Monday 4 September 2023

इतक्यात वाचलेली पुस्तकं

धारपांची इतर काही पुस्तकं मागे वाचली होती. समर्थ आणि आप्पा या जोडीचं मात्र काही वाचलं नव्हतं. रोहन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली समर्थ-पुस्तकमालिका वाचली.
एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. धारपांच्या कथांची मुळं भारतीय मातीतली नाहीत, हे मूळ पुस्तकं वाचणार्याला कळतंच. पण मूळ पुस्तकंं ज्यांच्या वाचनात आलेली नाहीत, त्यांनाही हे स्पष्ट जाणवतं की धारपांच्या कथांमधलं जे काही अमानवी आहे, त्याची जातकुळी भारतीय नाही.
मराठी माणसाला भुतांचे अनेक प्रकार ओळखीचे आहेत. जखीण, लावसट, हडळ, मुंज्या, समंध, मूळपुरुष, गिर्होबा, वेताळ... या सगळ्या भुतांच्या जगाचे स्वतःचे असे नियम आहेत. ही भुतं कोणत्या परिस्थितीत जन्माला येतात, त्यांच्यावरचे निर्बंध कोणते, त्यांचा नाश कसा होतो... हे सगळं विवक्षित नियमांनी बांधलेलं आहे. मात्र - त्यांच्यात एक अस्सल देशीपणा आहे. त्याखेरीज, ही भुतंखेतं अमंगळ असली, तरीही त्यांच्यामध्ये काहीएक आपलेपणाचा धागा आहे. जणू ती माणसाला घोळसतील, हवं ते वसूल करून घेतील, पण त्याच वेळी कुण्या परक्या जगातलं अभद्र काही चालून आलं, तर झटदिशी बाजू बदलून ज्याला घोळसलं त्या माणसाच्या बाजूनं उभीही राहतील. असं काहीतरी वाटायला लावणारं बरेवाईटपणाचं मिश्रण त्यांच्यात आहे. हॅरी पॉटर मालिकेमध्ये निअरली हेडलेस निक किंवा मोनिंग म्रिटल यांच्याबद्दल हॉगवर्ट्समधल्या कुणालाही परकेपणा वा भीती वाटत नाही. कारण ती जरी भुतं असली तरी हॉगवर्ट्सच्या विश्वाचा ती अपरिहार्य असा भाग असतात, त्यांच्यातलं काहीतरी हॉगवर्ट्सशी बांधलं गेलेलं असतं. तसंच काहीसं नातं मराठी माणसाचं देशी भुतांशी असतं.
समर्थमालिकेमध्ये येणारं अमानवी विश्व असं नाही. त्यात परकेपणा आहे. त्यातलं अमंगळ या सृष्टीशी उभा दावा मांडणारं आहे. ते दुष्ट आणि समर्थ सुष्ट असा हा उघड, दुभंग संघर्ष आहे. केसाळ काळे गुंतवळसदृश आकार, द्वेष-तिरस्कार-राग यांची आग, भुईच्या पोटातून रोरावत वर येणारे अभद्राचे उद्रेक, ओंगळवाणी पशुवत अस्तित्वंं, झोंबीज्... हे या अमंगळाचं स्वरूप आहे.
धारपांचं कौशल्य असं की या परकीयपणावर ते जवळजवळ बेमालूम असं देशी आवरण पसरून देतात. त्याचा धागा इथल्या मातीतल्या चिरपरिचित सुरासुराच्या झगड्याशी, क्वचित छद्मविज्ञानाशी, मानवी स्वभावाच्या खाचाखोचांशी, जोडतात. हे कौशल्य आहेच. ते त्यांच्या अस्खलित निर्मळ मराठी भाषेचं आणि गोष्ट सांंगण्याचं कसब आहे. पण त्याच वेळी धारपांनी असं विश्व मराठी मातीतल्या भुताखेतांसह विणलं असतं, तर काय बहार आली असती असं वाटल्यावाचून राहत नाही.
विशेषतः त्यांचं व्यक्तिरेखाटनाचं कौशल्य बघून फारच चुटपुट लागते. आप्पा, समर्थ, केशवराव, मार्तंड या व्यक्तिरेखा इतक्या थेटपणे वॉट्सन, होम्स, लेस्ट्राड, मॉरिआर्टी यांकडे बोट दाखवतात, की मजा वाटते. पण त्यांंचं देशीकरण मात्र धारपांना किती अफलातून साधलं असावं! या व्यक्तिरेखा अक्षरशः डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यांच्या रूपात-वागण्यात-भाषेत औषधालाही परकेपण नाही. हेच भुताखेतांचंही करता आलं असतं तर... असो.
ही इतकी हमखास यशस्वी मालिका. पण किती ढिसाळपणे काढली आहे! पहिली आवृत्ती कधीची त्याची नोंद नाही. 'पिशवि'सारख्या र्हस्वदीर्घाघाच्या चुका, एका अक्षराजागी सर्रास दुसरं अक्षर पडणं, पत्रातला मजकूर तिरप्या ठशात आणि पत्राबाहेरचा निवेदकानं सांगितलेला मजकूरही तशाच तिरप्या ठशात पत्राला जोडून दिलेला. वाचकानं काय ते अनमानधपक्यानं समजून घ्यावं. या पुस्तकांच्या बाबतीत तर व्यावसायिक यशाची खातरी असणारच. त्यांची तरी निर्मितिमूल्यं सांभाळावीत... छे, नाव नको. वाईट वाटतं.
समर्थांची ओळख, समर्थांना आव्हान, समर्थांचा विजय
नारायण धारप
रोहन प्रकाशन
रोहन प्रकाशनाने काढलेली पुनर्मुद्रित आवृत्ती २०२२

~


समीना दलवाईचं 'भटकभवानी' हे पुस्तक वाचलं.
अस्सल भारतीय मातीतली आणि ब्राह्मणी-अब्राह्मणी स्त्रीवादात स्पष्ट फरक करणारी मांडणी, विद्वान-सुधारकी-आंतरधर्मीय-शहरी+ग्रामीण अशा बहुरंगी कौटुंंबिक पार्श्वभूमीचं देखणं-सुस्पष्ट प्रतिबिंंब मिरवणारे अनुभव, या पार्श्वभूमीच्या पलीकडे जात केलेली खास स्वतःची अशी निरीक्षणं, वाचकाला त्याच्या पूर्वग्रहांकडे बघायला लावण्याची ताकद... ही सगळी वैशिष्ट्यंं या पुस्तकातल्या लेखांमध्ये आहेत खरी.
पण त्या सगळ्यांहून अधिकचंं, मला जाणवलेलं, वैशिष्ट्य म्हणजे तिची अस्सल मराठी भाषा. ती विद्वज्जड नाही, रसाळ आहे. सुटसुटीत आहे, पण कोरडी वा त्रोटक नाही. चपखल, मिश्कील, नेमकी तर आहेच. शिवाय जाता-जाता सहज 'मौना'ला 'चुप्पी' म्हणणारी आणि '...आम्हांला कोण अभिमान!'सारख्या किंचित जुन्या वळणाच्या रचना सहजी करणारीही आहे. आणि सगळ्या वर्णनांहून महत्त्वाचं म्हणजे अतिशय भेदक-परिणामकारक-वेळी मन हेलावून टाकणारी आहे. अशी भाषा अभ्यासकाला नव्हे, अभ्यास जगणार्याला-पचवणार्याला वश होते.
हिंदू-मुस्लीम दंगली, स्त्रियांवरचा अन्याय, दलितांवरचे अत्याचार... असे अनेक जळजळीत विषय समर्थपणे हाताळतानाही पुस्तकाचा सूर कुठेही कडवट होत नाही. त्यातला खेळकर, हृद्य भाव लोपत नाही. हे श्रेय भाषेला द्यावंं की लेखिकेच्या नजरेला, हे मात्र मला ठरवता येईना.
अक्षरशः बसल्या बैठकीत पूर्ण केलेलं, जरूर-जरूर वाचावं असं पुस्तक.
भटकभवानी
समीना दलवाई
हरिती प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२२

~

'झुम्कुळा' हा वसीमबार्री मणेरांचा कथासंग्रह.
गरीब माणसांच्या गोष्टी. कुठे एखाद्या टाकलेल्या, कुरूप प्रौढेचं हसर्या चेहर्यानं राब-राब-राबत झुरणं असेल. कुठे कुणा टमटमवाल्याची गाडीला टप करण्याची तगमग. कुठे एखाद्या चिल्ल्या पोराला दिवाळीच्या किल्ल्यावर कारंजं करताना बघायला न मिळाल्यामुळे झालेली हिरमूस. कुठे पावसात भिजणार्या खारीवाल्याची तंंगी बघताना मामासोबत खाल्लेल्या खारीच्या आठवणीनं हळवा-हळवा झालेला एखादा तगडा तरुण. लहान जिवाच्या, नाजूक चणीच्या, धारदार गोष्टी.
त्यांची बोली सातारकडची. त्यात मुस्लीम समाजाच्या हिंदीमिश्रित बोलीचे रंग बेमालूम मिसळून गेलेले.
या कथांचंं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळ्याशार-कडूजहर नाहीत. परिस्थिती तशी कायम परीक्षा घेणारी असतेच. पण होणार्या नवरीच्या मोबाईल-मेसेजिंगच्या कौशल्याला टरकून असणारा पैलवान गडी नि दोस्ताची मदत घेऊन तिला गोरंमोरं करून चीत करण्याची त्याची हौस... अशा मिश्कील गोष्टीही भेटतात. म्हातार्या निराधार मैमूनाच्या कष्टाच्या जाणिवेनं तिच्या सासरच्यांवर फणफणणारी पाटलीण भेटते. विद्यार्थ्याला 'नॅशनल'ला खेळवण्यासाठी स्वतःच्या खिशाला खार लावून घेणारे नि त्याची उडी हवी तशी पडल्यावर आनंदानं शिव्या देणारे सातपुते सर भेटतात. नि सोबतच्या दोस्ताची हलाखी बघून घास घशाखाली न लोटू शकणारे कोळेकर वकीलही. त्यांच्यातलं माणूसपण संपून कोरडंठाक झालेलं नाही. अजून थोडा ओलावा शिल्लक आहे...
आणखी एक अतिशय आवडलेली बाब म्हणजे स्थानिक खासियतींचे अन-अपोलोजेटिक, सहज उल्लेख. आंबट चुका घालून केलेला दालचा, मटणपुलावाची कुर्चन, गरम पुरीभाजी सॅम्प्लल... असे अनेक उल्लेख कथांना वास, रंग देऊन जातात.
'झुम्कुळा' म्हणजे सापांच्या जोडीचं जुगणं. नजरबंदी करणारं. विजेसारखं लवलवणारं. नजर ठरू न देणारं.
त्याचं नाव संग्रहाला शोभून दिसतं.
झुम्कुळा
वसीमबार्री मणेर
प्रकाशक : ताहिरनक्काश सलिम मणेर
प्रथमावृत्ती : २०१९

~

स्त्रीवादाशी निगडित काही पुस्तकं काही कारणानं एकापाठोपाठ एक समोर येत राहिली. काही मी उत्सुकतेनं हुडकल्यामुळे, काही कुणी सुचवल्यामुळे, काही निव्वळ गूगलकृपेनं. त्यांपैकी काहींनी अतिशय प्रभावित केलं. मार्च संपेपर्यंतचं वाचन नि टिपणं या पुस्तकांविषयी.
चिमामांडा एंगोझी अदिचे या नायजेरियन लेखिकेचं हे पुस्तक. 'Dear Ijeawele, or A Feminist Manifesto in Fifteen Suggestions' अशा लांबलचक नावाचं असलं तरी अतिशय छोटेखानी, साधंसोपं आणि खणखणीत. आपल्या मुलीला स्त्रीवादाचं बाळकडू कसं द्यावं, असा प्रश्न विचारलेल्या एका मैत्रिणीला लेखिका उत्तरादाखल पंधरा सुचवण्या सांगते आहे, अशी कल्पना करून लिहिलेलं.
आपल्या मुलांना सगळं काही शिकवावं इथपासून ते त्यांना आपलं आपण शिकण्यासाठी रस्ते खुले करून द्यावेत, बाकी काहीही करू नये अशा विचारापर्यंत झोके घेणार्या मला या पुस्तकाचा दृष्टीकोन अतिशय आवडला. आपण व्यक्ती म्हणून संपूर्ण, रसरशीत, न्यायी, करुणामयी असलं पाहिजे, तरच मुलांसमोर हा पर्याय राहील. आणि भाषेपासून ते विचारापर्यंत, कृतीपासून ते संसाधनांपर्यंत... सगळी काळजी घेतली तरीही मुलं आपल्याला चकवून स्वतःला हवी तशीच घडणार आहेत आणि तेच नैसर्गिक-निरोगी आहे - ही समजूत मला या लेखिकेत दिसली.
सौंदर्यविषयक समजुती, शरीराचं निरोगीपण, संंस्कृतीची तपासणी करत राहण्याची गरज, सेक्सविषयक मोकळेपणा, संतपणा सोडून माणूस होण्याची निकड, वैविध्याबद्दलचा आदर, भाषेकडे आणि पुस्तकांकडे जाणीवपूर्वक लक्ष्य पुरवण्याचं महत्त्व, स्वतःच्या आवाजाचं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचं-ओळखीचं भान... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'फेमिनिझम लाइट' उर्फ 'सुलभ स्त्रीवाद' या बुरख्याखाली येऊन पंखाखाली घेऊ पाहणारी पितृसत्ताकता ओळखण्याचं शिक्षण... हे सगळे पैलू इतक्या सोप्या भाषेत आणि सहजी सांगून जाणारं दुसरं पुस्तक मला ठाऊक नाही.
या लेखिकेचं 'We should all be feminists' नावाचं एक भाषणही मिळालं. तिचं मिश्कील हसू अनुभवत ते ऐकण्याजोगं आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
Dear Ijeawele, or A Feminist Manifesto in Fifteen Suggestions
Chimamanda Ngozi Adichie
Knopf Publishers
2017

~

मला शिरीष कणेकरांचं लिहिणं आवडतं.
त्यात पुष्कळ पुनरावृत्ती असते, घासून गुळगुळीत झालेले विनोद असतात, एक प्रकारचा सेक्सिस्ट आविर्भाव असतो, फार मोठं साहित्यमूल्य नसतं, हे सगळे आरोप मला मान्य आहेत. पण व्यक्तिचित्रं लिहिताना त्यांची लेखणी ओलसर असते. या व्यक्तीला माझ्या तराजूत घालून त्याचं यथेच्छ मूल्यमापन करूनच काढतो, असा अभिनिवेश नसतो. त्यांची आई, आजी, मावशी, वडील, काही मित्र... यांबद्दलचं लेखन आवडतं ते त्यामुळे. त्यातले विसंवाद, कटुता, अभाव, चुटपुट... सगळ्यासकट ते जिवंत वाटतं.
'लता' हे लता मंगेशकरांबद्दलचं पुस्तक त्या पठडीतलं आहे. वर दिलेल्या दोषांपासून ते मुक्त नाही. मात्र, मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय चित्रपटरसिक श्रोता आहे, माझ्या पदरात आयुष्यानं फार मोठं माप घातलेलं नाही, पण साक्षात 'लता'चा स्नेह देऊन त्याची जणू भरपाई केली आहे... असा भाव त्यात आहे. माझ्यातला सर्वसामान्य वाचक त्यामुळे त्याकडे ओढला गेला. एरवी अप्राप्य भासणारी ही कलावती विनोद करताना, गप्पा मारताना, टोमणे मारताना, खळखळून हसताना, चवीनं जेवताना, आपल्या कलेतून येणारा देखणा तोरा मिरवताना - कशी दिसते, हे मला एरवी कुठून कसं कधी बघायला मिळणार होतं?
अनेकानेक फिल्मी आणि साधेसुधे किस्से सांगताना कणेकर ते दाखवतात. मंगेशकर भावंडांमधले संबंध, अनेक कलावंतांशी उडालेले त्यांचे खटके, काही हृद्य आठवणी, काही अविश्वसनीय भासणाऱ्या प्रतिभावंतांच्या कहाण्या... हे सगळं वाचताना लतामधल्या माणूसपणाचं दर्शन घडतं. मस्त वाटतं.
थोडं नेटकं संपादन करून पुनरावृत्ती टाळली असती, तर.. असो.
लता
शिरीष कणेकर
नवचैतन्य प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२३

~


'निरंतर वाटेवर' या सानियाच्या नव्या कादंबरीची तुलना नकळत शांताबाई गोखल्यांच्या 'निर्मला पाटील यांचे आत्मकथन'शी झाली, तशीच अंबिकाबाई सरकारांच्या 'एका श्वासाचं अंतर'शीही झाली. 'निर्मला पाटील'मध्ये असलेला समग्र देशकालजातपरिस्थितीचा पट 'निरंतर'मध्ये नाही. 'एका श्वासाचं'मधला सहज, उगवून आल्यासारखा नैसर्गिक भावही नाही. पण तरीही, हे अन्यायकारक आहे हे कळूनही, अशा तुलना मनात आपसुख उमटतात, याचं कारण उघड आहे - या एकाच जातकुळीच्या कादंबऱ्या - की लघुकादंबऱ्या? - आहेत.
आत्मशोधाच्या वाटेवरच्या बायांची गोष्ट सांगणाऱ्या.
'निरंतर'मध्ये तीन मैत्रिणी आहेत. मालविका, रागिणी, चंदा. एक भारताच्या उत्तरेकडची, एक दक्षिणेकडची, आणि एक मधली - महाराष्ट्रातली. तिघींची आयुष्यं निरनिराळे प्रश्न पुढ्यात टाकणारी. तिन्हीत धागा आहे तो बाईपणाचा. त्यांच्या पुढ्यातले प्रश्न आहेत, कारण या समाजानं, या संस्कृतीनं त्यांना बाईचा जन्म दिला आहे, एक विशिष्ट पुरुषप्रधान अशी व्यवस्था घडवली आहे, आणि त्याबरहुकूम काही एक समजुती, अपेक्षा, नियम, चाकोऱ्या या बायांवर लादल्या आहेत. त्या-त्या बायांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीनुसार त्या किंचित बदलतात. तपशिलात, तीव्रतेत कमीजास्त फरक होतात. पण आकार घडवणारी मूस तीच आहे.
काही अपेक्षित टप्पे लागतात, काही अनपेक्षित. काही भाग जिवंत, रसरशीत, चकित करून जाणारे आहेत. काही अगदीच खेचल्यासारखे, बेतीव, रटाळ, एपिसोडिक. पुरतं समाधान झालं नाही, तरी पुस्तक संपेस्तो हातातून ठेववलंही नाही. तितकी ताकद गोष्टीत आहे.
मला झालेला आणखी एक वैयक्तिक साक्षात्कार म्हणजे - 'बाईला बाईच समजून घेऊ शकते' या काहीशा ठोकळेबाज, सुलभीकृत, जीवशास्त्राधारित, 'लेडीज कम्पार्टमेंट' गृहीतकात आपल्याला बांधून घेण्याची ताकद उरली नाही, हे जाणवलं. त्या गृहीतकाची स्वतःची अशी जागा आहे, भूमिका आहे, मोल आहे... पण आता ते पुरेनासं, पटेनासं झालं आहे, हेही.

निरंतर वाटेवर
सानिया
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२३

‍~
आज रद्दीवाल्याकडच्या त्रैमासिक चकरीत 'फादर टेरेसा आणि इतर वल्ली' हे डॉ. शंतनू अभ्यंकरांचं पुस्तक दिसलं. डॉक्टरांचं थक्क करणारं कॅन्सरविषयक टिपण इतक्यात वाचलं असल्यामुळे आपसुख उचललं गेलं.
खुमासदार मिश्किली आणि स्वतःचा कमीपणा दाखवायला अजिबात न लाजणारा प्रामाणिकपणा हे लेखकाचे दोन विशेष या सगळ्या व्यक्तिचित्रांतून दिसत राहतात. काही विशेष रंगलेली व्यक्तिचित्रं वाचताना पाणीही येतं डोळ्यांत. पण अखेर वाचून संपल्यावर भाव मनात उरतो तो जगण्याविषयीच्या प्रसन्न प्रामाणिक कुतूहलाचा. अफगाणिस्तानच्या वाताहतीची वेदना जगणारा सय्यद, 'फशिवलं हो मला' म्हणून उदास होणारी मायाळू म्हातारी, खाष्टपणात भूषण मानणारी मेट्र्न फादर टेरेसा, नाटकात रमलेला डीनमास्तर, सर्जनला देवासमान वाटणारे अनेस्थेशिया देणारे तज्ज्ञ, महाडहून आबीकर डाक्तरला भेटायला येणारा रहीम चाफेकर आणि मंडळी ... अशा अनेक व्यक्तिचित्रांमध्ये अधिक मोठ्या लेखनाची आणि कथांची बीजं दिसतात.
या पुस्तकाच्या निमित्तानं डॉ. मिलिंद कुलकर्णींचं, अगदी थेट याच जातकुळीचं 'कोकणचो डॉक्टर' आठवतं. डॉ. रवी बापटांचं 'वॉर्ड नंबर पाच, केईएम', आणि डॉ. नाडकर्णींची 'गद्धेपंचविशी' आणि 'वैद्यकसत्ता', डॉ. अभय बंग यांचं 'माझा साक्षात्कारी हृदयरोग', डॉ. सुलभा ब्रह्मनाळकरांचं 'डॉक्टर म्हणून जग(व)ताना', आणि डॉ. लीला गोखले यांचं 'माझी गोष्ट'देखील. मराठीत सुसंस्कृत सहृदय डॉक्टरांनी लिहिण्याची परंपराच आहे म्हणायची. त्यात डॉ. अभ्यंकर शोभून दिसतात, असं वाटलं.
पण डॉक्टर अभ्यंकरांचं सर्वांत भारी लेखन माझ्या लेखी त्यांचं ते 'आपुले मरण' उघड्या डोळ्यांनी आणि धीट विवेकानं पाहणारं आणि त्यातही आपला मिश्कील सूर न सोडणारं अजरामर टिपणच आहे. त्यात बदल होणे नाही.
फादर टेरेसा आणि इतर वल्ली
डॉ. शंतनू अभ्यंकर
समकालीन प्रकाशन
प्रथमावृत्ती २०१९

No comments:

Post a Comment