लायब्री म्हटल्यावर वास्तविक पुस्तकं आठवावीत. पण माझ्या गावातल्या मग्रसंच्या बाबतीत पुस्तकं ही एक गृहीत धरलेली बाब आहे. सरकारी लायब्र्यांमधली पुस्तकं जुनाट, पिवळी पडलेली, जीर्ण, फाटकीतुटकी असतात, वाचावीशी वाटत नाहीत… वगैरे राजपुत्री तक्रारी करणार्या लोकांशी वाद घालण्याच्या अजिबात फंदात न पडता – अर्थात. असल्या लोकांना बहुतकरून ‘मी आजवर १७३ पुस्तकं वाचलीत’ वगैरे हिशेब ठेवायची सवय असते आणि जनरली ते ‘दिल चाहता है’मधल्या सुबोध-कॅटेगरीत मोडतात. असल्यांच्या तोंडी कुठला शहाणा मनुष्य लागेल? असो. डायवर्जन लांबलं. तर, त्यांच्या फंदात न पडता – मी सरकारी लायब्री हा माझ्या वाचनाचा मुख्य स्रोत ठरवून सुखी झाले खरी.
उदाहरणार्थ, त्यांच्याकडची पुस्तक निवडण्याची व्यवस्था. पुस्तकांना थेट हात लावून, पान पलटून, मलपृष्ठावरचा मजकूर वाचूनबिचून पुस्तकं निवडण्याची जगन्मान्य पद्धत मग्रसंला मान्य असत नाही. साधारण चपला-बूट ज्या खोकांतून मिळतात, त्या खोक्यांच्या आकाराचे लाकडी खोके आणि त्यात पुस्तक, लेखक, किंमत, पृष्ठसंख्या इ. नोंदलेली पोस्टकार्डाच्या आकाराची आडवी कार्डं. पुस्तकांचं वर्गीकरण – उदा. कादंबरी, संकीर्ण, कविता, नाटक, निबंध, चरित्र... – दर्शवणारा एक मोठा पुठ्ठा खोक्याच्या पाठीशी उभा खोचलेला. असे वीस-पंचवीस खोके टेबलावर हारीनं लावलेले. लोकांनी या खोक्यांमधली कार्डं पेटीच्या भात्यासारखी ओढून वाचत आपल्याला हवी ती दोन – दोनच हं, लाडात यायचं नाही – कार्ड निवडून काउंटरवर नेऊन द्यायची. मग देवघेव विभागातला कर्मचारी ती कार्ड घेऊन मागच्या कपाटांच्या रांगांत गडप होणार. जर पुस्तक तुलनेनं नवं असेल, तर त्याला फार खोल सुळकांडी मारावी लागत नाही. पण जर ते पुस्तक बाबा आदमच्या जमान्यातलं असेल, तर बुडी मारण्यापूर्वी मारक्या म्हशीसारखा एक कटाक्ष भेटीदाखल दिला जातो. आपण अपराधी लोचटपणानं तस्सं उभं राहायचं. ती पुस्तकं गहाळ नसतील, तर ती तुमच्या पुढ्यात यथावकाश दाखल होतील. मग त्यांतलं एक निवडून घ्यायचं. तुम्ही पुस्तक नेलंत की निवडलेलं कार्ड आत जमा होतं, जेणेकरून ते लायब्रीत परत जमा होईस्तो इतरांना लोकांना निवडता येऊ नये. व्यवस्था चोख. पण एकदा घरी नेलेल्या पुस्तकात खुपसलेली दुसर्याच कुठल्यातरी पुस्तकांची दोन कार्डं हाती आल्यावर या व्यवस्थेतला घपला माझ्या लक्ष्यात आला. आपल्याला आवडतीलशी तीन कार्डं एकदम मिळाली, तर चक्क ती लांबवायची, म्हणजे मग पुढचे तीन दिवस कार्ड हुडकायचे कष्ट नकोत! हे भलतंच आवडूनही मला ही ट्रिक वापरायचा धीर काही कधी झाला नाही! आमची मजल आपली सगळ्या खोक्यांमधली कार्डं पलटून ‘शास्त्र चुंबनाचे’, ‘लक्ष्मी, लक्ष्मी, कुठे चाललीस?’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ आणि तत्सम नावं माफक मोठ्यांदा वाचून दाखवून खुसफुसण्यापर्यंतच.
दर साली दिवाळी आटपून महिना-दोन महिने उलटले की दिवाळी अंक विकून टाकण्यासाठी लागणारा मग्रसंचा बंपर सेल ही त्यांच्या खाती जमा असलेली एक रोमहर्षक बाब. दहा आणि पंधरा रुपयांत मिळणारे दिवाळी अंक ही माझ्या विद्यार्थी खिश्याकरता चैनीची परमावधी होती. कित्तीतरी वर्षं मी या संधीत अक्षरशः हात धुऊन घेतले. महिनाभराचं वाणसामान आणण्याच्या दोन दणकट खाकी पिशव्या घेऊन मी लुटीला जाई आणि गोड ओझं वागवत हवेवर तरंगतच घरी पोहोचे.
पारंपरिक आणि जुन्या घरांना पडव्या-पोटपडव्या पाडून वाढवल्यामुळे त्यांना जसे विशिष्ट भोंगळ-प्रेमळ-अमिबाई आकार आलेले असतात, तशा आकारांच्या अघळपघळ इमारतींतून गावातल्या मग्रसंच्या दोन्ही शाखा नांदत. त्यांची उंच कौलारू छतं, वर्षानुवर्षांच्या वापरानंच होऊ शकतात तसे गुळगुळीत झालेले लोणकट लाकडी जिने, जुन्या शहाबादी फरश्या, लोकमान्य टिळकांची आठवण करून देणार्या संस्थापककालीन देणगीदारांच्या काळ्यापांढर्या तसबिरी, उंच पाठींची लाकडी बाकडी, तिथे बसणारी रिकामटवळी पेन्शनर मंडळी, तिथल्या सभागृहांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिथे हमखास भेटणारे गावातले उत्साही लोक, रुक्षपणाचा साक्षात अर्क म्हणावा असा कर्मचारिवर्ग, अपरिहार्यपणे त्यांच्याशी भांडणं केल्यावर ‘फूंक फूंक के रखने पडनेवाले कदम’ नि ओळख झाल्यावर होणारे लाड... आणि सरतेशेवती तिथली कितीकांनी शेरेबाजी केलेली, चिताडून ठेवलेली, पुन्हा पुन्हा बांधणी केल्यामुळे ओळीतल्या शेवटच्या शब्दापर्यंत पोचण्याकरता हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार्या नृसिंहाचा अवतार घ्यायला लावणारी, जुनी, नवी, पिवळी, पांढरी, फाटकी, गुलाबी बायंडिंगातली,… अक्षरशः अंतहीन पुस्तकं... हे सगळं मी पुरेपूर उपभोगलं.
लायब्री जुन्या इमारतीत नांदत असताना, इमारतीच्या बाहेरून काढलेला एक डुगडुगता माडीवजा जिना संदर्भविभागात नेत असे. तो साक्षात स्वर्ग होता. तिथलं बुटकं छत, जुन्या कपाटांच्या अंतहीन रांगा, तिथे भरून राहिलेला अस्सल जुन्या पुस्तकांचा धुळकट वास, पाणी प्यायला भीती वाटावी असा एक प्राचीन माठ, शंभरेक वर्षांच्या कालखंडात जमा होत गेलेली निरनिराळ्या आकारांची नि शैलीतली लाकडी नि धातूची खुर्च्या-टेबलं, नुसतं नावं नोंदून सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट्टेल ती पुस्तकं वाचत बसण्याची मुभा...
अलीकडे काही कामानिमित्त नव्या इमारतीच्या संदर्भ विभागात गेले असता तिथे बॅंकेच्या कॅशियर काउंटरला लाज आणेल असा एक जाळीदार-कुलूपबंद-अद्ययावत काउंटर, अनेक कॉम्प्युटरांचे जुनाट डबे ठेवल्यामुळे सगळ्या संदर्भविभागाला आलेली स्वस्त सायबर कॅफेची कळा, आणि ‘बाहेर बसण्यासाठीच्या जागा संपल्या आहेत, पुढच्या वर्षी प्रयत्न करावा’ ही पाटी पाहिली.
मी अक्षरशः हाय खाऊन परतले.
No comments:
Post a Comment