कागदी पुस्तकांशी असलेलं पातिव्रत्य सोडून मला पहिला व्हर्चुअल व्यभिचार करायला लावला तो हॅरी पॉटरच्या अखेरच्या भागानं. जगभर पुस्तक प्रकाशित झालंय, लोक वाचतायत, पण आपल्याला वीकान्तापर्यंत प्रत मिळणार नाही हे असह्य होऊन मी मिळेल तिकडे सॉफ्टकॉपी हुडकायला सुरुवात केली. 'शोधेल तो पाणी चाखेल' या इंटरनेट ॲक्टान्वये मला ती मिळालीही. फक्त रिक्षा, ट्रेन, टॅक्सीतच नव्हे, तर हापिसातही राजरोस पडफ उघडता येणे या फायद्याची चव कळल्यानंतर तर मला पापाची चटकच लागली.
पायरसी चूक की बरोबर या वादात मी पडणार नाही. त्याची उत्तरं ज्यानंत्यानं आपापली शोधावीत, समर्थावीत आणि पचवावीत. मराठी पुस्तकांवर मिळकतीचा अमुक एक हिस्सा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे महाशहरातल्या इंच-इंच-लढवू घरातली तमुक इतकी जागा खर्चत असताना इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत तरी आपण थोडा बाहेरख्यालीपणा करावा अशी सूट मी मात्र मला देऊन घेतली आणि मग कायच्या काय एकेक मरुद्यानं सापडत गेली. इंग्रजीतलं माझं बहुतांश वाचन चाटकॉर्नरीच असे आणि असतंही. त्यामुळे मला कागदी प्रतींची तहान नसे. तरी मधूनमधून 'हारून ॲण्ड दी सी ऑफ स्टोरीज्' किंवा 'हॅंडमेड्स टेल'सारखी गाळीव रत्नं सापडतच. मग 'हे पुस्तक तरी कागदी हवंच आपल्याकडे' असं वाटून कागदी पुस्तकं घरी येत. माझ्या इंग्रजी वाचनात अशी माणकं विरळा असल्यामुळे जागेचं कसंबसं निभलं म्हणायचं.
पण पुस्तकांच्या बरोबरीनं ब्लॉग्स, टम्ब्लर्स, फॅनफिक्स असं वाचन वाढत गेलं, तसतशा निराळ्या अडचणी सतावायला लागल्या. खरं फॅनफिक्स हे अस्सल ऑनलाईन वाचन. पण त्यातही काही फॅनफिक्स इ-त-क्या आवडल्या, की मी चक्क पानाला आठाणे देऊन त्या छापवून नि बांधवून घेतल्या. अर्थात, हा अंमळ चोचलाच म्हणायचा. तो अपवादात्मक म्हणून सोडून दिला नि कागदी साठेबाजी रद्दबातल मानली, तरी सतत अद्ययावत होणाऱ्या ऑनलाईन गोष्टींचा माग काढणे आणि आपल्या संदर्भासाठी त्यांच्या नोंदी ठेवणे ही एक गरज होऊन बसली. गूगलचा रीडर होता तोवर चिंता नव्हती. तिथे एकदा ब्लॉगलिंक डकवली, की तो इमानेइतबारे खबरबात आणि दप्तरखानाही राखून असे. पण गूगलच्या 'खपतं ते विकणार नाही' या पुणेरी धोरणानुसार रीडर अंतर्धान पावला आणि पंचाईत व्हायला लागली. मग आपली कस्टमाइज्ड व्यवस्था आपली आपण राखणं आलं. बरं, पुस्तकांच्याही बाबतीत इंटरनेटवर फक्त पायरेटेड सॉफ्टकॉप्याच मिळत असं नव्हे. हळूहळू प्रताधिकार कायद्याबाहेर निसटलेल्या अनेक जुन्या मराठी-इंग्रजी पुस्तकांच्या प्रतीही ठिकठिकाणी चढवल्या जायला लागल्या. दर काही महिन्यांनी 'अमक्या ठिकाणी बराच माल आला आहे' अशी टीप कुणीतरी समानधर्मी देई आणि मग बरेच दिवस तिथला माल हुडकत बसण्यात नि इतरांना वेचक मालाच्या खबरी पुरवण्यात जात. 'किशोर'सारख्या मासिकानं आपलं सगळं जुनं दप्तर जालावर आणलं, तेव्हा तर 'घेता किती घेशील दो करांनी…' अशी अवस्था. काही हौशी आणि संचयी मित्रांच्या सल्ल्यानं ड्राइव्हवरची चकटफू जागा वापरून या सरकारी मालाचा ब्याकप घेण्याचेही धंदे केले. हो, अनेक पारिभाषिक कोश देणारं एक सरकारी संस्थळ अकस्मात दगावलं किंवा काही दिवस इंटरनेटवर वसून मराठी 'चांदोबा' एकाएकी पंचतत्त्वांत विलीन झाला, तसे फट म्हणता अंक गायबले म्हणजे हो?
पण असल्या व्यवस्था करूनही - योग्य वेळी योग्य लिंका आणि योग्य पडफस्रोत हाती लाभण्याकरता माणसांवर अवलंबून राहण्याला पर्याय नाही, हे माझ्या लक्ष्यात यायला लागलं, ते वाचन अद्ययावत राखून असणाऱ्या काही शेलक्या व्हर्चुअल मैत्रांच्या मागावर राहिल्याचे फायदे भोगल्यावर. त्याच सुमारास एका टम्ब्लर लेखिकेचं एक टपोरं सुभाषित नजरेस पडलं. ही लेखिका व्यवसायानं ग्रंथपाल. फॅनफिक्स लिहिणं, वाचणं, वेचक गोष्टींच्या शिफारशी करणं आणि त्यांबद्दल गप्पा छाटणं हा छंद. तिच्या मते अचूक हॅशटॅग लिहिणं आणि डकवणं हे परीकथेतल्या ब्रेडक्रम्स टाकत आपला माग सोडण्याच्या क्लृप्तीसारखंच कौशल्याचं आणि मोलाचं असतं. किंबहुना हे ज्याला जमलं, तो आजच्या युगातला ग्रंथपालच.
हे वाचून मान डोलावली. इथल्या अमूर्त ग्रंथालयांबद्दल नि अनामिक ग्रंथपालांबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढची लिंक क्लिकवली.
No comments:
Post a Comment