फेसबुकच्या तोट्यांबद्दल बरीच चर्चा झाली आहे. मात्र, व्हॉट्सअॅपच्या वापराच्या फायद्या-तोट्यांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. व्हॉट्सअॅपशी झालेल्या जवळिकीची ही काही विश्लेषणं. (हे टिपण आधी माझ्या फेसबुक भिंतीवर प्रकाशित करण्यात आलं होतं. मग ते 'बिगुल'वरूनही प्रकाशित करण्यात आलं. इथे काही बारीक मुद्द्यांच्यात थोडी फेरफार-भर-बदल इत्यादी केले आहेत. तरीही हा लेख नाही, लहानसं टाचण आहे. अनेक मुद्द्यांचा विस्तार सहजशक्य आहे.)
***
व्हॉट्सअॅपच्या जवळिकीबद्दल काही अभ्यास झाल्याचं माझ्या ऐकण्यावाचण्याबोलण्यात तरी आलेलं नाही. असं काही आहे का, हे शोधायला हवं आहे. एरवी फेसबुकावरून होणारा आरडाओरडा आता पुष्कळ चिवडला जातो. ते आपल्यात कशा भिंती घालतं, कसं बबलमध्ये नेऊन बसवतं, याबद्दलही चिकार बोललं जातं. त्याच्या धोक्यांचा बागुलबुवा आता शेंबड्या पोरांनाही ठाऊक असेल. पण व्हॉट्सॅपबद्दल काही माहिती, अभ्यास, विश्लेषण नाही. माझ्या अनुभवावरून केलेल्या या काही नोंदी. यात राजकीय मोहिमांसाठी होणार्या फेसबुकच्या वापराबद्दल फार काही सापडणार नाही. एका हाताची बोटंही खूप होतील, इतक्या कमी ग्रुप्समध्ये मी नांदत असल्यामुळे आणि नातेवाइकांच्या ग्रुपमधून मला काढून टाकलेलं असल्यामुळे (होय, मी हे मिरवते आहे.) माझी निरीक्षणं तोकडी आहेत.
व्यसन लावण्याची क्षमता- व्हॉट्सअॅपमुळे मोबाइल फोन सतत तपासण्याचं व्यसन लागू शकतं. लागतंच. बहुतांश लोकांना.
ग्रुपमधून चालणार्या गप्पा, फॉरवर्ड आणि राजकीय वापर - अफवा आणि मतं आणि मीम्स पसरवण्यासाठी ग्रुप्स आणि फॉरवर्डस अतिशय उपयुक्त आहेत. अगदी फेसबुकावरच्याही बर्याच पोस्टी लेखकांना कोणतंही श्रेय न देता व्हॉट्सॅपवरून फिरतात. व्हायरल होतात. एकाच वेळी आपल्या संपर्कयादीतल्या अनेकांना एखादी पोस्ट पाठवणं (एकेकट्याला आणि गटांनाही) इथे शक्य आहे. आणि त्याच वेळी या पाठवापाठवीच्या उद्योगाचं कोणतंही जाहीर दस्तावेजीकरण होत नाही. या पोस्टींना कोणताही पुरावा, पडताळणी, शहानिशा करावी लागत नाही. पोलिसांचा हस्तक्षेप झाला तर गोष्ट वेगळी. पण ती फारच अपवादात्मक परिस्थिती. व्हर्चुअल गप्पांमध्ये निरक्षर असणार्या लोकांच्या 'छापील आहे, म्हणजे खोटं कसं असेल?' यासदृश अंधविश्वासावर रेलून काय वाट्टेल ते पुढे ढकललं आणि ते पुरेसं कॅची / भिववणारं / भावनाखेचक / भडकाऊ असलं की पुरतं. पुढचं काम लोकच करतात. तरीही या प्रकारच्या वापराबद्दल मी बरीच अनभिज्ञ आहे. कारण मी शक्यतोवर असले घाऊक फॉरवर्ड वाचणं आणि धाडणं टाळते.
एकेकट्याशी होणार्या गप्पा - लोकमत तयार करण्यासाठी वा गढूळ करण्यासाठी फेसबुक किंवा इतर माध्यमांचा जो वापर होतो, त्याहून अगदी निराळी लक्षणं. इथे मला 'Her' या चित्रपटाची आठवण टाळणं शक्य नाहीय. कारण दुसर्या माणसाशी बोलताना व्हॉट्सॅप कमालीची आणि क्रीपी जवळीक देऊ करतं आणि ही जवळीक इतर कुणालाही दिसत नसते. संवाद करणार्या व्यक्ती फक्त एकमेकींशीच बोलत असतात. त्यात तिसरं कुणी असत नाही. हे ईमेल्स वा पत्रांहून निराळं नाही असं वाटेल. पण तसं नाहीय. इमेल्स सतत पाहिल्या जात नाहीत. दिवसाकाठी काही वेळा पाहिल्या जातात. अमुक एका अॅपमध्ये शिरल्याशिवाय त्या दिसतही नाहीत. पण व्हॉट्सॅपचं तसं नाही. तुम्ही अॅपमध्ये जाऊन मुद्दामहून एखादं संभाषण पाहत नाही, तोवर तुम्हांला सतत नोटिफिकेशन येत राहतं. दिसत राहतं. जर मुद्दामहून संभाषण म्यूट केलं नाही, तर मोबाईलच्या वरच्या पट्टीवर दिसत राहणारं हे नोटिफिकेशन फोन वापरणार्याला सतत खुणावत राहतं. त्याकडे दुर्लक्ष्य करायला मनोनिग्रह लागतो किंवा इंटरनेट तरी बंद करावं लागतं. दुसरं म्हणजे इमेल्सचा स्वभाव, प्रकृती व्हॉट्सअॅपहून वेगळी आहे. ईमेल्समधून दीर्घ संवाद होत असतो. एकदाच विचार करून काही थोडे विचार सुसूत्रपणे मांडायचे आणि मग दुसरी व्यक्ती त्यावर विचारपूर्वक उत्तरेल, असं तिथे बरेचदा गृहीत असतं. पण व्हॉट्स्अॅप मात्र खर्याखुर्या संभाषणाप्रमाणे चालतं. एकानं प्रश्न विचारला, दुसर्यानं उत्तर दिलं.. अशी एकोळी संभाषणं होत राहतात. मधला वेळ पुष्कळदा बराच कमी असतो. हा वेळ कमी असणं कम्पल्सरी नसलं, तरी आपल्याकडून वेगानं उत्तर मिळेल असं अपेक्षित मात्र असतं. हे एसेमेसहून काय वेगळं आहे, असाही प्रश्न शक्य आहे. तर एसेमेस अक्षरसंख्या मोजतात आणि त्यानुसार पैसे आकारतात. तसंही व्हॉट्सअॅपचं नाही. इंटरनेटची जोडणी असली, की तुम्ही किती अक्षरं लिहिता त्याची मोजदाद करायची गरज नाही. त्यामुळे मोठं काही एकाच मेसेजमध्ये कोंबून लिहायची आणि मग ते पाठवायची काटकसरी तसदी लोक घेत नाहीत. यामुळे सवयी कशा बदलतात, याचा अनुभव व्हॉट्सअॅप वापरण्याची सवय झाल्यावर एसेमेस पाठवताना होणार्या धांदलीवरून येऊ शकेल. या सगळ्याचा परिणाम म्हणजे इतर सगळ्या लोकांच्या नजरेआड दोनच माणसं एकमेकांशी खासगी, रिअल टाइम आणि अंतहीन चालू शकणारं संभाषण करत असतील, तर त्या संभाषणाचा पोत जसा असेल, तसा या संभाषणाचा पोत असतो.
सर्रिअल क्वालिटी - लिखित शब्दाला तर महत्त्व देतोच आपण. पण एकदा का कोणत्याही गोष्टीचा उच्चार केला की आपोआप त्या गोष्टीला एक प्रकारची वैधता प्राप्त होते. जगाच्या पाठीवरच्या सगळ्या संस्कृती कुणाच्या तरी साक्षीने असा शब्दोच्चार करून गोष्टींना वैधता प्राप्त करून देताना दिसतात. हा उच्चार या संवादात हरवतो. साक्षही हरवते. त्यातून या संभाषणाला एक प्रकारची सर्रिअल क्वालिटी मिळत असावी. काही विशेष काळजी घेतली नाही, तर यातून एक विचित्र खासगीपणा साकारतो. ज्याच्याशी संभाषण चालू आहे, त्याच्याशी विलक्षण, शरीरहीन निकटता आणि इतर जगासाठी हे संभाषण संपूर्ण अदृश्य असणं. यातून दृष्टिभ्रमासारख्या भ्रामक जवळिकींचे भास तयार होऊ शकतात.
व्हॉट्सॅपचे फायदेही अर्थातच आहेतच. त्याबद्दल इथे काही लिहिण्याची गरजच नाही. पण धोकेही आहेत आणि ते फेसबुकाइतक्या तीव्रतेनं चर्चिलेले नाहीत.
No comments:
Post a Comment