Friday 9 October 2020

आपण सगळे?

स्त्रीवादी ही एक शिवी आहे आता.
किंवा टिंगलटवाळीकरता वापरायचा शब्द.
किंवा आपल्याला उद्देशून कुणी वापरला,
तर अंगावरची पाल झटकावी तसा झटकून टाकायचा शब्द.
किंवा आपल्या हक्काचं काहीतरी मागताना
'मी तशी नाही, फक्त..' असं स्पष्टीकरण देऊन लपवून ठेवायचा शब्द.
स्त्रीमुक्ती हा शब्द वापरताना मला बांधलेले हातपाय सोडवून घेत असल्यासारखं बावळट वाटायचं. 
म्हणून मी हळूहळू हा शब्द आपलासा केला,
तिथून इथवर कसे आलो आपण?
नक्की काय नकोसं झालं आपल्याला आपल्यातलं?
नि आता इथून हाथरसपर्यंत कसे पोचणार आपण?
आपण सगळे?

Sunday 4 October 2020

आस्वादकाच्या मेंदूतलं घड्याळ आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी

कुठलीही गोष्ट वाचता-ऐकता-बघताना माझ्या डोक्यात एक अत्यंत कस्टमाइज्ड घड्याळ कम् कॅलेंडर चालू होत असतं. उदाहरणार्थ, १९२८ साली घडतीय का ही गोष्ट? बरं. पण १९२८ म्हणजे? या आकड्यांनी मला काहीच बोध होत नाही. म्हणजे भाऊआजोबा प्लेगातून मरता मरता वाचलेलं ते वर्षं. आत्या झाली होती, पण काका नि बाबा व्हायचे होते. नि गावात विजेचा पत्ता नव्हता. नि महायुद्धपण व्हायचं होतं ना पहिलं? की झालंवतं? च्यायला, कधी झालं पहिलं महायुद्ध? मरो. आलं लक्ष्यात. इतकं सगळं झर्रकन त्या घड्याळात वाजून जातं. नि मsssग गोष्टीला नेपथ्य-प्रकाश मिळून ती पुढे चालू होते. 
गोष्ट वाचताना ती कुठे घडतीय हे आपोआप रंगतं डोक्यात. आपण अगदी लहानपणी बघितलेल्या घरांचा नि जागांचा तोंडवळा असतो तिला. नि मजा म्हणजे प्रमाणंही त्या-त्या वयात भासलेलीच असतात. परदेशात घडणाऱ्या गोष्टी डोक्यात रचताना आपण कुठलं नेपथ्य घेतो हे मुद्दाम पडताळून पाहिलंय मी. तिथेही आपल्याला ठाऊक असलेली देशी घरंच चक्क मेकप् करून अवतरतात. उदाहरणार्थ, 'चौघीजणी' वाचताना माझ्या डोळ्यांसमोर ते साकारतं ते माझ्या आजोळच्या शेजाऱ्यांच्या घरात. का? तर बहुधा शांताबाई शेळक्यांच्या भाषांतरात चुकून आलेला पानगी हा शब्द मला त्या घरी घेऊन जात असावा, म्हणून. 
किंवा, वाचताना डोळ्यांसमोर येणाऱ्या माणसांना तोंडावळे कुठले मिळतात? तर नव्व्याण्णव टक्के वेळा असे तोंडावळे न मिळताच डोकं काम भागवून नेत असतं. पण जर गोष्टीला रेखाटनं सोबत करत असतील, तर त्या रेखाटनांना गोष्टीपासून वेगळं काढताच्च येत नाही. मला प्रतापगडावरच्या भुयारात अडकलेला फास्टर फेणे एका विशिष्ट पोजमध्ये काटकिळ्या तंगड्या दाखवत नि तांबारलेल्या डोळ्यांनी बघत असलेलाच दिसतो. आता किती निरनिराळी चित्रं नि चित्रपट त्यावर सुपरइम्पोज् करायला बघितलं, तरी अहं. वाईरकरांचा फाफे फिट् झालेला आहे, त्याला हलवणं ब्रह्मदेवाच्या बापालापण शक्य नाही. जेव्हा रेखाटनं नसतात, तेव्हा बरेचदा मला गोष्टीतली माणसं पाठमोरीच वावरताना दिसत असतात. त्यांची अंगयष्टी उभी राहते कल्पनेतून. पण चेहरा? चक्. जेव्हा चेहरे मिळतात, तेव्हा ते हमखास कुठल्यातरी नाटकासिनेमात दिसलेल्या नटांचे असतात. त्यांच्या निवडीचा गोष्टीशी कसलाही तर्कशुद्ध संबंध नसतो. माझ्या मेंदूनं जणू समोरच्या बावन्न पत्त्यातलं या चेहऱ्याचं पान ओढलं असावं, इतका शून्य तर्काधार.
या असल्या चमत्कारिक गोष्टी पुस्तकांच्याच बाबतीत नव्हे. सिनेम्यांच्याही बाबतीत घडतात. 'रंगीला'मधलं 'हाय रामा' आताची मी ऐकते, तेव्हा आताची मी एकदम कॉलेजातली मी होते. पातळ गुलाबी कागदाची बाल्कनीतली तिकिटं काढून धावत धावत सिनेमा बघायला पोचलेली. तेव्हाच्या मला येणारे वास, तत्कालीन मित्रमैत्रिणींसोबतचे संबंध, तेव्हाचे मूड्स, गंड, संकोच, आनंद... सगळं एकदम आतल्याआत कुणीतरी फिल्म चालू करावी तसं चालू होतं आणि मी त्यातलं माझं पात्र रंगवत असते. 
काही काही सिनेमांना माझी एखादी तत्कालीन आठवण चिवटपणे चिकटून बसलेली असते. उदाहरणार्थ, 'टायटॅनिक' बघताना मला का-य-म आम्ही सहकुटुंब सहमावसपरिवार आबालवृद्धांसकट हौसेनं सिनेमाला एकत्र गेलो होतो नि जॅक रोजचं चित्र काढतो तेव्हा भयंकर अवघडून बसलो होतो, हे आठवतंच आठवतं. आताही ऐन सीन बघता बघता त्या बिचाऱ्यांचा रोमान्स मनात सुरू व्हायच्या आधी ती अवघडलेली आठवण येते नि मग डोक्यातल्या डोक्यात स्वतःला हाकलत सिनेमात शिरावं लागतं. 
असं सगळं अत्यंत कस्टमाइज्ड होत असतानाही आपण सिनेम्यांची नि पुस्तकांची परीक्षणं वाचून अमुक काहीतरी आपल्याला आवडेल वा नावडेल हे कस्काय बॉ ठरवणार, असं वाटायला लागून समीक्षकांना गुरू मानणं सोडून दिलं आणि त्यांना सहप्रवासी मानलं, तेव्हापासून मी अत्यंत सुखी झाले - असंही एक आठवतं. ही आठवण कधीची हे मात्र नीटसं आठवत नाही.