Wednesday 25 April 2018

व्हॉट्सअॅपच्या जवळिकीची विश्लेषणे

फेसबुकच्या तोट्यांबद्दल बरीच चर्चा झाली आहे. मात्र, व्हॉट्सअॅपच्या वापराच्या फायद्या-तोट्यांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. व्हॉट्सअॅपशी झालेल्या जवळिकीची ही काही विश्लेषणं. (हे टिपण आधी माझ्या फेसबुक भिंतीवर प्रकाशित करण्यात आलं होतं. मग ते 'बिगुल'वरूनही प्रकाशित करण्यात आलं. इथे काही बारीक मुद्द्यांच्यात थोडी फेरफार-भर-बदल इत्यादी केले आहेत. तरीही हा लेख नाही, लहानसं टाचण आहे. अनेक मुद्द्यांचा विस्तार सहजशक्य आहे.)

***

व्हॉट्सअॅपच्या जवळिकीबद्दल काही अभ्यास झाल्याचं माझ्या ऐकण्यावाचण्याबोलण्यात तरी आलेलं नाही. असं काही आहे का, हे शोधायला हवं आहे. एरवी फेसबुकावरून होणारा आरडाओरडा आता पुष्कळ चिवडला जातो. ते आपल्यात कशा भिंती घालतं, कसं बबलमध्ये नेऊन बसवतं, याबद्दलही चिकार बोललं जातं. त्याच्या धोक्यांचा बागुलबुवा आता शेंबड्या पोरांनाही ठाऊक असेल. पण व्हॉट्सॅपबद्दल काही माहिती, अभ्यास, विश्लेषण नाही. माझ्या अनुभवावरून केलेल्या या काही नोंदी. यात राजकीय मोहिमांसाठी होणार्‍या फेसबुकच्या वापराबद्दल फार काही सापडणार नाही. एका हाताची बोटंही खूप होतील, इतक्या कमी ग्रुप्समध्ये मी नांदत असल्यामुळे आणि नातेवाइकांच्या ग्रुपमधून मला काढून टाकलेलं असल्यामुळे (होय, मी हे मिरवते आहे.) माझी निरीक्षणं तोकडी आहेत.
व्यसन लावण्याची क्षमता- व्हॉट्सअॅपमुळे मोबाइल फोन सतत तपासण्याचं व्यसन लागू शकतं. लागतंच. बहुतांश लोकांना.
ग्रुपमधून चालणार्‍या गप्पा, फॉरवर्ड आणि राजकीय वापर - अफवा आणि मतं आणि मीम्स पसरवण्यासाठी ग्रुप्स आणि फॉरवर्डस अतिशय उपयुक्त आहेत. अगदी फेसबुकावरच्याही बर्‍याच पोस्टी लेखकांना कोणतंही श्रेय न देता व्हॉट्सॅपवरून फिरतात. व्हायरल होतात. एकाच वेळी आपल्या संपर्कयादीतल्या अनेकांना एखादी पोस्ट पाठवणं (एकेकट्याला आणि गटांनाही) इथे शक्य आहे. आणि त्याच वेळी या पाठवापाठवीच्या उद्योगाचं कोणतंही जाहीर दस्तावेजीकरण होत नाही. या पोस्टींना कोणताही पुरावा, पडताळणी, शहानिशा करावी लागत नाही. पोलिसांचा हस्तक्षेप झाला तर गोष्ट वेगळी. पण ती फारच अपवादात्मक परिस्थिती. व्हर्चुअल गप्पांमध्ये निरक्षर असणार्‍या लोकांच्या 'छापील आहे, म्हणजे खोटं कसं असेल?' यासदृश अंधविश्वासावर रेलून काय वाट्टेल ते पुढे ढकललं आणि ते पुरेसं कॅची / भिववणारं / भावनाखेचक / भडकाऊ असलं की पुरतं. पुढचं काम लोकच करतात. तरीही या प्रकारच्या वापराबद्दल मी बरीच अनभिज्ञ आहे. कारण मी शक्यतोवर असले घाऊक फॉरवर्ड वाचणं आणि धाडणं टाळते. 
एकेकट्याशी होणार्‍या गप्पा - लोकमत तयार करण्यासाठी वा गढूळ करण्यासाठी फेसबुक किंवा इतर माध्यमांचा जो वापर होतो, त्याहून अगदी निराळी लक्षणं. इथे मला 'Her' या चित्रपटाची आठवण टाळणं शक्य नाहीय. कारण दुसर्‍या माणसाशी बोलताना व्हॉट्सॅप कमालीची आणि क्रीपी जवळीक देऊ करतं आणि ही जवळीक इतर कुणालाही दिसत नसते. संवाद करणार्‍या व्यक्ती फक्त एकमेकींशीच बोलत असतात. त्यात तिसरं कुणी असत नाही. हे ईमेल्स वा पत्रांहून निराळं नाही असं वाटेल. पण तसं नाहीय. इमेल्स सतत पाहिल्या जात नाहीत. दिवसाकाठी काही वेळा पाहिल्या जातात. अमुक एका अॅपमध्ये शिरल्याशिवाय त्या दिसतही नाहीत. पण व्हॉट्सॅपचं तसं नाही. तुम्ही अॅपमध्ये जाऊन मुद्दामहून एखादं संभाषण पाहत नाही, तोवर तुम्हांला सतत नोटिफिकेशन येत राहतं. दिसत राहतं. जर मुद्दामहून संभाषण म्यूट केलं नाही, तर मोबाईलच्या वरच्या पट्टीवर दिसत राहणारं हे नोटिफिकेशन फोन वापरणार्‍याला सतत खुणावत राहतं. त्याकडे दुर्लक्ष्य करायला मनोनिग्रह लागतो किंवा इंटरनेट तरी बंद करावं लागतं. दुसरं म्हणजे इमेल्सचा स्वभाव, प्रकृती व्हॉट्सअॅपहून वेगळी आहे. ईमेल्समधून दीर्घ संवाद होत असतो. एकदाच विचार करून काही थोडे विचार सुसूत्रपणे मांडायचे आणि मग दुसरी व्यक्ती त्यावर विचारपूर्वक उत्तरेल, असं तिथे बरेचदा गृहीत असतं. पण व्हॉट्स्अॅप मात्र खर्‍याखुर्‍या संभाषणाप्रमाणे चालतं. एकानं प्रश्न विचारला, दुसर्‍यानं उत्तर दिलं.. अशी एकोळी संभाषणं होत राहतात. मधला वेळ पुष्कळदा बराच कमी असतो. हा वेळ कमी असणं कम्पल्सरी नसलं, तरी आपल्याकडून वेगानं उत्तर मिळेल असं अपेक्षित मात्र असतं. हे एसेमेसहून काय वेगळं आहे, असाही प्रश्न शक्य आहे. तर एसेमेस अक्षरसंख्या मोजतात आणि त्यानुसार पैसे आकारतात. तसंही व्हॉट्सअॅपचं नाही. इंटरनेटची जोडणी असली, की तुम्ही किती अक्षरं लिहिता त्याची मोजदाद करायची गरज नाही. त्यामुळे मोठं काही एकाच मेसेजमध्ये कोंबून लिहायची आणि मग ते पाठवायची काटकसरी तसदी लोक घेत नाहीत. यामुळे सवयी कशा बदलतात, याचा अनुभव व्हॉट्सअॅप वापरण्याची सवय झाल्यावर एसेमेस पाठवताना होणार्‍या धांदलीवरून येऊ शकेल. या सगळ्याचा परिणाम म्हणजे इतर सगळ्या लोकांच्या नजरेआड दोनच माणसं एकमेकांशी खासगी, रिअल टाइम आणि अंतहीन चालू शकणारं संभाषण करत असतील, तर त्या संभाषणाचा पोत जसा असेल, तसा या संभाषणाचा पोत असतो.
सर्रिअल क्वालिटी - लिखित शब्दाला तर महत्त्व देतोच आपण. पण एकदा का कोणत्याही गोष्टीचा उच्चार केला की आपोआप त्या गोष्टीला एक प्रकारची वैधता प्राप्त होते. जगाच्या पाठीवरच्या सगळ्या संस्कृती कुणाच्या तरी साक्षीने असा शब्दोच्चार करून गोष्टींना वैधता प्राप्त करून देताना दिसतात. हा उच्चार या संवादात हरवतो. साक्षही हरवते. त्यातून या संभाषणाला एक प्रकारची सर्रिअल क्वालिटी मिळत असावी. काही विशेष काळजी घेतली नाही, तर यातून एक विचित्र खासगीपणा साकारतो. ज्याच्याशी संभाषण चालू आहे, त्याच्याशी विलक्षण, शरीरहीन निकटता आणि इतर जगासाठी हे संभाषण संपूर्ण अदृश्य असणं. यातून दृष्टिभ्रमासारख्या भ्रामक जवळिकींचे भास तयार होऊ शकतात.
व्हॉट्सॅपचे फायदेही अर्थातच आहेतच. त्याबद्दल इथे काही लिहिण्याची गरजच नाही. पण धोकेही आहेत आणि ते फेसबुकाइतक्या तीव्रतेनं चर्चिलेले नाहीत.

Saturday 14 April 2018

एरवी

वेळोवेळी शब्दांचा फास पडला आहे मला.
त्यांचं प्रेम नाही असा दावा नाही.
मनापासून भोगले शब्द.
याचा अर्थ बाकी कशात राम नव्हतासा नाही.
निवडीच्या भासाचे जे फासे पुढ्यात पडले,
त्यात शब्दाचीच सरशी होत गेली.
म्हटलं तर पर्याय होताच
रडीचा डाव खेळून उठून जाण्याचाही.
पण हसत खेळले.
भरभरून मजाही आली.
याचा अर्थ एरवी डाव जमलाच नसतासा नाही.
पण
प्रश्न अखेर अटीतटीनं खेळण्याचा होता.
मग कसलं का दान पडेना मला.

Saturday 7 April 2018

इंद्रियांची वेल पसरत पसरत

'हम ने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो'वर समाधान मानण्यात आपल्याला रस नाही. त्यात बेक्कार गुळमुळीतपणा आणि थोडा बेजबाबदारपणाही आहे हे आपल्याला पहिल्यापासून मान्यच. असं कसं 'नाम न दो'?

नाही आपण प्रपोज मारलेलं कधीच एकमेकांना. राखीबिखी तर नाहीच बांधणार बावळटासारखी. पण बोलता-बोलता कानातल्याशी अजाणता चाळा करणारी माझी बोटं बघून तुझी नजर जातेच खेचली माझ्या बोटांकडे - तुझ्याही नकळत. मी मोठ्या प्रयत्नानं खांद्यावरून मागे वळून पाहायचं टाळते. किंवा तुझा तो गेल्या शतकातला, धुऊन-धुऊन शेप हरवून बसलेला, विटका नि मऊसूत झालेला राखाडी कुर्ता घालून त्याच्या बाह्या पार कोपरापर्यंत दुमडून घेतोस, तेव्हा मी मवालीपणा करून शिट्टी मारत नाही इतकंच. पण एका कटाक्षात टिपलेले असतात मी तुझ्या हातावरचे कुरळे केस, आतल्या बाजूचं तुलनेनं कोवळं-रेखीव मनगट, कोपरावरची खळी आणि त्यापलीकडचा तुझ्यातला निवांत, सैलसर, गुणगुणता मूडही. बाप्यांना बायांचे फक्त आकार-उकारच पाहायचे असतात असं नाही आणि बायांना बाप्यांचे चीकबोन्स नि रुंद खांदे सोडून इतरही अनेक गोष्टी पाहण्यात कमालीचा रस असतो, हे एकमेकांचं शिक्षण आपणच नाही का केलेलं? बाई असल्यामुळे मला पुन्हा-पुन्हा नजर टाकावी लागत नाही इतकंच. तर्री कसं बुवा 'नाम न दो'?!

पण शरीर असल्याचं अमान्य न करणार्‍या माणसांना एकमेकांशी करार-मदार न करता घट्ट बांधणार्‍या नात्याला तूर्तास तरी मैत्री हेच एक नाव आपल्या भाषेत आहे, म्हणून आपण त्याबद्दल तह केलेला. आपल्याला एकमेकांबद्दल आकर्षण वाटून गेलं आहे, पुढेही अधूनमधून वाटेल आणि तरीही आपापल्या कारणांमुळे आपण त्या वाटांवर पाय टाकत नाही आहोत हे आपल्याला दोघांनाही स्वच्छ माहीत आहे, कबूल आहे, त्यात कोणतेही त्याग-अन्याय-एकतर्फी प्रेम इत्यादी मध्ययुगीन प्रकार नाहीत. या नात्याचं नाव 'मैत्री' असं सबगोलंकारी असलं, तरी त्यातले स-ग-ळे कंगोरे आपल्याला नीट ठाऊक आहेत. ही सऽगळी समजूत प्रस्थापित करण्यात आपण काही गंभीर भांडणं, काही जीवघेणे अबोले आणि काही सहनशील चर्चा खर्ची घातलेल्या नाहीत का?

इतक्या सार्‍या वर्षांच्या गाढ परिचयानंतरही अजूनही माझ्याबद्दलचा पालकभाव तुझ्यात कधी-कधी जागा होतोच. एखाद्या मोठ्या मीटिंगपूर्वी 'अमुक अमुक आगाऊपणा करू नकोस...' असा पोक्त सल्ला देऊन किंवा 'इतक्या रात्री जागी का आहेस? झोप बघू मुकाट.' असा दम भरून मग तू कसनुसा होतोस. आपण तद्दन पुरुषीपणा करून या बाईला पंखाखाली घेतलं की काय, आता ही कशी रिअ‍ॅक्ट होईल, त्यावरून भांडण होईल का, झालं तर कसं निस्तरायचं, चुकलं तर आपलं आहेच, पण काय चुकीचं सांगतोय का मी... असे डझनभर प्रश्न तुला एकसमयावच्छेदेकरून पडून जातात. मग सारवासारव. अशा वेळी तू जनरल पुरुषपणा करत नसून मैत्रीतून येणार्‍या काळजीमुळे असं सांगतो आहेस, त्यात थोडा पुरुष डोकावला तरी तो सहन केला पाहिजे, नि अखेर तू आहेस तर पुरुषच, ते थोडंच नाकारायचंय... हे माझं सहनशील स्वगत. मीही स्त्रीवादी व्यक्ती नंतर आणि माणूस आधी आहे, हे हजार वेळा बजावावं नाही का लागत माझं मलाच? कधी-कधी मलाही हवेसे होतातच आयते सल्ले, आधारबिधार आणि असल्या छत्रछायाही. पण तेव्हा नेमका तू 'बघ बुवा. मला हे असं-असं वाटतंय. तुझं तू ठरव.' असा सुटवंग पवित्रा घेतोस. कसली कांगावखोर चिडचिड होते माझी! आपल्या वागण्यातले असे अनेक लहानसहान कंगोरे आपापल्या बाई-बुवापणामुळे आल्यासारखे भासत असले, तरी त्यात काही अन्यायकारक नाही आणि शरमण्यासारखं तर नाहीच नाही हे स्वतःला सांगण्यात नि स्वीकारण्यात आपल्या दोघांचीही बरीच ताकद खर्ची पडली आहे, अजूनही पडते, हे आपल्या माणूसपणाचं लक्षण की सोईस्करपणाचं? कुणास ठाऊक.

आपल्याला एकमेकांचं कौतुक वाटतं. कधी अगदी रास्त आणि कधी अगदी अवाजवी कारणांनी.  "बावळट आहेस. माझ्यासमोर करतोस ते ठीके. जगात इतका बावळटपणा करून कसं चालेल? विकून खातील तुला." हा माझा कायमचा त्रागा. तर "प्लीजच! इतके मूर्ख न्यूनगंड कोण बाळगतं? No. Don’t even try fishing for compliments. मुद्द्याचं बोल." हा तुझा सडेतोडपणा. एकमेकांचं कौतुक तरी थेट निरोगीपणे करावं? ते करायची पद्धत नाही आपल्यात. त्याऐवजी खवचटपणानं ओढलेले धारदार ताशेरे. जिभेची धार परजून घेण्यासाठी एकमेकांना दगडासारखं वापरणं. सतत छिद्रान्वेषीपणे दोष तेवढे दाखवणं. असे दोष दाखवणं हेच जणू जबाबदार कौतुकाचं अखेरचं लक्षण मानणं. कौतुक करताना मात्र हात राखून आडवळणानं बोललं... न बोललं! कधी घडलंच कौतुक न राहवून चुकूनमाकून एखाद्या निसटत्या क्षणी, तर आधी आश्चर्य आणि मग संकोचून विषय बदलणं. कशातून येतं हे? निव्वळ अतिसज्जनपणाचे गंड, की आपण आपल्या बाई-बाप्येपणाचे संकोच पुरते ओलांडलेलेच नाहीत अजून? तसं म्हणावं, तर 'माझी पाळी येणार आहे. मी जरा रडारड करीन. गप ऐकून घे' असं सांगायला मी अनमान करत नाही. वर 'च्यायला. हे बरंय तुझं. कपाळावर पाटी लावून फिरत जा आठवडाभर. सुरुंग टाळत फिरल्यासारखं दबकत-दबकत वावरायला तरी नको मला. फक्त चॉकलेटं नि मोरपिसं नि रेशमी शाली नि अत्तरदाण्या घेऊन फिरत जाईन तेवढे दिवस.' अशी तुझी आदळआपट. काय की...

पण न बोलता थोडे जास्त सहिष्णूपणे लाडही केले जातातच. मला दिवसभरात इतक्यांदा कुणी कंटाळा-कंटाळा म्हणून कुरकुरून दाखवलं, तर मी 'ए बाबा! घरी जाऊन पाट मांडून रड. माझा वेळ खाऊ नकोस.' असं म्हणून बिनदिक्कत फटकारून टाकीन. पण तुला मात्र 'बाबा रे, पुता रे...' असं गोंजारत, चुटके नि किस्से ऐकवत, गाणी नि कविता देत, टोकत आणि फटकारत तुझा मूड सुधारायला पाहणं. मलाही रडायला खांदा लागणार असतो पुढेमागे आणि तेव्हा काही प्रियकर नि प्रेयस्या नि सहकारी नि भावंडं येत नाहीत कामी, ही व्यावहारिक खातरीच तेवढी असते फक्त त्याच्या मुळाशी? पण असले विनिमयाचे व्यवहार वाजवून घ्यायला आपण काय लग्नाचे नवरा-बायको आहोत थोडेच?

आपण असलोच काही, तर एकदा नाकातोंडात पाणी जाऊन जीव खाऊन धडपडत वर आलेले, बुडतानाच्या भीषण तडफडीचं ज्ञान जागं राखलेले आणि इथे पोटाशी धरणारा कुणी एक असेलच असं नाही हे कडवट सत्य गिळावं लागलेले शहाणेसुरते जीव आहोत, बस.

अर्थात, इतके सोवळेही नव्हेच आपण! एकमेकांच्या तत्कालीन प्रेमपात्रांबद्दल आपले खास पवित्रे असतात. एक विशिष्ट संशयीपणा. आपल्या मित्राच्या वा मैत्रिणीच्या योग्यतेची आहे का ही व्यक्ती, असा संशय सतत पार्श्वभूमीवर जागा असलेला. पण तो दिसू द्यायचा नाही, हा बाणाही. आपल्या मित्रा-मैत्रिणीबद्दलचा दिसे-न-दिसेसा मालकी हक्क आणि त्या व्यक्तीबद्दल थोडा मत्सरही अर्थात. तो दिसू द्यायला मात्र आपली हरकत नसते! 'हेच मी म्हटलं की फिस्कारून दाखवतोस. ती बोलते ते बरं चालतंय, अं?' असे खवचट प्रश्नही. पण आपल्या वर्षानुवर्षांच्या मैत्रीपोटी त्या बिचार्‍या तिसर्‍या (!) व्यक्तीवर अन्याय होऊ नये, म्हणून जागेही असतो आपण कायम. त्यापायी एकमेकांना जाब विचारणं, पुन्हा-पुन्हा विचार करायला प्रवृत्त करणारे प्रश्न विचारणं, त्या-त्या माणसासोबत पुरेसा वेळ दवडायला ढकलणं आणि अखेरीस अती झालं तर मग 'काय त्याची इंटेग्रिटी? कमॉन. वेळेवर माती खाल्लीन नि गेला टिनपाटात!' अशी आडून समजावणी. अशा वेळी थोऽडा का होईना, जीव भांड्यात पडतो आपला? मी अनेकवार उकरून उकरून पाहिलंय. पण मला नाही वाटत...

आपलं हे असं, शक्य तितक्या तटस्थपणे विचार करणं तितकंसं पणाला लागलेलंच नसावं अजूनपर्यंत कधी, असा माझा सावध अंदाज. ते लागेलच आज ना उद्या. तेव्हा आपण एकमेकांना उरू का, उरू ना... असा प्रश्न पडतो. मग घाईघाईनं 'आपण असूच' असे साळसूद दिलासे दिले जातात एकमेकांना, स्वतःला. त्यांतला फोलपणा आणि त्यांची गरज दोन्ही कळतं आपल्याला, म्हणून बरंय...

आपल्या लिंगांचं भान म्यान न करता, एकमेकांना रक्तबंबाळ न करता, लयबद्ध खणखणाट करत पदन्यास करण्याचं किती जणांच्या नशिबात असतं खरोखर?

आपण बाई असलो, बुवा असलो, बाईच्या शरीरातला बुवा असलो, बुवाच्या शरीरातली बाई असलो, किंवा अजूनही अधलंमधलं काही असलो असतो; तरीही असेच असलो असतो आपण थोड्याफार तपशिलांच्या फरकासकट. तोवर तुझ्याकडे पाहणारी माझी नजर कुठल्या लिंगाची आहे, यानं खरंच काय फरक पडतो

***


'तिच्या नजरेतून तो' या सदरात लोकसत्तेच्या 'चतुरंग' पुरवणीमध्ये इथे पूर्वप्रकाशित

Tuesday 3 April 2018

चार दिवस, चार कविता

आपण एखादी कविता वाचतो, ऐकतो; तेव्हा तिच्यातले शाब्दिक खेळभाषाशैली, अलंकारांची गंमत... इतकंच अनुभवत नसतो फक्त. आपल्या आयुष्यातला कुठलातरी अनुभव, कुठलातरी काळ, कुठलीतरी आठवण त्या कवितेशी नातं सांगत असते. कविता ऐकता-वाचताना नकळत पार्श्वभूमीमधून जागी होऊन पुढे येऊन उभी राहत असतो. तिच्याशी आपण कवितेचं मॅपिंग करतो. दोन्ही आपल्या डोक्यात एकजीव होऊन जातात.  मग तिथून पुढे कधीही कविता ऐकली, की आपल्या डोक्यात हे सगळं एकसंधच जागं होतं. एखादी कविता मी जेव्हा वाचून वा म्हणून दाखवते, तेव्हा मी माझ्या डोक्यात तिला लगडून असलेल्या अनुभवाबद्दलही सांगितलं तर? 

मी तसं केल्यामुळे इतरांच्याही कविताविषयक आठवणीत माझी आठवण ओवली जाईल

मला माहीत नाही. ते पाहायचं होतं म्हणून हा प्रयोग फेसबुकावर केला. तो इथे एकत्र करून ठेवते आहे.

***

सखे गं सये

मैत्र हे या कवितांमागचं सूत्र आहे.

प्रतिमा कुलकर्णींच्या सगळ्याच मालिका फार आवडीनं, समरसून पाहिल्या. इतकं साधंसरळ, आपल्या आयुष्यातलाच तुकडा वाटेलसंजिवंत काही टीव्हीवर हल्ली मिळणं तर अशक्यच आहे. पण तेव्हाही तो तसा अपवादात्मकच अनुभव होता. त्यांपैकी अंकुरही शेवटची मालिका. सुखासुखी चाललेलं, तृप्त गृहिणीचं आयुष्य तसं कुठलंच मोठं फिल्मी कारण घडलेलं नसताना सोडून देऊन निघालेल्या एका बाईची गोष्ट होती ती. आत्मशोध, आत्मभान, स्वाभिमान वगैरे ठरीव रस्त्याला ती गेलीच असती, पण प्रतिमा कुलकर्णींच्या शैलीत ते पाहायला मजा आली असती फार. तोवरच्या त्यांच्या सगळ्या मालिकांमध्ये एकत्र कुटुंब, प्रेमळ-समंजस वडीलधारी माणसं अशी सूत्रं होती आणि घर मोडून बाहेर पडणारी बाई पहिल्यांदाच गोष्टीची नायिका म्हणून दिसत होती. शिवाय सीमा देशमुख ही मला अतिशय आवडणारी पण फार कमी दिसणारी नटी त्यात बर्‍यापैकी मोठ्या भूमिकेत होती. त्यामुळेही उत्सुकता. पण त्या बाईचं काय होतं, हे काही कळायलाच नाही. जेमतेम काही आठवडे प्रदर्शित होऊन, मग ती मालिका अर्ध्यातच बंद पडली.

त्या मालिकेचं शीर्षकगीत म्हणून मिळालेली ही कविता. तिची आठवण काढताना लक्ष्यात आलं, आपण ही कविता कधीच वाचलेली नाहीकायम ऐकलीच आहे. आठवणीतही ती कायम ऐकूचयेते. जात्यावर बसून संथ, गोड सुरात सूर मिसळत गाणार्‍या बायकांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं; अशी तिची चाल आहे. दुःखाचं भांडवल न करणारी, हसरी, हातात हात गुंफून घेणारी आणि तरीही स्वतःत मश्गूल असलेली.

अलीकडे इंटरनेटरूपी स्फोट आयुष्यात झाल्यावर अनेक नवनवीन मैत्रं मिळाली. त्यांतल्या बोलभांड, आक्रस्ताळ्या, कर्तबगार, आगाऊउत्कट, खट, ढालगज, खंबीर, खमक्या, बिनधास्त, सातमजली खिदळू शकणार्‍या आणि शहाण्यासुरत्या अशा अनेक मैत्रिणींशी गप्पा ठोकताना मागे हे गाणं वाजत असल्याचा भास मला कायम होत आला आहे. 

# सखे गं सये

सखे गं सये, गाऊ या आता

आनंदाची गाणी गं

आतल्या आत, पिऊन टाकू

डोळ्यांतले पाणी गं

पाण्यावर त्या, एक नव्याचा

फुटेल अंकुर गं

विसावयाला, एक नव्याने

मिळेल माहेर गं...

माहेरी जाऊन, एकदा फिरून

लहान होऊ या गं

धरून आईच्या बोटाला, नवे

पाऊल टाकू या गं

मायेच्या गावा, मळभ सारे

क्षणात विरेल गं

मनातले जे, येईल ओठी

होईल सुरेल गं

तेजाची भाषा, नवीन आशा

डोळ्यांत हसेल गं

भल्याआडचे, बुरेही तेव्हा

सहज दिसेल गं
  
राजहंस तो, सहज ओळखी

मोत्यांमधले पाणी गं

फक्त विणकरा, ऐकू येती

धोट्यामधली गाणी गं

निःशब्दाच्या, कुशीत अलगद

गूज नव्याचे रुजते गं

स्वागत करण्या, त्याचे अन् मग

सृष्टी सारी सजते गं

तुला नि मला, दावील दिशा

एक स्वतःचा तारा गं

शोधून त्याला, जिंकून घेऊ

खेळ हा सारा गं...


-   मिलिंद जोशी, ‘अंकुरचं शीर्षक गीत, झी टीव्ही मराठी, 

***

मैत्रीच्या भुताचे दशावतार किंवा असंच काहीतरी

ही कविता मला वाचल्या वाचल्या कळली नाही. पण त्या शब्दरचनेचा आपला असा एक नाद, ताल होता. तो आकर्षक वाटला. त्याहून हॉन्टिंग् वाटला, तो 'सावध स्तोत्रांच्या फैरी' हा प्रयोग. त्या देठासकट कविता डोक्यात राहून गेली. ती सदेह भेटली, पुष्कळ वर्षांनंतर. 

तनमनधन अर्पून एक काम करत होते. अनेकांनी मिळून करायचं असलेलं एक काम. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काम तर इंट्रेष्टिंग, आव्हानात्मक होतंच. पण ज्यांच्यासोबत ते करायचं, ते लोकही घट्ट मित्र झालेले. एकमेकांवर विसंबणं, नात्यावरच्या परिणामांची पर्वा न करण्याची चैन परवडून आपले मुद्दे लावून धरणं, त्यासाठी भांडणं, एकमेकांना गृहीत धरणं, नंतरच्या चिंतनबैठकांत भांडणं पेल्यात बुडवून पुन्हा खिदळणं .. या, मला अस्सल मैत्रीचा अविभाज्य भाग वाटणाऱ्या, गोष्टीही कामाचाच भाग असल्यासारख्या. त्यामुळे एरवी आपण स्वतःचा हळवेपणा जपण्यासाठी जी अंतरं बाळगण्याची खबरदारी घ्यायला शिकलेले असतो, ती अंतरंही मी कापून टाकलेली. अखेरच्या टप्प्यावर एक भांडण असं झालं, की मी एका बाजूला आणि इतर सगळे एका बाजूला. हेही ठीकच होतं. खरं भोसकून गेलं, ते माझ्या हेतूंबद्दलच शंका घेणं, त्यांत इतर कुणी अवाक्षरानं हस्तक्षेप न करणं आणि या तांत्रिक मतभेदाआड आपण आपल्यातलं किती काय-काय कायमचं ठार करतो आहोत, याची तत्किंचितही तमा न बाळगणं. 

मैत्री असते खरी. पण ती दुहेरीच असते असं नव्हे. म्हणून तर लोक अस्तासमयी स्तोत्रांच्या सावध फैरी झाडून अंतरं बाळगून असतात, याचा साक्षात्कार होऊन मला ही कविता नीटच 'झाली'! तिच्या पहिल्या सहा कडव्यांत - अशाच कसल्याश्या धक्क्याबद्दलचा अविश्वास आहे. अजूनही झालंय त्याचा स्वीकार मन करत नाहीय. स्वतःशीच सवालजवाब सुरू आहेत. पण सातव्या कडव्यात कवीला एकदम यातली अपरिहार्यता कळते नि तो एकतर्फी उत्कटतेचे परिणाम स्वीकारतो. उदार, मोकळा स्वीकार नाही तो. कडवट चव आहे त्याला. पण मोठं होताना तीही चव अपरिहार्यच.

# मैत्रीच्या भुताचे दशावतार किंवा असंच काहीतरी

ते नाते कधीच नव्हते
मैत्रीचे कसले बंध?
वार्‍याला अजून स्मरतो
सुकल्या जाईचा गंध

मी उगीच भावुक होतो
मैत्रीस समजून नाते
वार्‍याशी खेळुन सुकते
रानात तृणाचे पाते

कुठल्या नियमाच्याधारे
मैत्रीचे नाते व्हावे?
वाहणे सुकेना म्हणुनी
पाण्याने पारा व्हावे

मौनाने स्पष्ट करावा
मस्तकात भिनला पारा
तुज मात्र सोडून भगवा
वाटला अबोली तारा?

वागेन कसाहि कधीही
हे बंधन अतूट गमते
डोहात ठरेना तारा
अन रिती अंजली भिजते

का मला कधी ना कळले
मैत्रीचा नसतो रस्ता
मग धूमकेतू दुरूनी
सूर्याशी आला नसता

त्या रस्त्यावर भर दिवसा
मी मुक्त मनाने हसलो
फसलो मी, कळले मी त्या
सूर्याला मित्र समजलो

मग हेही मला उमगले
सूर्याला नाही वैरी
त्याच्या अस्ताशी झडती
स्तोत्रांच्या सावध फैरी

तेव्हा मैत्रीची सारी
व्याख्या एकेरी झाली
एकाची मैत्री झाली
एकाने मैत्री केली

ना कधी गायली कोणी
मैत्रीची सहस्र नावे
मंतरल्या काळासाठी
'भूत' एवढेच म्हणावे

- ए सेन मॅन

***

#तेव्हा काय कराल?

ही कविताही मला पहिल्या वाचनात भिडली नाही. त्यातली हताश, हसरी, अपार खिन्नता तेवढी नोंदून घेतली. पण 'काय घडलं असेल या मित्रांच्यात?' असा प्रश्न अनुत्तरित राहिला आणि मी तिचा नाद सोडून दिला.

पुढे आमची भेट व्हायची होती.

कधीकधी काही मैत्र्या इतक्या घट्ट होतात, की मित्रांचं स्वतंत्र अस्तित्व आपण जणू विसरूनच जातो. तशातली ती मैत्री. सतत बारा महिने चोवीस तास चालणाऱ्या गप्पा. सल. स्वप्नं. दुखऱ्या आणि हसऱ्या जागा. खवचटपणा. टारगटपणा. उद्धटपणा. हलकटपणा. एकटेपणाच्या आणि दुकटेपणीच्या भित्या. सगळंच एकमेकांशी शेअरलेलं. एकमेकांच्या निर्मितिप्रक्रियांमध्येही पाय घालून असण्याइतकी जवळीक. असा मित्र एकाएकी, कोणत्याही दृश्य कारणाविना, स्पष्टीकरणाविना, उत्तराविना आयुष्यातून चालता झाला, तर काय करायचं असतं

माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. धक्का, अविश्वास, अपराधभाव, संताप, आत्मटीका, दुःख, कुतूहल, मित्राचं त्याही टप्प्यावर समर्थन करू पाहणं, स्वतःचाही राग येणं, आत्मविश्वास गमावणं, अहंचा फणा निघणं, त्याच्या जोरावर शंकाकुशंकांवर मात करणं, दुखऱ्या जागा होत्या का नव्हत्याशा करत पान उलटून टाकणं... असं सगळं पायरीपायरीनं बयाजवार झालं. 

आणि एके दिवशी गृहस्थाचं पत्र दत्त म्हणून उभं. मधली वर्षं जणू उलटलीच नाहीत, अशा आविर्भावात. पुन्हा अविश्वास ते स्वीकार व्हाया संताप असा प्रवास करून त्याला जे उत्तर लिहिलं, त्यात ही कविता लिहिली. 

नक्की काय झालं असेल, हा प्रश्न तसा फारसा महत्त्वाचा नसतोच हे आम्ही एव्हाना शिकलो होतो.

#तेव्हा काय कराल?

मित्र दारात येतो, घरात येत नाही,
मित्र बोलत राहतो... कळू देत नाही,
मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात,
मित्र आठवण नाकारतो रात्री एकटं असतानाही

मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणिक...
आणि पूर्ण विचारान्ती, नाही आवेगात क्षणिक.
दु:ख त्याचे खरे, नुसत्या दुराव्याचे नाही,
असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई

अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल,
अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल,
अशा मित्रास तुम्ही द्याल हिरवा चारा, तो फसणार नाही,
मित्रासाठी व्हाल तुम्हीच निवारा, तो थांबणार नाही

तो चालत सुटेल अशा वेगात,
की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितिजापार,
जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे,
की तुम्ही निराधार... तर तो निर्विकार

मित्र जसजसा होत जाईल शत्रू, तसे तुम्ही काय कराल?

मित्र ओळख नाकारेल.... दुखावले जाल, पण मग घ्याल समजुतीने.
मित्र आठवण नाकारेल एकान्तातही... हराल तुम्ही समग्रतेने.
मित्र जाऊ लागेल क्षितिजापार, तुम्ही हसाल नुसते

आणि क्षितिजापार असलेल्या लाटेवर, मित्रावर
उतरेल दिवस-रात्रीच्या पलीकडची सायंकाळ
आणि मग जेव्हा मित्र हलेल, हरेल,
बोलावेल तुम्हांला पुन्हा एकदा,
कवळेल तुम्हांला पुन्हा एकदा,
अशा बोलीत, की जणू हीच तुमची पहिली भेट!

...तेव्हा काय कराल?
सांगा! तेव्हां काय कराल?

-    डॉ. आशुतोष जावडेकर, साधना, दिवाळी २००८

***

समोर हिरवंगार जंगल

एरवी अनुभव भेटतो आणि मग नेपथ्यात निर्जीव असलेली कविता सजीव होऊन त्या अनुभवाच्या हात हात घालून नव्यानं भेटते. 

पण या कवितेच्या बाबतीत हे पार उलटंपालटं होतं कायम. 

नंतर भांडणाची फिल्म पाहिली तर आपण शरमेनं मरून जाऊ अशा पातळीचं, खूप आक्रस्ताळं भांडून, शिव्याशाप देऊन, हात आवरून धरून, रडकुंडीला येतो आपण पार. आता या माणसाचं तोंडही पाहणं नको. बस करू या. अशी अवस्था. पण कडेलोटाच्या क्षणी भीती वाटते खूप. मग मागे फिरून, शरम गिळून, पुन्हा धरू पाहतो आपण समोरच्या माणसाचा हात. राग नि शरम नि असहायतेचं-अपमानाचं रडू नि प्रेम हे सगळं एकमेकांत ओळखू न येण्याइतकं मिसळून गेलेलं. समोरच्याचीही अवस्था फार निराळी असते असं नव्हे. पण आपण आपल्यातच इतके चूर, की कशाची शुद्धच नसते. 

नशीब बरं असेल, तर कधीतरी भांडण संपतं.

अशा भांडणांनंतर एकमेकांच्या कुशीत विसावताना फक्त अपरंपार दमणूक जाणवत असते. बाकी काही जाणवत नाही, म्हणावंसं वाटत नाही, करावंसं वाटत नाही. खूप रडून गेल्यावर पुढेही काही वेळ येत राहतात, तसे कोरडे हुंदके येत राहतात फक्त. असा एक हुंदका येतो नि तो आपला नसल्याचं लक्ष्यात येतं, तेव्हा मात्र हलकंसं हसू फुटतं.

ही माझी कविता पुन्हा वाचताना मला कायम त्याच जातीचं हलकंसं हसू फुटत आलं आहे.

# समोर हिरवंगार जंगल

कोण चूक कोण बरोबर काय न्याय काय अन्याय कसले हिशेब कसले जाब कसले जबाब -
दे सगळे हलकेच सोडून
नि पाहा समोर पसरलाय अथांग वैराण प्रदेश दगडधोंड्यांचा नि उन्हातान्हाचा नि सपाट उजाड माळरानांचा नि लालबुंद सोनेरी सूर्यास्तांचा आपल्यासाठी - एकेकट्या असलेल्या आपल्यासाठी.
छातीत दाटून गच्च झालेला तो भीतीचा नि दुःखाचा हुंदका हळूहळू अगदी हळूहळू सैल करत ने,
पाहा, माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना, की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता.
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.
त्या सगळ्या प्रश्नांना सापडू देत अजून काही प्रश्न, मग निघून जातील ते एकमेकांच्या सोबतीनं इथेच कुठेतरी.
मग आपण उरू
आणि हे सारं उरेलच तरीही.
एकटे असू आपण दुकटे असूनही.
पण आता संध्याकाळीतली हुरहूर जाईल निवून.
हातात एक घामेजलेला हात असेल
आणि समोर हिरवंगार जंगल.