Saturday 17 October 2009

सुशीलाकाकू आणि तत्सम

यंदाच्या ’मायबोली’च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली ही कथा.
------------------------------------------------------------------

सुशीलाकाकू आणि तत्सम पंचेचाळिशी-आसपास सुखवस्तू-संवेदनशील बायकांबद्दल तिला एक विचित्र, हिंस्र राग होता.

म्हणजे तिच्याखेरीज दुसर्‍या कुणाला ते कळलं नसतंच. उलट तिचं या सगळ्या बायकांशी असलेलं गूळपीठ तसं प्रसिद्धच. त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं, की ती कड घ्यायला धावलीच. पण तरी आत राग होताच. नेमका कसला राग, असा प्रश्न स्वत:लाच अनेकवार विचारूनही उत्तरावर बोट ठेवता येत नसे; आणि राग अजून अजून धुमसतच जाई.

'इतक्या कसल्या गं गप्पा मारायच्या असतात तुम्हांला तासन् तास?' किंवा 'तुझ्याएवढी असताना मी नोकरी सांभाळून आदित्याच्या वेळच्या बाळंतपणात होते, आता बघ की एखादा मुलगा. की मी बघू?' हे आणि असले प्रश्न त्या मानानं निरुपद्रवी. स्नेकच्या गेममध्ये गुंग झाल्याचं दाखवत असतानाच कानावरून वाहून जाऊ शकणारे. पण त्यांचं ते नेमानं दर श्रावणात सगळ्या रामरगाड्यासकट सत्यनारायण घालणं, इमेल करायला शिकणं आणि एखाद्या अवघड सोशिअल प्रसंगी 'ह्यांना म्हणजे काऽऽऽही कळत नाही' असा कळे न कळेसा तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून, काहीतरी समयोचित धूर्त बोलून बघता बघता प्रसंग आपल्याला हवा तसा वळवणं - या सगळ्यांमधली विसंगती तिला झेपेनाशीच होई.

आपण त्यांचा लसावि न काढता आल्यामुळे उखडतो की अनिश्चिततेच्या टप्प्यावरच्या आपल्याला त्यांच्या लवचिक आत्मविश्वासाचा मत्सर वाटतो, ते न उलगडता आल्यामुळे तिनं ते भिजत घोंगडं डोक्याच्या मागे टाकून द्यायला सोईस्कर सुरुवात केली होतीच. तरी एखाद्-दुसर्‍या अवघड वेळेला मध्ये उभा राहणारा हा पेच वारून आपल्याच जिवाजवळच्या या बायकांशी दुहेरी वागता वागता तिचा जीव कासावीस होऊन जाई.

एकीकडे त्या हळव्याहून हळव्या भासत. अरुणा ढेर्‍यांची 'रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून निघालेल्या उत्कट मुलीची गोष्ट' वाचून जिव्हारी लागल्यासारखी ओली नजर लपवणारी सुशीलाकाकू अजून आठवते की तिला. पण एकीकडे त्या तितक्याच क्रूर, निर्घृण भासत. 'अहो, असे काय पेंगताय भर बैठकीत वेंधळ्यासारखे? नीट झोपा की आत जाऊन. नैतर तोंड धुऊन या - जा...' असं वसकन् खेकसणारी प्रमिलामामी आणि खडबडून जागा होत शीपिशली हसणारा मामा बघताना घशाशी आवंढा आला होता, तो काय फक्त ती 'आपल्या' मामाला बोलली म्हणून? व्हीआरेस घेतलेल्या या कंटाळवाण्या आणि काहीशा केविलवाण्या, उतारवयातल्या माणसाशी काहीच बंध जुळले नसतील तिचे? आपल्याला त्याच्या वयाकडे बघून जे वाटतं, पोटात कालवून येतं, ते त्याच्यासोबत आयुष्य काढलेल्या आणि गाताना विलक्षण कोवळा सूर लावू शकणार्‍या या बाईला जाणवतच नसेल?- की त्याच्याबरोबर आयुष्य काढूनच ती अशी झाली असेल? - असे प्रश्नांचे लाख तुकडे एका क्षणात नव्हते आठवून गेले तिला?

नेहमी टाकत असे, तसंच आताही तिनं हे स्वत:लाच न कळणारं प्रश्नोपनिषद मागं टाकून दिलं असतं. पण "अगं, आपणच ढकलावं लागतं मुलांना, त्यांना काय कळतंय?" असं हलक्या आवाजात धूर्त शहाजोगपणे म्हणणार्‍या सुशीलाकाकूचा सूर बघता बघता तिच्या डोक्यातच गेला. "मी म्हटलं तिला - बघ बाई, हा मुलगा मी गेलं वर्षभर तुझ्याबरोबर बघते आहे. महत्त्वाकांक्षी आहे नि साधाही आहे अगदी. 'तसलं' काही वाटत नाही असं स्पष्ट म्हणालीस, तरी त्याच्या वागण्यात तसूभर फरक नाही की शिष्टपणा नाही. मग तुझं 'तसलं' वाटणं म्हंजे तरी काय? मित्र म्हणून आवडतो नं तो तुला? नवरा मित्रासारखा असण्यापेक्षा अजून मनासारखं काय असणारेय? विचार कर. मजेत जगाल आयुष्य दोघंही. प्रेम वाटायला लागतं आपोआप... मला काही बोलली नाही. पण त्याच्याशी बोलली मग ती परवा स्वत:हूनच. म्हंजे - तीच सांगत होती गं. जवळ जवळ ठरवल्यातच जमा म्हणायचं..." असं म्हणताना तिच्या स्वरातला न लपलेला यशाचा आनंद. 'अनुभवी' आनंद.

तोंडभर हसून तिला तिच्या आनंदात कंपनी देताना आतून तडकत - धुमसत गेली ती. आपल्याच निष्ठांशी अशी बेईमानी? आपल्याच पोराच्या कोवळ्या निराकार भावना मॅनिप्युलेट करून त्याचं चौकटीतलं भलं करायला बघावं? असं कसं करू शकतं कुणी? 'आपलं' कुणी?

तेव्हा तिच्या रागाचे सगळे लखलखते कंगोरे सर्रदिशी तिच्या पुढ्यात उभे ठाकले. डोक्यातला कोवळा तुकडा तिनं तिच्यापुरता जाळून-विस्कटून टाकला. स्वत:शीच चालवलेली लढाईही. आणि मग मोबाइल वापरताना त्यांची तिरपीट होई, त्यावर तिच्या वयाचे लोक खिंकाळून-टाळ्या देऊन देऊन हसत, त्यात आपलाही उंच निरपराध स्वर तिनं अलगद मिसळून दिला.

***

'वक्त जाता सुनाई' द्यायला ती काही गुलजार नव्हती.

आपल्या सोकॉल्ड संवेदनशीलतेचं धारदार पातं दुधारी असतं आणि ते बेईमान होऊन आपल्यावरच उलटतं, तेव्हा मुकाट रक्ताळत जाण्याखेरीज दुसरे काही पर्यायच असत नाहीत हे कळायलाही.

तरीही वक्त उलटलाच. जिवाजवळच्या मित्राचं मोडकळीला आलेलं अफेअर त्याच्यासोबतीनं भोगताना आपल्याच संवेदनांचे शापही तिनं भरभरून भोगले. चिंतनबैठका, तारस्वरातली भांडणं, रात्री-बेरात्री फोनवर बोलत काढणं, काही दिवस सगळं काही गोडगुलाबी होणं. पुन्हा एकदा आकांतानं आतून आतून रडणं. आपल्याच नात्यांचे काच आपल्याला सोसेनासे होतात तेव्हा ते झुगारून द्यायला बघणं. आणि सवयीचे झालेले बंध कापले जाण्याच्या कल्पनेनं अनाथ - निराधार वाटून, शहारून पुन्हा पुन्हा नात्याच्या आसर्‍याला परतणं. यांत सुरुवातीचे कोवळे दिवस कसे बघता बघता निबर - राठ होत जातात ते पाहताना बुद्धासारखी आतून विटत विटत गेली ती.

पण बोधिवृक्षाखालचा क्षण मात्र तिनं सुशीलाकाकूच्या नावे लिहून दिला.

प्रेमात न पडण्याच्या कन्फर्म्ड वयातला तिचा एक गृहस्थ-मित्र. अवकाश आणि काल आणि नियती अशी जुळून आली - बघता बघता शहाणा गृहस्थ तिच्या प्रेमात पडला. त्याची घालमेल - ओढाताण - कासाविशी - म्हटलं तर तिला कळली आणि कळली नाहीही. तळ्या-मळ्याच्या काठावरून तिनं हे सगळं पुन्हा नव्यानं अनुभवलं. समोरच्या माणसाला आपल्याबद्दल हे असं मरणप्राय उत्कट काहीतरी वाटतं आहे आणि आपण मात्र त्याची सगळी घालमेल एखाद्या गणितज्ञासारखी निर्विकारपणे निरखतो आहोत, सिनेमातल्या एखाद्या व्यक्तिरेखेसाठी 'बाहेरून' आणि 'असहाय'पणे व्हावं तसे दु:खी होतो आहोत - आपल्याला या जीवघेण्या वादळाचा परीघ मोजता येतो आहे, पण केंद्रबिंदू बघणारी नजर मात्र आपण गमावली आहे...

हे सगळे सगळे साक्षात्कार तिला झाले ते तेव्हाच.

पण स्वत:साठी टिपं गाळत न बसता - तिच्या मते - मोठ्या कौशल्यानं तिनं त्याला प्रेम आणि इतर तत्सम भावनांमधला फोलपणा विशद करून सांगितला. उलटतं वय, शरीरातली आणि मनातली बदलत जाणारी रसायनं आणि निव्वळ निव्वळ निव्वळ योगायोग - यांचा परिपाक म्हणून हे असं काहीतरी वाटत असल्याचं तिनं मित्राला यशस्वीपणे - तिच्या मते - पटवून दिलं. शी ऑल्मोस्ट टॉक्ड हिम आउट ऑफ इट - अर्थात तिच्या मते. त्यालाही हे असं स्वत:ला पटवून घेण्याची निकड भासली असेलच कदाचित. वादळं झेलण्यात भव्य-दिव्य दिमाख असतो, पण ते तितकंसं सुखकारक प्रकरण नसतं, हे समजण्याइतका - जाणिवेच्या वा नेणिवेच्या पातळीवर - मित्र परिपक्व इत्यादि होताच. त्याची समजूत पटली. नंतर कधीतरी पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेल्यावर, शिळोप्याच्या गप्पा छाटताना 'किती मॅच्युअर्ड आहेस गं. तेव्हा मी कुठल्याकुठे वाहवत जाऊ शकलो असतो...' हे त्याचं वाक्य ऐकलं आणि त्या बेसावध क्षणी तिला आपल्यातली सुशीलाकाकू अशी वेगळी होऊन लख्ख दिसली.

आताही तिचा त्या पंचेचाळिशी-आसपास बायकांवरचा राग मावळलेला नाहीच. पण आता तिला आपल्या रागाला टोक काढून तो कुणाच्याही अंगावर नेम धरून सोडता येणं जमेनासं झालं आहे. सुशीलाकाकू तिला हल्ली 'मोठी झाली हो लेक आमची - ' असं जनरल वडीलधार्‍या प्रेमानं म्हणते. त्यात पंखांखाली घेणारी निखळ जवळीक असते की चुकल्या फकिराला मशिदीत घेणारी कावेबाज माया असते, ते तिला अजूनही ठरवता येत नाहीच.

राग - कंटिन्यूड.

------------------------------------------------------

शेवटच्या शब्दामुळे फसू नका. कथा इथेच संपली आहे. 
हे सांगायला लागावं यात सगळं आलं. :(

शुभ दीपावली

रेषेवरची अक्षरे २००९’ प्रसिद्ध झाला आहे. वाचून नक्की अभिप्राय द्या.

सुचवण्या, तक्रारी, दाद - सगळ्यांचं मनापासून स्वागत.

शुभ दीपावली!