Saturday, 28 December 2024

नव्वदीच्या आगेमागे : राहून गेलेले तुकडे ०१

शहरी घरात, चाळीत नि ऑलमोस्ट झोपडपट्टीत वाढले मी. काही वर्षं तर घर बांधकाम चालू असलेल्या इमारतीतच थाटलेलं होतं, कारण बिल्डर पळून जाईल अशी भीती होती. सांगायचा मुद्दा असा की माझं लहानपण काही निसर्गरम्य वगैरे खेड्यात गेलं नाही. नि तरी मला अनेक झाडं नि फुलं ओळखीची होती.
कुंपणापाशी मेंदीची झुडपं होती. ती ओरबाडून पाला पाट्यावर वाटायचा नि हाताला बांधून झोपायचं, असा एक उद्योग असायचा. पुढे गल्लीत वड. त्याच्या फळांचा सडा रस्त्यावर पडून रस्ता लालपिवळा माखलेला असे.
चाळीत राहत असताना शेजारच्या मामीच्या पुढीलदारी जांभळाचं झाड होतं. जांभळीचं लाकूड कुचकं हो, जपून... असे इशारे देत कुणीतरी दर वर्षी तिच्यावर चढायचं, पहिल्या मजल्यावरच्या व्हरांड्यातून लोक काढण्याबिढण्या देऊ करायचे, जांभळं काढून घरोघर वाटली जायची. मामी रोज संध्याकाळी अंगणात पाण्याचा सडा मारायची. तिच्या मागीलदारी केळ नि जास्वंद नि सोनटक्का. तिच्या पलीकडे तगरीचं गचपण. नि तिच्या तळाशी दुर्वा. त्या तगरीची फुलं चाळीतले सगळे जण देवाला घालायला कायम काढत असायचे. तरी तगर कमी पडायची नाही. जांभळीच्या पलीकडच्या कोपऱ्यात कायम चिकनखडे नि खाजकुयली नि एरंड माजलेले असायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिथे टाचण्या नि चतुर भिरकटत असायचे कायम. माझी आगाऊ भावंडं चतुर पकडून त्यांना दोरे बांधून उडवायची. मला ते एकाच वेळी जाम शूर नि भयंकर क्रूर वाटायचं. पण माझी धाव मात्र आमच्या दारासमोरच्या बिट्टीची पिवळीधम्मक फुलं वेचून पाची बोटांत घालण्यापुरतीच. बिट्टीच्या फुलाच्या आत एकच नाजूक देखणा पराग असतो, तो काढून त्याची नथनी करायची. बिट्टीची फळंही पडायची. त्याचा गर खोट्या खोट्या कैऱ्यांचा गर म्हणून भातुकलीतलं लोणचं घालण्याकरता. आत बिट्ट्यांच्या बिया. त्या उगाच जमवून ठेवायच्या. तशाच चटक्याच्या बिया असायच्या. बहुधा पांगाऱ्याच्या. त्या फरशीवर जरा घासल्या की तापायच्या. मग त्यांनी चटका द्यायचा, हा खेळ. कारंज्याच्या बियाही मला आठवतात. त्या दाबून एकमेकांवर पिचकाऱ्या उडवण्याचा खेळ. पलीकडच्या वाडीत गणपतीचं देऊळ. मधल्या कुंपणाच्या भिंतीवर शेवाळ धरायचं पावसात. तसंच एक विशिष्ट जातीची शेवाळासारखी वनस्पतीही उगवायची. टाचणीसारखा अगदी नाजूक देठ नि त्याला पुढे घोड्याचं चिमणं तोंड असावं तसं चिमुकलं डोकं. सगळा मिळून टाचणीहून लहान हिरवागार कारभार. असे दोन घोडे दोघांनी घ्यायचे नि त्यांची डोकी एकमेकांच्यात अडकायची. कुशल खेळाडू आपल्या टाचणीनं दुसरीचं मुंडकं उडवायचा. देवळाच्या आवारात देवचाफा उर्फ पांढरा चाफा. त्याच्या फुलांना गोड वास. त्याच्या फुलांच्या अंगठ्या करून बोटांत घालायच्या. पुढच्या वाडीत चिमण्या केशरी फुलांचे गुच्छ येणारं झाड. त्या फुलांच्या देठांत अगदी थेंबभर मध असायचा. त्याचे गुच्छच्या गुच्छ तोडून एकेका फुलातला मध चुंपत बसायचं. तिथेच कोपऱ्यावर मधुमालतीचा माजलेला वेल. वेड लागल्यासारखा फुलांनी लदबदलेला असे तो. त्याच्या फुलांचे देठ लांबसडक नि चिवट. ते एकांत एक गुंफून आई त्याची सुबक वेणी करायची. त्याही फुलांना मंद आणि गोड वास. पुढे हनीसकलचा वास घेतल्यावर - काही साम्य नसूनही मला मधुमालती आठवली होती एकदम. मागीलदारी अनंताचं झाड. लहानसं. पण काय धुंद सुगंध. दर वर्षी एकदा त्याला फुलांचा वेडा बहर यायचा. मग ती फुलं काढून वाडीत सगळ्यांना थोडथोडी वाटायची. पैंच्या दाराशी सदाफुली, अबोली, आणि गुलबक्षी. पांढऱ्या सदाफुलीची पानं पाण्यात उकळून ते पाणी प्यायलं तर मधुमेहावर गुणकारी असतं म्हणे. गुलबक्षीची फुलं बघून मला कितीतरी वर्षं सोनाराकडचा कागद आठवायचा. हे खास माझ्या शहरीपणाचं लक्षण. अबोली बघून आईच्या गजरेप्रिय मनाला मोह, पण मला ती तशी ग्लॅमरहीनच वाटायची.
शाळेत येण्याजाण्याच्या रस्त्यावरही रान माजलेल्या जागा होत्या चक्क. आता आठवून अचंबा वाटतो. त्यातून चिकनखडे काढून ओढण्यांवर फेकून मारण्याचा एक खेळ.
कोकणातल्या आजोळी तर काही विचारू नका. विहिरीवरचा मोगरा, दारात बकुळ. कुंपणावर फड्ये निवडुंग. मागीलदारी जांब आणि चिकू आणि पेरू आणि पपई. पलीकडे काजू. देवळासमोर आंबा. दारातही मोठ्ठा आंबा. कवाडीपाशी फणस... असा सगळा सरंजाम. बाबांच्या माहेरी कवाडीजवळच हेs मोठं बांबूचं गचपण, अलीकडे प्राजक्त. दारचा फणस तोडला तर भाऊआजोबा कोण खवळले होते. पण गावचं वेगळंच. तिकडे अजूनही बरंच कायकाय. त्याचं मोठंसं कौतुकही नाही, तिथल्या कुणाला तर नाहीच. पण सापाकिरडाला, अंधाराला, नि एकूणच गावातल्या हिरव्याकंच वासाला भिऊन असलेल्या शहरी मला तर नाहीच नाही.
मला नवल वाटतं ते माझ्या ठार शहरी आयुष्यातल्या फुलापानांच्या श्रीमंतीचं. वाडीत सुरवंट अंगावर पडायचा कधीतरी कुणाच्या येताजाताना. मग चार तास कंड सुटून पुरेवाट. पावसात मृगाचे लाल रेशमी किडे सापडायचे, मग ते बिचारे मरेस्तो काडेपेट्यांतून कैद व्हायचे. पिवळी नि काळीपांढरी नि शेंदरी फुलपाखरं कायम दिसायची. कण्हेर असायची मागीलदारी. तिच्यावर एखादंच लाल-शेंदरी तकतकीत डौलदार फूल. मामीच्या दारात कृष्णकमळांचा वेल होता. पावसाळ्यात त्यावर फुलं आली की शाळेत जाताना केसांत घालायला म्हणून तिच्याकडून फूल आणायचं. शंभर कौरव, पाच पाण्डव, नि मधला कृष्ण. त्याचा निळाजांभळा रंग नि वास. त्या गोड वेलीवर काडमुंगळे असायचे कायम. बुचाच्या फुलांचा दिमाख मी आत्याच्या गावी बघितला. रस्त्यावर हाs सडा. अगदी माजोरड्यासारखं वाटायचं त्यावरून चालत जाणं. पण गावातल्या गावात मावशीच्या सोसायटीबाहेर हा थोरला नागचाफा. त्याच्या बुंध्यावर कायम फुलं लगडलेली नि गोडसर सुवास. त्याच्या चामड्यासारख्या जाडसर नि तरी मखमली स्पर्शाच्या, गर्दलाल पाकळ्या, आतला पिवळाधमक फणा नि शंकराची पिंड म्हणवला जाणारा परागकंद अतीव दिमाखदार वाटायचा.
आता निदान शहरांतून तरी या सगळ्याचं आयुष्यातून उच्चाटनच झालेलं दिसतं. उदास वाटतं. थोडं भयभीतही.

No comments:

Post a Comment