Wednesday, 6 September 2023

मेहंदी से जला के उंगलीयाँ...

आमच्या इमारतीबाहेर कुंपणबिंपण होण्याच्या पूर्वी तिथे मेंदीची झुडपं होती. त्याची पानं वाटून एखाद्दोनदा हाताला बांधण्याचा उपद्व्याप केलेला आठवतो. पण आमची खरी भिस्त मेंदीच्या तयार कोनांवरच असायची. ते कोन चांगले आहेत ना, असं दुकानदाराला चारचारदा विचारून मग आणायचे. नि तरी तो अडकायला लागला तर, म्हणून सेफ्टीपिना, टाचणी, एखादं फडकं, सेलोटेप असा सगळा सरंजाम तयार ठेवायचा. तेव्हा आयते कोनही तसे अपूर्वाईचेच होते पण. बाबांची चित्रकला चांगली असल्यामुळे त्यांच्याकडून आईनं मेंदी काढवून घेतल्याचीही मला आठवण आहे. पण त्यात काही रोमॅंटिक वाटायची ऐवजी आईचा चिकित्सकपणा, भेंडी वाटून घातल्यामुळे अतिरिक्त तार आलेली मेंदी, हिरकुटाची हजारदा मोडणारी काडी आणि त्यामुळे एकंदर कावलेले बाबा, इतकीच अंधुक आठवण. पुढे बरेच दिवस त्या प्रकरणाचा शेष रोमान्स पुरला असावा. कारण मग अनेक वर्षं काडीनं मेंद्याबिंद्या काढल्याचं मला आठवत नाही. एकदम कोनच आठवतात. पण ते ठाण्यातल्या दुकानांतून सर्रास नि खातरीचे मिळायला लागण्यापूर्वी ट्रेनने येणार्या कुणालातरी कुर्ल्याच्या स्टेशनबाहेरच्या मार्केटातून आणायला सांगत असू. मेंदी आणि मुसलमान धर्म यांची अस्फुट का होईना – जोडी जुळल्याची ती एकमात्र आठवण. बाकी मेंदी कायमच आसमंतात होती. नि बायकी नटमोगरेपणा वगळला , तर तिच्याशी इतर कसले लागेबांधे नव्हते. धार्मिक तर नव्हतेच नव्हते. एनिवे.


तर कोन. काही हौशी नि कुटीरोद्योगी लोक मेंदीचे कोन घरी करत असत. मेंदीची भुकटी पातळ कापडातून जमेल तितक्या वेळा गाळून घेणे, मग ती एकही गुठळी राहू न देता उकळून गार केलेल्या चहाच्या पाण्यात भिजवून ठेवणे, भिजवताना त्यात लिंबाचा रस – तोही गाळून! – घालणे – मग ती पेस्ट दुधाच्या पिशवीच्या कोनात भरून सेलोटेपनं तो बंद करणे... असा सगळा खटाटोप असायचा. मेंदीच्या क्लासला जाऊन तोही मी एखाद-दुसर्या वेळा यशस्वीपणे केला आहे. पण हळूहळू बाजारानं ती गरज संपवली. तरी मेंदी हा एक उपक्रम असायचा. दुसर्या दिवशी रविवार हवा. कोन तर हवेतच. कापूस. निलगिरीच्या नाहीतर लवंगेच्या तेलाची एखादी चिमुकली कुपी. लिंबाचा रस आणि साखर यांचं संपृक्त द्रावण. शिवाय घरात लवंगा आहेत ना हे बघून ठेवायचं. मेंदीचं एखादं पुस्तक. तेव्हा ‘लोकप्रभा’ आणि ‘साप्ताहिक सकाळ’ वर्षातून एकेकदा मेंदी विशेषांकही काढायचे. ते जपून ठेवलेले अंक. मग कुठलं डिझाईन कुणाला ते ठरवायचं. शेजारच्या काकी कलाकार. त्यांना ते दाखवून त्यांच्याकडून अप्रूव करून घ्यायचं. नि मग रात्री काकी पेंगायला लागेस्तो मेंदी प्रकरण सुरू. हाताला निलगिरीचं तेल लावून घ्यायचं. काढताना हात हलवायचा नाही, मेंदी काढल्यावर वाळेस्तो वाकवायचाही नाही. मेंदी किंचित सुकू लागली की मग अलगद कापसानं लिंबूसाखरेचा पाक लावायचा तिला, की मग ती हाताला घट्ट चिकटून बसते. आधीच हातावर रेखाटलेली ओली मेंदी काहीच्या काही सुंदर दिसते. त्यात तो साखरेचा द्राव तिच्यावर बसला की तिला चकाकी चढायची. हाताकडे बघत राहावं वाटायचं. कोयर्या, वेलबुट्ट्या, ग्रेसफुली वळलेले ग आणि ह ल्यालेल्या वेली, पाना-फुलांचे नाना प्रकार, हंस, मोर, चक्रं, शंख, हत्ती... यांचीच कॉम्बिनेशन्स असलेल्या नक्ष्या. चोचीत चोच घातलेले हंस बघताना मला अगदी टिपिकल बायलट वाटायचं, ते बहुधा या सगळ्या चित्रांमधला स्टिरिओटिपिकल बायकी नाजूकपणा जाणवल्यामुळेच असावं. पण हाताला वळणच इतकं पडलं, की आता कागदावर डूडल काढतानाही असलंच काहीतरी हातून उमटतं. पुढे कधीतरी एकदा कोयरी हे स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक आहे हे ऐकल्यावर मी अवाक झाले होते. आश्चर्य, चिडचिड, आणि मग पुन्हा वळून तो डौलदार आकार हट्टानं रिक्लेम करण्यासाठी झगडणं. एनिवे! नि हो, एका हातावर दुल्हा नि एका हातावर घुंगटातली दुल्हन असंही एक असायचं. दोन्ही हात एकमेकांशी जोडून त्याची ओंजळ केली, की ते एकमेकांकडे बघताना दिसणारे, असा लग्नाच्या अल्बममधला एक फोटोही ठरलेला असायचा. हल्ली काय असतं काय कळायला मार्ग नाही. पण हे दुल्हा-दुल्हन डिझाईन मात्र स्ट्रिक्टली फ-ह-क्त-ह नवर्यामुलीसाठी. तिच्या मेंदीत नवर्याचं नाव लिहायचं नि मग नवरा सुहागरातीला ते शोधेल असाही एक भाबडा संकेत मनात अनेक वर्षं होता. नवर्याचं वा प्रियकराचं प्रेम असेल तर मेंदी रंगते, हा विड्याच्या बाबतीतला कॅरीड फॉर्वर्ड संकेत मात्र आमच्या विश्वात शिरला नव्हता. एखादीची मेंदी अती रंगली (“अय्या! हिची काळी झाली बघ!”) तर ‘काय हीट आहे गं तुझ्या अंगात.’ इतपतच आमची धाव. ती मेंदी रंगावी म्हणून कोण कर्मकांडं. मेंदी वाळून पडून जायच्या आत साखरेचं पाणी तर झालंच, पण आधी निलगिरीही त्याचसाठी. झोपताना हात अलगद उशाकडे वर ठेवून झोपायचं. तोही पालथा नाही! उठल्यावर सगळीभर मेंदीचे कणकण पडलेले असायचे नि बाबा वैतागायचे. ती मेंदी काढून टाकतानाही सुरीबिरीनं खरवडून काढायची. पाणी लावायचं नाही. चुन्याच्या पेस्टचा एक थर द्यायचा. मग लवंगा तव्यात तापवून त्यावर हात शेकवायचे. जमेल तेवढा वेळ हात न धुता वावरायचं. कुणाची किती रंगली, ते तपासून बघायचं.

माझ्या आजूबाजूला कुठेच मुलगे नव्हते. मावसभाऊ होते, पण ते मेंदीच्या खटाटोपात अजिबात नसायचे. त्यामुळे एखाद्या मुलाला हे सगळं बघून मेंदीचं अप्रूप वाटतं का, मेंदी काढून घ्यावीशी वाटते का, नि मग बाकीचे लोक त्यांच्याशी कसे वागतात, ते मला बघायला मिळालं नाही कधीच. पुढे एकदा एका गे मित्रानं कौतुकानं मनगटावर मेंदीनं काढलेली काकणं दाखवली होती, तेव्हा त्याच्या गे असण्याशी हे जोडलं जाईल का हा प्रश्न मला पडल्याचा आठवतो. पण हळूहळू आपण लिंगभावाबाबत निदान शहरांतून तरी तसे बर्यापैकी खुले होत गेलो आणि मेंदी मागे पडत गेली. आपण खुले झालो हे ठीकच. पण मेंदी मागे पडली हे जरा खटकतं. मला तिच्याबद्दल कधी कसली अढी नव्हती. तिला स्त्रीत्वाचे लागेबांधे लगडलेले असूनही आणि मला स्त्रीवादाचे वारे लागल्यानंतरही मला मेंदी मनापासून आवडायची. लग्नाची मेंदी काढून पहिली कमाई करण्यापासून ते सख्ख्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आधल्या दिवशी मेंदी काढताना दोघींनीही उद्यापासून बदलणार असलेल्या परिस्थितीचा ताण वाटून, कंटाळून ‘मरो मेंदी’ असं म्हणत गप्पाच मारत बसण्यापर्यंत अनेक प्रकारे मेंदी आयुष्यात होती. आहे.

कोरड्या, ओल्या, नंतर रंगलेल्या मेंदीचा – असे तीन स्वतंत्रपणे ओळखू येणारे धुंदावणारे गंध. हातांवरून वाहत असल्यासारखे दिसणारे ते डौलदार आकार. रंगण्या-न रंगण्याबद्दलची उत्कंठा. सगळंच बेहद्द आवडायचं. आवडतं. ‘बेहनों ने रौशनी कर ली, मेहंदी से जला के उंगलीयाँ’ ही 'पिंजर'मधली ओळ ऐकल्यावर हटकून रंगलेल्या मेंदीचा आतून उजळल्यासारखा दिसणारा केशरी रंग आठवायचा नि तो रंग पाहिला की कधीही तीच ओळ मनात उमटायची. ‘गीली मेहंदी की खुशबू’ लिहिणारा गुलजार मित्रासारखा वाटायचा, त्याचं तेही एक कारण असणारच, इतकी मला मेंदी प्रिय.

आत्ता काही श्रावण नाही. पण श्रावणात लिहायला बसलं तर हे अजूनच क्लिशेड वाटणार आहेच. म्हणून आत्ताच मनात आल्याक्षणी let's indulge म्हणत निखळ नॉस्टाल्जियाला शरण जाणं.

No comments:

Post a Comment