Monday, 1 June 2020

लायब्र्यांचे‌‌ दिवस २




आपल्या हक्काच्या शहरात असताना नाक वर करून, भवतालाला गृहीत धरून, आपल्याच तंद्रीत सुखेनैव चालणारी माणसं परक्या शहरात पडल्यावर जशी व्याकूळपणे आपल्या गावच्या खुणा हुडकत असतात; तसं होऊन मी बंगळूरच्या लायब्रीत गेले. आपण कुठल्यातरी अमराठी ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात जायचं आहे या कल्पनेनीच माझी नांगी इतकी मोडली होती, की गावढ्या गावातून तालुक्याच्या जागी चालत येण्यापूर्वी आठवून आठवून पिशवी भरणार्‍या एखाद्या कष्टकरी महिलेप्रमाणे वेळेआधी फोन करून, आज नक्की लायब्री उघडी असेल ना हे तीनतीनदा विचारून मी तिकडे मोर्चा वळवला. 
त्यांच्याकडे नाव नोंदवताना मात्र क्याटलॉगात नजर फिरवून घेतली आणि 'अरेच्चा! 'बाइंडर' आहे यांच्याकडे शाबूत!', ''नातिचरामि'ही घेतलंय अं? वाईट नाही. तसे अद्ययावत दिसतात.', ''मी भैरप्पा''! हे कधीचं राहिलंय वाचायचं...' अशा जिभल्या चाटत आणि मनोमन शेरेबाजी करतच विचार पक्का केला. तशी पुस्तकं बदलायला मुख्य शाखेत क्वचितच गेले असेन. कारण घराजवळ पंचवीस रुपये रिक्षाच्या अंतरात एक काकू ट्रंक भरून पुस्तकं आणून पोटशाखा चालवतात अशी माहिती मिळाली आणि मग एकशेपंचवीस रुपये रिक्षाला देणं अर्थातच मागे पडलं. पण सुमारे दोन-अडीच वर्षं वापरली ती लायब्ररी. आपल्या शहरात नसताना वीकान्ताचे रकाने भरून काढणं खरं दमवणारं असतं हा साक्षात्कार होता-होताच मला लायब्रीचा शोध लागलेला. त्यातही माझं मराठी नाक मनातल्या मनात सदैव वर असे. 'महाराष्ट्राबाहेर गोठवलेली मराठी जपणारे डबकीय लोक हे, नाईलाज आहे म्हणून वाचायचं झालं!' असा एक उगाचच्या उगाच आढ्यताखोर फणकारा असायचा. पण नाही म्हणता म्हणता मी चिकार नवं कायकाय वाचलं त्यांच्याकडे. 
सुरुवातीला त्यांच्या 'गेटेड कम्युनिटी'तल्या चकचकीत ड्युप्लेक्स फ्लॅटमधून ट्रंकभरून पुस्तकांची शाखा चालवणार्‍या काकूंची जिम्मा मीही पुलंच्याच असंवेदनशीलतेनं 'अतिविशाल' क्याटेगरीत करून टाकली होती. अर्थात - त्यांच्याही बाजूनं अढी कमी नसणार. कधीच एका शब्दाहून अधिक बोलायच्या नाहीत. शोधक नजरेनं बघायच्या मात्र मी काय वाचतेय ते. हळूहळू 'अमकं वाचलंय का?' इथवर प्रगती झाली होती, इतकंच. विशीच्या अल्याडपल्याडच्या पोरी खिदळत पुस्तकं न्यायला येतात, त्या काय डोंबल वाचणारेत, ओसरेल खूळ... अशी दबा धरून बसलेली, पन्नाशीच्या अल्याडपल्याडची, कमावलेली खातरी त्यांनाही असणारच. मी आपली हे सगळं नोंदूनच्या नोंदून वर खांदे उडवून खुशाल असे. दर चारेक महिन्यांनी तेवीस किलोंमधले पंधराएक किलोतरी मी पुस्तकांकरताच वापरत असे, ती काय उगाच होय! परिणामी वर्तुळात सावध अंतरावरून एकमेकींसमोर गोल फिरत एकमेकींचा अंदाज घेणार्‍या आणि क्वचित दात विचकून मग पवित्रा बदलणार्‍या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे आमची एकंदर पुस्तक देवघेव चाले. 
यात फरक पडला, तो विभावरी शिरूरकरांचं 'खरे मास्तर' हे पुस्तक मी उचललं तेव्हा. हे पुस्तक मला तोवर भेटलं नव्हतं. विभावरी शिरूरकरांचं 'कळ्यांचे निःश्वास' हे एकच पुस्तक ठाऊक. अत्यंत विपरित परिस्थितीत जिद्दीनं आपल्या लेकींना शिकवणार्‍या आणि मग त्यांचे पुरोगामी निर्णय पचवणार्‍या गरीब मास्तराची स्तिमित करणारी आधुनिक ओळख वाचून मी अतिशय अतिशय हरखून गेले. 


त्या आनंदात देवघेवीच्या पुढच्या शनिवारी माझ्याकडून अधिकचं वाक्य सुटलं, "काय सुरेख आहे पुस्तक!" यावर काकूंनी हातातला मटा खाली करून चश्मिष्ट नजर माझ्याकडे वळवली. हसू नाही. नुसती सावधपणे जोखणारी नजर. एक क्षण माझ्या काळजाचा ठोका चुकला असणार बहुतेक. पण मग हसल्या हलकंसं. नकळत हुश्श झालं मला! तेव्हापासून त्या आवर्जून एखाद्दुसरं वाक्य उच्चारायला लागल्या दर शनिवारी. सुचवायला लागल्या क्वचित एखादं पुस्तक. 
तितकीच ती मैत्री. कोणत्याही आबदार ग्रंथपालाशी हवी तितकीच आणि तशीच. काकू क्वचित हॉलमध्ये गवार मोडत असल्या, क्वचित यजमानांना सूचना देत असल्या - तरी त्या होत्या अंतर्बाह्य ग्रंथपालच, हे मी स्वीकारून टाकलं. तिथला मुक्काम संपतानाही त्या मैत्रीत विशेष भावनात्मक देवाणघेवाण झाली नाही. 'चाललात का? अच्छा.' इतपतच संवाद. 
पुढे पुष्कळ वर्षांनी एका दिवाळी अंकातला लेख वाचून काकूंनी आवर्जून वाचल्याचं कळवलं. 'वाचला. कुठे असता?' उत्तर. पूर्णविराम. इतकाच संवाद. पुढचा फापटपसारा नाही! मग मी त्यांचं ग्रंथपालपद अजूनच पक्कं करून टाकलं. 

०१ । ०२ । ०३ ०४ । ०५

No comments:

Post a Comment