‘अंतर्जनम’ हे देवकी निलयमगोडे (उच्चारात चू०भू०दे०घे०) यांचं आत्मचरित्र. नंबुद्री ब्राह्मण घरात १९२८ साली जन्माला आलेल्या या बाई. इंदिरा मेनन आणि राधिका पी. मेनन अशा दोघी जणींनी देवकीबाईंची मल्याळमध्ये लिहिलेली दोन चरित्रात्मक पुस्तकं आणि त्यांचेच काही सुटे लेख यांचं इंग्रजीत भाषांतर करून हे पुस्तक सिद्ध केलं आहे.
नंबुद्री ब्राह्मण चालीरीतींबद्दल मला मोघम माहिती होती. साधारणपणे आठव्या शतकात केरळातल्या राजांनी श्रौत कर्मकांडं करवून धर्माची मान्यता मिळवण्याकरता नंबुद्री ब्राह्मण कुटुंब उत्तरेतून आणवली. ही कर्मकांडं करण्याच्या मोबदल्यात त्यांना जमिनी दिल्या. या ब्राह्मणांनी वेदाध्ययनाची मौखिक परंपरा जपली. मल्याळम भाषेत काव्यरचना केल्या. त्यातून मल्याळम भाषेवर संस्कृतचा अमीट ठसा उमटला. याबद्दल आणि त्यांच्या काही विशिष्ट चालीरीतींबद्दल तेव्हा ऐकण्यात आलेलं असल्यामुळे मला त्याविषयी कुतूहल होतं. त्यामुळे नेटवर रानोमाळ भटकताना वाटेत लागलेलं हे पुस्तक उचललं आणि ते अक्षरशः दोन दिवसांत संपवलं.
वाचताना संताप, शरम, अचंबा, कुतूहल, विषण्णता, कौतुक, अविश्वास…. अशा भावना आलटून पालटून मनात येत राहिल्या.
नंबुद्री ब्राह्मणांना इनाम मिळालेल्या जमिनी कुटुंबातच राहाव्यात आणि त्यांचे तुकडे होऊ नयेत, म्हणून या कुटुंबांमध्ये एक विशिष्ट पद्धत राबवली जात असे. फक्त मोठ्या मुलग्याचं लग्न नंबुद्री ब्राह्मण जातीत करायला परवानगी होती. बाकीच्या मुलग्यांना नायर राजकुळात, वा इतर काही क्षत्रिय जातींमध्ये ‘संबंध’ राखण्याला परवानगी असायची. या संबंधांना ‘संबंधम्’ असंच म्हणत. त्यांच्या स्त्रिया आणि मुलं ही त्यांच्या मातृघरीच राहत. त्यांचे वंशपरंपरागत हक्क, नावं हे सगळंच त्या स्त्रियांच्या माहेरचं असायचं. त्यामुळे नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या जमिनी त्यांच्याकडे सुरक्षित राहत. त्या कुटुंबातल्या मुलींना साहजिकच नवर्या मुलांची चणचण भासायची. हुंडेही जबरदस्त द्यावे लागायचे. त्यामुळे त्यांची लग्नं होणं अतिशय कठीण असे. या मुली वयात आल्यापासून मरेपर्यंत अक्षरशः दिवाभीतासारख्या घरातच डांबल्या जात. एकुणातच नंबुद्री घरांमधल्या सगळ्याच स्त्रियांना परपुरुषाच्या नजरेला पडण्याचीच बंदी होती. त्यामुळे त्यांना ‘अंतर्जनम्’ – म्हणजे अक्षरशः ‘आत राहणारी माणसं’ हेच नाव असे. पुरुषाचा तर सोडाच, परजातीच्या स्त्रीचाही स्पर्श वर्ज्य. तो झालाच तर स्नान केल्याशिवाय अन्नग्रहण-जलग्रहण नाही. पुरुषाची तर नजरही पडणं अशक्यप्राय. तरी घरातल्या विवाहित आणि नवरा जिवंत असलेल्या बाईचं आयुष्य बरं. पण अविवाहित मुली मात्र पाळी सुरू होईपर्यंत घराबाहेरच्या आवारात, देवळापर्यंत, ओसरी-पडवीवर, तळ्यापर्यंत उंडारतील, तितक्याच. पाळी सुरू झाली, की लग्न होईपर्यंत वा मरण येईपर्यंत स्वैपाकघर ते घरातल्या बायकांसाठी राखीव असलेला, परसातला आंघोळीचा हौद कम् तळं. इतकाच त्यांच्या आयुष्याचा परीघ.
वाचताना माझा संताप होत होता. पण मग लागोपाठ चित्पावन ब्राह्मण घरातल्या बायकांची स्थिती आठवे आणि शरमेनं जीव गोळा होई. पण महाराष्ट्रात आधी न्यायमूर्ती रानडे यांनी बालविवाहाच्या विरुद्ध चळवळ आरंभली होती (इ०स० १८६५) तर धोंडो केशव कर्व्यांनी महाराष्ट्रातला पहिला विधवाविवाह १८९८ साली केला होता. त्याही आधी फुले दाम्पत्यानं विधवांच्या मुलांसाठी, स्त्रीशिक्षणासाठी काम सुरू केलं होतं. त्यामुळे तुलनेनं लवकर परिस्थिती बदलली. पण केरळमध्ये मात्र साधारण १९४०-४५पर्यंत नंबुद्री ब्राह्मण स्त्रियांची परिस्थिती कमालीची दयनीय होती. म्हणजे फक्त ८० वर्षांपूर्वीपर्यंत हे असंच सुरू होतं.
राग येत होता, पण एक विचित्र रोगट कुतूहलही वाटत होतं, इतके विलक्षण तपशील.
सांपत्तिक स्थिती बरी असेल, तर या घरांमधून शेकडो माणसं जेवून जात, मदतनीस स्त्रिया, नोकरचाकर, आला-गेला, रोगी, विद्यार्थी... कुणीही विन्मुख जात नसे. पण घरातल्या स्त्रीला मात्र दमडीही उपलब्ध नसायची. ‘तशी पद्धत नव्हती’, इतकंच स्पष्टीकरण. लेखिकेच्या आईला माहेरी जायचं असेल, तर स्वैपाकघरात वापरण्यासाठी जे तांदूळ मॅनेजर द्यायचा, त्यांतले काही तांदूळ महिनोन् महिने थोडथोडे बाजूला करून ठेवावे लागत. मग ते कुणाच्या तरी मेहेरबानीनं विकले गेले की मग हाती आणा लागायचा. असे पैसे जमले की ते मुंडूच्या चुण्यांमध्ये लपवायचे आणि तेव्हा कुठे माहेरी जाता यायचं. अंगावर ल्यायचे कपडेही रंगीत नव्हेत. दोन पांढरी वस्त्रं. बाहेर जाताना अंगाभोवती गुंडाळायला एक मुंडू. एक सोनेरी कडा असलेलं पांढरं वस्त्र. चोळ्या घालायला बंदी. एक लाकडी छत्री. लग्नाच्या वेळी बरोबर आणलेले काही दागिने. एक लाकडी पेटी. इतकीच त्यांची सत्तेची मालमत्ता. बाहेर जाताना अंगाभोवती पायघोळ वस्त्र लपेटायचं, छत्री धरायची – जेणेकरून कुणाच्या दृष्टीला नखही पडू नये, नजर खाली पायाकडे. पुढे मदतनीस नायर स्त्रिया चालत, ‘याS होS’ अशा आरोळ्या देत, म्हणजे ‘शूद्र’ कुणी असेल, तर त्यांनी रस्त्यातून दूर व्हावं. असं देवळापर्यंत जायचं आणि तसंच परत यायचं. मुलींचे कान टोचून त्यात जड पितळी कानातले बाळपणीच घातले जात. कानांच्या पाळ्या लोंबून पार खांद्यापर्यंत याव्यात अशा बेतानं या कानातल्याचं वजन वाढवलं जाई. तसे कान सुंदर मानले जात. ‘मुलींचे कान चांगले लांब होऊ देत’ अशी प्रार्थना बायका करत, म्हणजे मग त्यांची लग्नं नीट होतील आणि त्या कदाचित पोटभर जेवू शकतील, अशी इच्छा त्यामागे असे. नवरा चिडला तर कानांतले खेचून बायकोला सहज यातना देऊ शके. किंवा बसायचं लाकडी आसन पायांवर फेकून मारी, म्हणजे पाय मोडत. बायकांना डॉक्टरनं बघायची पद्धत नव्हतीच. कुणीही आजारी पडलं, तरी आधी आयुर्वेद. तो थकला की मग डॉक्टर. तोही पुरुषांकरता. ‘घरी डॉक्टर आला, तर पेशंट अर्थात ‘पुरुष’ असायचा’ या अर्थाची नोंद वाचून मला चरकायला झालं. बायकांनी अंथरूण धरायचं. जीवानं तग धरला तर ठीक. नाहीतर विधवा, कुमारिका, अविवाहिता मेली काय नि जगली काय. लग्नाची बाईल मेली, तर तिची जागा घ्यायला इतर मुली तत्पर असायच्या. शिक्षण वर्ज्यच. अक्षरओळख करून दिली जायची, पण ती पुराणाचं एक पुस्तक वाचता आलं की तत्काळ बंद. मग पुस्तक वाचण्यावर अर्थातच बंदी. शिक्षणालाही. कारण? परपुरुषाच्या नजरेला पडण्याला बंदी. लग्न झालं तर ठीक, नाहीतर घरात कुजून-राबून मरण. क्वचित या बाया अविवाहित असतानाच मेल्या, तर त्यांची नाममात्र लग्नं करून त्या नवऱ्याकरवी अंत्यसंस्कार केले जात. कारण धर्मानं मुलगी अविवाहित ठेवण्याला मान्यता नव्हती. विधवांचे हाल तर कुत्राही खात नसे. त्यांच्या ‘अशुभ’पणाबद्दल आपण मराठी ब्राह्मणजनांना काही सांगायला नकोच. पण एकंदरीतच शुद्धाशुद्धतेच्या विलक्षण कर्मठ कल्पना. नवरा मेल्यावर स्त्रीनं दागिने उतरवून ओलेतं वस्त्र नेसायचं. नवर्याच्या प्रेतासमोर माथा टेकून त्याची क्षमा मागायची. मग तिनं स्नान करायचं. पण तिला अंग कोरडं करायची परवानगी नसे. दिवसातून तीनदा स्नान करून ओलेतं वस्त्र अंगावरच वाळू द्यायचं. मीठ नसलेलं, न शिजवलेलं असं कदान्न खायचं. एकान्तात, कोंडल्या स्थितीत, काळोखात राहायचं. वैधव्यानंतर पुढे तीन वर्षं हा ‘दीक्षा’ नामक सुतकाचा कार्यक्रम लागू असे. विवाहित बायकाही अक्षरशः जेवणाच्या आशेनं लग्नाबिग्नासारख्या समारंभांतून आशेनं जात. पण त्यांनी जेवायचं ते नवर्याच्या उष्ट्या पानात. ही नंबुद्री ब्राह्मण बायांची स्थिती. इतर - नायरेतर आणि ब्राह्मणेतर - 'शूद्र' स्त्रियांनी तर इतर सगळे जेवल्यावर त्यांच्या उष्ट्या पानांवरच जेवायचं. तेही मालकानं समारंभाच्या ठिकाणच्या ब्राह्मणाला सांगून ओळख पटवून दिली तरच. नंबुद्री कुटुंब कर्जबाजारी झाल्यामुळे जमिनी गेल्या, जप्ती आली, तर पुरुष खुशाल कुठल्यातरी देवळाच्या आसर्याला राहू शकत. स्त्रियांची फिकीर कुणालाच नसे. त्यांचं काही का होईना.
यातला अन्याय अंगावर येतोच. पण त्याचं व्यवस्थेमध्ये केलेलं चिरेबंदी रूपांतर जाणवून थरकून जायला होतं. कुठून आला असेल इतका तीव्र द्वेष आपल्याच बायकांबद्दल आणि मुलींबद्दल? पोटात तुटत नसेल काही? न राहवून मला पेगी मोहन यांच्या पुस्तकाच्या भाषांतरांच्या निमित्तानं वाचलेल्या अनेक गोष्टींची आठवण होत राहिली. भारतात आलेल्या वैदिक आर्यांच्या टोळ्या निदान सुरुवातीच्या काळात तरी पुरुषबहुल होत्या. त्यांनी इथल्या स्त्रिया मिळवल्या. कशा मिळवल्या? त्या स्वेच्छेनं या परकीय पुरुषांशी रत झाल्या असतील, की नाइलाजानं? कुणाला ठाऊक. या स्त्रियांची भाषा संस्कृतेतर. शिवाय त्यांच्यावर संबंध लादलेला असल्यामुळे त्यांच्याबद्दल कमालीचा अविश्वास. त्यामुळे त्यांना संस्कृत शिकायला बंदी असेल? या अविश्वासाची, तिरस्काराची, व्यवस्थाप्रणित छळाची मुळं तिथे असतील का? समजत नाही... अवाक, खिन्न व्हायला होतं खरं.
लेखिकेची भाषा मात्र कमालीची संयत आहे. इतकी, की हा संयतभाव भाषांतरातही आणायचा, पण लेखिका त्या नेमनियमांचं समर्थन करत नाहीय, हेही अधोरेखित करायचं – हे कसं साधायचं असा पेच भाषांतरकारांपुढे उभा राहिल्याचं त्यांनी नोंदलं आहे.
लेखिकेच्या सुरात कडवटपणा नाही. तिला यातला अन्याय दिसत नाही, असं नाही. तिचं लग्न सुधारकी कुटुंबात झालं आणि इंग्लिश शिकता आलं. ‘योग क्षेम सभा’ नामक सुधारकी चळवळीचं काम करता आलं. आयुष्य बदललं. पण ते नंतर. त्यापूर्वीच्या आयुष्याबद्दलच्या तिच्या नोंदी कडवट, संतप्त असत्या तर ते समजण्याजोगं होतं. पण तसं दिसत नाही. तत्कालीन सणसमारंभ आणि चालीरीती, अन्नधान्य साठवण्याच्या पद्धती, जेवणातले पदार्थ, वस्त्रप्रावरणं, निसर्गाशी असलेलं जोडलेपण, वैद्यकीय अज्ञान आणि त्यामुळे धर्मावर असलेलं अवलंबित्व, देवभोळेपण, निरनिराळी फळं-फुलं-पानं यांना जगण्यात असलेलं स्थान... यांबद्दल अतिशय तपशिलात जाऊन, रसाळपणे केलेल्या नोंदी दिसतात. आयुष्य एका प्रकारे अभावाचं खरं, पण ही व्यक्ती त्याही परिस्थितीत किती रसरसून जगली आहे, ते दिसायचं राहत नाही. त्यानं थक्क, नतमस्तक व्हायला होतं.
मला त्यातल्या कितीतरी समारंभांबद्दल वाचताना, केळी-नारळ-सुपार्या-भात-बांबू यांनी घेरलेलं हिरवंगर्द आयुष्य अनुभवताना; कोकणातल्या तत्कालीन मंगळागौरींची, गौरीगणपतीत खेळल्या जाणाऱ्या बायकांच्या खेळांची, तिथल्या निसर्गाची, हिरवेपणाची आठवण होत राहिली. पाठोपाठ अर्थात चित्पावनांच्या केशवपनासारख्या चालीही आठवणं क्रमप्राप्त होतं... पण समाज सुधारू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी रक्त आटवणार्या काही माणसांचं महत्त्व किती आणि त्यांनी माझं आयुष्य कसं बदललं आहे, हेही पुन्हा पुन्हा जाणवत राहिलं.
नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या दात्री नामक स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप झाला आणि तिच्यावर ‘स्मार्तविचारम’ नावाचा खटला चालवण्यात आला. तिनं एक-दोन नव्हे, तब्बल त्रेसष्ट पुरुषांची नावं घेतली. त्यांच्या शरीरावरच्या अवघड जागच्या खुणा- त्यांची पत्रिका – जन्मवेळ – शरीरसंगाची वेळ-तिथी... इत्यादी पुरावे देऊन तिनं खटला चालवणार्या नायर राजाच्या तोंडाला फेस आणला. त्यानं तिच्यासकट त्या त्रेसष्ट लोकांना जातिबाह्य जाहीर करून खटला गुंडाळला. पुढे तिचं काय झालं त्याच्या काहीही नोंदी सापडत नाहीत. ही घटना १९०५मधली. (अलीकडे मनु पिळलै यानं लिहिलेल्या The Courtesan, the Mahatma & the Italian Brahmin: Tales from Indian History या पुस्तकात त्याबद्दल तपशीलवार वाचता येईल.) या प्रकरणाचे लेखिकेच्या आयुष्यावर पडलेले पडसाद या पुस्तकात दिसत राहतात. दबक्या आवाजात होणार्या चर्चा, दात्रीच्या चारित्र्यावर ओढले जाणारे ताशेरे, आपल्या कुटुंबातल्या कुणा पुरुषाचं नाव त्यात ‘निघालं’ तर काय, ही पोटातली भीती, अविश्वास आणि एक प्रकारचं छुपं कौतुक... अशा गोष्टींच्या नोंदी लेखिकेनं केल्या आहेत. त्या वाचताना लेखिकेच्या संयत, डोळस, विशाल दृष्टीचा प्रत्यय येत राहतो.
नंबुद्री ब्राह्मण जातीतले पुरुषही अखेर या सगळ्या अंधकारमय चालीरीतींचे बळीच होते. त्यांच्यापैकीही काही जणांनी आपापल्या मुलीबाळींसाठी, बहिणीबायकांसाठी सुधारणेचे कडवे प्रयत्न केले. काही जणांमध्ये धैर्य नव्हतं. पण प्रेम होतं. लेखिकेच्या वडलांनी तिच्या बहिणीला संस्कृत शिकायची हौस असल्यामुळे निदान ज्योतिषशास्त्र तरी शिकवण्याचं वचन तिला दिलं. मुलगी एका खोलीत, उंबर्यात वडील, दुसर्या खोलीत शिक्षक – असा शिक्षणाचा खटाटोप काही काळ चालवला, अशी नोंद लेखिकेनं केली आहे. काही नंबुद्री ब्राह्मण पुरुषांनी औषधोपचार न घेता देवासमोर मरायचं ठरवलं. पण स्नानाशिवाय देवासमोर जायचं नाही या नियमासमोर मान तुकवून त्या मरणासन्न अवस्थेत घरच्या तळ्याकाठच्या हौदात बुडी घेऊनच... हे वाचताना पोटात तुटतं. माणसं रूढींसमोर इतकी हतबल का होतात, असा प्रश्न परत एकदा पडला.
जमिनींच्या मालकीपासून या भयानक चक्राला मिळालेली गती अखेर कूळकायद्यात जमिनी गेल्यावर हळूहळू मंदावली. जमिनीच उरल्या नाहीत. जमिनींवर उलटसुलट दावे सांगून तिच्या वाटण्या होऊ नयेत, म्हणून नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या धाकट्या मुलग्यांनी जातीत लग्न करण्यावर बंदी होती. तीही हळूहळू संपुष्टात आली. वाटण्या झाल्या. विभक्त कुटुंबव्यवस्था आली. स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, चोळ्या घालू लागल्या, कानांच्या फाटक्या पाळ्या शिवून घेऊ लागल्या...
हे पुस्तक इंग्रजीत २०११ साली प्रकाशित झालं. ‘माझ्यानंतर कुणी अशा प्रकारचं आत्मचरित्र लिहू शकणार नाही. जग बदललं आहे.’ अशा आशयाची ओळ त्यातल्या शेवटच्या परिच्छेदात आहे. ती वाचताना हायसं वाटतं.
पण जे. देविका यांनी त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना विचारात टाकणारी आहे. ‘खरंच दरवाजे उघडले का, किती?’ असा प्रश्न त्या प्रस्तावनेत विचारतात. ते आठवून आणि सध्याचे एकंदर वारे पाहता - थोडं भयभीतही वाटतं.
***
Antharjanam : Memoirs of a Namboodiri woman
Devaki Nilayamgode
Trans. Indira Menon, Radhika P. Menon
Oxford University Press, 2011
***
'फेसबुक'च्या पोस्टखालच्या कमेंट्स बघून काही पुरवण्या जोडाव्याशा वाटतात -
१. केरळ पुढे पुष्कळ प्रागतिक राज्य झाले, तरी नंबुद्री ब्राह्मण समाजांसारख्या काही तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये ही कर्मठ आणि संकुचित मानसिकता पार स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकून होती. त्यानंतर त्यात बदल झाला. जाती-जातींमध्ये असा असमतोल आजही दिसतोच - तोही फक्त केरळमध्ये नव्हे, सर्वत्रच.
२. तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये स्त्रियांचे स्थान कायमच दुर्लक्षित, बंदिस्त असे असते असे एक समाजशास्त्रीय निरीक्षण सांगतात. मालमत्ता अधिक, त्यामुळे त्यावर ताबा ठेवण्याची उर्मी अधिक, त्यामुळे योनिशुचितेची चिंता अधिक - असा त्यामागचा तर्क असावा.
३. स्त्रियांना दिली जाणारी वागणूक भयावह असली, तरी त्यात फक्त नंबुद्री ब्राह्मण ही एकच जात दोषी होती असे नाही. महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबांमध्ये बालविवाहाची चाल होती, तसेच केशवपनासारखी निर्घृण चालही होती. विधवांची स्थिती भयानकच होती. बंगाली ब्राह्मणांमध्ये सती चांगलीच प्रचलित होती. त्याबद्दल काही बोलावे तितके कमीच आहे. तमिळ ब्राह्मणांमध्येही केशवपनाची चाल होती. मराठा जातींतल्या सधन-जमीनदारीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये आजही स्त्रियांची स्थिती दयनीय असते. मारवाडी समाजात, तसेच उत्तरेकडच्या उच्चजातीय समाजांमध्येही तीच परिस्थिती असते. मुस्लीम समाजातल्या स्त्रीप्रश्नांवर तर सरकारी प्रचारच चालतो. एकुणात कुणी कुणाला हसण्यासारखी परिस्थिती नाही. काही पुढे, तर काही मागे, काही आधी, तर काही नंतर. पण स्त्रीची दडपणूक या एका बाबतीत सब घोडा बारा टक्का.
४. याविषयी पुष्कळ पुस्तके आहेत. मराठीत ह. ना. आपटे, वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, ज्योतिबा फुले, आगरकर, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, ताराबाई शिंदे, साने गुरुजी, श्री. ज. जोशी अशा कितीतरी नव्या-जुन्या लोकांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल पुष्कळ लिहिले आहे. बंगालीबद्दलही तेच. मल्याळममध्ये ललितांबिका अंतर्जनम यांचे लेखन आहे. त्यावर दोन उत्तम सिनेमेही ऐंशीच्या दशकामध्ये येऊन गेले. मराठी वैचारिक निबंध आणि कादंबर्यांखेरीज, नाटकांमध्येही या विषयाचे उत्तम आणि यथासांग प्रतिबिंब पडलेले दिसते. संदर्भासाठी पाहा : मराठी नाटकाच्या तीस रात्री, खंड पहिला, मकरंद साठे, पॉप्युलर प्रकाशन.
४. वरील परिचयात मी या लेखिकेने केलेल्या निसर्गविषयक, संस्कृतिविषयक निरीक्षणांबद्दल फार लिहिलेले नाही. हे लेखिकेला अन्यायकारक आहे, लिहायला हवे होते. त्यातले अन्नाच्या साठवणुकीचे तपशील, सणांमधून दिसणारे पर्यावरणाचे भान, त्यातला विलक्षण आनंदाचा भाग, नृत्य आणि गाण्यांचे - पुस्तकांतल्या गोष्टींचे आणि पुराणांचे तपशील... हे सगळे अतिशय मनोज्ञ, आनंददायक आहे.
No comments:
Post a Comment