Wednesday, 6 September 2023

मराठी नट्या ०२

आपण दुसऱ्या कुणाला दमदाटी करताना वरच्या दाताखाली खालचा ओठ आवळतो आणि डोकं खाली झुकवतो झटक्यानं, तसं करणारा एक टारगट दादागिरी-भाव रसिकाच्या चेहऱ्यात लपलेला आहे, असा कायम भास होई मला. बघता बघता ती 'क्या बे?' असं म्हणून टगेगिरी करायला लागेल, असं वाटायला लावणारा. मी तिची जी-जी कामं पाहिली, त्यांतली बहुतांश या छटेच्या जवळची होती म्हणूनही असेल. पण ते तितकंच नव्हतं. तिच्या व्यक्तिमत्त्वातच ते काहीतरी होतं असावं.

तिचं 'उंच माझा झोका गं' हे नाटक माझ्याकडून हुकलं. मग एकदम 'प्रपंच'मधली अलकीच. त्या भूमिकेतली रसिका डोक्यात गच्च रुतून राहिली. एकत्र कुटुंबातली मुलगी, नाटकात रस असणारी, स्वतंत्र मतं असलेली, ती बेदरकारपणे मांडायला न कचरणारी, रूढार्थानं बाईपणाच्या झुली चढवायला नकार देणारी, ढगळ्या पुरुषी शर्टपॅंटीत वावरणारी. त्या भूमिकेत 'तसं' काहीही नव्हतं, पण मला कायम ते काम बघताना तेंडुलकरांच्या 'मित्रा'ची आठवण यायची मात्र. मित्रामधली बंडखोरी अलकाच्या भूमिकेत होती. 'सुरणाची भाSजी'चा सूर लावणारी, "आई, अगं एकवीस वर्षांचीय फक्त आपली लतिका. लग्न?" म्हणून कळवळणारी, मंग्यासोबत लग्नाविषयी बोलताना-न बोलताना तिच्या नेहमीच्या नुराला न साजेसा कोवळा गोंधळ घालणारी अलका मला कायम आधी आठवते. रसिकाच्या सगळ्या आठवणीतच अलकाची आठवण वेगळी न काढता येईलशी विरघळून गेली आहे, असं जाणवतं. 

त्याच सुमारास तिचं 'सुपरहिट नंबर वन' नाटक पाहिलं. त्यात ती आणि उपेंद्र दोघं अतिरेकी होते! तिच्या त्या रावडी कामानं तिची प्रतिमा ठसलीच माझ्या डोक्यात. 'व्हाइट लिली नाइट रायडर' पुष्कळ नंतरचं. त्यातलं तिचं काम निराळं होतं. पण तोवर मीही बंडखोरीच्या वयातून त्या भूमिकेच्या वयाच्या जरा जास्त जवळ गेले होते, म्हणूनही असेल. अतीव आवडलं ते लेखन आणि कामही. जोडीदार नको असं नाही, पण आर्थिक-सामाजिक तडजोडी करण्याची गरज संपल्यामुळे, इंटरनेट स्मार्टफोन्ससह बहुमितीय ओळखींशी झगडत असल्यामुळे... जोडीदार शोधताना निराळ्याच अडचणी पेलणारी आमची पिढी. त्याबद्दलचं ते नाटक आवडलं. आणि त्यातली रसिकाची आडमुठी-किंचित छुप्या प्रकारे हळवी लिलीही आवडली. इतकी आवडली, की रसिका गेल्यानंतर सोनाली कुलकर्णीनं केलेलं ते काम बघायला मी परत गेले, पण कपाळाला आठ्या घालूनच. जणू दोष शोधायलाच. पण सोकुनं त्या भूमिकेला दिलेल्या छटा इतक्या वेगळ्या नि ताज्या होत्या की आवडलं ते काम. पण रसिकाशी निष्ठा इतकी, की 'हं, चांगलं केलंय.' असं ग्रजिंगलीच मान्य करता आलं.

'एक हसीना थी' आला नि रसिका हिंदीतच शिरली. त्या कामासाठी तिची निवड 'सुपरहिट नंबर वन'चा प्रयोग बघून झाली होती असं कळल्यावर मलाच उगाच जाम भारी वाटलेलं. कारण जेमतेम आठदहा प्रेक्षक असलेल्या चार-पाच प्रयोगांतला एक मी पाहिलेला. तिला हिंदीत बिनधास्तपणे वावरताना बघून जाम बरं वाटायचं, 'अर्थात! ती नाही तर कोण!' असं वाटायचं. 'भूलभुलैया'तली केरसुणीनं हूल देऊन अक्षय कुमारला हाकलायची ॲडिशन तिनं घेतलेली असणार आणि सेटवर लोक हसून वेडे झाले असणार, असं मला पाहताक्षणी वाटलं होतं. अजूनही वाटतं. 

पण हिंदीतली रसिका नंतरच्या काळातली. त्याआधी 'प्रभात' नामक एका मराठी वाहिनीवर तीच बारा-पंधरा नाटकं आलटून पालटून लागायची काही वर्षं. त्यात रसिका असलेलं 'गंमत-जंमत' हे नाटक असायचं. त्यात किती प्रकारच्या भूमिका केल्या होत्या तिनं! त्या टीव्हीवर पडीक असल्यामुळे मनमुराद बघता यायच्या. त्यातली तिची 'राड्डो'चं घड्याळ मिरवणारी नवश्रीमंत महिला आणि दाताच्या फणी पुढे असलेली बाई विशेष आठवते. त्यात तिची रेंज दिसे. चकित वाटायचं या जाडजूड देहाच्या, आडव्या बांध्याच्या मुलीचा आत्मविश्वास आणि शरीरावरची पकड बघताना. 'खबरदार'मध्ये ती संजय नार्वेकरची आई होती. कष्टकरी नऊवारी पातळ आणि कजागपणा यांचं मिश्रण रसिकाला कायच्या काय शोभून दिसलं होतं. 

नाटक चालू असताना फोनवर बोलणाऱ्या नि बोलता बोलता चक्क स्टेजवरच्या रसिकाला हातानं 'एक मिनिट हं, झालंच.' अशी खूण करणाऱ्या एका प्रेक्षकाची तिनं हतबल संतापानं केलेली, अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमातली नक्कल थोर होती. या विषयावर ती आणि तिचा नवरा एक स्वतंत्र प्रयोग सादर करू शकतील कदाचित, असं वाटून गेलं होतं.

एकदा आशियाई चित्रपट महोत्सवाच्या दिवसात 'प्लाझा'बाहेर रेंगाळताना मला रसिका नि मुक्ता दोघी एकदम सुटकेसा खरेदी करताना दिसल्या. मला इ त क्या बेहद्द आवडणाऱ्या दोन नट्या एकत्र समोर बघून काही सुचलंच नाही बोलायला. तसंही जाऊन सांगणार काय, 'तुम्ही किती भारी आहात!' असं?! मग त्या दोघी प्लॅस्टिकचं हसू हसणार. नकोच ते. असं वाटून मी उलट फिरून तिथून निघून गेले. 

रसिका गेल्याचं कळल्यावर बाकी कशापेक्षाही माझी मेजर चिडचिड झाली होती. That was not fair. तिला किती काम करायचं होतं अजून. याला काय अर्थ होता? तिला कुणीतरी उलटी दमदाटी करून थांबवून घ्यायला पाहिजे होतं. पण तिला दम देणारं होतं कोण?

1 comment:

  1. ती माझी गुरु होती. तिला कळलं असतं तर बेरकी नजरेने माझ्याकडे हो? शेंडे? गुरु? असं म्हणून हसली असती. पण होती. कमाल. खूप सुंदर लिहिता तुम्ही..

    ReplyDelete