Wednesday 6 September 2023

मराठी नट्या ०१

नटांच्या अभिनयाबद्दल भरभरून लिहितात, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. नटी म्हटलं की मधुबाला-टाईपचं सौंदर्य आठवण्याची प्रथा आहे. पण मराठीत कसली एकाचढ एक नट्यांची परंपरा आहे! नि रूढ सौंदर्यबिंदर्य राहिलं बाजूला – बघणार्या माणसावर फुंकर टाकून मंतरून टाकणारा अभिनय नि वावर नि व्यक्तिमत्त्व असलेल्या नट्या. रेंज आणि इंटेन्सिटी आणि सूक्ष्मातिसूक्ष्म भाव दाखवण्याची क्षमता वागवणार्या. शबाना आझमी ‘Why actress? I am an actor.’ म्हणते तसं त्यांना नट्या न म्हणता कलाकार म्हणावं नि लिंगभेदासह येणारी कमनीय सौंदर्याची अपेक्षा साफ पुसून टाकावी, असा मोह होतो.
~
लीना भागवत त्यांपैकी एक. माझी कायमची तक्रार आहे, की आपण लीना भागवत या बाईच्या अभिनयकौशल्याचं पुरेसं अप्रूप बाळगलेलं नाही, कौतुक केलेलं नाही. मी कमी ठिकाणी पाहिलं आहे तिला. सगळी मिळून तीन नाटकं. त्यांतलं एक तर रेकॉर्डेड. टीव्हीवरच्या दोन-तीन मालिका. पण माझ्यावर त्या बाईनं जादू केली आहे.


रूढ अर्थानं सुंदरबिंदर तर ती नाहीच. काळीसावळी बाई. खळी पडते तिला. पण त्या खळीकडे लक्ष्य जावं, अशी कामं तिनं केलेली पाहिली नाहीत. ती कायम सर्वसामान्य मुलगी वा बाई असते. ‘अधांतर’मध्ये तिनं मंजूची भूमिका केली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळ. निवर्तलेल्या गिरणी कामगाराचं घर. मंजूचा नवराही गिरणीकामगार. पण ती आणि नवरा दोघेही आईकडे राहत असलेले. फटकळ, स्ट्रीटस्मार्ट मंजूला आईनं बिजवराकडे उजवून दिल्याचा सल आहे. पण आपलं आपण बघावं लागतं ही स्वार्थी जाणीवही. गाऊनमधला वावर, बोलता-बोलता फणकार्
यानं केसांचा अंबाडा बांधून टाकायची लकब, कोकणी ब्राह्मणेतर घर मुंबईच्या चाळीत वसलं की तोंडी येणारी बोली... लीना भागवतनं केलेल्या मंजूखेरीज दुसर्या कुणालाही डोळ्यासमोर आणणं शक्य नाही. अर्थात, हे ‘अधांतर’च्या सगळ्याच पात्रयोजनेबद्दल तितकंच खरं आहे, पण त्यानं भागवतबाईंचं पुण्य कमी होऊ नये. ‘नाय’चा तिचा उच्चार आणि जहाल नजर या दोन्ही गोष्टींना तुलना नाही. असंच तिचं काम ‘पाऊस येता येता...’ या मराठी मालिकेत बघितलं होतं. माझ्या आठवणीनुसार दैनंदिन साबणवड्या सुरू होण्याच्या जस्ट आधीच्या दिवसांतली ती मालिका होती. त्यातही ती एका कनिष्ठमध्यमवर्गीय विवाहितेचं काम करत असे. आपल्या बहुधा फेमिनिस्ट नणंदेला उद्देशून तिनं उच्चारलेलं “राह्यलं. फडकवा – स्त्रीस्वातंत्र्याचे झें-डे!” हे वाक्य मला अजुनी आठवतं. त्यातली तुच्छता, जाणतेपणा, राग... सगळंच एकमेवाद्वितीय होतं. तशीच तिनं पालेकरांच्या ‘कैरी’मध्ये केलेली मोलकरणीची भूमिका. किती कमी संवाद आहेत तिला! पण तिचा नुसता वावर – चवचालपणा, नागडा स्वार्थ, देहाचा पुरेपूर वापर करणारी मानसिकता, नायिकेच्या नवर्याला पदराला गुंडाळून घेतल्याचा ताठा... या सगळ्याचा गाळीव अर्क तिच्या वावरात आहे. लीना भागवत पडद्यावर दिसत असली की ती तीन-पदरी मंगळसूत्राची फॅशन आणणार्या जान्हवी नामक नायिकेची मालिकाही मी चुपचाप थांबून बघायचे. नवर्याच्या आत्यंतिक प्रेमात असलेली, पण सासूच्या धाकामुळे त्याला चोरून भेटत असणारी, भाबडी, धांदरट, प्रेमळ बाई अशी तिची भूमिका होती. लीना भागवत त्या फडतूस मालिकेतले काही क्षण बहारदार करून सोडायची. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतलं तिचं काम याच धाटणीचं होतं. मध्यमवयीन, संसारी, प्रेमळ गृहिणीचं. निव्वळ लीना भागवत – मुक्ता बर्वे एकत्र दिसल्यावर काय होईल, या उत्सुकतेपोटी ती मालिका बघितली जायची. तेंडुलकरांच्या ‘अशी पाखरे येती’चा नव्या संचातला प्रयोग मी पाहिला होता. त्यात ती सरू होती. नि काय होती! अहाहा...

ती होती म्हणून तिचं नि मंगेश कदमचं काम असलेलं एक नाटक बघायला गेले. त्यात हे थो हो र ह जोडपं मंचावर काहीतरी बोलत होतं. मग शशांक केतकर नावाची नुकतीच मराठी मालिकेतून लोकप्रिय झालेली एक पुटकुळी येऊन स्टेजवर फुटली. लोकांनी प्रेक्षागारातून ‘श्री! श्री!’ – हे त्याचं मालिकेतलं नाव – अर्थात – अश्या चकित-भारावलेल्या हाका मारल्या नि आपण अशा प्रेक्षकांत असायची लाज वाटून मी उठून आले. असो.

अजूनही ‘भाडिप’ची डोक्यात जाणारी कांदेपोहे-स्फुटमालिका बघितली जाते, त्याला कारण ही बाई. कर्तृत्वाचा काही संबंध नसता निव्वळ राहत्या शहरामुळे आलेला आत्मविश्वास, आगाऊपणा, भोचकपणा, मानभावीपणा... लीना नाही दाखवणार तर कोण?!

‘दिल के करीब’मध्ये सुलेखा तळवलकरनं तिची एक मुलाखत घेतली आहे, त्यात ती मंगेश कदम आणि तिच्या लग्नाविषयी, तिच्या कामाविषयी, कामाविषयीच्या तिच्या दृष्टीकोनाविषयी बोलते. ती मुलाखत बघून अलीकडच्या काळात लीना भागवत बघण्याची माझी तहान काही अंशी शमली. पण तिला तिच्या स्वभावामुळे तिच्या योग्यतेचं काम मिळत नसणार, असंही वाटून गेलं. तिनं आजवर जे केलंय त्याहून वेगळं काही न केलं, तर तिच्यावर आपल्याला जे येतं, तेच करत राहिल्याचा आरोप होऊ शकेल. तिचा वकूब पुष्कळ आहे. तिनं नि मराठी नाटक-सिनेमावाल्यांनीही ओळखावा तो.

No comments:

Post a Comment