो मला, तरी काय झालं!

    ReplyDelete
  10. ते मागंच गोणपाट काढ आधी, फोनवर वाचताच येत नाही. त्यामुळे इतका उशीर झालाय.
    भाषेवर स्वतंत्र सांगावं असं प्रेम नाही करावं लागत, ते असतंच. ते जाणवतं किंवा फुत्कार काढतं जेव्हा कुणी तुमच्या भाषेच्या सोग्याला हात घालतं तेव्हा. जर तेव्हा ही तुमची "अस्मिता" (लय डेन्जर शब्द आहे नाही?) जागी नाही झाली, तर तुम्ही मुळी एका भाषेचे नाहीच...
    पण हल्ली आपल्याला सगळंच आपल्या भाषेत सुचतं का गं? किंवा व्यक्त करता येतं का? निदान काही वेळा माझं तरी असं नाही होत...हा भाषेचा किंवा माझा दोष नसावा. हा त्या विशिष्ट वातावरणाचा किंवा अवघडलेपणाचा किंवा मोकळेपणाचा परिणाम असतो/ असावा.
    जाता जाता, तू वागळ्यांची ग्रेट भेट घालून दिलीस म्हणून तुला ही शिक्षा: परवा वागळे काकांनी आकार, ऊकार फाट्यावर मारत (अगदी वेलांटी सुद्धा न जोडता स्वतंत्र बाण्यानं उभी होती...) अत्यंत अशुद्ध भाषेत टीवटीव केली आणि त्यावर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटल्यावर बामणी कावा असा ओरडा करुन पुन्न्ना नामानिराळे झाले

    ReplyDelete
  11. गोणपाट काढलं आहे. खूप लोकांनी खूप शिव्या घातल्या! मी मोबाईलवर पाहत नसल्यामुळे मला कळायलाच वेळ लागला! तर -

    १. भाषेच्या सोग्याला हात घालणं म्हणजे काय?
    २. माझा असा दावा आहे की भारतीय लोक मुळी एका भाषेचे नाहीतच. आणि हे मी म्हणत नाहीय, कारंथ म्हणतात. त्यांच्या मते भारतातले यच्चयावत लोक पुरातन काळापासून माजघरात, सोप्यावर आणि रस्त्यावर तीन निराळ्या भाषा वापरत आलेले आहेत. आणि हे वाचल्यापासून पडताळून पाहण्याचा किडा मला चावला आहे - खरोखरच सगळ्या भारतीयांना किमान दोन भाषा तरी येतातच. त्यामुळे मला हे अपमानास्पद नाही वाटत. समृद्ध वाटतं.
    ३. मला मात्र सुचतं ते मायमराठीतच सुचतं. म्हणजे बोलणं वा व्यक्त होणं मी जमवू शकते परिश्रमानी इतरही भाषांतून. पण स्वप्नातून उठून त्या बिरबलीय पंडितासारखी शिवीगाळ करायची झाली, तर पहिला भकारच उमटेल!
    ४. वागळे काका हा स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. सगळेच विषय राजकीय असले, तरी इतक्या उघड उघड राजकीय धुळवडीत उतरावं असं सध्या वातावरण नाही. मित्रांच्यात तर नाहीच नाही!

    मुदलात मला भाषेबद्दल ओढ वाटते म्हणजे नक्की काय नि का वाटतं, ते तपासायचं होतं. कितीही माय म्हटलं तरी मराठी काही मला दूध पाजत नाही. मग काय बुवा, असा प्रश्न. त्यासाठी ही वळणं-वाकणं. पण माझ्यापुरती ती सार्थकी लागली खरी! जय हिंद, जय महाराष्ट्र!

    ReplyDelete
  12. १) माध्यम - मराठी शिक्षणाचं माध्यम म्हणून रोडावत जाणार हे अाता स्वीकारलं पाहिजे. सध्यातरी तो अपरिवर्तनीय बदल दिसतो. तरीही मराठीने फार काळ तग धरला. माझ्या पिढीकडे पाहता बाकी राज्यांत त्या त्या भाषांनी माध्यम म्हणून मागच्याच पिढीत माना टाकल्या असं दिसतं. इंग्रजीतर भाषांतून शिकलेली १ गुजराथी व १ कन्नड व्यक्ती मला माहीत अाहे. बाकी सगळे लोक मराठीच अाहेत. पण म्हणून या भाषा मेल्या का? अद्याप नाही. अस्मिता तर अधिक उफाळून अालेल्या दिसतात. शिवाय यांत बंगाली, तमिळ अशा भाषिक अस्मितांच्या चळवळींचा अधिक प्रखर इतिहास असणाऱ्या भाषाही येतात.

    २) या मराठीतर भाषासमूहांत काय दिसतं? - अ) हे लोक त्या त्या भाषांतलं पॉप्युलर कल्चर (टिवी मालिका, चित्रपट, गाणी) जपतात. अा) हे लोक स्वत:ची ओळख त्या भाषेतून सांगतात. इ) त्यांना त्या त्या भाषेतल्या साहित्याची ओळख असेलच असं नाही. त्यांना गाण्यांतील अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसतात. ई) इंग्रजी ही त्यांची प्रमुख भाषा अाहे. उ) ते भाषा syntax म्हणून वापरतात. शब्द मात्र इंग्रजी वापरतात. ऊ) मी प्रामुख्याने मध्यमवर्गीय लोकांबाबत बोलत अाहे. या वर्गाचा शासकीय संस्था व व्यवस्थांशी व्यवहार मर्यादित अाहे. त्यामुळे त्यांना राज्यव्यवहाराची भाषा काय असावी असे प्रश्न पडत नाहीत. ती इंग्रजी असेत, तर त्यांचं काही अडत नाही. ए) या भाषांतून ज्ञाननिर्मिती ही दूरची गोष्ट अाहे. ती होतही असेल, पण ती झाकोळली जात होती व अधिकाधिक झाकोळली जाणार अाहे.

    ३) भाषा हे निव्वळ साधन नसतं तर ती एका समाजाची, त्याच्या संचिताची प्रतिसृष्टी असते असं मानलं, तर मराठी वाचवायची का व कशी ह्याअाधी कोणती/त्या मराठी वाचवायची/च्या हा प्रश्न सोडवावा लागेल. जर मराठी जगण्यानं समाजाच्या परिघावरच्या समूहांना मुख्य प्रवाहात अाणताना (त्यांना यायचं असल्यास) काही मदत होणार असेल तर काही अर्थ अाहे. या समूहांचा पहिला झगडा (अजूनही) त्यांच्या बोलींवर, त्यांच्या ज्ञानाच्या अाकलनावर, व पर्यायाने व्यक्त होण्याच्या शक्तीवर होणाऱ्या प्रमाण भाषेच्या, संस्कृतीकरणाच्या अाक्रमणाशी अाहे. एकप्रकारे हा लढा अाणि मराठीच्या हिंदी/इंग्रजीच्या वर्चस्वाशी असलेला लढा हे समांतर, समकालीन अाहेत. अापण या दोहोंकडे समदृष्टीने पाहतो का हेही पाहिलं पाहिजे. जर वर्गीय, जातीय हितसंबंध पाहिले, तर वास्तविक बोलीभाषांचा लढा हा त्या त्या समूहांच्या अस्तित्वाचा लढा अाहे. तुलनेने तांबडा की रेड हा वाद दुय्यम गरजांशी निगडीत अाहे.

    ४) तुझी गरज नुसती मराठी जगण्याची नाही. तुला जशी ती येते तशीच ती जगण्याची अाहे. "भल्यापहाटे उठून दिवा न लावता अंधारातच ती काहीतरी खुडबूड करत होती. माठावरचं ओगराळं तिला सापडलं नसावं. त्याच गोंधळात ओट्यावरचा तांब्या लवंडला अाणि त्याच्यावरचंम भांडं खाली पडून घरंगळत गेलं. त्या अावाजाने जाग येऊन पाहते तर काय, तिला रात्री भिजत घातलेल्या साबुदाण्यांतलं पाणी उपसून ते सारखे करायचे होते." हे असं बोलणारी माणसं नि भाषा जगली पाहिजे हा तुझा अट्टाहास का अाहे ते कळू शकतं, पण तो किती व्यावहारिक अाहे?

    ५) एरवी एका ओळखीच्या व्यक्तीबाबतची गोष्ट अाठवली. ही व्यक्ती अनेक काळापूर्वी जर्मनीत स्थायिक झाली. बायकोही जर्मन. अर्थातच सगळा व्यवहार जर्मन भाषेत. शेवटच्या अाजारपणात त्यांना माणसं ओळखता येत नव्हती, काही नीट कळत नव्हतं. अाणि एकदम ते फक्त मराठीतूनच बोलायला लागले. अखेरपर्यंत. मराठी येणारी रक्ताचं नातं नसलेली एक जण वगळता सारं जग एकदम त्रयस्थ झालं त्यांना. भाषेशी असणारं नातं इतकं प्रतिक्षिप्त असतं. ते साजरं करावं, पण म्हणून त्याचा व्यावहारिक पातळीवर संस्थात्मक अाविष्कार कसा होतो याचा विचार करताना निष्कारण भावुक होऊ नये.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. १) भाषा मरण्याचा किंवा तगण्याचा आणि अस्मिता उफाळण्याचा थेट संबंध आहे का? मला अस्मितेशी आर्थिक हितसंबंध आणि त्या त्या भाषिक समूहांचा इतिहास हे जास्त निगडीत दिसतात. भाषा हे निव्वळ एक आनुषंगिक टूल. ते तू म्हणतोस तसं सिंटॅक्स म्हणून वापरलं तरी लोकांना पुरतं, असं दिसतं. हे खरं मानलं तर माध्यम म्हणून माझी भाषा मला का टिकायला हवीय, याचं निखळ वैयक्तिक स्वार्थाखेरीज बाकी काहीही उत्तर सुचत नाही. त्या अर्थानं स्वीकारण्याखेरीज निरुपाय आहे हे कबूलच आहे. लोकांनाच नको आहे त्यांची भाषा, तर मी अल्पसंख्य म्हणून मुकाट राहण्याला पर्याय नाहीच. पण मी खरोखर अल्पसंख्य आहे का, हे तरी नीट तपासून पाहायला नको?

    २) आपल्या भाषेतून ज्ञाननिर्मिती व्हावी आणि ती राजभाषा असावी असं नक्की कधी वाटत होतं मराठी समाजाला? माझ्या मते असं कधीच वाटत नव्हतं आपल्याला. (मध्ये शिवाजीचा एक ठोस अपवाद. पण तो बुवा अनेकच बाबतींत अपवादात्मकच आहे. त्यामुळे त्याचं काय करायचं ते न कळून त्याला एक देव बनवून मोकळे झालो आहोत आपण बहुतेक.) या न वाटण्यात आपल्या सहिष्णू स्वभावाचा भाग किती, भौगोलिक स्थानाचा भाग किती, आळशीपणा नि परभाषाप्रेमाचा भाग किती… आणि कारंथ म्हणतात तद्वत कायमच तीन निरनिराळ्या भाषांतून वावरण्याची सवय असण्याचा किती… हे धूसर आहे. साधं ब्लॉगिंग. हिंदीनं ते - हे असं बघता बघता - आपलंसं केलं. देवनागरीतून सर्च टर्म टाकली नेटावर, तर हिंदी लिंका वारता वारता वारायची वेळ येते. असंही काही मराठीतून व्हावं असं आपल्याला वाटत नाही. सर्वप्रथम बरहा उपलब्ध करून दिलं ते कन्नड माणसानं. त्यात मराठीसाठी योग्य ऍ नाही, यात काय नवल? असो, त्रागा नाही. मुद्दा हा की भाषेबद्दल आपल्याला मुळात काही महत्त्वाकांक्षा आहेत का, नि होत्या का? बहुतेक नव्हत्याच.

    ३) सगळ्या कृतींचं अंतिम साध्य परीघावरच्या समूहांना मुख्य प्रवाहात आणणं हेच्च्च असतं असं मला वाटत नाही, हे सगळ्यांत आधी नमूद करणं आवश्यक. भाषा ही संचिताची प्रतिसृष्टी असते हे मी मानते. मग कोणकोणत्या मराठ्या (आय नो! केवळ चूष म्हणून.) वाचवायच्या? तर सगळ्याच. त्यातही वस्तुनिष्ठ विचार करायचा झाल्यास, ज्यानं-त्यानं आपापल्या जीवनशैलीशी निगडीत असलेल्या मराठ्या वाचवायच्या. ’पडघवली’कारांची मराठी जगवायला माझी काही मदत होणार नाही. कारण मी ते आयुष्यच जगत नाही. मग मी पोफळी ’पष्टाळणार’ कशा, पाणी ’शेंदणार’ कसं, ’दुवेतल्या’ गायीसाठी ’बारक्या तांदळाचं धुवणाचं पाणी’ कुठून आणणार आणि ’स्रहाणेवर उगाळून सुंठसांबरशिंगाचा ओढा’ कसा घालणार? आवडो किंवा नावडो, हे संचित हळूहळू लुप्त होणारच आहे. माझा लढा जीवनशैलीसाठी नाही. भाषेसाठी आहे. एका प्रकारे मीही सिंटॅक्ससाठी आणि सिंटॅक्सपुरतीच लढते आहे असं म्हणायला पाहिजे. कारण प्रतिशब्द परभाषेतून उसने घेऊन, हवे तसे घासूनपुसून, बोलींकडून आणवून, माझ्या संचितातून… कसेही वापरले तरी मला विशेष अडचण नाही आहे. त्यांचं मराठी प्रारूप तयार व्हावं, असं मात्र मला वाटतं. उदाहरण - फलाट, टेबल, पेन, टमरेल, घासलेट. जिथे ते लोकवापरातून तयार होत नाही, तिथे ते कृत्रिमपणे करण्याचा प्रयत्न मी करते. यावर संस्कृतचा वरचश्मा आहे का? तर आहे. माझ्या वर्गीय पार्श्वभूमीचं प्रतिबिंब अपरिहार्य आहे. ते होता होईतो पुसट व्हावं म्हणून मी उद्मेखून फारसी-उर्दू, इंग्रजी आणि क्वचित मला ज्ञात असलेल्या इतर बोली वापरते. पण मला अशा प्रकारच्या प्रतिशब्दघडणीचा ऍक्सेस आहे आणि काही जणांना नाही, हे उरतंच. मग हा असमतोल दूर व्हावा म्हणून मी काहीच न करता शांत बसू? नही होगा. माझी त्यांना सहानुभूती आहे. शक्य असेल त्या त्या वेळी मदत. पण माघार मात्र जमणार नाही. मी बोलींचा प्रमाणमराठीशी आणि प्रमाणमराठीचा हिंदी-इंग्रजीशी असलेला लढा - वा देवघेव म्हणू - समांतर मानते, इतक्या कबुलीवरच समाधान मानणं भाग आहे. हा माझ्याही अस्तित्वाचाच लढा आहेच.

    ४) सवालच नाही. वर म्हटल्याप्रमाणे मी माझ्या जीवनशैलीशी निगडीत असलेल्या मराठी भाषेबद्दलच बोलते आहे. हा अट्टहास व्यावहारिक उरणार नाही याचीच तर भीती वाटते. शेवटी मला हे मान्य करावंच लागेल, की भाषा ’च’च्या भाषेसारखी एका विशिष्ट खेळापुरती वा पोकळीपुरती बोलून भागणार नाही. त्याचीच तर भीती वाटते. फक्त माझ्या वरच्या लेखात चुकलेला भाग असा की, हे काही एका रात्रीत होणार नाही. हे हळूहळू होणारं स्थित्यंतर असेल. त्यामुळे त्याचं रिअल टाईम दु:ख शून्यवत असेल. कधीतरी ’मागे वळून पाहताना’ हे जाणवून वाईट वाटेल, पण प्रत्यक्ष घडताना नाही.

    ५) ’निष्कारण भावुक’ या शब्दप्रयोगातच विसंगती आहे! भावुकता सकारण येतच नाही. म्हणूनच ती डीकोड करण्याचा प्रयत्न करत होते.

    ReplyDelete
  15. Meghana, first I admire your Marathi skills...the way you can express complex thoughts in it....I have not been able to do it....But I enjoy reading them...

    Each of your bullet-point is solid and could not agree with them more...

    just one point

    if I were a decision maker, I would donate Marathi vishwakosh to Wikipedia and work with them to integrate it with Wiki Marathi but this won't happen and sadly MV will eventually die just like Encyclopedia Britannica...

    I can give many such examples....

    finally I use (for speaking, writing, joking, crying, cribbing, praising) Marathi because I enjoy using it....but Marathi is not my only language...the same is true of my son...he read Shakespeare before Tukaram....he has read more world classics than me at his age...He went to English medium schools...

    but today at 22 he reads little...when he reads, he reads English....he does not even look at Loksatta and let us talk about Lalit...(even I don't read it!)...reads TOI every day, even Business Standard occasionally...he knows Marathi writers because of me and he admires greatly whenever I quote something of Tukaram or Kolatkar or PuLa or GA...he likes world football, like American TV serials...loves his grand parents and cares genuinely for them...worries about his mother more than his father...he is not worried about future of Marathi but he is worried about the ecology...that it has not rained for a while...

    I don't think I want him to change any of the above...

    ReplyDelete
  16. @AGK
    मनापासून आभार!

    माझ्या भाच्यालाही नाही वाटलं मराठीतून काही वाचावंसं, तर काय वाटेल मला? (ही इतकी ’२०४० सालचा कल्पनाविस्तार’छाप कल्पना नाही बरं का! त्याला आत्ताही मराठी वाचता येत असलं, तरी त्याला ते मनापासून आवडत नाही. मी माफक ओळख करून देण्याचं माझं कर्तव्य पूर्ण करते आणि खांदे उडवते.) पण त्यानं पर्यावरणाची चिंता केली नाही आणि दंगलीत ’हेऽऽऽ मारोऽऽऽ काटोऽऽऽ’ असं म्हणून बेअकलीपणे धावत जाणार्‍या कुणाला थांबवलं नाही, तर मात्र मला अगदीच शरमून-कळकून वाईट वाटेल. साहजिक आहे, भाषा हे काही स्वयंसिद्ध मूल्य नाही, असंच तर आपण म्हणतो आहोत ना?

    आता इतक्या चर्चीलपणानंतर मला आपले भाषाविषयक कढ हे ’गॉन विथ दी विंड’च्या जातीचे वाटायला लागले आहेत. त्यातली जीवनपद्धती गुलामगिरीला पोषक आहे, हे प्रचंडच भयंकर आहे. तसला भयंकर आरोप मराठीवर मी करणार नाही. पण बाकी जात्या जीवनशैलीबद्दचा जिव्हाळा, ती जाण्यातली अपरिहार्यता आणि “टुमॉरो इज अनादर डे.” यातली जीवनसन्मुखता (सॉरी, सॉरी, जरा जड झाला खरा हा शब्द.) तर दोन्हीमध्ये तीच आहे...

    ReplyDelete
  17. पण बाकी जात्या जीवनशैलीबद्दचा जिव्हाळा, ती जाण्यातली अपरिहार्यता आणि “टुमॉरो इज अनादर डे.” यातली जीवनसन्मुखता...तर दोन्हीमध्ये तीच आहे...touche!

    ReplyDelete
  18. याच धर्तीवर, मग देशप्रेमही आलं. आजच मी विचार करीत होते, "भारत माता की जय".....या म्हणण्याला तसा काय अर्थ आहे? भारतावर निष्ठा, प्रेम असणे म्हणजे नक्की काय? आणि भारताला आई वगैरे समान मानणे म्हणजेही नक्की काय? शीख लोक म्हणतात की आम्ही स्त्रियांची पूजा वगैरे काही करत नाही....म्हणून भारतालाही ’भारत मा’ वगैरे म्हणणार नाही. खरेच नाही का ते?

    ReplyDelete
  19. @आंबट-गोड
    अर्थातच. जन्मजात मिळालेल्या गोष्टीबद्दल का नि कशी अस्मिता बाळगायची, हाच तर प्रश्न. वर आणि त्या अस्मितेची जबरदस्ती इतरांच्या गळ्यावर सुरी ठेवून त्यांनाही करणं म्हणजे तर आणिच वाईट.

    ReplyDelete