Sunday, 24 February 2008

जगता जगता...

गर्भाशयातल्या अंधाराची स्पष्ट आठवण नाही उरली जगता जगता.

काही पुसट हृदयखुणा फक्त.
काही अनोख्या शांततेचे निरव प्रदेश.
सगळी दु:खं विसरून विसावावं अशा काही अंधार्‍या ऊबदार जागा.
कसल्याही हक्कांविना पोटाशी घेणारे काही कोवळ्या सावलीचे दगडी पार..

अशा प्रदेशांचे पत्ते नसतात कधीच. चालता चालता अवचित सापडून जाणार्‍या या भाग्यखुणा. पावलांना पुन्हा तहान लागलीच, तरी गवसतीलच याची काहीच शाश्वती न देणार्‍या. गूढ. आकर्षक. आश्वासक...

थेटराच्या अंधारात क्वचित सापडून जातो त्यांचा माग. काळोख उतरतो हलक्या मांजर-पावलांनी. पाहता पाहता क्षुद्र कुजबुजी विरत जातात. उत्सुक गाढ शांतता जन्म घेते आसमंतात. या शांततेला मरणाचा गर्द-भीषण वास नाही. जन्माच्या आतुरतेचा एक कोवळा गंध केवळ. उण्यापुर्‍या काही सेकंदांचं आयुष्य या शांततेचं. भारून टाकणार्‍या दमदार आवाजानं मेंदूचा कब्जा घेण्याआधीचं. या अल्पायुष्यामुळेच असेल तिचं गूढ सौंदर्य कदाचित.. आणि पोटाशी धरणारी जिवंत ऊबही.

कधी गाण्याच्या कोवळ्या सुरात सापडतात अशा प्रदेशांच्या वाटा. गाणी एकेकटी येतात थोडीच? गर्द रानात नेणार्‍या आठवणींच्या गूढ वाटांचं जाळं घेऊन येतात गाणी त्यांच्यासोबत. त्या वाटांवर पाऊल ठेवणं-न ठेवणं हातातलं नव्हेच. केवळ पूर्वसंचिताचं खुणावणारं आव्हान. शब्द, सूर आणि मधले अर्थानं भारलेले मौनाचे तुकडे. एकाच वेळी निवांत आणि कासावीसही करण्याची ताकद असणारे. त्यांच्या आव्हानाला सामोरं जायचं ताठ मानेनं. दोन हात करायचे असेल नसेल ती सगळी ताकद एकवटून आणि मग थकून विसावायचं तिथेच... कुणीच हटकायला नाही येणार तिथं, याचं आश्वासन उशाला घेऊन.

तशा कविता जीवघेण्याच. विषारी संवेदनांची शस्त्रं पोटात बाळगणार्‍या. विषकन्यांसारख्याच विश्वासघातकी आणि आकर्षकही. पण त्यांच्यापाशीही कधी कधी मिळून जातो हा मऊ अंधार. एकेका शब्दाचं बोट धरून हलके हलके उतरत जाव्यात एखाद्या खोल अंधार्‍या विहिरीच्या पायर्‍या, तशा अर्थाच्या तळाशी घेऊन जातात कविता कधी कधी. एखाददा पायाखालचा दगड निसटतोही, नाही असं नाही. मग कपाळमोक्ष चुकत नाही. पण हा धोका पत्करून त्या अंधारात पाऊल ठेवावं अशी लालबुंद रसरशीत स्वप्नं असतात कवितांच्या पोटी दडलेली.. क्वचित कधी बोटांना त्याचा निसटता स्पर्श होतो आणि जन्माला पुरेल अशी धगधगती ऊर्जा पाहता पाहता वस्तीला येते आपल्याआत...

एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी माणसंही घेऊन येतात हे असे प्रदेश त्यांच्या पावलांसोबत. पुरेश्या अंतरावरून माणसं न्याहाळण्याची सुरक्षित सवय स्वतःला लावून घेतलेले आपण बिचकतो मग. काहीश्या अविश्वासानं मागे सरतो. अंग आक्रसून घेतो. पण एका जादूभरल्या क्षणी सगळी अविश्वासाची वर्तुळं विरून जातात आणि कुशीत शिरावं कुणाच्या, तसे नि:संकोचपणे नात्यात शिरतो आपण.

तश्या दुर्मीळच या गोष्टी... पण गर्भाशयाच्या पुसट आठवणी जागवणार्‍या... जगता जगता विसरून गेलेल्या त्या विश्वात परतून नेणार्‍या...

10 comments:

  1. क्या बात है! अकल्पितपणे सापडण्यात, आणि जेव्हा तू म्हणतेस तसं पावलांना तहान लागेल तेव्हा न गवसण्यातच ह्या भाग्यखुणांचं गूढ आकर्षण. चांदण्यात फिरुन आल्यासारखे वाटण्याची उपमा जी.एं.ना अशाच मधल्या निरव प्रदेशात सापडली असेल कदाचित.

    ReplyDelete
  2. maybe that is why they say,
    "between you and your destination lies the journey."
    maybe that is why they say,
    "na jaane kyon manzil se behatar lagne lage hai yeh raaste."

    needless to say, another fine post from you - the choice of words, the ideas, the metaphors, the flow of thoughts - e'thing is so beautiful.

    ReplyDelete
  3. तुझं perfectionचं वेड वाढतच चाललय...पुन्हा एकदा १०/१०

    ReplyDelete
  4. i think u r in right place... :)apratim zalay

    ReplyDelete
  5. तुला काय जे म्हणायचंय ते असं आत आत उतरत जातं नं...अलगद..
    फार सुंदर. ह्या अज्ञात,निर्जन आणि हव्या हव्याशा काळोखालाच आपण काय काय नावं देतो मग...प्रिती, अभिव्यक्ती, संवेदनशीलता...

    असंच नेटकं आणि उत्कट लिहीत रहा,

    ReplyDelete
  6. तश्या दुर्मीळच या गोष्टी... पण गर्भाशयाच्या पुसट आठवणी जागवणार्‍या... जगता जगता विसरून गेलेल्या त्या विश्वात परतून नेणार्‍या...
    kyaa baat hai?

    ReplyDelete
  7. ya postvar kay comment dyayachi yacha gele kityek divas ananvit v4 kela...paN kahi jamena nemaka...

    mhaNun sadhya chhan zalay evdhach!...baki kahi nemaka suchala tar nantar...

    ReplyDelete
  8. बाई, पुढं लिहा नां...........

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर !

    ReplyDelete