Tuesday, 29 October 2013

माझ्या मनातला का...

आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक.

शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार फार जवळचं, आत्मीय वाटलं.



मराठी वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधे अभिनेत्रींनी संवेदनशीलपणे इत्यादि लिहायची आपली समृद्धबिमृद्ध परंपरा आहेच खरी म्हणजे. पण ’कित्ती साधेपणी’ लिहिलं नि जपलेले संस्कार + तरल सर्जनक्षमता दाखवली, तरी त्या लिखाणातली अभिनेत्री काही केल्या लपत नाही असा अनुभव. लिखाण वाईट असतं असं नव्हे, पण ’कित्ती झालं तरी मी पडले नटीऽऽ’चा सूर पार्श्वभूमीला असतोच. या बाईच्या लिहिण्यात मात्र तिचं अभिनेत्री असणं गायबच आहे. खरं तर या लेखांमधले सगळे अनुभव तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या कामाच्या काठाकाठानं जाणारे. कधी शूटिंगच्या धावपळीत मनसोक्त / आवर्जून / सोसासोसानं / हौसेनं / चोखंदळपणे केल्या जाणार्‍या खरेदीबद्दल नि वस्तुसंग्रहाबद्दल लिहील. कधी शूटिंगच्या धावपळीत सहकलाकारांच्या नि निर्मात्यांनी खिलवलेल्या तृप्त करणार्‍या भोजनाबद्दल ऐकवेल. कधी शूटिंगच्या धावपळीत आपल्या घरापाशी थांबून राहिलेल्या, गळक्या भिंती-आवरायचा माळा-धुवायच्या चादरी वागवत समजूतदारपणे आपली वाट पाहणार्‍या आपल्या घराबद्दल सांगेल. कधी शूटिंगच्या धावपळीत मनापासून काम करताना, एखाद्या सिरियलमधल्या जिवाजवळच्या होऊन गेलेल्या एखाद्या भूमिकेबद्दल हळवी होईल. कधी शूटिंगच्या धावपळीत....

पाहिलंत?! शूटिंग हे तिचं आयुष्य आहे. तुमचं-आमचं ऑफीस असतं, शाळा असते किंवा घरकाम असतं, अगदी तस्संच. त्यातल्या शोकेसी झगमगाटाचा पदर तिनं मुळी पांघरलेलाच नाही. सांप्रतच्या धावपळीच्या, रोज नवे मोह पाडणार्‍या, स्पर्धेच्या मायाजालात आपलं निखळ-नितळ असणं जपू पाहणारी ती एक बाई आहे, बास.

तिची संवेदनशीलता (आयला, या शब्दाच्या तर...!) पुरेपूर महानगरी आहे. म्हणजे सोईस्कर, घडी घालून ठेवता येणारी, थोडीश्शी बेगडी? अहं. महानगरी संवेदनशीलता म्हणजे अनावर आणि अनावश्यक कढ न काढता, भावुकतेच्या उंबर्‍याच्या अलीकडे थांबणारी. पुरेशी कॉस्मोपॉलिटन होत गेलेली, समजूतदार, स्मार्ट, ग्लोबल.

तिचं ललित गद्य वाचताना मी नव्यानं ताजी होत गेले. नसेल तिच्या विस्कळीत ललित लेखनात गोष्टीच्या रचनेचं कौशल्य. पण म्हणून काय झालं? कशी मस्त प्रसन्नता, गाढ समजूत, ताजी कोवळीक आहे... याबद्दल तिचे आभार कसे मानणार? नाटकाच्या रंगपटात जाऊन, आपल्याच अनाकलनीय संकोचांच्या निर्‍या आवरत ’तुमचं लिखाण फार आवडतं बरं का मला’ असं अवघडत म्हणून टाकणं माझ्याच्यानं काही व्हायचं नाही. तिच्यातल्या दिलखुलास लेखिकेलाही ते अन्यायाचंच. म्हणून माझं खुशीपत्र हे इथंच.

मज्जा आली. लिहीत र्‍हावा. 

3 comments:

  1. Pahilyandach tuze likhan wachatye, ya blogs warache posts wachun jhale. ajun kahi blogs asatil tar pls link de ani pls kadhi jamal tar mala yawar marathi kase type karayach te shikav ge muli.... ha majha ek adanipana ahe ki te mala jamatach nahie. (read adaani as adaan....pana)

    ReplyDelete
  2. स्नेहल:
    :)
    मनस्वी:
    धन्यवाद! मी जुन्या पोस्ट्स नुकत्याच पुन्हा माळ्यावरून काढल्यात आणि उजव्या बाजूला इतर ब्लॉग्सचे दुवेही मिळतील. मी देवनागरीत लिहायला baraha वापरते. आता बरहा फुकट मिळत नाही बहुधा. पण गमभन नावाचं एक सॉफ्टवेअर फुकट मिळतं. यांचे कीबोर्ड शिकायची भानगड नाही. ’क’साठी k, इतकं सोपं. कुठल्याही मराठी संस्थळावरही, त्यांची फोनेटिक कीबोर्ड कसे वापरावेत याबद्दल मार्गदर्शन करणारी पानं असतात. सहज कळेल.

    ReplyDelete