Thursday, 4 June 2020

लायब्र्यांचे दिवस ४

शाळेत असतानाची बहुतेक वर्षं घरातल्यांचा मुख्य जाच जर काही असेल, तर तो म्हणजे हक्काची लायब्ररी नसणे. लहान मुलांची पुस्तकं पुरेनाशी झालेली आणि मोठ्यांची पुस्तकं वाचायला सेन्सॉर बोर्ड. परिणामी कुणीतरी भेट दिल्याशिवाय, कुण्या जबाबदार जाणत्या माणसानं सुचवल्याशिवाय, वा आईबापांनी वाचून संमत केल्याशिवाय पुस्तकं हाती लागत नसत. पण पुस्तकांकरता तर मी सदैव बुभुक्षित असे. आणि तत्कालीन मराठी लोकांच्यात सोज्ज्वळ संस्कार करू शकणारं साहित्य म्हणून मान्यता पावलेली पुस्तकंच आधी आणि अल्लाद हातात पडत. अर्थात माझी त्यांबद्दल तक्रार नव्हती. तेव्हा मिळेल ते सगळंच गोड लागण्याचे दिवस होते. पण त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या, चरित्रं, आत्मचरित्रं… असला निवडक कडबाच आधी हातात मिळत गेला, असं आता लक्ष्यात येतं. 

'स्वामी' ही कादंबरी बरी आहे की वाईट आहे ही चर्चा आपण बाजूला ठेवू. पण शाळकरी मुलांनी ती वाचावी का, याचं उत्तर मला आज निस्संदिग्धपणे हो असं देता येत नाही. सती जाण्याचं उदात्तीकरण वाईट हा तथाकथित 'फुरोगामी' मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी त्या गोष्टीत यत्ता पाचवी-सहावीतल्या मुलीला भावण्यासारखं काय आहे? वाचणारी माणसं - मग ती वयाने कितीही लहान का असेनात - ती त्यांच्या क्षमतेनुसार दिसेल ते ते भक्ष्यत सुटतात, शोषून घेतात आणि काहीतरी अंगी लावून घेतातच हे जरी खरं असलं, तरी मी काही आज पौगंडवयीन मुलांना ही कादंबरी सुचवणार नाही. नि हे तरी 'स्वामी'बद्दल झालं. 'ययाती'? का? का? का? पण 'स्वामी', 'मृत्युंजय', 'ययाती' या तीन एकमेकांशी साहित्यप्रकाराच्या अंगाने आणि साहित्यिक काळाच्या अंगानेही अर्थाअर्थी संबंध नसलेल्या आणि कुठल्याही प्रकारे मुलांसाठी नसलेल्या कादंबऱ्यांचं त्रिकूट अगोचर वाचणाऱ्या मुलांना सुचवण्याची प्रथा आजही मराठी माणसांच्यात आहे.


तशी शाळेला सुरेख लायब्ररी होती. पण ती मुलांसाठी वापरण्याची मात्र प्रथा नव्हती. बहुतकरून शिक्षकच तिचा वापर करत. शाळेच्या सगळ्या मिळून दहा वर्षांत एकदा कधीतरी कुणा तरुण शिक्षकांनी ऑफ तासाला एकेक पुस्तक हातात देऊन वाचा, अशी ऑफर दिल्याची आठवते. एरवी पुस्तकांनी खचाखच भरलेल्या कपाटांकडे आशाळभूतपणे फक्त पाहणे. माझ्या पालकांची शाळेत ओळख असल्याकारणे मला लायब्रीचा फायदा मिळे. पण तिथेही काही विशिष्ट पुस्तकंच थोर मानली जात. आणि तीही मिळायची, ती फक्त दिवाळीच्या वा उन्हाळ्याच्या सुट्टीत. आमच्या शाळासमूहामध्ये इतरही काही शाळा होत्या. पालकांच्या ओळखीचा फायदा घेऊन मी त्यांच्याही लायब्र्या पालथ्या घातल्या. सगळीकडे माझ्या वाचनाचं एक पारंपरिक आणि अपरंपार कौतुक - जे मी पथ्यावर पाडून घेऊन त्याचा नीट वापर करायला शिकले - आणि माझ्यावर संस्कार घडवण्याची एक जबाबदारी घेऊन वावरणारे लोक भेटत. मग रत्नाकर मतकरींचं 'ॲडम' चुकून माझ्या हाती लागलंच, तर कसनुसं होऊन ते घाईघाईनं काढून घेणे, 'पॅपिलॉन' मी वाचावं की नाही याबद्दल भवति न भवति होऊन माझ्या मनात त्याबद्दल अतीव उत्सुकता निर्माण करून ठेवणे, चरित्रांमुळे चांगले संस्कार होतात या समजुतीपायी हाती लागतील ती चरित्रं माझ्या हाती कोंबणे… असल्या लिळा होत.

उन्हाळी सुट्ट्यांच्यात लायब्ररी 'लावली', तरीही तिथेही हा प्रश्न उद्भवेच. मला अधिकृतरीत्या उपलब्ध असे, तो बालविभाग. आणि त्यात मी कसाबसाच जीव रमवून घेई. मग्रसंसारख्या अवाढव्य लायब्रीच्या बालविभागातही भारा आणि इतर काही मंडळीच कसाबसा किल्ला लढवत असत. तीही जेमतेम दोन बाय दोन फुटाच्या लाकडी खोक्यात. तुका म्हणे त्यातल्या त्यात तेच ते उचकत त्यातून मनाजोगतं वाचायला शोधताना चरफडाट होई. 

पण त्यामुळेच मी काय वाट्टेल ते वाचायला लागले. हे चांगलं झालं की वाईट झालं हे मला आजही ठरवता येत नाही. बालसाहित्य असं काही आखीवरेखीव, मापात-चौकटीत, बांधीवतोलीव असावं का, असतं का, या प्रश्नाचं उत्तरही मला कुठल्याच बाजूनं ठामपणे देता येत नाही ते त्यामुळेच असावं.


०१०२ ०३ । ०४ । ०५


1 comment:

  1. Nice :)

    Fortunately I got hold of Satara Nagar parishad library in highschool and read everything I can. My father is also a bibliophile and voracious reader, so we always had some books available at home to read and he allowed me to read anything and everything in those days.

    ReplyDelete