Wednesday 26 October 2011

रेषेवरची अक्षरे २०११

मंडळी,

सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.

इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.

दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत.

अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.

तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...

ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद

संपादक

रेषेवरची अक्षरे

२०११

Friday 7 January 2011

गालिब, तू कुठे आहेस?

कुणी आत्महत्या करायचं नक्की कधी नक्की करतं?
असतो असा - एकच एक क्षण?
एखादी फिल्मी शाम-ए-गम?
एखादी लांबलचक काळीकुट्ट रात्र?
एखादी भण्ण उदासलेली दुपार?
असतो असा - एकच एक क्षण - नक्की बोट ठेवता येणारा?

एखाद्या बोगद्यातून जात जात जात जात जात जात जात राहावं-
अंतरं कापण्याचं त्राण तर दूरच -
दूरवरचा उजेडाचा ठिपकाही भासमान वाटत जावा.
अशा
ना दिवस ना रात्र
ना आत ना बाहेर
ना जागृत ना निद्रिस्त -
अशा उंबर्‍यावरच्या संदिग्ध ठिकाणी स्वत्त्वाचं भान हरपलेलं असताना कधीतरी -

तुटून जात असेल दोरी.

मग काही अस्पष्ट स्मृती गेल्या जन्मातल्या उत्कट दुःखांच्या
पाऽर मागल्या बाकावरून मान उंचावून उंचावून पाहाव्यातश्या
झगमगत्या
चुटपुटत्या
पाहता पाहता निसटून जाणार्‍या.

मग एक निर्वात पोकळीतलं बधीर आयुष्य.
अंगावर ओरखडाही न उठू देणार्‍या गेंडाकातडीतलं.
लांबलचक, सुखासीन.

त्यात नेमका क्षण कसा शोधणार?

असतो का खरंच असा एकच एक क्षण, नक्की बोट ठेवता येणारा?