Thursday, 10 October 2013

सूरजको मैं निगल गया....

खालच्या या जुन्या पोस्टनंतरही बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. पण कृतज्ञता आहे तशीच. तुझ्यासोबत एक आख्खं युग बघायला मिळाल्याबद्दल.
बाकी प्रश्नोत्तरं होत राहतील. शंकाकुशंका, आरोपप्रत्यारोप, आकडेवारी आणि भूमिकांचं विच्छेदन... होवो.

तूर्तास फक्त एक कृतज्ञ सलाम. मजा आणलीस यार, भरभरून!

सांग ना, काय वाटतं आहे तुला आत्ता?

***

ही कदाचित हे सगळं बोलण्याची योग्य वेळ नाहीय. कुठल्याही बाजूनं बोललं तरी त्याला एक विशिष्ट रंग येण्याचे हे दिवस.

बॅडपॅचचे दिवस. ’सो कॉल्ड’ उतरणीला लागण्याचे दिवस...
वेल... लेट्स नॉट गो इनटु दॅट. ऍट्लीस्ट आत्ता नको. मग ते सगळं आहेच...

एक्झॅक्टली काय वाटतं आहे तुला आत्ता?
येस. ’अभी वहाँ का माहौल कैसा हैं?’ या आचरट प्रश्नाइतकाच हाही एक क्वालिफाईड बिनडोक प्रश्न आहे. मान्य. पण तरी तो पडला आहे मला निरागसपणॆ.

त्या कुठल्याश्या इंग्लंडातल्या पोरीनं तुझ्या जिगरबाज खेळावर फिदा होऊन तुझी ’पापी’ घेतली होती तेव्हा काय वाटलं होतं असेल तुला एक्झॅक्टली, हाही प्रश्न पडतोच की मला. किंवा बाबांना अग्नी देऊन पुढच्या विमानाने परत खेळायला जाणं जरा अमानवीच नसेल वाटलं का तुला, हाही प्रश्न पडतोच मला.
मला हक्क आहे तुला हे आणि असले कितीही बिनडोक प्रश्न विचारण्याचा.

कारण?

कारण अजुनी कोणाला काय आणि किती आचरट वाटेल याचा विचार न करता - किंबहुना तो केला तरी ’काय वाटायचं ते वाटू दे, गेले खड्ड्यात...’ असं म्हणून - तुझ्यावरची निष्ठा स्वत:लाच सिद्ध करून दाखवायला म्हणतेच की मी - "सचिनची शप्पथ - "
किंवा
जुनी मॅच तर सोडाच; पण बिस्किटं किंवा बाईक किंवा अंडी किंवा कसल्याही जाहिरातीत जरी तू दिसलास की रिमोटवरचा हात थांबतोच.
किंवा
’जिनियस काय चाटायचंय?’, ’जिंकून दिलंय का त्याने कधी इंडियाला?’, ’सगळा पैसा हो हा..’ यांपैकी कुठलीही कमेण्ट कितव्यांदाही ऐकल्यावर अजूनसुद्धा अकरावीतल्या भाबड्या पोरासारखी मुद्देसूदपणे भांडायला मी तोंड उघडतेच.
किंवा...
जाऊ दे. मुद्दा काय, तर मला हक्क आहे. माझा मीच तो स्वत:ला देऊन घेतलाय.

तर... काय वाटतं आहे तुला आत्ता?

’अरे जा रे... काय वाट्टेल ते तोंडसुख घ्या आणि वाट्टेल तेवढे जळा. पण त्याला टीमच्या बाहेर बसवायची कुणाच्या बापाची टाप नाही...’ हा माझा कॉन्फिडन्स फोल ठरल्यावर मलाच इतकं भ्रमनिरास झाल्यासारखं, आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय -
तुला काय वाटतं आहे आत्त्ता?

की तुला काहीच फारसं वाटत नाहीय या सगळ्याचं? फक्त एक बॅडपॅच आणि पुन्हा सारं होणार आहे तसंच पहिल्यासारखं एकसंध?

आय डाउट...

स्वत:ला बदलताना आरशात दिसत नसलात, तरी रोज थोडे थोडे - रेषेरेषेनं बदलत असताच की तुम्ही . तूही बदलत गेला आहेस तसाच.


परत एकदा कर्णधारपद घेतलंस तेव्हा.

परत एकदा नाईलाजानं ते उतरवून ठेवलंस तेव्हा.

एखाद्या कारकुनासारखं तोंड वेंगाडून भूखंड मागितलास तेव्हा.
लोकांची मुक्ताफळं तोंड मिटून सहन करत बॅटनं बोलायचं अजून घट्ट ठरवत गेलास तेव्हा.

आणि चिखलफेक सहन न होऊन अखेर तोंड उघडलंस तेव्हाही.

तुझ्यापासून तू पुष्कळ पुढे आला आहेस आता. नाही?

’सूरजको निगलनेवाले सभी’ पुढे येताना अशीच आग ठिणगी-ठिणगीनं हरवत येतात का रे? की उरतो तरीही त्यांच्यात एखादा धपापता जिगरबाज स्फुल्लिंग?

तुझ्यातही आहे? आहे का रे?

सांग ना - काय वाटतं आहे तुला आत्ता?

9 comments:

  1. कोहम, धन्यवाद!
    योगेश, मला नाही वाटत तो गॉड आहे असं. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहीत असतं, की तसं कुणीच देव नाहीय आपल्या आजूबाजूला. पण तसं कुणीतरी आहे असं समजायला आवडतं आपल्याला. मग सचिन किंवा अमिताभ गॉड होतो.
    त्याला तरी कुठे चुकल्या आहेत पण आपल्याला कराव्या लागणाऱ्या तडजोडी? प्रकार, व्हॉल्युम आणि इण्टेन्सिटी वेगळी असेल फार तर.

    ReplyDelete
  2. chhan lihilayes. tyane tyachya manavar faar motha oza ghetalaye. to purvi sarakha nirbhiD, tyachya manacha raja rahila nahiye, yachi khantt vaTate.

    te adrushya oza tyane utaravun thevala, tar nidan shevaT tari goDD karun nivrutt hovu shakel to.

    Amen!

    ReplyDelete
  3. Ekdum chhan lihile ahes tu Meghna! Ani Yogesh la lihilela abhipray dekhil khup chhan!
    Asach lihilel vachayala avadel

    ReplyDelete
  4. Meghana, Cricket ha maza bhaltach avadata vishay - aani Sachin la mi hi eke kaali God manaycho - almost throughout my entire teenage years till the last cuople of years - but last couple of years have been extremely disappointing - agadi mazya manatale lihile aahes tu ! Uttar fakt tyalach mahit aahe. THanks for sharing this. Liked it, really.

    ReplyDelete
  5. @अभिजीत
    सुम्मामेन!

    @नीरज, रणजीत
    थॅन्क्स.
    :)

    ReplyDelete
  6. सचिन म्हटलं की आपलं कोणीतरी जवळचं असं चित्र लगेच मनात उभं राहतं. अमर्याद आनंद देण्याखेरीज त्याने दुसरं काय केलंय? लता, किशोर, आशा यांसारख्यानी गाण्यांच्या क्षेत्रात जे केलं तेच सचिननं क्रिकेटम्ध्ये. त्यामुळे लाराने विचारलेला प्रश्न "डिड आय एन्टरटेन यू?" सचिननं विचरला तरी उत्तर येसच येणार. सचिनने मारलेला प्रत्येक शॉट अप्रतिम असतो त्यातली नजाकत हेडन आणि ढोणी वर्गीय खेळाडूंमध्ये कुठून येणार?


    मला सचिनवर बिनबुडाचे आरोप करणार्‍यांबद्दल काय म्हणायचंय ते इथे लिहिलं आहेच.

    http://artiligent.blogspot.com/2006/03/what-boooo-means_20.html

    ReplyDelete
  7. काल सचिन खेळला आणि मला तुझ्या लेखाची आठवण झाली. म्हटलं आज आपल्यसारखा अजून एक सचिनभक्त प्रचंड सुखावला असेल. शतक नाही झालं तरी चालेल पण धावा निघत राहो..सचिन तू आम्हाला सर्वोच्च आनंद देतोस.

    ReplyDelete