Saturday, 9 February 2008

...अफलातूनच!

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

उदाहरणार्थ ऑफीसमध्ये एका भिकार डॉक्युमेण्टमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करून मी प्रचंड दमलेली. आत्ता चहासाठी ब्रेक घेतल्यास किंवा निवांतपणे गूगल टॉक उघडल्यास नवा मॅनेजर आपल्यावर कितपत खूश होईल हा विचार चेहर्‍यावर दिसू न देता साळसूदपणे कामात दंग.

एवढ्यात एक आंग्लाळलेली बया एक म्युझिक सिस्टिम घेऊन अवतीर्ण होते. 'इट्स टाइम टू एक्झरसाइज्' असं म्हणते आणि गर्दीनं भरलेला, मरगळलेला प्लॅटफॉर्म दूरवरची लोकल पाहून जसा एकदम सळसळतो, तसं अवघ्या ऑफीसमधे एकदम चैतन्य सळसळतं.

काही लोक उघडपणे दात काढत बाहेर पडतात.
काही लोक 'आपल्याला देणंघेणं नाय' अशा मख्ख आविर्भावात मॉनिटरमधे घुसतात.
काही लोक सूर्यफूलसदृश तत्परतेनं तिच्याकडे तोंडं वळवतात.
काही लोक शीपिशली हातातली कामं टाकून, खुर्च्या बाजूला सारून जागीच उभे राहतात.

आणि भर ऑफीसमधे दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत ती एरोबिक्सचा वॉर्म अप् सुरू करते.

जेन फोंडा माझी आई असल्याच्या थाटात निर्विकारपणे आणि सराईतपणे एरोबिक्स करताना मला वाह्यात हसायला यायला लागतं.

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडणं एकंदरीत मस्तच.

उदाहरणार्थ एकाच सिग्नलला तीन प्रदक्षिणा घालूनही मला घर सापडतच नाही. पत्ता तोंडपाठ. पण जायचं कसं विचाराल तर आपली बोलती बंद. बरं, मला नाही तर नाही, रिक्षेवाल्याला तरी माहीत असावं? नपेक्षा त्यानं ते कुणाला तरी विचारावं? पण एकतर तो अभिजात मंदबुद्धी तरी असावा किंवा स्वतःच्याच शहरात कुणाला पत्ता विचारण्यानं त्याचा इगो दुखावणार असावा.

परिणामी आम्ही मारतोय आपल्या गरागर चकरा एकाच सिग्नलला.

शेवटी मी बळंच रिक्षा थांबवून त्याला त्याची दक्षिणा देऊन टाकते आणि ट्रॅफिक पोलिसाकडे मोर्चा वळवते. 'कन्नडा बरुन्दिल्ला' हे माझं कन्नडचं ज्ञान, 'व्हेअर गो?' हे पोलिसाचं इंग्लिशचं ज्ञान आणि आजूबाजूच्या तत्पर लोकांचं कामचलाऊ हिंदी यांच्या बळावर माझी वरात स्वगृही पोचते.

आणि पगार ठरवताना कोळणीला लाजवेलशी हुज्जत घालणार्‍या आणि दिवसभर होता होईल तेवढी उद्धट अडवणूक करणार्‍या एचआरवाल्या मॅनेजरचा फोन येतो - डिड यू रीच सेफली? आय वॉज वरिड् यू नो...

मी नीट सुखरूप पोचलेय. आता कॅबचा पिक अप्-ड्रॉप मिळेपर्यंत मी घरी पोचल्यावर एक मिस्ड् कॉल देत जाईन... हे त्याला पटवून देता देता मला परत अनावर हसायला यायला लागतं.

कुठे येऊन कुणासोबत काय चाललंय!

अशीच एक भयानक उदास संध्याकाळ. आपण म्हणजे एक गरीब खाणकामगार असून एकटेच जन्माला आलो आहोत व एकटेच मरणार आहोत, अशा प्रकारचे भीषण विचार डोक्यात चालू. वेळ सरकता सरकतच नसलेला. आपण असेच मरून गेलो तरी कुणाला काही कळणार नाही, असं वाटण्याच्या सुमंगल मुहूर्तावर जुन्या मित्राचा फोन येतो.

माझे बारा वाजलेले त्याला कळू नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न करून मी हसरा आवाज काढण्याच्या प्रयत्नात असतानाच साहेब सेण्टी होतात. 'आता गप्पांचा अड्डा बसत नाही. सगळे एकेकटे आपापला जीव रमवत असतात. मला प्रचंड एकटं वाटतं. तिकडे एखादी नोकरी मिळेल काय..' या त्याच्या एकंदर मूडवर मी उत्तरादाखल भली मोठ्ठी उपदेशाची फैर झाडते.

एकटं असण्याची सवय करून घेतली पाहिजे..
नाही तिथे इमोशनल होऊन कसं चालेल..
सेल्फ पिटी बंद करायला कधी शिकणार..

या वाक्यावर मला इतकं हसायला का येतंय ते बिचार्‍याला कळतच नाही.

काही म्हणा, आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

12 comments:

  1. अफलातून! :)
    मीही नुकतीच माझ्या जुन्या मित्राला 'नवीन वर्ष सुरू झाल्याबद्दल कसलं excite व्हायचं..' असं ध्रुपद असलेलं (रड)गाणं फोनवर ऐकवत असताना अशीच वाह्यात हसत सुटले होते. आणि वर 'मी आत्ता सांगताना हसत असले तरी मला हे फार सीरियसली वाटतंय' हे त्याच्या गळी उतरवायचा प्रयत्न करत होते.

    ReplyDelete
  2. agadich aflatun! :D:D:D

    bangLoor mukkami pahila post vatta...ekTepaNacha fayda hoil ni ikade dhadadhad posts yetil asala ataynt swarthi v4 yetoy manat :P

    btw ...class upama aahet sagaLya :)

    ReplyDelete
  3. तू एकूणच सर्व परिस्थितीत जगायला शिकली आहेस असं वाटतय. बरं आहे राव...

    "एवढ्यात एक आंग्लाळलेली बया एक म्युझिक सिस्टिम घेऊन अवतीर्ण होते. 'इट्स टाइम टू एक्झरसाइज्' असं म्हणते आणि गर्दीनं भरलेला, मरगळलेला प्लॅटफॉर्म दूरवरची लोकल पाहून जसा एकदम सळसळतो, तसं अवघ्या ऑफीसमधे एकदम चैतन्य सळसळतं.

    काही लोक उघडपणे दात काढत बाहेर पडतात.
    काही लोक 'आपल्याला देणंघेणं नाय' अशा मख्ख आविर्भावात मॉनिटरमधे घुसतात.
    काही लोक सूर्यफूलसदृश तत्परतेनं तिच्याकडे तोंडं वळवतात.
    काही लोक शीपिशली हातातली कामं टाकून, खुर्च्या बाजूला सारून जागीच उभे राहतात."

    कसली मजा आली असेल ना हे बघताना...

    जेन फोंडाच्या आईला माझा सा.न.

    ReplyDelete
  4. khrach i m happy after reading this post!!! keep it up... asa lamb ubha rahun baghta yetay tula...

    ReplyDelete
  5. :-))))))))))))) Kharach mala pan asach prashna khup vela padlay. Even aata vacation nantar US la parat aalyavar pan..."apan kay kartoy aani kutlya lokaant ahot...." :-)) Ani tujhi post vachun tyach pan hasu aala. :-))
    Take care.
    -Vidya.

    ReplyDelete
  6. मस्त !
    सूर्यफूलसदृश तत्परतेनं >>> :))

    ReplyDelete
  7. कुठे येऊन कुणासोबत काय चाललंय!
    हा प्रश्नं (की उद्गार) अनेकांना पडलेला आहे. भय्यांना मुंबईत,मुंबैकरांना सॅन होजेत,केरळ्यांना दुबईत, तस्लिमांना दिल्लीत, अमेरिकनांना इराकमधे, संता-बंतांना कॅनडात, पटेलांना न्यु जर्सीत अशी नं संपणारी यादी आहे. त्यामुळे मुंबईत उत्तरप्रदेश दिन, अमेरिकन सिनेटमधे मंत्रपठण,सॅन होजेत गणेशोत्सव असं "कुठे येऊन काय काय" चाललेलं असतं.
    "मी","आपण" "आपले" "माझे" या शब्दाची व्याप्ती फारच छोटी असते आधी. ती हळुहळु वाढत गेली की नंतर असे प्रश्नं पडत नाहीत.
    Just hang in there!

    ReplyDelete
  8. सुंदर लिहिलं आहेस. पण अर्थात ठिकाण, परिस्थित्या बदलायची, परीघाबाहेर रहायचीच सवय झाली तर आपोआप तुझे हे प्रश्न आपण कुठेच न जाता इथेच काय करतो आहोत मधे कन्वर्ट होतील हे नक्की:))

    ReplyDelete
  9. सुरेख लिहिलं आहेस.

    'कन्नडा बरुन्दिल्ला' हे माझं कन्नडचं ज्ञान, 'व्हेअर गो?' हे पोलिसाचं इंग्लिशचं ज्ञान आणि आजूबाजूच्या तत्पर लोकांचं कामचलाऊ हिंदी <<<<
    LOL....

    ReplyDelete
  10. स्वाती, ए सेन मॅन, मधुरा, संवेद, स्नेहल, विद्या, राहुल, संगीता, ट्युलिप आणि श्रद्धा -

    मनापासून आभार.

    ReplyDelete
  11. सुरुवातीला मी सुद्ध बँगलोर मध्ये असाच सरबरल्या सारखा होतो. सारखी घरची आणि तिथल्या मित्रांची आठवण यायची. मी इथे एकटा गादीवर पडलेलो असतान ते तिथे कसे उंडारत असतील असं वाटायचं. आणि मित्र सुद्धा एकत्र जमले की अरे फोन वरून हजेरी लाव म्हणून मला फोन करयचे. पण २-३ आठवड्यात सवय झाली. कट्टे शोधले, मित्र जमवले. आत सगळं नीट सुरू आहे. नम्म बँगलूरू

    ReplyDelete