खरेदी केलेल्या वा संग्रहातल्या पुस्तकांचे फोटू डकवू डकवू लोकांना जळवण्याच्या काळात आमचे तत्त्वज्ञान तसे मागासच. परंतु आम्ही त्यास चिकटून आहोत.
आमच्या मते :
- घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवावी लागल्यासच व्याकरण, शब्दकोश, तत्त्वज्ञान, चर्चा-समीक्षकी मुलाखती, कविता अशा प्रकारची ठेवावीत. कादंबर्या, कथा, निरनिराळ्या विषयांतली ललित पुस्तके, इतर कोणतीही पुस्तके - ज्यांच्याबद्दलची जनमानसातली आवड+क्रेझ+अकारण उत्सुकता+लेटेस्ट फॅशन आणि ज्यांच्याबद्दलची तुमची आवड+क्रेझ+आपुलकी यांचे प्रमाण सारखे असेल - बैठकीच्या खोलीतून सहसा दिसणार नाहीत, अशा प्रकारे आवरून ठेवावीत. तसे न केल्यास दोन परिणाम संभवतात. 'ही सगळी पुस्तकं वाचून झाल्येत तुझी?' असा अडाणी प्रश्न. किंवा मग 'मी नेतो हे. वाचायला पायजे माण्साने.'छाप उद्धट आक्रमण. त्यामुळे हा नियम प्राथमिक महत्त्वाचा.
- चुकून एखादे जिव्हाळ्याचे पुस्तक बाहेर राहिले आणि कुणी 'कसे आहे रे हे' अशी पृच्छा केलीच (या प्रकारची पृच्छा करणारे लोक सहसा एकीकडे हाताने पुस्तकाची पाने पलटवत असतात. जसा काही एका दृष्टिक्षेपात त्यांना पुस्तकाचा आवाका कळणार आहे आणि त्यांच्या मताची निव्वळ खातरजमा करून घेण्यासाठी ते तुम्हांला तुमचे मत विचारताहेत), तर 'छे, बंडल आहे एकदम.' (तुच्छतापूर्ण आवाजात) किंवा 'हम्म्म्म्म.... डिपेण्ड्स..' (विचारमग्न मुद्रा करून), 'ठीकाय... पण तू बोअर होशील... फार चावलीय बाई...' (आवाजात उसन्या तुच्छतेने युक्त असा जिव्हाळा आणून) असे एखादे वाक्य फेकावे.
- शक्यतो पुस्तकांना कव्हरे घालावीत. मग ती वर्तमानपत्राची का असेनात. कव्हर जितके अनाकर्षक असेल, तितके उत्तम, जेणेकरून लोक उत्सुकतेने माना वाकड्या करकरून - किंवा आगाऊपणाने ('हम्म... तेलविहिरी. वाचाय्ला इतका वेळ कसा रे मिळतो?') - पुस्तकाबद्दल भोचक प्रश्न विचारणार नाहीत.
- इतके सगळे करूनही कुणी चिकाटीने पुस्तक मागतच राहिले, तर कधीतरी ते द्यावे लागते. कधी कधी वाचनाचा तात्कालिक किडा चावलेले लोक हावरटासारखे एकदम दहा-बारा पुस्तके उसनी नेऊ पाहतात. त्यांना वेळीच ठेचावे लागते. अशा वेळी शक्य तितका तुसडेपणा करून 'मला तमक्याला द्यायचे आहे, झाले की लगेच दे', 'हे झाले की परत दे, मग दुसरे देईन' किंवा 'हे नाही तुला आवडणार...' असे काहीतरी बोलण्याचे कौशल्य आत्मसात करून ठेवावे.
- पुस्तक नेणार्यांतले पुष्कळसे लोक ते सोईस्कर विसरून जातात, 'देऊ की, आहे नीट ठेवलेलं. काय घाई आहे?' असे आपल्यालाच उद्दामपणे विचारतात, किंवा चक्क 'कुठेतरी गेलं रे ते. तमक्या त्या ह्यानी नेलं वाट्टं..' असे निर्लज्जपणी सांगतात. अशा लोकांची आपल्या ब्ल्याकलिस्टीत कायमची नोंद करून ठेवावी.
- काही लोक मात्र आठवणीने पुस्तक परत आणून देतात (कधीकधी भोचकपणे ब्राउन कलरचे कव्हर घालून देतात. बहुधा हे लोक गटणे वर्गातले.), बरे वाटले - नाही वाटले ते भरभरून सांगतात, त्यांच्याकडे असलेले एखादे विशेष पुस्तक आपल्याला देऊ करतात. अशी माणसे कुठल्याही लक्षणांखेरीज प्रथमभेटीतच ओळखणे सरावाने जमते. त्यांच्याशीच देवघेव व्यवहार करावेत. बाकी जग आपल्याला हळूहळू शिष्ट म्हणून ओळखू लागतेच, त्यांच्याकडे चश्मिष्ट+शिष्ट नजरेने चश्म्याच्या कडेवरून पाहून दुर्लक्ष्य करावे.
- अलीकडे पुस्तकांच्या फुकट मऊप्रती मागण्याची टूम आहे. बरे, मागण्याची पद्धतही खास. 'हा आमचा मेलायडी. आम्हांलापण धाडा.' असा हुकूमच करतात. अशा लोकांना एकेकदा मऊप्रत धाडावी. पुन्हा अशी विनंती (हुकूम) झाल्यास आधीच्या पुस्तकावर चाचणीवजा प्रश्न विचारावेत. वाचन झाल्याचे दिसले, तरच पुढले धाडावे. नाहीतर 'बाहेर आहे', 'मेल जात नाही', 'फाईलसाइज जाम आहे' असे बिनदिक्कत दडपून द्यावे. गूगल देवाने सर्वांना दिले आहे. ज्याला हौस आणि खाज असेल, त्याला मऊ प्रत मिळावयाची राहत नाही हे पक्के ध्यानी धरावे.
पुस्तके आणि आपण सुखी राहावे.