Monday, 4 September 2023

इतक्यात वाचलेली पुस्तकं : एका श्वासाचं अंतर

अंबिका सरकारांबद्दल निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. पोटच्या तिन्ही मुलांचा मृत्यू पाहावा लागणं. अर्थशास्त्राचं अध्यापन. सळसळता उत्साह. गौरी देशपांडेशी असलेली मैत्री आणि तिच्या तोंडचं ‘माझी अंबू’ हे संबोधन. ‘द रीडर’चं अंबिकाबाईंनी केलेलं भाषांतर. ते भाषांतर आणि सिनेमा या दोन गोष्टी अजिबात वेगळ्या न काढण्याजोग्या एकमेकींवर सुपर इंपोज झाल्यासारख्या होत्या डोक्यात.
पण या सगळ्या ओळखी ओलांडून त्यांची ओळख माझ्या डोक्यात कायम ‘एका श्वासाचं अंतर’ लिहिणारी लेखिका अशीच राहील.

कथानक अगदी साधं सरळ आहे त्या कादंबरीचं. एक कमावती बाई. एक मुलगा झाल्यानंतर नवर्याच्या नादानपणाला कंटाळून वेळीच घटस्फोट घेते. लोकांची बरीवाईट, शहाणी-कुजकी बोलणी झेलते, पचवते. दुसरं लग्न करते. संसार करते, यथाशक्ती निभावते. मरून जाते. यापल्याड त्या पुस्तकात विशेष सांगण्याजोग्या घटना नाहीत. पुस्तक संपल्यावर हे जाणवतं, तेव्हा चकित व्हायला होतं. कारण या सरळसाध्या आयुष्यात किती काय-काय प्रवास घडतात त्या बाईचे! जराही मेलोड्रामा न वापरता, उत्कटतेचे रंग गडद न करता, माणसांना काळ्या-पांढर्या रंगांमध्ये न रंगवता, स्त्रीवाद या शब्दातला ‘स’ही न उच्चारता, तटस्थतेचा आव न आणता – आयुष्याबद्दलच बोलणारी गोष्ट इतक्या परिणामकारकपणे कशी काय लिहू शकतं कुणी, असं वाटतं.
यातली सगळीच पात्रं हाडामांसाची माणसं आहेत. नायिकेचा दुसरा नवरा – बाप्पा, त्यांचा अश्राप चांगुलपणा आणि तरीही कुणापर्यंतच न पोचता येण्यातला अभागीपणा बघताना पोटात तुटतं. मुलाचं - कार्तिकचं - आईवर उत्कट प्रेम आहे. आणि तरी एक प्रकारचा हट्टी आक्रसलेपणाही आहे. तो त्याला आईपल्याड कुणापर्यंतच धड पोचू देत नाही. त्याच्या बायकोचा - रेखाचा - स्वतःचा असा इतिहास-भूगोल आहे. त्यातून येणार्या तिच्या धारणा आहेत. त्यांची नि तिच्या नवर्याच्या स्वभावाची अशी काही करकचून गाठ बसलेली आहे, की संसार सोन्यासारखा, नातं घट्ट, दोन गोजिरवाणी मुलं, एकमेकांबद्दल प्रेमही आहे - पण कुठेतरी काही विस्कटून बसलेलं...
या सगळ्या गुंत्याकडे नायिका साक्षीभावानं पाहते. तिला त्या-त्या वेळी दुःखं होतात, राग येतो, माया वाटते, काळजी वाटते. पण त्यापल्याड बघणारी नजर तिच्यापाशी आहे. त्यानं सगळ्यांमधली असूनही ती निराळी होते.
तिच्या ऑफिसातल्या एका सहकार्याचं – नवलकरचं - एक पात्र कादंबरीत आहे. मनमोकळेपणी चावट कोट्या करणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, भरभरून जगणारा असा तो माणूस. त्याच्या बोलण्यामुळे त्याच्यापासून फटकून राहिलेल्या नायिकेला एका क्षणी त्याच्या वाह्यात बोलण्यापल्याडची खरीखुरी आस्था, जगण्यावरचं प्रेम जाणवतं. धागा जुळल्यासारखा होतो, काहीतरी चमकून गेल्यासारखं होतं.
तिथेच लेखिका थांबते.
आपण थांबून अर्थ लावू पाहतो, पण गोष्ट पुढचं वळण घेते.
असे अनेक क्षण गोष्टीत येतात. अर्थपूर्णता आणि निरर्थकता यांच्यातला लपंडाव घडत राहावा, माणसांनी सर्वस्व पणाला लावून जगू पाहावं आणि भ्रमनिरास व्हावा, पण काहीतरी सापडल्यासारखंही व्हावं. थबकून काही चिमटीत धरू पाहण्याआधीच आयुष्यानं पुढचं वळण घ्यावं - असे ते क्षण. बघता-बघता निसटून जाणारे, जगण्या-मरण्यातलं अंतर दाखवून देणारे.
हे अनलंकृत, जिवंत, कसलाही आव न आणणारं, शहाणं पुस्तक लिहिणारी लेखिका म्हणून अंबिकाबाईंची जागा कायम मनात राहील. त्यांना आदरांजली.
एका श्वासाचं अंतर
अंबिका सरकार
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९०

No comments:

Post a Comment